रुबेला-जर्मन गोवर आजार...

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 2 मे 2022

आरोग्यभान

रुबेला गोवरासारखा गंभीर नाही, मात्र गरोदर स्त्रियांना रुबेलाची लागण झाली तर त्यांच्या पोटातील बाळांवर विपरीत परिणाम होऊ शकतात. ही मुले जन्मल्यावर त्यांच्यात अनेक गंभीर विकृती आढळून येतात. गरोदरपणाच्या पहिल्या १२ आठवड्यात रुबेला झालेल्या मातांच्या पोटी जन्मलेल्या ८० टक्के अर्भकांमध्ये ‘कंजनायटल (जन्मजात) रुबेला सिंड्रोम’ निर्माण होतो.

रुबेला हा एक विषाणूजन्य सांसर्गिक आजार आहे. या आजारात साधा ताप येतो आणि सौम्यसे लाल पुरळ येते. याला जर्मन गोवर किंवा तीन दिवसांचा गोवरदेखील म्हणतात. रुबेला झालेल्या व्यक्तींना बहुधा सौम्य लक्षणे दिसतात. पण अनेकांमध्ये कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. मात्र ज्या मातांना गर्भधारणेदरम्यान संसर्ग होतो त्यांच्या पोटातील बाळांबाबत गंभीर समस्या उद्‌भवतात. तसे पाहिले तर रुबेला आणि गोवर (मीझल्स) यामध्ये बरेच फरक आहेत. दोन्ही आजारात लालसर पुरळ येत असले, तरी रुबेला गोवराच्या विषाणूंमुळे होत नाही. त्याचा विषाणू वेगळा आहे. रुबेलामध्ये गोवरासारखा संसर्ग वेगाने पसरत नाही आणि रुबेला गोवरासारखा गंभीरही नाही.

भारतामध्ये मुले होण्याच्या वयोगटातील स्त्रियांपैकी ४० टक्के स्त्रियांना रुबेला विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. मात्र भारतीय उपखंडात दरवर्षी गरोदरपणात मातेला रुबेलाचा संसर्ग झाल्यामुळे सुमारे दोन लाख मुले जन्मजात विकृती घेऊन या जगात येतात. 

चिन्हे आणि लक्षणे
रुबेलाची चिन्हे आणि लक्षणे सहजासहजी लक्षात येण्यासारखी नसतात. आजार होऊन गेल्याचे कित्येकांना कळतही नाही. मात्र विषाणूचा संपर्क झाल्यानंतर, दोन ते तीन आठवड्यांनी या आजाराची  चिन्हे आणि लक्षणे बहुसंख्य रुग्णांमध्ये आढळतात. ही लक्षणे १ ते ५ दिवस राहतात. यामध्ये-

 • १०२ अंश फॅऱ्हनाहाइट  (३८.९ अंश सेंटिग्रेड) किंवा त्यापेक्षा कमी असा सौम्य ताप
 • डोकेदुखी
 • चोंदलेले किंवा वाहणारे नाक
 • डोळे सुजतात आणि लाल होतात. 
 • मानेच्या मागील बाजूस आणि कानांच्या मागे वाढलेल्‍या, पण दाबल्यावर नरम लागणाऱ्या गाठी लागतात. (रसग्रंथी) 
 • एक बारीकसे, लालसर गुलाबी रंगाचे पुरळ चेहऱ्यावर सुरू होऊन पुढे छातीवर, पाठीवर, हातांवर आणि पायांवर पसरते. २ ते ३ दिवसात ते त्याच क्रमाने अदृश्य होते.
 • सांधे दुखणे
 • एखाद्या व्यक्तीला, मुलाला वर सांगितलेली केलेली चिन्हे किंवा लक्षणे असतील तर तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. 

