लसीकरणात  टाळाटाळ नको...

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 11 एप्रिल 2022

आरोग्यभान

रोग टाळण्यासाठी लसीकरण हा सर्वात किफायतशीर आणि उपयुक्त असा शास्त्रीय मार्ग आहे. कोरोनापूर्व काळातही लसीकरणामुळे जगभरातले सुमारे ३० लाख मृत्यू दरवर्षी टळत होते. लसीकरणाच्या जागतिक व्याप्तीमध्ये सुधारणा झाल्यास आणखी १५ लाख मृत्यू टाळता येतील. कोरोना प्रतिबंधक लशींमुळे २०२१च्या मध्यानंतर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत घट दिसून येऊ लागली आहे.

दरवर्षी ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन साजरा होतो. जागतिक आरोग्य संघटना ही १९४८मध्ये स्थापन झालेली संस्था आरोग्याबाबत असलेल्या सर्व समस्या, निरनिराळे आजार, नव्याने निर्माण झालेल्या आजारांच्या साथी याचा सखोल अभ्यास करून, हे आजार निर्माण होण्यामागची तसेच ते पसरण्यामागची कारणे, त्यावरील प्रतिबंधक उपाय, औषधोपचार याबाबतीत जागतिक स्तरावर सर्व देशांना मार्गदर्शन करत असते. 

गेली दोन वर्षे कोरोनाबाबतच्या कार्यामुळे या संस्थेचे नाव अगदी सर्वसामान्यांच्या घरात पोहचले. पण स्थापनेपासून गेली सात दशके अनेक आजारांबाबत या संस्थेने सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 

कोरोनाची महासाथ अस्तित्वात येण्याआधीच्या वर्षात म्हणजे २०१९मध्ये जागतिक आरोग्याच्या दृष्टीने भावी काळात उद्‌भवणाऱ्या महत्त्वाच्या १० धोक्यांची यादी केली होती. त्यामध्ये...

 •     हवेचे प्रदूषण आणि हवामानातील बदल 
 •     असंसार्गिक आजार
 •     एन्फ्लुएन्झा
 •     आरोग्यसेवांचा अभाव किंवा तकलादू सार्वजनिक आरोग्य प्रशासन
 •     प्रतिजैविकांना येणारा प्रतिरोध (अॅण्टिबायोटिक रेझिस्टन्स)
 •     नव्याने उदयाला येणाऱ्या विषाणूजन्य आजारांच्या महासाथी
 •     प्राथमिक आरोग्यसेवांचा अभाव
 •     लसीकरणातील टाळाटाळ
 •     डेंग्यू
 •     एचआयव्ही यांचा समावेश होता.  

या सूचीतील जागतिक स्तरावर असलेली लसीकरणाबाबतची उदासीनता आणि टाळाटाळ हा मुद्दा खरोखरी महत्त्वाचा आणि दूरदर्शी आहे.

लस घेण्यासाठी टाळाटाळ (व्हॅक्सीन हेझिटन्सी)
कोरोनापूर्व काळातही संसर्गजन्य आजारांविरोधी असलेल्या लशी उपलब्ध असूनही लस घेण्याची अनिच्छा, नकार आणि टाळाटाळ जागतिक स्तरावर दिसून येत होती. खरेतर ही धक्कादायक प्रवृत्ती आहे. कारण, देवीसारखा अनेक दशके लोकांना विद्रूप करणारा आणि प्रसंगी जिवावर उठणारा आजार लसीकरणामुळे जगातून पूर्ण नाहीसा झाला. लहान मुलांना जन्मभरासाठी पंगू करणारा आणि मृत्युमुखी पाडणारा आजार ‘दोन थेंब पोलिओचे’ या मोहिमेयोगे जगातून काढता पाय घेण्याच्या मार्गावर आहे. घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, गोवर, गालगुंड, कांजिण्या असे वारेमाप संख्येने आढळणारे आजार अगदी तुरळक झाले आहेत. लसीकरणामुळेच अशा असंख्य रोगांशी सामना करत मानवी आरोग्याबाबत उल्लेखनीय प्रगती साधता आली हे निःसंशय. मात्र आजमितीला जगातील अनेक देशात तिथल्या जनतेकडून लसीकरणाबाबत होणारी टाळाटाळ पाहता, ही प्रगती अधोगतीच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे.

