भाजणे-गांभीर्य  आणि उपचार...

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 7 मार्च 2022

आरोग्यभान

मानवी शरीराशी अग्नीचा संपर्क आल्यावर त्याच्या त्वचेवर होणाऱ्या परिणामांना सर्वसाधारणपणे ‘भाजणे’ ही संज्ञा वापरली जाते. भाजणे हे दुखापतींचे, तसेच शरीरात निर्माण होणाऱ्या विकृतींचे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या गंभीर परिस्थितीचा विचार करता, त्याच्या उपचारांबद्दल सर्वांना त्याबाबत किमान प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. 

मानवी शरीराशी अग्नीचा संपर्क आल्यावर त्याच्या त्वचेवर होणाऱ्या परिणामांना सर्वसाधारणपणे ‘भाजणे’ ही संज्ञा वापरली जाते. भाजण्याच्या मुख्य कारणांमध्ये काही गोष्टींशी येणारे संपर्कसुद्धा गणले जातात. यात रसायने, विद्युतप्रवाह, गरम, अतिउष्ण पदार्थ, तीव्र सूर्यप्रकाश यांचा समावेश होतो. भाजण्याच्या घटनांमागे अपघात, आत्महत्येचा प्रयत्न, हल्ले ही कारणेदेखील असू शकतात. 

काहीवेळा भाजून इजा झाल्यामुळे होणाऱ्या वेदनांसारख्या वेदना झाल्यास ‘भाजल्यासारखे होते’, ‘आगआग होते’ असे म्हटले जाते. उकळते द्रवपदार्थ शरीराच्या संपर्कात येतात तेव्हा त्याला पोळणे (स्काल्ड) म्हणतात. भाजण्याच्या घटना घरामध्ये, प्रवासात, रस्त्यावर, कार्यालयात, वाहनात कुठेही घडून, दुखापत होऊ शकते. भाजल्यावर त्वचेमधील पेशीसमूहांना (ऊतींना) इजा होते आणि भाजलेल्या भागातील पेशी नष्ट होतात. 

वेगवेगळ्या कारणांनी भाजल्यामुळे वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या भारतात वर्षाला सुमारे ७० लाखांच्या जवळपास आहे. त्यातील सुमारे १ लाख ४० हजारांना आपले प्राण गमवावे लागतात, तर २ लाख ४० हजारांच्या आसपास रुग्णांमध्ये भाजण्यापश्चात दीर्घकाळ राहणारी व्यंग निर्माण होतात. भाजलेल्या रुग्णांमध्ये पुरुष आणि महिला यांचे प्रमाण जवळजवळ सारखेच असल्याचे दिसून आले आहे. यात लहान मुलांचे प्रमाण लक्षणीय असल्याचे आढळते. भारतात एक ते नऊ वर्षे वयाच्या मुलांमध्ये ‘भाजल्यामुळे मृत्यू’ हे एकूण कारणांमध्ये ११व्या क्रमांकाचे कारण आहे. 

भाजल्यामुळे शरीराची कमी जास्त प्रमाणात हानी होत असते. भाजण्याच्या तीव्रतेचे अनुमान करताना भाजलेल्या भागाची व्याप्ती कितपत आहे आणि भाजण्याच्या जखमा किती खोलवर पसरल्या आहेत याचे परीक्षण केले जाते. या दोन्ही प्रकारे मोजमाप करून भाजलेल्या रुग्णाच्या गंभीर परिस्थितीचा अंदाज घेतला जातो.

 • भाजण्याची टक्केवारी : भाजल्यामुळे शरीराचा किती टक्के व्यापला आहे याचे मोजमाप करता यावे, यासाठी ‘नवाचा नियम’ (रुल ऑफ नाईन), या तत्त्वाने भाजलेल्या भागाची व्याप्ती टक्केवारीमध्ये खालीलप्रमाणे मोजली जाते.
 •     डोके : पुढील बाजूने ४.५ टक्के आणि मागील बाजूने ४.५ टक्के असे ९ टक्के
 •     प्रत्येक हात : पुढील बाजूने ४.५ टक्के आणि मागील बाजूने ४.५ टक्के असे प्रत्येक हाताचे ९ टक्के 
 •     पाय : कंबरेखाली मांडीपासून पायांच्या बोटापर्यंत, पुढील बाजूने ९ आणि मागील बाजूने ९ असे प्रत्येक पायाचे १८ टक्के
 •     छाती : गळ्यापासून छातीच्या शेवटच्या बरगडीपर्यंत पुढील भाग ९ टक्के
 •     पाठ : मानेपासून कंबरेपर्यंत ९ टक्के
 •     छातीच्या पिंजऱ्याच्या खालील भागापासून कंबरेच्या खालील भागापर्यंत ९ टक्के
 •     पाठीच्या बाजूने छातीच्या शेवटच्या बरगडीपासून माकड हाडापर्यंत ९ टक्के
 •     जननेन्द्रियाचा भाग १ टक्का 

सर्वसाधारणपणे २० टक्क्यांच्या वरील जखमा गंभीर समजल्या जातात.