कारणे
रुबेला नावाच्या विषाणूमुळे होणारा हा आजार हवेतून पसरतो. संक्रमित व्यक्ती खोकल्यावर किंवा शिंकल्यावर त्याच्या आजूबाजूस असणाऱ्या व्यक्तींना त्याचा संसर्ग होऊ शकतो. संक्रमित व्यक्तीच्या श्वासोच्छवासातून उडणाऱ्या स्रावांमधून आणि नाकातोंडातून उडणाऱ्या तुषारांमधून इतरांना त्याची बाधा होत राहते. गर्भवती स्त्रीला रुबेलाचा संसर्ग झाला असेल तर रक्तप्रवाहाद्वारे तिच्या गर्भाशयातील गर्भालादेखील त्याचा संसर्ग होतो.

रुबेला विषाणूची लागण झाल्यावर पुरळ उठण्याच्या आधी एक आठवडा आणि पुरळ निघून गेल्यानंतर एक किंवा दोन आठवडे ती व्यक्ती संक्रमक राहते. म्हणजेच एखाद्या संक्रमित व्यक्तीला या आजाराची लक्षणे दिसून येण्याआधीपासूनच तिच्याकडून त्याचा प्रसार होत असतो आणि ती व्यक्ती बरी झाल्यावरही हा आजार पसरवत राहते.    

आजारातील गुंतागुंत
रुबेला हा सौम्य पद्धतीचा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार एकदा झाल्यावर त्याविरुद्धची प्रतिकारशक्ती निर्माण होते आणि ती कायमची राहते. 

 •     रुबेला झालेल्या काही स्त्रियांना बोटे, मनगटे आणि गुडघ्यांच्या सांधेदुखीचा त्रास होतो. हा त्रास एक महिना टिकतो. 
 •     काही रुग्णांत रुबेलामुळे कानांना संसर्ग होतो 
 •     तसेच मेंदूला सूजही येऊ शकते.

गरोदर स्त्रियांना रुबेलाची लागण झाली तर त्यांच्या पोटातील बाळांवर विपरीत परिणाम होऊ शकतात. ही मुले जन्मल्यावर त्यांच्यात अनेक गंभीर विकृती आढळून येतात. गरोदरपणाच्या पहिल्या १२ आठवड्यात रुबेला झालेल्या मातांच्या पोटी जन्मलेल्या ८० टक्के अर्भकांमध्ये 'कंजनायटल (जन्मजात) रुबेला सिंड्रोम' निर्माण होतो. या सिंड्रोममुळे खालीलपैकी एक किंवा अनेक दोष आढळतात- 

 •     बाळाच्या वाढीला विलंब होणे
 •     जन्मजात मोतीबिंदू
 •     जन्मजात बहिरेपणा
 •     जन्मजात हृदयाच्या झडपा आणि कप्प्यांमध्ये दोष
 •     इतर अवयवांमध्ये दोष
 •     बौद्धिक अपंगत्व
 •     ग्लोकोमा
 •     मेंदूला इजा 
 •     थायरॉइड आणि इतर संप्रेरकांच्या समस्या
 •     फुप्फुसांना सूज येणे

गर्भधारणेच्या १२ आठवड्यांनंतरच्या काळातसुद्धा जन्मणाऱ्या बाळांमध्ये दोष आढळू शकतात. याशिवाय गर्भवती स्त्रियांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांमध्ये

 •     गरोदरपणाचे ५ महिने पूर्ण होण्याआधी गर्भपात होणे
 •     प्रसूतीमध्ये बालक जन्मजात मृतावस्थेत जन्माला येणे,
 •     अपुऱ्या काळात प्रसूती होणे अशा गंभीर गोष्टी येतात. 

