विसर पडलेला आजार...

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 18 एप्रिल 2022

आरोग्यभान

भारत सरकारच्या आरोग्यविभागाच्या २०२०च्या आकडेवारीनुसार २५० जिल्ह्यांमध्ये हत्तीरोगाचा प्रादुर्भाव असून, त्यात महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. २०१७च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात हत्तीरोगाचे ६५ हजार रुग्ण होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात या आजाराचे रुग्ण असल्यामुळे त्यावर सार्वजनिक स्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.

‘एक (किरकोळ) मच्छर बलदंड पुरुषाला नपुंसक बनवतो...’ असे एका हिंदी सिनेमातले वाक्य एकेकाळी खूप चर्चेत होते. वाक्याचा ध्वन्यार्थ त्या चित्रपटात अपेक्षित होता. पण त्यातला वाच्यार्थसुद्धा वैद्यकीयदृष्ट्या फारसा चुकीचा नाही. ‘हत्तीरोग’ नावाने पूर्वापारपासून ओळखल्या जाणाऱ्या आजारात असे घडू शकते. डासांच्या चाव्यातून पसरणाऱ्या या आजारात माणसाचा पाय सुजून हत्तीच्या पायासारखा तर होतोच, पण जननेन्द्रियांना कमालीची सूज येते आणि त्याकडे दुर्लक्ष केल्यास, तो रूग्ण एकाप्रकारे आपले पौरुष हरवून बसू शकतो.

हत्तीरोग सर्वसाधारणपणे पृथ्वीच्या उष्ण कटिबंधातील देशात आढळतो. वैद्यकीय भाषेत याला ‘लिम्फॅटिक फिलेरियासिस’ म्हणतात. यामध्ये- 

 • लिम्फॅडीनायटिस- रसवाहिन्यांमधील रस (लिम्फ) वाहण्याला अडथळा येऊन पायांना सूज येऊ लागते.                                             
 • लिम्फॅडीमा- पायाचा आकार वाढून तो हत्तीच्या पायांसारखा दिसू लागतो. (एलिफन्टियासिस) 
 • काही पुरुष रुग्णांमध्ये अंडाशयाला (स्क्रोटम) सूज येऊन त्याचाही आकार खूप मोठा होतो. याला हायड्रोसील म्हणतात. 

रोगाचे प्रमाण
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार या आजारामुळे २०२०मध्ये जगातील ५० देशांतल्या ८६.३ कोटी व्यक्ती बाधित होत्या. हत्तीरोगाने संसर्गग्रस्त झालेल्या व्यक्तींपैकी अडीच कोटी पुरुषांना हायड्रोसील, दीड कोटीपेक्षा अधिक व्यक्तींना लिम्फिडीमा, तर साधारणपणे ३.६ कोटी लोकांमध्ये हा आजार दीर्घकाळ आहे.
भारत सरकारच्या आरोग्यविभागाच्या २०२०च्या आकडेवारीनुसार २५० जिल्ह्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव असून, त्यात महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. २०१७च्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात हत्तीरोगाचे ६५ हजार रुग्ण होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात या आजाराचे रुग्ण असल्यामुळे त्यावर सार्वजनिक स्तरावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. 

आजाराची कारणे
फिलारियोडायडिया या गटातील नेमाटोड्स  (राउंडवर्म्स) म्हणून वर्गीकृत असलेल्या परजीवी कृमींच्या संसर्गामुळे हत्तीरोग उद्‌भवतो. एखाद्या सुती धाग्याप्रमाणे दिसणाऱ्या या कृमीचे तीन प्रकार आढळतात. 

 1. वुचेरेरिया बँक्रॉफ्टी - जगातील ९० टक्के रुग्णांमध्ये याचा संसर्ग आढळतो. 
 2. ब्रुगीया मलायी- उर्वरित १० टक्क्यांपर्यंत व्यक्तींमध्ये या कृमींचा संसर्ग आढळतो.
 3.  ब्रुगिया टिमोरी- या प्रजातीमुळेही काही व्यक्तीत संसर्ग होतो.

प्रसार
विविध प्रकारच्या डासांमुळे हत्तीरोग पसरतो. यामध्ये-
    शहरी आणि निमशहरी भागात प्रामुख्याने क्युलेक्स
    ग्रामीण भागात अॅनॉफेलीस 
    पॅसिफिक महासागरातील बेटांवरील वस्त्यांमध्ये एडीस असे वर्गीकरण आढळते.