रोग टाळण्यासाठी लसीकरण हा सर्वात किफायतशीर आणि उपयुक्त असा शास्त्रीय मार्ग आहे. कोरोनापूर्व काळातही लसीकरणामुळे जगभरातले सुमारे ३० लाख मृत्यू दरवर्षी टळत होते. लसीकरणाच्या जागतिक व्याप्तीमध्ये सुधारणा झाल्यास आणखी १५ लाख मृत्यू टाळता येतील. कोरोना प्रतिबंधक लशींमुळे २०२१च्या मध्यानंतर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत घट दिसून येऊ लागली आहे. त्याचबरोबर आजार गंभीर स्वरूप धारण करून हॉस्पिटलमध्ये, आयसीयूमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झालेली आहे. 

मात्र लसीकरणाला विरोध केल्यास, टाळाटाळ केल्यास काय होऊ शकते हे पोलिओच्या उदाहरणावरून लख्खपणे स्पष्ट होते. आजमितीला पाच वर्षाखालील मुलांचे लसीकरण काटेकोरपणे केलेल्या देशातील पोलिओ संपुष्टात आला, पण या लसीकरणाला विरोध करणारे पाकिस्तान, अफगाणिस्तान, नायजेरिया हे देश अजूनही पोलिओच्या विळख्यात आहेत. या देशांमधून पोलिओ मालावी, येमेन, मादागास्कर अशा देशात जिथे २०१४ पासून एकाही रुग्ण सापडला नव्हता अशा देशात पसरला.

लसीकरणाला टाळाटाळ करण्यामागची कारणे

अनाठायी भीती ः  इंजेक्शन घेण्याबाबत सर्वसामान्यांच्या मनात एक भीती असते. सुई टोचल्यामुळे होणाऱ्या संभाव्य वेदनेबाबत ही भीती असते. कोणत्याही वेदनेबाबत भीती वाटणे साहजिकच असते. पण अगदी बालपणापासून, ‘तुला डॉक्टरकडे नेईन, मग ते तुला इंजेक्शन टोचतील’ अशा रुजवलेल्या भीतीचा हा परिपाक असतो. आपण आजच्या जमान्यात अगदी छोटा आकार असलेल्या डिस्पोझेबल सुयांमुळे या वेदनाही कमी होतात. शिवाय कित्येक इंजेक्शन्स वेदनारहित पद्धतीने त्वचेखाली दिली जातात. शिवाय नाकातून फवाऱ्यावाटे घ्यायच्या लशी आणि पोलिओ तसेच रोटाव्हायरस विरोधी लशी तोंडावाटे दिल्या जातात. या गोष्टी समजावून सांगितल्यास ही भीती दूर होऊ शकते.

लशीचे साइड इफेक्ट ः आधुनिक औषधप्रणालीमधील प्रत्येक औषधांचे साइड इफेक्ट खूप असतात, असा एक (गैर)समज अस्तित्वात आहे. त्यामुळे साधीसुधी अलोपॅथिक औषधेदेखील अनेक जण टाळत असतात. याबाबत दोन मुद्दे लक्षात घ्यायला हवेत.

