लसीकरणामुळे आटोक्यात आलेले चौदा आजार

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 28 मार्च 2022

आरोग्यभान

जगात सर्वत्र होणाऱ्या सर्वसाधारण लसीकरणामुळे किमान १४ आजार पूर्ण आटोक्यात आले आहेत आणि त्यामुळे होणारे लाखो (कदाचित करोडो) मृत्यूदेखील टळले आहेत. या आजारांची थोडी माहिती घेतल्यास, लसीकरणाबाबतचे गैरसमज आणि बुद्धिभेद दूर होतील, तसेच लशींबाबत शंका घेणारे लोक लसीकरणाला उद्युक्त होतील.

जीवघेण्या ठरणाऱ्या गंभीर आजारांवर विजय मिळवण्यासाठी वैद्यकीय शास्त्र शतकानुशतके प्रयत्न करत आहे. आजारावर विजय मिळवण्यासाठी औषधे शोधून काढायला सर्वच प्रकारच्या वैद्यकीय शाखांतील संशोधकांनी आपले आयुष्य पणाला लावले. आजार का होतो? कशामुळे होतो? हे शोधण्यासाठी अगणित यशस्वी आणि अयशस्वी प्रयोग सर्वच शास्त्रज्ञ गेली काही शतके करतच आले. भौतिक विज्ञानाच्या, रसायनशास्त्राच्या प्रगतीसोबत जैवविज्ञान पुढे जात राहिले. देवी आजाराचा प्रतिबंध करणाऱ्या लशीचा शोध एडवर्ड जेन्नरने वर्ष १७९६मध्ये लावला. त्यानंतर रोगप्रतिबंधक आणि रोगनिवारण शास्त्राची गेल्या तीनशे वर्षांत नेत्रदीपक वाढ झाली. मानवजातीला संत्रस्त करणारे असंख्य आजार आटोक्यात आले. काही दिसेनासे झाले, काही तुरळक उरले. एकेकाळी जीवघेणा असणारा देवी हा आजार १९८०साली जगातून कायमचा नाहीसा झाला.

आज जगभरात कित्येक लोक कोरोनाच्या लसीकरणाच्या विरोधात आरडाओरडा करतायत आणि कोरोना लस घेऊ नका म्हणून प्रचारही करतायत. पण काही वर्षांनी, कोरोना लसीकरणामुळे कोरोना कायमचा नियंत्रणात आला, अशी सुवर्णनोंद वैद्यकीय इतिहासात केली जाईल.

जगात सर्वत्र होणाऱ्या सर्वसाधारण लसीकरणामुळे किमान १४ आजार पूर्ण आटोक्यात आले आहेत आणि त्यामुळे होणारे लाखो (कदाचित करोडो) मृत्यूदेखील टळले आहेत. या आजारांची थोडी माहिती घेतल्यास, लसीकरणाबाबतचे गैरसमज आणि बुद्धिभेद दूर होतील, तसेच लशींबाबत शंका घेणारे लोक लसीकरणाला उद्युक्त होतील.

पोलिओ

बालकांसाठी अपंगत्वाचे कारण, प्रसंगी प्राणघातकही ठरणारा; पोलिओव्हायरसमुळे होणारा पोलिओ हा संसर्गजन्य रोग आहे. हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये विष्ठेमार्फत पसरतो आणि संक्रमित व्यक्तीच्या मेंदू आणि मज्जारज्जूवर आक्रमण करतो. या आजारामुळे पक्षाघात होऊन पाय, हात लुळे पडतात.

भारतात पोलिओचा शेवटचा रुग्ण आढळला १३ जानेवारी २०११ या दिवशी. त्यानंतर २४ मार्च २०१४ रोजी पोलिओचे भारतातून निर्मूलन झाल्याचे जाहीर करण्यात आले. १९९५पासून पोलिओ निर्मूलनाची मोहीम मोठ्या निकराने भारतात राबवण्यास सुरुवात झाली. बाळ जन्मल्यापासून दर महिन्याला एक मौखिक डोस असे पाच डोस आणि त्यानंतर बाळ दीड वर्षाचे आणि साडेचार वर्षांचे झाल्यावर एकेक बूस्टर डोस सर्व लहान मुलांना देणे सुरू झाले. 

दरवर्षी दोन वेळा देशातल्या पाच वर्षाखालील यच्चयावत मुलांना पोलिओचे डोस देण्याची पल्स पोलिओ मोहीम कटाक्षाने राबवण्यात आली. एखाद्या विभागात पोलिओचे रुग्ण किंवा संशयित रुग्ण आढळल्यावर तिथे आणखी एक पूरक मोहीम घेण्यात येत होती. पोलिओ लसीकरणातील सातत्यामुळे भारत पोलिओमुक्त झाला. आजही पाकिस्तान, अफगाणिस्तान, नायजेरिया अशा देशांत पोलिओचे अस्तित्व आहे. त्यामुळे जगात पोलिओचा अजूनही धोका आहे. आणि त्यासाठी अजूनही प्लस पोलिओ मोहीम आणि बालकांचे लसीकरण सुरू आहे.

