अॅल्युमिनियम आणि आरोग्य

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 21 मार्च 2022

आरोग्यभान

आरोग्यदृष्ट्या अॅल्युमिनियम चांगले की वाईट याबाबत विज्ञानाचा अंतिम कौल अद्याप अनिर्णित आहे. मात्र अॅल्युमिनियमचा नित्य वापर इतक्या मोठ्या प्रमाणावर केला जात असतो, की या दोन्ही परस्परविरोधी कल्पनांचा सारासार विचार होणे आवश्यक आहे.

अॅल्युमिनियम हा जगात सर्वत्र आढळणारा धातू. मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या घरात आजही अॅल्युमिनियमची अनेक प्रकारची भांडी वापरली जातात, तर खाद्यवस्तूंचे पॅकिंग करायला अॅल्युमिनियमच्या फॉइल सर्वत्र सर्रास वापरल्या जातात. मात्र यासाठी वापरले जाणारे अॅल्युमिनियम आरोग्यासाठी कितपत सुरक्षित असते? हा एक मोठा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. काही शास्त्रज्ञ अॅल्युमिनियमला धोकादायक मानतात, तर कित्येक संशोधक ते  सुरक्षित असल्याचा दावा करतात. आरोग्यदृष्ट्या अॅल्युमिनियम चांगले की वाईट याबाबत विज्ञानाचा अंतिम कौल अद्याप अनिर्णित आहे. मात्र अॅल्युमिनियमचा नित्य वापर इतक्या मोठ्या प्रमाणावर केला जात असतो, की या दोन्ही परस्परविरोधी कल्पनांचा सारासार विचार होणे आवश्यक आहे.

अॅल्युमिनियम म्हणजे काय?
नित्य परिचयातला असलेला अॅल्युमिनियम हा धातू दैनंदिन जीवनात स्वयंपाकाच्या भांड्यापासून पाणी साठवून ठेवण्यासाठी वापरला जातो. उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्गात त्याचा वापर कमी झाला असला तरी फॉईल स्वरूपातील अॅल्युमिनियमचा स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये समावेश होतो. याशिवाय घरगुती वस्तू, लस, औषधे, रंगद्रव्ये, भिंतींचे आणि वस्तूंना देण्याचे रंग, स्फोटके, प्रॉपेलंट्स, एरोसॉल्स आणि पेट्रोकेमिकल इंधनामध्ये भर टाकण्यासाठी अॅल्युमिनियम वापरतात. सिरॅमिक्स, कागद, लाइट बल्ब, काचा आणि उष्णता-प्रतिरोधक तंतू अशा उत्पादनातही अॅल्युमिनियम ऑक्साईड वापरतात.
 

   खाद्यपदार्थांमध्ये अँटी-केकिंग एजंट्स, कलरिंग एजंट्स, इमल्सिफायर, बेकिंग पावडर आणि बालकांना दिल्या जाणाऱ्या काही सोया-आधारित शिशुआहारात, काही औषधात अल्युमिनियमची संयुगे वापरतात.

    पर्यावरणाचा विचार केला तर पृथ्वीच्या पृष्ठभागातील कवचामध्ये (अर्थ क्रस्ट) ८ टक्के असलेल्या अॅल्युमिनियमला सर्वात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेला धातू मानतात. अतिशय प्रतिक्रियाशील असल्यामुळे तो निसर्गात मुक्त धातू म्हणून न आढळता; फ्लोरिन, सिलिकॉन आणि ऑक्सिजन अशा इतर घटकांशी बंधित असतो. माती, खडक, चिकणमाती, चिखल; तसेच सफायर, रूबी, टरकॉइज (नीलम, माणिक, नीलमणी) अशा खनिजद्रव्यांशी तो रासायनिकदृष्ट्या बद्ध होतो. तो हवेतही मिसळू शकतो, पाण्यात विरघळू शकतो आणि मातीमधून वनस्पतींमध्ये जाऊ शकतो.
    वातावरणातील अल्युमिनियमचे प्रमाण आम्ल पाऊस, विविध उद्योगधंद्यांतून हवेत सोडला जाणारा धूर, अॅल्युमिनियम धातू, मिश्रधातू आणि संयुगे प्रक्रिया करणाऱ्या खाणी, कोळसा प्रकल्प, ज्वलनशील पदार्थांचे उद्योग यातून पर्यावरणातील अॅल्युमिनियमचे प्रमाण वाढत जाते.  
मानवी शरीराशी अॅल्युमिनियमचा संपर्क