१) बहुतेक सर्व लशींचे साइड इफेक्ट म्हणून मानले जाणारे त्रास म्हणजे इंजेक्शनची जागा (दंड/ नितंब)  दुखणे हे असतात. खरेतर ते त्रास म्हणजे या लशीद्वारे आपल्या शरीरातील प्रतिकार प्रणालीचे ट्रेनिंग सुरू झाल्याचे लक्षण असते. त्यामुळे लस घेतल्यावर ताप येणे हा एक चांगला परिणाम असतो. आणि तो एक ते तीन दिवसात कमी होतो. प्रौढांना दिल्या जाणाऱ्या लशींमुळे होणारे इतर त्रास म्हणजे चक्कर, मळमळ, थकवा येणे हेदेखील जास्तीत जास्त तीन दिवसात थांबतात आणि वेळ पडल्यास साधी औषधे घेऊन त्वरित कमी होतात.

२) सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध असलेल्या सर्व लशींचे परिणाम आणि दुष्परिणाम  संशोधकांद्वारे पूर्ण तपासलेले असतात. यासाठी काही आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉल काटेकोरपणे पाळावे लागतात. यात आधी प्रयोगशाळेत आणि प्रयोगशाळेतील प्राण्यांवर तीन टप्प्यात, त्यानंतर तीन टप्प्यात मानवी चाचण्या झालेल्या असतात. या चाचण्यांत दिसून येणाऱ्या दुष्परिणामांची सखोल छाननी केली जाते. त्यात गंभीर दुष्परिणाम असलेल्या लसी किंवा औषधे बनवण्याची परवानगी नाकारली जाते. 

इतक्या काळजीपूर्वक तयार झालेल्या लशी वापरात आल्यावरही दीर्घकाळ त्यांच्या चांगल्या आणि वाईट परिणामांची नोंद ठेवली जात असते. त्यामुळे या लशी सुरक्षित असतात. त्यातील गंभीर दुष्परिणाम हे दहा लाखात एखाददुसरा, म्हणजे अत्यल्प असतात. अशा दुर्मीळ घटनांचा बाऊ करून लस घेणे टाळू नये. रस्त्यावर हजारो अपघात होत असतात, म्हणून रस्त्यावरून जाणे, वाहन चालवणे आपण सोडत नाही. योग्य काळजी घेतल्यास अपघात होत नाहीत, हे आपल्याला माहिती असते. लशींच्या बाबतीत हाच विचार अमलात आणावा. दैनंदिन जीवनासाठी वाहतूक महत्त्वाची असते; तसेच निरामय आरोग्यासाठी लसीकरणही तेवढेच महत्त्वाचे असते.

लसीकरणाविरोधी अपप्रचार ः कोरोना लसीकरणाविरोधात आणि त्याआधी पोलिओ, गोवर, रुबेला अशा लशींविरोधात स्युडोसायन्सवर आधारित अनेक मोहिमा जगभरातल्या सोशल मीडियावर सातत्याने लोकांचे बुद्धिभेद करताना दिसतात. कोरोना लशीमुळे वंध्यत्व येते, पौरुष नष्ट होते इथपासून ते लस घेतल्याने एड्स होतो, माणसे मरतात अशा पद्धतीचे बिनबुडाचे संदेशच ‘व्हायरल’ होताना दिसतायत. अशा विरोधी प्रचाराचा परिणाम कोरोना महासाथीच्या आणि अन्य आजारांच्या भवितव्यावर नक्कीच होणार आहे.

वांशिक द्वेष ः या लशी काही वंशांची मुले षंढ व्हावीत म्हणून दिल्या जातात अशा स्वरूपाच्या विद्वेषी प्रचाराची गरळ कट्टरवादी संघटनांकडून जगभरात सातत्याने ओकली जात असते. पूर्वीच्या काळात पोलिओच्या लशीबद्दल आणि आता अलीकडे कोरोनाच्या लशीबाबत हा प्रकार दिसून आला. परिणामतः या वंशाच्या लोकांमध्ये लसीकरणाची वानवा दिसून येते. याचा परिणाम या आजारांचे पूर्ण नियंत्रण न होण्यात होतो आहे.