धनुर्वात (टिटॅनस)

या आजारात स्नायू कडक आणि वेदनादायक होतात. दातखीळ बसून जबडा उघडता येणे बंद होते (लॉकजॉ). हे प्राणघातक ठरू शकते. कोणतीही जखम झाली, अगदी संपूर्ण निर्जंतुक पद्धतीने ऑपरेशन करायचे असेल, बाळंतपण करायचे असेल तरी धनुर्वाताची लस दिली जाते. बाळांना जन्मल्यापासून सहाव्या, दहाव्या आणि चौदाव्या आठवड्यात ट्रिपलचे किंवा पेंटाव्हॅक्सिन इंजेक्शन दिले जाते. त्यात धनुर्वाताची लस समाविष्ट असते. पुन्हा दीड आणि साडेचार वर्षांनी त्याचे बूस्टर डोस दिले जातात. आजकाल १०व्या वर्षापासून दर दहा वर्षांनी दिल्या जाणाऱ्या डीटीएपी लसीमध्येही धनुर्वाताच्या लशीचा समावेश असतो. एकेकाळी धनुर्वात होऊन हजारो रुग्ण, गरोदर स्त्रिया दगावत असत. उत्तम लसीकरणामुळे आजमितीला धनुर्वाताचे रुग्ण सापडणेदेखील दुर्मीळ झाले आहे.

गोवर (मीझल्स)

गोवर हा तीव्र संसर्गजन्य आणि विशेषतः लहान मुलांसाठी खूप गंभीर आजार आहे. १९८५पर्यंत दर उन्हाळ्याच्या सुरुवातीला गोवर मोठ्या प्रमाणात आढळून येत असे. त्यामुळे न्यूमोनिया, श्वास गुदमरणे, मेंदूला गंभीर सूज येणे अशा प्रकारची गुंतागुंत व्हायची. आता मुलांना नवव्या आणि १५व्या महिन्यात गोवराचे इंजेक्शन दिले जाते. त्यामुळे गेल्या २५-३० वर्षात गोवराचे रुग्ण सापडणे विरळाच. 

डांग्या खोकला (व्हुपिंग कॉफ)

दोन ते पाच वर्षांच्या मुलांना होणारा हा एक गंभीर आजार आहे. बॉर्डेटेला पर्टुसिस या जिवाणूंमुळे हा आजार होतो. हे जिवाणू श्वासावाटे एकमेकांकडे हा आजार पसरवतात जंतूसंसर्गानंतर ७ ते १५ दिवसात लक्षणे सुरू होतात. खोकताना यात 'व्हूप' असा आवाज येतो. यात उद्‌भवणारा खोकला अनेक आठवडे टिकतो. सतत खोकल्याने भूक कमी होऊन मूल खंगते. श्वास कोंडणे, गुदमरणे, श्वास बंद पडणे, नाकातला घोळणा फुटणे, डोळयात रक्त साकळणे असे त्रासही होतात. शिवाय हर्निया, गुदाशय बाहेर पडणे, झटके येणे असे दुष्परिणामसुद्धा संभवतात.

ट्रिपलच्या लशीमध्ये या आजाराच्या लशीचाही समावेश असतो. लस टोचल्यावर हा आजार होत नाही. ट्रिपल लसीकरणानंतर या रोगाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे.

घटसर्प (डिफ्थेरिया)

कॉरिनीबक्टेरियम डिफ्थेरिइ या जिवाणूद्वारे हा संसर्गजन्य आजार होतो. त्‍यामुळे घसा व टॉन्सिल्‍स यांना संसर्ग होऊन घसा खवखवणे, सौम्‍य ताप, घशामध्‍ये राखाडी रंगाचा पडद्याचा पट्टा किंवा पट्टे निर्माण होणे अशी लक्षणे दिसतात. घशात निर्माण झालेल्या पडद्यामुळे श्‍वासाला अटकाव होऊन मृत्यू होऊ शकतो. 

घटसर्पाचा जिवाणू जंतुसंसर्ग झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या तोंड, नाक, घसा या भागात वास्‍तव्‍य करतो. खोकला व शिंकेच्‍या माध्‍यमातून तो एका व्‍यक्‍तीकडून दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पसरतो.

