अन्नसेवनाचे  आजार आणि विकृती

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 14 मार्च 2022

आरोग्यभान

नियमित वेळेस घेतला जाणारा समतोल आहार म्हणजे आरोग्याचा समतोल राखण्यासाठी आवश्‍यक असणारी मूलभूत बाब असते. मात्र खाण्यापिण्याबाबतच्या काही चुकीच्या सवयी अनेक व्यक्तींमध्ये आढळतात. या सवयी त्या व्यक्तीच्या एकुणातल्या वर्तनाशी, त्याच्या भावभावनांशी आणि मानसिक स्थितीशी संबंधित असतात. यांना इटिंग डिसऑर्डर्स किंवा अन्नसेवनाचे विकार म्हणून संबोधले जाते. या विकारांचा त्या व्यक्तीच्या आरोग्यावर, भावनांवर आणि जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रात काम करण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम होताना दिसतो.

अन्नसेवनाच्या विकारांपैकी बरेच आजार हे स्वतःच्या वजनाला आणि शरीराच्या आकाराला अवास्तव महत्त्व देऊन, ते कमी करण्याच्या किंवा कमी असल्यास वाढवण्याच्या विचारातून निर्माण होतात. काही वेळा अन्नपदार्थांबाबत अवास्तव कल्पना बाळगून काही अन्नघटक पूर्णपणे टाळण्याच्या प्रयत्नातून हे आजार उद्‌भवताना आढळतात. मात्र या सवयी आणि आहाराबाबाबतचे वर्तन यामुळे शरीराच्या पोषणावर, शारीरिक तसेच बौद्धिक क्षमतेवर लक्षणीय परिणाम होत असतात. अशा अनेक ‘खाण्याच्या विकारां’मुळे हृदय, पचनसंस्था, हाडे, दात आणि तोंड यांच्या आरोग्यसमस्या निर्माण होतात आणि इतर अनेक आजार उद्‌भवतात.

खाण्याचे विकार तसे पाहिल्यास कोणत्याही वयोगटातील व्यक्तीत सुरू होऊ शकतात, पण प्रामुख्याने  पौगंडावस्थेत आणि तरुण वयात ते विकसित होताना आढळतात. योग्य उपचाराद्वारे खाण्याबाबतच्या आरोग्यदायी सवयी पुन्हा प्राप्त होऊ शकतात, मात्र खाण्याच्या विकारामुळे अनेकदा आरोग्याबाबत गंभीर गुंतागुंत उद्‌भवू शकते.
खाण्याच्या विकाराचे विविध प्रकार आहेत, त्यानुरूप त्यांची लक्षणे वेगवेगळी असतात.  
अॅनोरेक्सिया नर्वोजा
प्रसंगी प्राणांतिक ठरू शकतो असा हा एक खाण्याचा मनोशारीरिक विकार आहे. यामध्ये रुग्णाचे वजन खूप घटलेले आढळते, पण तरीही त्याच्या मनात वजन वाढण्याबाबत तीव्र भीती असते आणि वजनाबाबत तसेच स्वतःच्या शरीराच्या आकाराबाबत एक विकृत धारणा असते.. अॅनोरेक्सिया नर्व्होजाने ग्रस्त असलेले रुग्ण, त्यांचे वजन आणि शारीरिक आकार नियंत्रित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहतात, त्यासाठी ते अनेक चित्रविचित्र कल्पना खऱ्या मानतात. अमुक प्रकारचे अन्न घेतले तर आपले वजन वाढेल या विचाराने ते अन्नग्रहण करणे टाळतात. परिणामतः त्यांच्या आरोग्य आणि जीवनातील दैनंदिन व्यवहारांमध्ये  लक्षणीयरीत्या दुष्परिणाम होत राहतात..

या आजारातील व्यक्ती -

 • रोजच्या आहारातील कॅलरींवर अकारण कडक मर्यादा घालतात.
 • अनेकदा जेवण्याच्या वेळा टाळतात किंवा दिवस दिवस उपाशी राहतात.  
 • वजन कमी करण्‍यासाठी अतिव्‍यायाम, सतत रेचक घेणे, वजन कमी करण्यासाठी विविध डाएट, वजन कमी करणारी तथाकथित औषधे  यांच्या नादी लागतात. 

    काही व्यक्ती आहार घेल्यावर तो जास्त झाला असे मानून उलट्या काढतात.
या विकृत सवयींमुळे या रुग्णांत अनेकदा उपासमार होऊन बेशुद्ध पडणे, रक्तातील क्षारांचे प्रमाण कमी होऊन गंभीर त्रास निर्माण होणे अशा घटना घडू शकतात.

