संकल्प निरामय आरोग्याचा...

डाॅ. अविनाश भोंडवे
सोमवार, 4 एप्रिल 2022

आरोग्यभान

शककर्ता राजा शालिवाहनाने सुरू केलेल्या कालगणनेनुसार चैत्र शुध्द प्रतिपदेला आपले नवे वर्ष सुरू होते. गुढीपाडवा म्हणून साजरा होणारा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त आहे. वृक्षांना नवी पालवी, झळाळी देणाऱ्या वसंत ऋतूचाही हा प्रारंभ असतो. मग अशा दिवशी आपण आपले संकल्प करून ते पूर्ण करण्याचे इच्छिले तर? नक्कीच मुहूर्ताच्या या हार्दिक भावनेने संकल्पसिद्धी होण्याची शक्यता अधिक ठरेल. कारण कोणतेही कार्य तडीला नेण्यासाठी जी एक भरभक्कम मनोभूमिका लागते, साध्यपूर्ती करण्यासाठी जे मनोबल लागते, ते अशा मंगलमय वातावरणात जास्त सयुक्तिक ठरावे.

या वर्षीच्या आपल्या नववर्षदिनी निरामय आरोग्याचा संकल्प आपण सोडू या. त्यासाठी आपल्या आयुष्यात आणि जीवनशैलीत बदल घडवणारे दहा निश्चय आपण करूया.  

सकाळी लवकर उठेन

‘लवकर निजे, लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे’ खरंतर पूर्वजांच्या या शिकवणीचे अनेक चांगले फायदे आहेत. सकाळी लवकर उठल्याने उत्साही वाटते, मन आनंदी राहते, आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक विचार मनात येत राहतात, व्यायामासाठी वेळ मिळतो, दैनंदिन जीवनातील कार्यक्षमता वाढीस लागते, ताणतणाव दूर होऊ लागतात, भूक लागते आणि रात्री झोपही लवकर आणि गाढ लागते. 

सकाळी उठण्यासाठी रात्री लवकर झोपावे लागते. याबाबत एक शास्त्रीय तत्त्व लक्षात ठेवावे. आपल्या शरीरातील मेलाटोनीन नावाचा एक हार्मोन आपल्या झोपेचे चक्र नियंत्रित करत असतो. सूर्यप्रकाशात तो अगदी कमी असतो. आणि सूर्यास्तानंतर त्याचे प्रमाण वाढते आणि आपल्याला झोप येऊ लागते. रात्री दिव्यांच्या उजेडात, टेलिव्हिजन, संगणक आणि मोबाईलच्या पडद्यावरील रेडीएशनमुळे झोप उशिरा येते. 

त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी आणि झोपताना टेलिव्हिजन, संगणक, मोबाईल पाहत झोपण्याची सवय सोडा. तसेच चहा-कॉफी, कोला पेयांसारखी उत्तेजक द्रव्ये दुपारी चारनंतर घेऊ नका. दुपारी झोपणेही टाळा. शक्य असल्यास रात्रीचे जेवण झाल्यावर शतपावली करावी किंवा थोडे फिरून यावे.

रोज भरपूर पाणी प्राशन करेन

पाणी हा आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीत द्रवपदार्थ असतो. त्यातील रासायनिक क्रियांनी आपली चयापचय क्रिया चालत असते. शरीरातील पाणी कमी पडल्यास डिहायड्रेशन होते. सर्व क्रिया मंदावू लागतात. श्वसन, रक्ताभिसरण, मज्जासंस्थेचे संदेश आणि वेदनांचे परिवहन, मूत्रपिंडाचे कार्य अशा सर्व जीवनावश्यक क्रियांचा जोर ओसरू लागतो. त्यामुळेच पाण्याला ‘जीवन’ म्हणतात.

प्रत्येक प्रौढ व्यक्तीला दिवसभरात सर्वसाधारणपणे २ ते ३ लिटर पाणी पिणे आवश्यक असते. सकाळी उठल्यावर एक-दीड ग्लास पाणी प्यायल्याने रात्रीत कमी पडलेल्या पाण्याची भरपाई होते. पोट साफ होते आणि उत्साही वाटू लागते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने.