मुलांना पहिल्या ६ महिन्यात ट्रिपलचे तीन डोस दिले जातात. त्यानंतर दीड आणि साडेचार वर्षांनी बूस्टर डोस दिले जातात. पुढे वयाच्या दहाव्या वर्षी डीटीएपी ही लस दिली जाते. लसीकरणाच्‍या अभावी १४ वर्षापर्यंतच्या बालकांना घटसर्प वारंवार होऊ शकतो. लसीकरणामुळे या आजाराचे अस्तित्व खूपच नगण्य झाले आहे.

गालगुंड (मम्प्स)

गालगुंड हा विषाणुजन्य आजार मम्प्स व्हायरसमुळे लहान मुलांना होतो. लहान वयात न झाल्यास मोठया वयात हा आजार होण्याची शक्यता असते व त्या वयात स्त्रीबीजांड- पुरुषबीजांडामध्ये याचे विषाणू शिरून रुग्णाला वंध्यत्व येण्याची शक्यता असते. हा आजार श्वसनामार्फत पसरतो. थोडा ताप, गालातील लाळग्रंथी सुजणे, दुखणे ही मुख्य लक्षणे. पाच-सात दिवसांत हा आजार बरा होतो. प्रौढ व्यक्तींना मात्र या ‘गालफुगी’ बरोबर वृषण (पुरुष) किंवा ओटीपोटात (स्त्रिया) दुखते. गालगुंडांसाठी एमएमआर ही प्रतिबंधक लस आहे, यात गोवर, रुबेला या आजारांसोबत गालगुंडाच्या लशीचा समावेश आहे. याची प्रतिकारशक्ती जन्मभर टिकते. 

कांजिण्या

व्हेरिसेला झोस्टर व्हायरस या विषाणूमुळे हा संसर्गजन्य आजार होतो. लहान मुलांमध्ये होणाऱ्या या आजारात ताप येतो, अंगाला खाज सुटते, पुरळ येते, ती आकाराने वाढून त्याचे फोड बनतात. हे फोड सर्वांगावर येऊ शकतात. संपूर्ण शरीरावर ५००पेक्षा जास्त फोड असल्यास हा आजार गंभीर आणि प्राणघातक ठरू शकतो, लहान मुले, प्रौढ आणि कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या लोकांमध्ये हा आजार होतो. अगदी निरोगी मुलेदेखील खरोखर आजारी होऊ शकतात. लसीकरणामुळे या आजाराचे प्रमाण अत्यल्प उरले आहे. 

रुबेला

रुबेला व्हायरसमुळे होणारा हा संसर्गजन्य आजार रुग्णांच्या खोकल्यामुळे आणि शिंकण्याने पसरतो. गर्भवती महिला आणि तिच्या बाळासाठी हे विशेषतः धोकादायक असते. लसीकरण न केलेल्या गर्भवती महिलेला रुबेलाची लागण झाल्यास, तिचा गर्भपात होऊ शकतो किंवा जन्मानंतर लगेचच तिचे बाळ दगावू शकते. हा आजार मातेकडून बाळामध्ये पसरल्यास बाळांमध्ये गंभीर दोष व विकृती निर्माण होतात. एमएमआर लस तसेच केवळ रुबेलाची लस दिल्याने आज या आजाराचे प्रमाण जगभरात घटले आहे.

हिपॅटायटिस-ए 

सर्वसामान्यपणे कावीळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिपॅटायटीस-ए आजाराची प्रतिबंधक लस १९९५मध्ये विकसित करण्यात आली. तेव्हापासून जगभरातील या आजाराचे प्रमाण कमालीचे घटते आहे. हिपॅटायटीस-ए हा संसर्गजन्य यकृत रोग आहे. व्यक्ती- संपर्काद्वारे किंवा दूषित अन्न आणि पाण्याद्वारे संक्रमित होते. हिपॅटायटीस-ए प्रतिबंधक लस घेणे बाळांना निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

हिपॅटायटिस-बी

जगभरात दरवर्षी आठ लाखाच्या आसपास रुग्ण हिपॅटायटीस-बी आजाराच्या गुंतागुंतीमुळे दगावतात. रक्त किंवा इतर शारीरिक द्रवांद्वारे हिपॅटायटीस-बी पसरतो. मुलांसाठी हा धोकादायक असतो. बाळाच्या जन्मादरम्यान संक्रमित आईपासून बाळामध्ये हिपॅटायटीस बी विषाणू पसरू शकतो. मातेकडून संसर्ग होणाऱ्या दर  दहापैकी नऊ अर्भकांना या आजाराचा दीर्घकाळ संसर्ग होतो, म्हणूनच बाळांना जन्मानंतर हिपॅटायटीस-बी लशीचा पहिला डोस लगेचच दिला जातो. गर्भवती महिलांची हिपॅटायटीस-बीसाठी चाचणी घेणे आणि बाळांना लसीकरण करणे यामुळे या आजाराची संख्या सध्या नियंत्रणात येते आहे.