बुलिमिया नर्वोजा
बुलिमिया नर्वोसा  किंवा सामान्यतः बुलिमिया म्हणून ओळखला जाणारा आजार एक गंभीर, संभाव्य जीवघेणा खाण्याचा विकार आहे. बुलिमियामध्ये  रुग्णाचे खाण्यावर नियंत्रण नसल्याचे निदर्शनास येते. या व्यक्ती सतत प्रमाणाबाहेर खा खा खात राहतात. ते इतके खातात की त्यांना अपचनामुळे जुलाब होऊ लागतात. पण त्यांचा दिनक्रम नित्यनेमाने चालूच राहतो.  

बुलिमियाचे काही रुग्ण दिवसभरात अजिबात खात नाहीत आणि मग खूप भूक लागल्याने रात्री प्रमाणाबाहेर खातात आणि त्यांनाही अतिखाण्याने जुलाब होत राहतात. बुलिमियाच्या रुग्णांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कमी वेळेत जास्त अन्न भरभर खातात. त्यानंतर आपण जास्त जेवलो या विचाराने ते अस्वस्थ होतात. मग या अति अन्नग्रहणातून मिळालेल्या अतिरिक्त कॅलरीज कमी करण्याच्या विचाराने ते पछाडतात. त्यांना आपल्या वर्तनामुळे अपराधीपणाची भावना वाटते. परिणामतः ते त्यासाठी अतिव्यायाम, रेचके घेणे, उलट्या करणे, वजन कमी करण्याचे अन्य मार्ग, औषधे हाताळतात. मात्र हे जास्त खाण्याचे आणि नंतर ते कमी करण्याचे प्रयत्न यांचे चक्र सतत सुरूच राहते. 

बुलिमियाच्या रुग्णांमध्येही वाढते वजन आणि शरीराचा वाढता आकार यांच्या विचाराने ते त्रस्त होत राहतात. आदर्श वजनापेक्षा थोडे जास्त वजन असले तरी त्यासाठी ते स्वतःला कठोर शिक्षा करण्याचे प्रयत्न करतात. पण त्यांचा खाण्याचा हव्यास सुरूच राहतो.   

बिंज इटिंग डिसऑर्डर
या आजारात  

 •     नित्य नेमाने प्रत्येक दिवशी खूप जास्त आहार घेतला जातो. 
 •     खाण्याच्या प्रमाणावर नियंत्रण नसते.
 •     भूक नसतानाही खूप खाल्ले जाते.

    पोटाच्या आहारक्षमतेपेक्षा जास्त अन्न खाल्ले जाते, आणि पोट भरले असे वाटूनही खाणे सुरूच राहते.

आपण खूप खातो याची जाणीव झाल्यावर या रुग्णांमध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते. परंतु या व्यक्ती आपले जास्त खाल्लेले अन्न उलट्या काढून बाहेर काढत नाहीत किंवा व्यायाम जास्त करून अतिरिक्त कॅलरीज जाळण्याचा प्रयत्न करत नाहीत. याउलट लोकांपासून आपले खाणे लपवून एकटे खाऊ लागतात.   

हा आजाराचा झटका या लोकांना आठवड्यातून किमान एकदा येतो. अशा व्यक्ती लठ्ठ असतीलच असे नाही तर त्या नॉर्मल वजनाच्या किंवा कृशसुद्धा असू शकतात. 

रुमिनेशन डिसऑर्डर
या विकृतीत अन्नाचा घास गिळल्यावर तो पुन्हा तोंडात येतो आणि या व्यक्ती तो घास पुन्हा चघळून खातात. खाल्लेले अन्न पुन्हा वर येण्यासाठी या व्यक्तींना उलटी काढावी लागत नाही. त्यांना असे करताना मळमळदेखील होत नाही. विशेष म्हणजे या व्यक्तींच्या तोंडात खाल्लेला घास पुन्हा येण्याची क्रिया मुद्दाम न करता आपोआप घडत राहते. त्यामुळे अॅनोरेक्सिया किंवा बुलिमियापेक्षा हा आजार वेगळा ठरतो.