 • अॅल्युमिनियमचा मानवी शरीराशी संपर्क होण्यामागे पुढीलपैकी कोणतेही कारण असू शकते...
 • आहार- मांस, भाज्या आणि फळे, प्रक्रिया केलेले पदार्थ बेकिंग पावडर, अँटी-केकिंग एजंट आणि कलरिंग एजंट अशा अन्नपदार्थांतून, (अमेरिकी आकडेवारीनुसार दररोज ७ ते ९ टक्के, तर अन्य जागतिक आकडेवारीनुसार आहारातून ०.१ ते ०.३ टक्के. आम्ल पदार्थ अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये शिजवल्यास हे प्रमाण जास्त भरू शकते.) 
 • पाण्यातून- ०.३ टक्के  
 • श्वासोच्छवासातून- प्रदूषित हवेतून, अॅल्युमिनियम धूळ असलेल्या वातावरणात काम करणे,
 • त्वचेमार्गे - अॅल्युमिनियमच्या खाणी आणि प्रक्रिया संयंत्रे, धोकादायक कचरा डेपो किंवा जिथे ते नैसर्गिकरीत्या जमिनीत जास्त आहे अशा भागात राहणाऱ्या व्यक्तींच्या त्वचेतून ते शरीरात शोषले जाऊ शकते.

    अँटासिड्स, बफर्ड अॅस्पिरिन अशा औषधातून 

शरीरात अॅल्युमिनियमचे प्रमाण वाढल्यास त्यातील ९५ टक्के भाग मूत्रपिंडांद्वारे उत्सर्जित होतो. मात्र ते उत्सर्जित न झाल्यास हाडे, फुप्फुसे, स्नायू, यकृत आणि मेंदूमध्ये जमा होत जाते. मूत्रपिंडाचे कार्य कमी झालेल्या व्यक्तींमध्ये, डायलिसिसवर असलेल्या रुग्णांमध्ये ही जोखीम जास्त असते. भारतात मधुमेह आणि उच्च रक्तदाब अशा विकारांचे रुग्ण फार मोठ्या प्रमाणात आहेत. या आजारात मूत्रपिंडाचे कार्य कमी होत असते. त्यामुळे आपल्या देशात अॅल्युमिनियमच्या वापराबाबत सजग राहणे आवश्यक आहे. 

अॅल्युमिनियमची विषबाधा
रक्तामध्ये अॅल्युमिनियमची पातळी सर्वसाधारणपणे १० मायक्रोग्रॅम प्रती लिटरपेक्षा कमी असते. दीर्घकाळ डायलिसिस कराव्या लागणाऱ्या रुग्णांमध्ये सीरम अॅल्युमिनियमची पातळी ५० मायक्रोग्रॅमपर्यंत आढळते. शंभर मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त पातळी संभाव्यतः विषारी असते आणि २०० मायक्रोग्रॅमवरील पातळीमध्ये काही ​​लक्षणे दिसू लागतात आणि याला अॅल्युमिनियममुळे होणारी विषबाधा मानले जाते. याच्या लक्षणांमध्ये-

 •     वैचारिक गोंधळ
 •     स्नायूंची कमजोरी
 •     हाडे दुखणे, हाडांच्या विकृती आणि फ्रॅक्चर
 •     फेफरे किंवा झटके येणे
 •     संभाषण समस्या

    लहान मुलांची वाढ खुंटणे आदींचा समावेश होतो.
अॅल्युमिनियमचे रक्तातील प्रमाण जुजबी वाढल्यास औषधोपचाराने त्याचे नियंत्रण करता येते, पण सातत्याने हे प्रमाण दीर्घकाळ वाढत राहिले, तर काही त्रासदायक आजार उद्‌भवतात, त्यात... 
  

 हाडांचे आजार : हाडांच्या पेशीसमूहात  ६० टक्क्यांपर्यंत अॅल्युमिनियम जमा होऊ शकते. त्यामुळे हाडे कमकुवत होणे, (ऑस्टियोमॅलेशिया), हाडे ठिसूळ होणे (ऑस्टिओपोरोसिस) असे त्रास होतात. अशा रुग्णामध्ये ‘ड’ जीवनसत्त्व, कॅल्शियम किंवा मॅग्नेशियमची कमतरता असल्यास हा त्रास तीव्रतेने होतो. याशिवाय अॅल्युमिनियमचे प्रमाण वाढल्याने पॅराथायरॉइड संप्रेरक कमी होऊन हाडे आणखी कमकुवत बनतात.
  