लसीकरणाची गती मंदावणे
लसीकरण मंदावण्यात आणि वेगाने पूर्ण न होण्यामागे इतरही काही करणे आढळून येतात. 

लशींचे असमान वाटप ः लसीकरण कमी पडण्याबाबत लशींची उपलब्धता नसणे हे महत्त्वाचे कारण असते. आज जगभरात सर्वच आजारांबाबत औषधोपचार आणि लशींचे असमान वाटप झालेले आढळून येते. अमेरिका आणि युरोपमधील श्रीमंत देशांमध्ये सर्वच लसीकरणे मोठ्या प्रमाणात होतात. पण आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या, आफ्रिका, आशिया आणि द.अमेरिका खंडातील असंख्य गरीब व विकसनशील राष्ट्रांपर्यंत औषधे आणि लशी पोहचत नाही. याचा परिणाम साथी आटोक्यात न येता त्या अधिक फैलावण्यामध्ये होतो. 

आत्मसंतुष्टता ः काही प्रगत राष्ट्रांमधील लसीकरणाबाबतची आत्मसंतुष्टता अंगलट येताना आढळते. आपल्या देशामध्ये एखाद्या आजाराचा प्रादुर्भाव कमी झाला की लस घेण्यामध्ये लोकांकडून आणि देशातील आरोग्यसेवांकडून कुचराई होऊ लागते. परिणामतः नाहीसे झालेले आजार पुन्हा उद्‌भवू लागतात. आजच्या जगातील दळणवळणातील प्रगती याचे कारण असते. एखाद्या देशातला तो आजार संपला, अजूनही प्रादुर्भाव असलेल्या परदेशातून या आजाराच्या रुग्णांची आवक होते. त्यातून त्या आजाराचा पुनश्च उद्रेक झाल्याचे दिसून येते. उदाहरणे पाहिल्यास...

 • सन २०००मध्ये अमेरिकेतून गोवराचे पूर्ण उच्चाटन झाल्याचे जाहीर झाले होते.पण त्यानंतर गोवराचे रुग्ण हळूहळू वाढत जाऊन २०१४मध्ये ६६७ आणि २०१८मध्ये ३५० गोवराच्या केसेस अमेरिकेत आढळल्या आणि जगभरात १ लाख १० हजार मृत्यू झाले
 • २०१६मध्ये गोवराच्या रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली. २०१७मध्ये सधन युरोपियन देशात गोवराची २३,७५७ प्रकरणे होती २०१८मध्ये ती वाढून ५३ हजार झाली.
 • इस्राईलमध्ये २०२२मध्ये पोलिओचा एक रुग्ण आढळला.कोणत्याही आजाराचे निर्मूलन तेव्हाच मानले जाते, ज्यावेळेस तो जगभरातून नष्ट होतो. साहजिकच आपल्या देशात आजाराचा प्रादुर्भाव थांबला, तरी तो इतर देशातून आयात होऊ शकतो. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लसीकरणाबाबतची उदासीनता आणि टाळाटाळ करण्यामुळे साथीचे अनेक नवे आजार उद्‌भवू शकतात आणि जुने आजार नव्या स्वरूपात फैलावू लागतात. लशीबाबतची टाळाटाळ हीच आरोग्याबाबत कमालीच्या जोखमीची गोष्ट ठरते. 

सामुदायिक रोग प्रतिकारशक्ती : सांसर्गिक आजारावरील प्रतिबंधक लस दिल्यावर, व्यक्तीच्या शरीरात त्या आजाराच्या विषाणूंना किंवा जिवाणूंना रोखणाऱ्या अँटीबॉडी तयार होतात. ज्यावेळेस जगातील ८० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या शरीरात अशा अँटीबॉडी तयार होतात, तेव्हा जगामधील लोकांत सामुदायिक प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) तयार होते. यायोगे तो विषाणू किंवा जिवाणू जो आजार निर्माण करतो, त्या आजाराच्या प्रसाराला खीळ बसते. यापद्धतीने तो आजार नामशेषही होऊ शकतो. 