या व्यक्तींच्या बाबतीत अनेकदा अन्न तोंडाबाहेर पडून सांडते. या विकाराच्या रुग्णांमध्ये कुपोषणाची आणि जीवनसत्वे व अन्नघटकांच्या कमतरतेची लक्षणे दिसून येतात. लहान मुलांमध्ये तसेच बौद्धिक वाढ न झालेल्या प्रौढांमध्ये हा विकार आढळतो.  
प्रतिबंधित अन्नसेवन विकार
या विकारात अन्नसेवन करण्याबाबत रुग्णांकडून टाळाटाळ केली जाते. त्यांना खाण्यात एकतर रस नसतो. काही विशिष्ट अन्नपदार्थांचे रंग, वास, चव, आकार यावरून ते अन्न आवडत नाहीत असे या रुग्णांचे म्हणणे असते. अन्न खाल्ल्यावर मला गुदमरल्यासारखे होते अशी यांची मुख्य तक्रार असते. या व्यक्ती शारीरिक वजन किंवा आकार यासाठी अन्न खाणे तालात नाहीत, हे या विकाराचे मुख्य वैशिष्ट्य असते.

विकारामुळे वजन कमी राहणे, रुग्ण कृश होणे, तसेच कुपोषणाच्या आणि जीवनसत्त्वांच्या अभावाच्या तक्रारी उद्‌भवणे असे त्रास होत असतात. लहान मुलांमध्ये या समस्येमुळे आहारविषयक आणि शारीरिक वाढीसंबंधात अनेक तक्रारी उद्‌भवतात.

डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा?
खाण्यापिण्याच्या विकारावर स्वतः नियंत्रण करणे शक्य होत नसल्यास किंवा आपल्या दोषांवर प्रयत्न करूनही मात करता न आल्यास वैद्यकीय सल्ल्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यावे. यामुळे पुढील दुष्परिणाम टाळता येतात. 

उपचार घेण्यास उद्युक्त करणे
अन्नसेवनाचे विकार असलेल्या अनेकांना त्यांना उपचार घेण्याची  गरज आहे, असे दुर्दैवाने वाटत नाही. पण एक कौटुंबिक जबाबदारी म्हणून आपल्या प्रियजनांमध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये या आजाराची लक्षणे असलेल्या व्यक्तींना वैद्यकीय उपचारासाठी उद्युक्त करावे. बहुतेकदा हे रुग्ण आपल्याला काही त्रास असल्याचे मान्य करत नाहीत, पण तरीही त्यांच्याबाबत चिंता व्यक्त करून त्यांना वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी भाग पाडणे गरजेचे ठरते.

साधारणपणे खालील चिन्हे एखाद्या व्यक्तीत दिसत असतील, तर त्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते.  

 • जेवण करण्याचे वारंवार टाळणे किंवा न खाण्याचे बहाणे करणे
 • अतिशय कडक पद्धतीने शाकाहारी आहाराचे अवलंबन करणे
 • 'हेल्दी' खाण्यावर जरुरीपेक्षा जास्त लक्ष पुरवणे 
 • कुटुंबांसमवेत सर्वांसाठी तयार केलेेले जेवण टाळणे आणि स्वतःचे जेवण स्वतःच्या आवडीनुसार करणे किंवा तसेच करण्याचा आग्रह धरणे
 • सर्वसामान्य सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहणे
 • आपले वजन खूप वाढले आहे, आपण लठ्ठ झालो आहोत याबाबत सतत चिंता व्यक्त करणे आणि सतत त्याचबाबत चर्चा करणे. 
 • आपण बारीक झालो आहोत का? आपले वजन वाढले आहे का? यासाठी सतत आरशात न्याहाळणे किंवा वजन काट्यावर वारंवार वजन करत राहणे. 
 •  मोठ्या प्रमाणात मिठाई किंवा जास्त चरबीयुक्त पदार्थ वारंवार खाणे
 •  वजन कमी करण्यासाठी अन्न कमी घेऊन जीवनसत्त्वांच्या गोळ्या घेणे, रेचक किंवा हर्बल उत्पादनांचा अतिवापर करणे
 • व्यायामाचा अतिरेक करणे
 • घशात बोटे घालून सतत उलट्या काढण्यामुळे बोटांच्या पेरांवर हाडांचे कडक उंचवटे (कॉलस) निर्माण होणे
 • वारंवार उलट्या काढल्याने, पोटातील आम्लामुळे दातांवरील एनॅमल नष्ट झालेले आढळणे
 • जेवणादरम्यान नेहमीच शौचाला जाणे 
 • जेवणात किंवा स्नॅक्समध्ये जास्त अन्न खाणे हे सामान्य मानले जाते
 • आपल्या खाण्याच्या सवयींबद्दल उदासीनता, स्वतःचा तिरस्कार, आपल्या सवयींबाबत लाज, अपराधीपणाची भावना सतत व्यक्त करणे
 • सगळ्यांच्या नकळत गुपचूप किंवा चोरून खाणे

लहान मुलाला अन्नसेवनाचा विकार आहे अशी शंका वाटल्यास बालरोग तज्ज्ञ तसेच बाल मानसरोग तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संबंधित बातम्या