 मज्जासंस्था : ऐच्छिक आणि अनैच्छिक क्रिया मंदावतात. शारीरिक हालचालींमध्ये समन्वय नसणे, स्मरणशक्ती मंदावणे आणि तोल सावरता न येणे अशा समस्या उद्‌भवतात.
    मेंदूचे विकार : अॅल्युमिनियमच्या उच्च पातळीमुळे मज्जासंस्थेची विषबाधा (न्यूरोटॉक्सिसिटी) होऊ शकते. डायलिसिसच्या रुग्णांमध्ये अॅल्युमिनियमची पातळी ८० मायक्रोग्रॅमपेक्षा जास्त वाढल्यास मेंदूच्या कार्यात अनेक दोष (एन्सेफॅलोपॅथी) निर्माण होतात. अॅल्युमिनियमची पातळी वाढल्याने अल्झायमर्स उद्‌भवू शकतो असेही संशोधनात दिसून आले आहे.  
    

श्वसनसमस्या : अॅल्युमिनियमची धूळ असलेल्या उद्योगात काम करणाऱ्या लोकांमध्ये सततचा खोकला, पॉटरूम अस्थमा, अॅल्व्हीओलर प्रोटीनोसिस, अॅल्व्हीओलर वॉल थिकनिंग, डिफ्युज पल्मनरी फायब्रोसिस, इंटरस्टीशीयल एम्फायझीमा, फुप्फुसात छोट्या गाठी होणे (नोड्यूल), शेव्हर्स डिसीज असे आजार उद्‌भवतात.  

    लोहाचे अभिशोषण मंदावणे : शरीरातील लाल रक्तपेशी तयार होण्याच्या प्रक्रियेत लोहाची गरज असते. अॅल्युमिनियमचे प्रमाण वाढल्यावर लोह कमी शोषले जाऊन अॅनिमिया होतो, तसेच फॉस्फरसचे उत्सर्जन वाढते. 

    पुनरुत्पादन संस्था : अॅल्युमिनियममुळे पुनरुत्पादन संस्थेबाबत होणाऱ्या परिणामांबाबत संशोधनात्मक पुरावे कमी आहेत, पण काही प्राण्यांवरील संशोधनात संततीवरील परिणाम दिसून आला आहे.

    कर्करोग : १९८४मध्ये, ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ या संस्थेने अॅल्युमिनियमचे 'कर्करोगजन्य' म्हणून वर्गीकरण केले. २०१२च्या एका संशोधनाद्वारे अॅल्युमिनियमचा अंश असलेल्या सूचित अँटीपर्स्पिरंट्सयोगे (घाम येऊ नये यासाठी वापरले जाणारे सौदर्य प्रसाधन) स्तन कर्करोगाचा धोका उद्‌भवू शकतो, असे लक्षात आले. स्तनावरील त्वचेतून अॅल्युमिनियम असलेले अँटीपर्स्पिरंटमधील रसायने त्वचेतून शोषली जातात. विशेषत: तेथील केस काढलेले असल्यास, रसायनांचे त्वचेत सहजरीत्या शोषण होते. त्या रसायनांचा  डीएनएवर परिणाम होऊन पेशींमध्ये कर्करोगजन्य बदल होतात. तसेच इस्ट्रोजेन या स्त्रियांच्या हार्मोनवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी वाढू लागतात. 

सन २०१२मधील संशोधनात अॅल्युमिनियममुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढून कर्करोगाची शक्यता वाढते असे आढळले. त्याचवर्षी आणखी एका संशोधनातही स्तन पेशींबाबत आणि त्याआधी २००१मधील एका संशोधनात त्वचा पेशींवरसुध्दा दिसून आला. यातून अॅल्युमिनियममुळे हे कर्करोगाची शक्यता वाढते हे लक्षात आले.   

चयापचय क्रिया ः २०१२मधील संशोधनानुसार अॅल्युमिनियममुळे, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह अशी खनिजे शरीरात शोषले जाताना अटकाव होऊन, त्यांची कमतरता निर्माण होते.