प्रसारचक्र
संक्रमित रुग्णाला डास चावतो, रुग्णाचे रक्त डासांच्या शरीरात जाते. डासांना मायक्रोफिलेरियाचा संसर्ग होतो. डासांच्या शरीरात गेल्यावर मायक्रोफिलेरिया संसर्गजन्य अळ्यांच्या रूपात परिपक्व होतात. जेव्हा असे संक्रमित डास निरोगी व्यक्तींना चावल्यावर, विकसित झालेल्या परजीवी सूक्ष्म अळ्या रुग्णांच्या त्वचेवर जमा होऊन रुग्णाच्या  शरीरात प्रवेश करतात. त्यानंतर या अळ्या रसवाहिन्यांकडे स्थलांतरित होतात. तिथे त्यांची वाढ होऊन पूर्ण विकसित फिलेरिया कृमी निर्माण होतात. पूर्ण वाढ झालेल्या कृमी रसवाहिन्यांमध्ये घर करून राहतात आणि रसग्रंथीप्रणालीच्या दैनंदिन कार्यात व्यत्यय आणतात. या कृमी अंदाजे ६ ते ८ वर्षे जगतात. त्यांच्या जीवनचक्रामध्ये लाखो मायक्रोफिलेरियांना (अपरिपक्व अळ्या) त्या जन्म देतात आणि या अळ्या रक्तप्रवाहात सर्वत्र फिरत राहतात.    

आजाराची जोखीम
हत्तीरोग होण्यामध्ये विविध घटकांचा विचार केला तर खालील गोष्टी लक्षात येतात- 

 • वय - सर्व वयोगटांमध्‍ये हत्तीरोगाची लागण होऊ शकते.
 • लिंग - हत्तीरोग पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही होऊ शकतो. मात्र प्रादुर्भाव अधिक असणाऱ्या प्रदेशात पुरुषांमध्ये हत्तीरोगाचे प्रमाण जास्त दिसून येते.
 • स्थलांतरित लोकसंख्या - कामधंदा आणि इतर कारणांमुळे वारंवार स्थलांतर करणाऱ्या लोकांमधील रुग्णांमुळे हत्तीरोगाचा प्रसार देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात होताना ढळतो.
 •  रोगप्रतिकार शक्ती - हत्तीरोगाविरोधी रोगप्रतिकार शक्तीबाबत वैद्यकीय संशोधनांद्वारे अद्याप निश्चित माहिती उपलब्ध नाही.
 • सामाजिक कारणे - वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, लोकांचे स्‍थलांतर, अज्ञान, गरीबी आणि अस्वच्छता.
 •  पर्यावरणीय घटक -

    २२ ते ३८ डिग्री सेंटीग्रेड तपमान आणि ७० टक्‍के आर्द्रता ही क्युलेक्स डासांच्या वाढीसाठी पोषक असते.

 •   दूषित पाणी- क्युलेक्स डासांची उत्पत्ती डबकी, प्रदूषित पाणी यात मोठया प्रमाणात होते. उघडी गटारे, शहरांचे आणि गावांचे रचनात्मकदृष्ट्या अयोग्य आणि अपूर्ण नियोजन, अयोग्य पद्धतीने होणारा सांडपाण्याचा निचरा या सर्व बाबींमुळे क्युलेक्स डासांची उत्पत्ती मोठया प्रमाणात होते. परिणामस्वरूप हत्तीरोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव वाढतो.

लक्षणे
हत्तीरोगाच्या संसर्गक्षम जंतूंचा शरीरात प्रवेश झाल्यावर आजाराची लक्षणे दिसण्यास ८ ते १६ महिन्यांचा कालावधी लागतो. हत्तीरोगाच्या रुग्णांमध्ये दिसणाऱ्या लक्षणांच्या चार अवस्था आढळतात.