२. जखमांची व्याप्ती  : भाजल्यामुळे झालेली इजा किती खोलवर पसरली आहे, याचा अंदाज जखम त्वचेच्या किती खोलपर्यंत पसरली आहे याचे परीक्षण करून केला जातो. यानुसार भाजण्याचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा श्रेणींमध्ये वर्गीकरण होते. 

 •     प्रथम श्रेणी : यामध्ये केवळ त्वचेचा सर्वात वरचा म्हणजे बाह्य स्तराला इजा पोहोचते. यामध्ये भाजलेल्या जागेवरील त्वचा लालबुंद होते, त्यावर सूज येते आणि वेदना होतात. या श्रेणीच्या भाजण्यामुळे होणारी जखम लवकर भरते आणि कालांतराने डागही राहत नाहीत.
 •  
 •     द्वितीय श्रेणी : यात बाह्यत्वचा आणि त्याखालील त्वचेच्या थराला इजा पोहचते. पण त्वचेतील केसांच्या मुळांपर्यंत आणि घर्मग्रंथीपर्यंत ही इजा पसरत नाही. हे भाजणे त्वचेच्या पहिल्या थरापलीकडे जाते. यात तीव्र वेदना होतात, त्वचा लाल होते आणि त्वचेवर फोड येतात. या फोडातून  पाण्यासारखे द्रव पदार्थ असतात.  या श्रेणीतील भाजण्यामुळे जळालेल्या ठिकाणी त्वचेचा रंग बदलतो. 
 •  
 •     तृतीय श्रेणी : यात त्वचेच्या सर्वात खालचा स्तरापर्यंत सर्व थर आणि त्याखालील पेशी समूह नष्ट होतात. यामध्ये केस, घर्मग्रंथी, मज्जातंतू नष्ट होतात आणि त्यामुळे त्या भागातील संवेदनांची भावना कमी होते. भाजलेला भाग पांढरा आणि मेणासारखा, करपलेला किंवा तपकिरी दिसू शकतो. भाजलेली जागा चिवट आणि वर आल्यासारखी दिसते. 
 •  
 •     चतुर्थ श्रेणी : यात त्वचा, स्नायू, हाडे यांना मोठी इजा होते.

भाजण्याचे परिणाम
त्वचेला सूज येणे, फोड येणे, भाजल्याचे व्रण निर्माण होणे असे सर्वसामान्य परिणाम दिसतातच. त्याशिवाय भाजलेल्या जखमांत जंतूसंसर्ग होऊन पू होऊ शकतो आणि रक्तातून जंतूसंसर्ग संपूर्ण शरीरात पसरून सेप्टीसीमिया ही गंभीर समस्या निर्माण होते. यामध्ये फुप्फुसांना संसर्ग होऊन न्यूमोनिया होऊ शकतो. शरीराचा मोठा हिस्सा भाजल्यास पेशीसमूहातील द्रव पदार्थांचे प्रमाण कमी होते आणि डीहायड्रेशनची समस्या निर्माण होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने, रक्तदाब कमी होतो, हृदयाचे ठोके मंद पडू लागतात, लघवीचे प्रमाण घटते आणि कालांतराने मूत्रपिंडाचे कार्य कमी होऊ लागते. तिसऱ्या श्रेणीच्या भाजण्यामध्ये त्वचेखालील पेशीसमूहांना, स्नायूंना, स्नायूबंध आणि अस्थिबंधांना इजा होऊन त्याभागातील स्नायू आकसून व्यंग निर्माण होते.

उपचार  

 •     एखादी व्यक्ती आगीत सापडली आहे असे लक्षात आल्यास-
 •     ती आग विझवा  
 •     त्या व्यक्तीचा गरम द्रव, वाफ किंवा इतर सामग्रीशी संपर्क थांबवा.
 •     ज्वाला विझविण्यासाठी त्या व्यक्तीला हालचाल थांबवण्यास सांगा, जागच्या जागी खाली पडून लोळायला सांगा. या तत्त्वाला ‘स्टॉप, ड्रॉप, रोल’ अशी संज्ञा आहे.
 •     व्यक्तीच्या अंगावरील धुमसणाऱ्या गोष्टी काढून टाका. गरम किंवा जळलेले कपडे काढा. जर कपडे त्वचेला चिकटले असतील तर ते कापून टाका किंवा फाडून टाका.
 •     दागिने, बेल्ट आणि घट्ट कपडे काढा. अशाने भाजलेल्या जखमा  लवकर फुगू शकतात.