काय टाळावे?
अॅल्युमिनियमच्या दीर्घकालीन वापरामुळे किंवा संपर्कामुळे त्याने शरीरावर दुष्परिणाम होतात आणि विषबाधाही होऊ शकते. अॅल्युमिनियम हा शरीराच्या क्रियांसाठी आवश्यक घटक नाही. तो टाळल्याने कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे आपल्या आरोग्यास अपाय होऊ नये म्हणून खालील गोष्टी टाळाव्यात. 

 अँटासिड्स : अँटासिड्सच्या एका गोळीत किंवा ५ मिलीच्या डोसमध्ये १०४-२०८ मिलीग्रॅम अॅल्युमिनियम असते. पचनसंस्थेत ते विशेष शोषले जात नसले तरी दीर्घकाळ वापर करण्याने किंवा अॅल्युमिनियमची रक्तातील पातळी जास्त असणाऱ्यांसाठी ती चिंतेची बाब ठरू शकते. अॅल्युमिनियमचे शोषण आम्लांमुळे जास्त प्रमाणात होते. त्यामुळे लिंबू, कैरी, टोमॅटो, चिंच असे आंबट पदार्थ खाल्ल्यावर अँटासिड्स घेऊ नयेत.

अँटीपर्स्पिरंट्स : अँटीपर्स्पिरंट्समध्ये अॅल्युमिनियम झिरकोनियम टेट्राक्लोरोहायड्रेक्स ग्लाइसिन वापरतात. 'एनव्हरॉनमेंटल वर्किंग ग्रुप' या पर्यावरणविषयक आरोग्यावर कार्य करणाऱ्या संस्थेने ही अँटीपर्स्पिरंट्स वापरू नयेत अशी स्पष्ट सूचना दिलेली आहे. याशिवाय अॅल्युमिनियम असणारे डिओड्रंट्सही टाळावेत.

 सनस्क्रीन : अनेक सनस्क्रीन आणि मेकअप फाउंडेशनमध्ये अ‍ॅल्युमिनियम हायड्रॉक्साइडचा वापर अपारदर्शक एजंट, त्वचा संरक्षक आणि कॉस्मेटिक कलरंट म्हणून केला जातो. कमी प्रमाणात असते, तरी कॅनडासारख्या देशात त्यावर निर्बंध आहेत.

स्वयंपाकाची भांडी : स्वयंपाकाच्या भांड्यांमध्ये आणि कुकिंगवेअरमध्ये अॅल्युमिनियम वापरतात. त्यामुळे टेफ्लॉन किंवा अॅल्युमिनियम असलेल्या भांड्यांऐवजी सिरॅमिक कुकवेअर वापरावे. 

अॅल्युमिनियम फॉईल, डबाबंद किंवा कॅन्ड पदार्थ, पाण्याच्या बाटल्या, ड्रिंकिंग पाऊच, टिन स्टोअरेज डिशेस यांसारख्या स्वयंपाकघरातील इतर अनेक उत्पादनांमध्ये अॅल्युमिनियम असते. जेव्हा अन्न फॉईल किंवा भांड्यांमध्ये गरम केले जाते किंवा गरम अन्न अशा फॉईलमध्ये गुंडाळले जाते तेव्हा त्यात अॅल्युमिनियमचा अंश उतरतो. थंड पदार्थ साठवण्यासाठी फॉईल सुरक्षित असतात, पण तरीही ते टाळावे.

 • डिशेस झाकण्यासाठी घरगुती मेणकापड वापरावे. अन्नपदार्थ अन्य प्रकारच्या भांड्यात ठेवावे. 
 • ब्लीच न केलेला मेणकागद वापरावा.
 • पाण्यासाठी अॅल्युमिनियम किंवा प्लास्टिक बाटल्या वापरू नये.
 • कॅनऐवजी काचेच्या भांड्यांतील खाद्यपदार्थ खरेदी करावे. ताजे पदार्थ, गोठलेले, वाळलेले (फ्रीझ्ड, ड्राईड) पदार्थ वापरावे 
 • कॅन केलेली कोल्डड्रिंक्स, सोडा वापरू नयेत.

अॅल्युमिनियमबाबत भारतात फारसे कडक नियम नाहीत. मात्र त्यामुळे होणारे संबंधित आरोग्यविषयक धोके लक्षात घेतल्यास आपणच या गोष्टींची जाणीव करून घेतल्यास आणि ज्यामुळे अॅल्युमिनियमचा संपर्क येईल अशा वस्तू टाळणे एवढेच आपल्या हातात आहे.

संबंधित बातम्या