  • वजन आटोक्यात राहते. भूक नसतानाही खा खा करण्याची सवय कमी होते.
  • जेवणापूर्वी दहा मिनिटे, जेवण झाल्यावर दहा मिनिटांनी पाणी प्यायल्यास अन्नपचन व्यवस्थित होते. मात्र दोन घासांमध्ये पाणी पिऊ नये. त्यामुळे पोटात गुबारा धरू शकतो.
  • मेंदू तजेलदार राहतो. बौद्धिक कामे झपाट्याने होतात. 
  • शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची मूत्रपिंडांचे कार्य व्यवस्थित होते.
  • झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्याने झोप चांगली लागते.
  • कोणत्याही आजारात पाणी भरपूर प्यायल्याने आजारामध्ये आणि आजारापश्चात येणारा थकवा कमी राहतो आणि लवकर बरे वाटते.
  • नियमित स्वरूपात भरपूर पाणी प्यायल्याने मूतखडे, मूळव्याध, बद्धकोष्ठ असे आजार टळतात.
  • पाणी स्वच्छ आणि निर्जंतुक केलेले वापरावे. पर्याय नसेलच तर मिनरल वॉटर वापरावे. 

नियमित व्यायाम करेन

रोज किमान २५ मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम करावा. त्या जोडीला शक्य झाल्यास व्यायामशाळेतील व्यायाम, सूर्यनमस्कार, योगासने आणि दीर्घ श्वसन यांची जोड द्यावी. नियमित व्यायामाने वजनवाढ होत नाही आणि त्यामुळे होणारे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असे आजार होण्याची शक्यता दुरावते आणि ते असल्यास नियंत्रणात ठेवायला मदत होते. जिममधील व्यायामाने हाडे, स्नायू बळकट होतात आणि पाठ, कंबर दुखण्याचे त्रास होत नाहीत. 

योग्य आणि संतुलित आहार योग्यवेळी घेईन

सकाळी नाश्ता करण्याची सवय लावून घ्या. त्यामुळे आरोग्य उत्तम राहते. नाश्ता करून शाळा-कॉलेजात जाणाऱ्या विद्यार्थांची एकाग्रता, वर्गात शिकतानाची समज आणि आकलनशक्ती उत्तम राहते. सर्व वयाच्या व्यक्तींनी शक्य असल्यास सकाळी किमान एक कप दूध जरूर प्यावे.  आहारामध्ये जंकफूड, फास्टफूड, डबाबंद खाद्यपदार्थ, कृत्रिम शीतपेये, कोला ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स टाळावीत. उघड्यावरचे बाजारी अन्न खाऊ नये. साधेच पण घरी तयार केलेले ताजे अन्न दिवसातून चार वेळा खावे. फॅड डाएटच्या नादी लागू नये.

ऑफिसमध्ये जाणाऱ्या लोकांनी डबा न्यावा. शक्य असल्यास संध्याकाळच्या खाण्याच्या स्नॅक्सही डब्यात असाव्यात. नोकरी-शिक्षणानिमित्त परगावी एकट्या राहणाऱ्या व्यक्तींनी हॉटेल, खानावळी, हातगाडी-टपरीवरच्या अन्नाऐवजी घरगुती मेसचा वापर करावा.

बैठ्या जीवनशैलीत बदल घडवेन

आजमितीला शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून, ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रौढांपर्यंत आणि गृहिणींपासून सेवानिवृत्त आजोबाआजींपर्यंत सर्वांची जीवनशैली पूर्णपणे बैठी झाली आहे. तासनतास एकाच जागी बसून राहणे आजच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झालाय. कोणी अभ्यासासाठी, कोणी कामासाठी, कोणी टेलिव्हिजन नाहीतर मोबाईलवरील मनोरंजनाच्या निमित्ताने एकाच जागेवर अव्याहतपणे खिळून बसलेला असतो. नव्या वर्षाच्या निमित्ताने यात बदल करा. मनोरंजनासाठी एकच तास द्या. त्यातही अर्धा तास बसून तासाभराचा ‘ब्रेक’ घ्या. ऑफिसमधील कामात अगदी आयटी उद्योगामधील कामातसुद्धा, दर तासाला ५० मिनिटे काम झाले की १० मिनिटे पाणी प्यायला किंवा वॉशरूमला जायला एक ब्रेक घेत जा. पन्नास मिनिटांच्या कामातही कधी बसून तर कधी उभे राहून काम करा.

जिथे पायी जाता येईल तिथे वाहन वापरू नका, लिफ्टऐवजी जिना वापरा, लंचअवरमध्ये डबा खाऊन झाल्यावर थोडे पायी चालून या. शरीर सतत हलते चालते राहू द्या, बैठी समाधी टाळा.