 • जंतूंचा शिरकाव - यामध्ये आजाराबाबत लक्षणे क्वचित दिसू शकतात.
 • लक्षणविरहित अवस्था- बहुतांश रुग्णांना सुरुवातीला काहीच लक्षणे नसतात. रात्रीच्या वेळेस रुग्णांच्या रक्त तपासणीत मायक्रोफायलेरिया आढळून येतात, मात्र रुग्‍णांमध्‍ये रोगाची कोणतीही लक्षणे व चिन्‍हे आढळून येत नाहीत. परजीवी कृमींचे संक्रमण होत असताना आणि त्या कृमी रसवाहिन्यांत वाढत असताना संसर्गाची कोणतीही बाह्य लक्षणे दिसत  नाहीत. पण लक्षणे नसली तरी या रुग्णांच्या रसवाहिन्या, रसग्रंथी आणि मूत्रपिंडांना इजा होऊन त्यांची कार्यक्षमता कमी व्हायला लागलेली असते. या रुग्णांची प्रतिकार प्रणालीदेखील खालावत जाते. 
 •  तीव्र लक्षणे असलेले रुग्ण- फिलेरिया शरीरात गेल्यावर रुग्णाच्या शरीरांतर्गत प्रतिकार प्रणालीचा प्रतिसाद म्हणून अंतर्गत दाह (इन्फ्लेमेशन) निर्माण होतो. अनेकदा क्रॉनिक लिम्फीडीमा किंवा एलिफंटियासिसमध्ये अशा प्रकारचा दाह निर्माण होऊन, सूज आलेल्या भागाची तीव्र आगआग आणि वेदना होत राहतात. फिलेरियाच्या संसर्गाने जिवाणूंना रोखण्यासाठी असणारी प्रतिकारशक्ती कमी होते. परिणामतः त्वचेमध्ये अन्य जिवाणूंचा संसर्ग होऊन, सूज वाढते, त्यामध्ये पू होऊ शकतो आणि तीव्र वेदना वाढतात. या वेदना एवढ्या तीव्र असतात आणि त्या एवढ्या दीर्घकाळ सुरु राहतात की अनेक रुग्णांना काम करणे अशक्य होते. त्यामुळे या व्यक्तींवर नोकरी गमावण्याची किंवा व्यवसाय बंद करण्याची वेळ येते.     
 • दीर्घकाळ संसर्ग असलेले रुग्ण - हत्तीरोगाचा संसर्ग दीर्घकाळ राहिल्यावर पाय सुजणे, पुरुषांमध्ये अंडाशय सुजणे आणि स्त्रियांमध्ये स्तन सुजणे ही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. शरीरातील अशा विकृतींमुळे अनेकदा सामाजिक, आर्थिक, मानसिक, आणि कौटुंबिक समस्या उभ्या राहतात. अशा रुग्णाचा संपर्क टाळला जातो. व्यावसायिक उत्पन्नाच्या संधी दुरावतात. रुग्णाचा वैद्यकीय खर्च वाढतो. 

निदान
हत्तीरोगाच्या जंतूंच्या विशिष्ट सवयीमुळे हे जंतू मानवी रक्तात रात्री मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे रात्री ८.३० ते १२ या काळात रुग्णाची रक्त तपासणी केल्‍यास रक्तात मायक्रोफिलेरिया सापडतात आणि हत्‍तीरोगाचे निदान होते.

औषधोपचार
रक्त तपासणीत मायक्रोफिलेरिया आढळून आलेल्या रुग्‍णांना - डीईसी (डायएथील कारबामॅझाईन) हे औषध ३०० मिलीग्रॅम दररोज असे १२ दिवस देण्‍यात येते. याचा डोस रुग्णाच्या वजनाप्रमाणे असतो. (दर किलोला ६ मिलीग्रॅम) हत्तीरोगाच्या रुग्णांसाठी पायाची स्‍वच्‍छता करणे आणि काळजी घेणे तसेच शारीरिक व्यायाम करणे महत्त्वाचे असते. तीव्र लक्षणांसाठी वैद्यकीय सल्ल्याने योग्य ती प्रतिजैविके घेणे आवश्यक असते.

प्रतिबंधात्मक उपाय
हत्तीरोग नियंत्रणात प्रतिबंधात्‍मक उपाययोजना महत्त्‍वाच्‍या ठरतात यात -

डासांचे नियंत्रण
डास उत्पत्तीच्या जागा नष्ट करण्यासाठी मैला, घाण, कचरा सांडपाणी, डबकी आदींची योग्य विल्हेवाट लावणे. खड्डे, सखल जागा मातीचा भराव टाकून बुजविणे. साचलेल्या पाण्यातील पाणवनस्पती, गवत अशा गोष्टी काढून टाकणे, डासांच्या उत्पत्ती स्थानांमध्ये मलेरिया ऑइल, पॅरीसग्रीन अथवा कीटकनाशकाची फवारणी करणे, डासांचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी साचलेल्‍या पाण्यात गप्‍पी मासे सोडावेत. पाण्याच्या टाक्या, रांजण, बॅरल, हौद यांना व्यवस्थित झाकणे बसवणे, अन्यथा ती कापडाने झाकणे, वेळोवेळी त्यांची साफसफाई करणे. आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळणे हे उपाय करावे लागतात.