भाजण्यावरचे उपचार इजा किती व्यापक आणि सखोल आहे यावर ठरवली जाते. काहीवेळा इजा घरीच बरी होऊ शकत असली, तरी अनेक प्रसंगांमध्ये त्वरित वैद्यकीय उपचार आवश्यक असतात. 

वैद्यकीय उपचार : कितीही कमी-जास्त भाजले असेल तर त्या व्यक्तीला त्वरित दवाखान्यात न्यावे. तिथे रुग्णाच्या जखमांच्या खोलीचा आणि व्याप्तीचा, तसेच एकूण शारीरिक स्थितीचा आणि भाजण्यामुळे होऊ शकणाऱ्या शारीरिक परिणामांचा अंदाज घेऊन त्याचे उपचार ठरवले जातात. आगीत सापडून भाजलेल्या व्यक्तींना त्वरित रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात दाखल करावे. अशा व्यक्तीच्या अंगावर पाणी टाकू नये, त्यामुळे त्यांचे कपडे जखमांवर जास्त चिकटतात. त्यांच्या श्वसनक्रियेवर लक्ष द्यावे.  

जर जखमांची व्याप्ती अधिक असेल आणि त्या द्वितीय किंवा तृतीय श्रेणीनुसार खोल असतील तर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते. प्रथम श्रेणीच्या ५ ते १० टक्क्यांपर्यंतच्या जखमांना दवाखान्यात बाह्यरुग्ण पद्धतीने उपचार केले जातात.    

वैद्यकीय उपचारांमध्ये  वेदनाशामक इंजेक्शन्स, गोळ्या तसेच जंतूसंसर्ग होऊ नये म्हणून आवश्यकतेनुसार प्रतिजैविके दिली जातात. जखमा सलाईनने किंवा जंतूनाशक औषधांनी स्वच्छ केल्या जातात. जळलेल्या त्वचेचे भाग संसर्गविरहित पद्धतीने काढले जातात. त्यावर सिल्व्हर नायट्रेट किंवा तत्सम जंतुनाशक मलम किंवा जेल लावले जाते. त्यावर जंतुविरहित केलेले ड्रेसिंग किंवा काही वेळेस अँटीबायोटिक असलेले गॉझने वापरले जातात.  

द्वितीय श्रेणीच्या भाजण्यामध्ये इस्पितळातील मायनर ऑपरेशन थिएटरमध्ये कमालीच्या निर्जंतुक प्रक्रियेने रुग्णाचे ड्रेसिंग करावे लागते. भाजलेला भाग स्वच्छ करून, त्या भागाला पंधरा मिनिटांपर्यंत निर्जंतुक थंड पाण्याखाली किंवा सलाईनच्या धारेखाली स्वच्छ केले जाते.. फोडांसाठी अँटिबायोटिक क्रीम वापरले जाते. फोड मोठे असल्यास त्याची त्वचा कातरून दूर केली जाते. कापूस वापरणे आणि ड्रेसिंग घट्ट बांधणे टाळले जाते. 

तृतीय श्रेणीमध्ये भाजलेल्या रुग्णाला तातडीच्या वैद्यकीय सेवेची गरज असते. यामध्ये शिरेतून दिली जाणारी प्रतिजैविके (इन्टरव्हीनस अँटिबायोटिक्स) आणि खूप जास्त प्रमाणात सलाईन द्यावी लागतात. या रुग्णांचे ड्रेसिंग ऑपरेशन थिएटरमध्ये भूल देऊन करावे लागतात. ही एक प्रकारची शस्त्रक्रियेची प्रक्रियाच असते. यात जखमेवर विशिष्ट मलमपट्टी, वेदना कमी करण्यासाठी औषधे दिली जातात. जखमा भरण्यासाठी आवश्यक असल्यास व्रण झालेल्या भागावर त्वचारोपण (स्कीन ग्राफ्टिंग) करावे लागते. रुग्णाला श्वसनासाठी प्राणवायू द्यावा लागतो, त्याला आहारासाठी नाकातून पोटात सोडलेल्या नळीचा (राईल्स ट्यूब) वापर करावा लागतो.

भाजणे हे दुखापतींचे तसेच भाजल्यानंतर होणाऱ्या विकृतींचे महत्त्वाचे कारण आहे. त्यातून निर्माण होणाऱ्या गंभीर परिस्थितीचा विचार करता, त्याच्या उपचारांबद्दल सर्वांना त्याबाबत किमान प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या