लसीकरणातील टाळाटाळीमुळे आजाराला वेसण घालणे शक्य होत नाही. त्यामुळे जगामध्ये काही ठिकाणी त्याची पॉकेट शिल्लक राहतात आणि त्या आजाराच्या साथी वर्षानुवर्षे येत राहतात. संसाधने आणि दृढनिश्चय पुसले जाऊ शकतात, रोगाचा प्रादुर्भाव वाढत राहतो आणि पूर्वी नष्ट झालेले आजार पुन्हा नव्या जोमाने वाढू लागतात. परिणामतः दशकभराचे कठोर परिश्रम वाया जातात.

उपाय

 • लोकशिक्षण ः साथीचे आजार, त्यांचे धोके आणि लसीकरणाचे फायदे याबाबत लोकशिक्षण किंवा जनप्रबोधन होणे गरजेचे ठरते. सर्वच रोगांच्याबाबत सार्वजनिक शिक्षण महत्त्वाचे असते. यामध्ये लसीकरणाला अकारण विरोध करणाऱ्या, अशास्त्रीय गोष्टी आणि अफवा पसरवणाऱ्या लोकांना उघडे पाडणे आवश्यक ठरते. सामाजिक मानसिकतेच्या अभ्यासात ‘डनिंग-क्रुगर इफेक्ट’ नावाचा एक सिद्धांत प्रसिद्ध आहे. यानुसार स्वतःला ज्ञान नसणारे, कोणताही अभ्यास नसलेले लोक आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात. लसीकरण विरोधी मोहिमा या अशा लोकांकडूनच राबवल्या जातात. त्यांना लक्ष्यित करून त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी विशेष प्रबोधनपर मोहिमा आखाव्या लागतील. 

 

 • कायदे ः पालकांना त्यांच्या मुलांना लस देण्यास नकार देणे शक्य तितके कठीण बनवण्यासाठी लसीकरणाबाबतचे कायदे काळजीपूर्वक तयार केले जाणे गरजेचे आहे. लसीकरण न झाल्यामुळे असुरक्षित असलेल्या लोकसंख्येचे संरक्षण करण्यासाठी उपायांचा विचार करणे आवश्यक आहे.

 

 • सोशल मीडिया ः सोशल मीडिया म्हणजे समाजाच्या मनाचे प्रतिबिंब असते. त्यात उमटणारे आवाज हे अनेकदा दबल्या जाणाऱ्या समजांचे प्रतिध्वनी असतात. काहीवेळा हे समज जसे योग्य असतात तसे काहीवेळा ते चुकीचेही असू शकतात. या आधीच्या जगात, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, नियतकालिके, पुस्तके अशी छापील स्वरूपाची आणि रेडीओसारखी ध्वनीस्वरूपातील समाज माध्यमे होती. पूर्वीच्या या छापील माध्यमांपेक्षा आजच्या युगातील आभासी स्वरूपातील माध्यमे तळागाळातल्या लोकांपर्यंतही पोहचू शकतात. या माध्यमांद्वारे सकारात्मक विचारांपेक्षा अतिरंजित स्वरूपातले नकारात्मक, हिंसात्मक आणि निषेधात्मक विचार समाजात सहजरीत्या पसरतात. ज्या व्यक्तींच्या मनात लशींबद्दल फक्त प्रश्न आहेत त्या व्यक्ती मूलगामी लसविरोधी प्रचाराच्या अमलाखाली जाऊ शकतात. 

पूर्वीच्या सोशल मीडियावर काही कायद्यांनी समाजविरोधी प्रचारावर निर्बंध आणणे सोपे होते. मात्र आजच्या आभासी सोशल मीडियाबाबत ते शक्य नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या अल्गोरिदमवर पुनर्विचार करणे आवश्यक आहे.

संबंधित बातम्या