डासांच्या चाव्यांपासून रोगक्षम व्यक्तींचे संरक्षण करणे आवश्यक असते. त्यासाठी मच्‍छरदाण्‍यांचा वापर करणे, घराच्या दारे, खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळी बसविणे आवश्यक असते.

रोगाचे सर्वेक्षण
हत्तीरोगाचा प्रसार रोखण्‍यासाठी हत्‍तीरोग समस्‍याग्रस्‍त भागात दोन वर्षाखालील मुले, गर्भवती महिला आणि गंभीर आजारी रुग्‍णांना वगळता, सर्वाना वर्षातून एकदा एकाचवेळी डीईसी गोळ्या खाऊ घालणे महत्त्वाचे आहे. ही मोहीम किमान पाच वर्षे राबविल्यास हत्तीरोग नष्ट होण्यास हातभार लागू शकतो.

आरोग्य शिक्षण
हत्‍तीरोगासाठी वैयक्तिक स्‍वच्‍छता आणि हत्‍तीपायाच्या सूजेवरील उपचार आवश्यक असतात. पाय सुजलेल्या रुग्णांनी तीव्र लक्षण अवस्‍था टाळण्यासाठी पाय किंवा बाधित अवयव साबणपाण्‍याने नियमित स्वच्छ ठेवावेत. पायाच्या आकारमानाप्रमाणे योग्य पादत्राणे वापरावीत. पावलांना जखम होऊ नये म्हणून काळजी घ्‍यावी. हत्तीरोगामुळे अंडाशयाला सूज आली असल्यास शस्त्रक्रिया करून घ्यावी. एक दिवसीय सामुदायिक औषधोपचार मोहीम आणि रात्रीच्या रक्त तपासणीत सहभाग घ्‍यावा. रक्तनमुना तपासून घेऊन उपचार घ्यावा. 

प्रतिबंधक केमोथेरपी
जागतिक आरोग्य संघटनेने हत्तीरोग निर्मूलनासाठी प्रतिबंधात्मक केमोथेरपी धोरणाची शिफारस केली आहे. हत्तीरोगाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या प्रदेशातील सर्व जनतेला मोठ्या प्रमाणात प्रतिबंधक औषधे दिली जातात. (मास ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन) यामध्ये जोखीम असलेल्या लोकसंख्येला औषधांचा वार्षिक डोस देणे समाविष्ट आहे. प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागात जर फिलेरीयामुळे होणाऱ्या इतर आजारांचाही प्रादुर्भाव असेल तर वेगवेगळी औषध योजना केली जाते.

 • लोईअसीसचा सह-प्रादुर्भाव असलेल्या देशांत- अल्बेन्डाझोल (४०० मिलीग्रॅम) वर्षातून दोनदा
 • ऑन्कोसर्कियासिस असलेल्या देशांमध्ये- अल्बेन्डाझोल (४०० मिग्रॅ) आणि आयव्हरमेक्टिन (२०० मायक्रोग्रॅम/ दर किलो वजनामागे)
 • ऑन्कोसेरकियासिस नसलेल्या देशात -डायएथिल कार्बामाझिन सायट्रेट -डीईसी (६ग्रॅम मिग्रॅ/किलो) अल्बेन्डाझोल (४०० मिग्रॅ)

जागतिक आरोग्य संघटनेने ऑन्कोसेरकियासिस नसलेल्या देशात - आयव्हरमेक्टिन (२०० मायक्रोग्रॅम/ किलो), डायएथिल कार्बामाझिन सायट्रेट  (६ मिग्रॅ/ किलो) आणि अल्बेन्डाझोल (४०० मिलिग्रॅम) दरवर्षी असे पाच वर्षे दिल्यास आजार पूर्ण दूर करता येतो असे सांगितले आहे.

संबंधित बातम्या