हिब

हिमोफिलस इन्फ्लूएंझा बी या नावाने ओळखला जाणाऱ्या या आजारामुळे मुलाच्या रोगप्रतिकारक शक्तीचे गंभीर नुकसान होते. त्याचबरोबर त्यांच्या मज्जासंस्थेला इजा पोचणे, श्रवण क्षमता कमी होणे असे गंभीर त्रास होतात. यामध्ये बालकांचा मृत्यूदेखील होऊ शकतो. पाच वर्षाखालील वयोगटामध्ये याचा प्रादुर्भाव असतो. दरवर्षी एक लाखांपेक्षा जास्त मुलांना संसर्ग होत असे. या आजारात २० टक्के मुलांना बहिरेपणा येऊ शकतो किंवा मेंदूची कार्यक्षमता कमी होऊ शकते.  उपचार करूनही, हिबमेनिंजायटीस असलेल्या २० मुलांपैकी एकाचा मृत्यू होतो. बालकांचे हिब लसीकरण झाल्यामुळे या आजाराला आटोक्यात आणता येणे शक्य झाले आहे.

रोटाव्हायरस जुलाब

रोटाव्हायरस सांसर्गिक आजार आहे. मुख्यतः लहान मुलांमध्ये होणाऱ्या या आजारात, मोठ्या प्रमाणात पाण्यासारखे जुलाब होतात, उलट्या, ताप आणि ओटीपोटात दुखणे, गंभीरपणे निर्जलित होणे असे गंभीर त्रास होतात. मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागते. निर्जलीकरण झालेल्या बालकाला आवश्यक उपचार न मिळाल्यास ती दगावू शकतात. रोटाव्हायरस ही भारतात लसीकरणाच्या वेळापत्रकानुसार, अर्भकाला सुरुवातीच्या काळात दिल्याने या आजाराचे प्रमाणही घटले आहे आणि त्यामुळे होणारे मृत्यूही दिवसेंदिवस खूप कमी होत आहेत. 

न्युमोकॉकल डिसीज

स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया नावाच्या जिवाणूंमुळे हा आजार होतो. यामुळे कानात, सायनसेसमध्ये जंतुसंसर्ग होतो. न्यूमोनिया आणि मेंदूज्वरदेखील होतो, साहजिकच छोट्या बाळांसाठी हा आजार प्राणगंभीर ठरू शकतो. हे जिवाणू मेंदू आणि मज्जारज्जूमध्ये संक्रमित होऊ शकतात. या आजाराच्या लसीकरणामुळे आज कोट्यवधी बालके या धोकादायक आजारापासून सुरक्षित झाली आहेत.

इन्फ्ल्यूएंझा

इन्फ्लूएंझा विषाणूंमुळे होणारा फ्लू हा नाक, घसा आणि फुप्फुसांमध्ये होणारा श्वसनाचा आजार आहे. नाक, घसा आणि फुप्फुसांना संक्रमित करतो रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती, वय आणि आरोग्य यानुसार त्याच्यावर होणारे परिणाम कमी अधिक असतात. फ्लू कोणत्याही वयोगटातील मुलांसाठी धोकादायक असू शकतो. खोकला, ताप, वेदना, थकवा, उलट्या आणि अतिसार अशी लक्षणे यात उद्‌भवतात. 

फ्लूची लस पाच महिन्यांपेक्षा मोठ्या बाळांना दिली जात असल्याने, सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांना फ्लूमुळे रुग्णालयात दाखल करावे लागू शकते. याकरिता गर्भधारणेदरम्यान गरोदर स्त्रियांना फ्लूची लस देणे आणि बाळाच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांचे लसीकरण करणे आवश्यक असते. सहा महिने आणि त्याहून अधिक वयाच्या प्रत्येकाला दरवर्षी फ्लूच्या लशीची आवश्यकता असते. फ्लू लशीचा पहिला डोस देताना १८ दिवसांच्या अंतराने दोन डोस दिले जातात. त्यानंतर प्रत्येक वर्षी एक डोस घ्यावा लागतो. भारतात फ्लूच्या आजाराला फारसे महत्त्व दिले जात नाही, परंतु पाश्चात्त्य देशात हे लसीकरण खूप काळजीपूर्वक केले जाते.कोरोना महासाथीच्या दरम्यान इन्फ्ल्यूएंझा लस दिल्याने जगातील अनेक बालकांना गंभीर स्वरूपात कोरोनाची लागण झाली नाही.

संबंधित बातम्या