रोज ध्यानधारणा करेन

आजच्या जीवनात आरोग्याचा समतोल ढासळण्याचे मुख्य कारण म्हणजे जीवनातील विविध क्षेत्रात अनुभवला जाणारा कमालीचा ताणतणाव. हा तणाव आपण नष्ट करू शकत नाही, पण त्याला नियंत्रित करू शकतो, त्यासाठी मेडिटेशन (ध्यानधारणा) आणि रिलॅक्सेशन टेक्निक हे महत्त्वाचे उपाय आहेत. त्याच्या विविध पद्धती आहेत. शिकवणाऱ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली त्या केल्यास तणावाचे दुष्परिणाम दूर होऊ शकतात. मेडिटेशन किंवा ध्यानधारणा शिकणे शक्य नसल्यास रोज  मन एकाग्र करून आपल्या इष्ट दैवताची एखादी प्रार्थना करणे हासुद्धा उपाय ठरू शकतो. रिलॅक्सेशन टेक्निकविषयी माहितीच्या महाजालात अनेक संकेतस्थळे आहेत. त्याचाही फायदा होतो.

व्यसने टाळण्यासाठी योग्य प्रयत्न करेन

मद्य, तंबाखूजन्य पदार्थ, ड्रग्ज यांच्या व्यसनांनी आयुष्य उद्‌ध्वस्त होते. ही व्यसने म्हणजे वैद्यकीयदृष्ट्या आजारच असतात. ती सोडून देण्याचा निश्चय या वर्षप्रतिपदेला करा. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेणे कधीही उपयुक्त ठरते. हे वर्ष व्यसनमुक्तीचे असा आरोग्यदायी संकल्प व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींनी नक्की करावा. व्यसनमुक्तीनंतर एक नवे जीवन प्राप्त होते. अनेक आजारांची संभाव्यता टळून आणि आयुर्मर्यादाही वाढते. 

नियमितपणे आणि वेळेवर झोप आणि विश्रांती घेईन

रात्री ठरावीक वेळेस झोपण्याची सवय लावा. योग्य काळ झोप घेऊन सकाळी वेळेवर उठण्याची सवय लावा. अशा पुरेशा निद्रेमुळे मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक आरोग्य सुधारू शकते. झोप अपुरी झाल्याने, जागरणे केल्याने उच्च रक्तदाब, वजनवाढ, डोळ्यांचे आजार तर वाढतातच पण चेहऱ्याच्या त्वचेला सुरकुत्या पडणे, वार्धक्य आल्यासारखा चेहरा दिसणे, डोळ्याखाली काळी वर्तुळे आणि बॅग्ज तयार होणे असे बदल दिसून येतात. उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह असे आजारही यामुळे बळावतात. मानसिक तजेला आणि स्मरणशक्ती ढेपाळू लागते. 

एखादा छंद-कला-खेळ जोपासेन

मानसिक ताणतणाव दूर करणे आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी विविध प्रकारचे सकारात्मक छंद, नृत्य, गायन, वादन, चित्रकला, अशा अनेक कला आणि मैदानी खेळ उपयुक्त असतात. आयुष्यात काही तरी चांगली कला किंवा छंद जोपासेन किंवा वाद असलेला मैदानी खेळ पुन्हा खेळू लागेन असा संकल्प आयुरारोग्यवृद्धीसाठी उपकारक ठरेल.  

समाजाभिमुख कार्यात रस घेईन

आरोग्याच्या व्याख्येत मानसिक आणि शारीरिक आरोग्यासोबत सामाजिक आरोग्याचाही सहभाग असतो. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने कोणतीही सामाजिक जबाबदारी घेऊन आपले उत्तरदायित्व निभावणे खूप गरजेचे असते.  

आज अशा अनेक स्वयंसेवी, सामाजिक, धार्मिक संस्था, व्यावसायिक संघटना, सामाजिक चळवळी होत असतात. 

काही आंतरराष्ट्रीय संस्थादेखील आपल्या आजूबाजूला काम करताना दिसतात. अशा संस्थांमध्ये काम केल्याने लोकांशी संपर्क वाढतो, विविध क्षेत्रातील लोकांशी स्नेहसंबंध जुळतात, सामाजिक समजुती आणि विचारांना प्रगल्भता येते. इतरांशी विचारांचे आदानप्रदान केल्याने आयुष्याला एक वेगळे आणि चांगले वळण 

लागू शकते. अशा एखाद्या संस्थेच्या कार्यात सहभागी होण्याने आपल्या आरोग्यावर नक्कीच चांगला आणि सकारात्मक परिणाम होतो. 

संकल्पों की दूरदृष्टि से

राह प्रगति की दिखती,

संकल्पों की कठिन लेखनी

भाग्य मनुज का लिखती ।

असे एका हिंदी कवितेत म्हटले आहे. आपले आरोग्य उजळल्यास भाग्योदय नक्कीच होऊ शकतो. निरामय आरोग्यासाठी हे दहा संकल्प या नववर्ष दिनी करूयात आणि वर्षभर त्यांचे पालन करूया. आणि 'उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही' अशी  प्रतिज्ञा करू या.

 

संबंधित बातम्या