प्रतिबंध
लसीकरण हाच रुबेला टाळण्याचा एकमेव आणि उत्तम पर्याय आहे. रुबेलाच्या लसीकरणामुळे आज कोट्यवधी मुलींच्या विवाहोत्तर आयुष्यात, विकृत मूल जन्मण्याचे, अपुऱ्या दिवसातील प्रसूतीचे आणि २०व्या आठवड्यांतील गर्भपाताचे दुर्धर प्रसंग टळले आहेत.     रुबेलाची लस स्वतंत्रपणे मिळते किंवा ‘एमएमआर’ या गोवर-गालगुंड-रुबेला अशा तीन आजारांविरोधी कार्य करणाऱ्या लशीमार्फत लसीकरण केले जाते. भारतातील बालकांना राष्ट्रीय लसीकरण योजनेमध्ये एमएमआर लस दिली जाते. ही लस ०.५ मिलिलिटर एवढ्या प्रमाणात त्वचेखाली दिली जाते.  भारतात ९ ते १२ महिन्यांपर्यंत पहिला आणि १६ ते २४ महिन्यांच्या वयात बालकांना दुसरा डोस दिला जातो. आंतरराष्ट्रीय लसीकरण सूचीनुसार मुलांना १२ ते १५ महिन्यांच्या दरम्यान एकदा आणि ४ ते ६ वर्षांच्या दरम्यान, म्हणजे शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी एमएमआर लस द्यावी असा संकेत आहे. गर्भधारणेदरम्यान रुबेला होण्याचा आणि त्यानंतर बाळांवर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्व मुलींनी लस घेणे विशेषतः महत्त्वाचे आहे. ज्या स्त्रियांनी लस घेतली आहे किंवा ज्यांना रुबेला होऊन गेल्यावर त्यामुळे निर्माण होणारी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे, अशा स्त्रियांच्या नवजात अर्भकांमध्ये रुबेलाविरोधी जन्मजात प्रतिकारशक्ती असते आणि जन्मानंतर ती सहा ते आठ महिने टिकून राहते. 

नवजात अर्भकांना घेऊन त्यांच्या पालकांना रुबेलाग्रस्त देशात जायचे असेल तर ही बालके ६ महिन्यांची होण्याआधीही त्यांना रुबेला लस दिली जाते. पण त्यांना सूचीप्रमाणे १२ ते १५व्या महिन्यात आणि साडेचार वर्षांच्या दरम्यान पुन्हा लस घेणे आवश्यक असते. अनेक देशांमध्ये रुबेला दुर्मीळ आहे कारण त्या देशातील मुलांना लहान वयातच रुबेलाविरोधी लसीकरण केले जाते. जागतिक पातळीवरच्या संशोधनानुसार साधारणपणे एकुणातल्या ९० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मुलांना रुबेलाविरोधी लस दिल्यास सामुदायिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊन हा आजार त्या देशातून हद्दपार होऊ शकतो. मात्र जगामधील असंख्य देशात हा विषाणू अजूनही सक्रिय आहे. त्यामुळे अशा देशात जाण्यापूर्वी गर्भवती असलेल्या महिलांनी रुबेला लस घेणे आवश्यक ठरते.

एमएमआर लशीची गरज कोणाला?
परदेश प्रवासाला जाताना काही देशांमध्ये एमएमआर लस घेणे अनिवार्य असते. मात्र खालील वर्गीकरणामध्ये एमएमआर किंवा रुबेला लस घेण्याची गरज नसते.

 • वयाच्या १२व्या महिन्यांनंतर एमएमआर लशीचे दोन डोस दिले गेले असतील
 • जर त्यांच्या रक्तचाचणीत गोवर, गालगुंड आणि रुबेला या आजारांविरोधी रोगप्रतिकारक शक्ती दर्शविणाऱ्या अँटिबॉडीज असतील.
 • १९५७पूर्वी जन्मलेल्या महिलांनी रुबेला लस आधीच घेतली असेल, किंवा रुबेलाविरोधी अँटिबॉडीज त्यांच्या रक्त चाचणीत आढळल्या असतील परंतु खालील वर्गीकरणानुसार एमएमआर लस घेणे योग्य असते. 
 • प्रसूतिपश्चात बाळाला स्तनपान करणारी माता  
 • कॉलेज, किंवा शाळेनंतरचे उच्च शिक्षण घ्यायला परदेशी जाणारे विद्यार्थी
 • परदेशात जाऊन हॉस्पिटल, वैद्यकीय सुविधा, बाल संगोपन केंद्र किंवा शाळेत काम करणाऱ्या व्यक्ती
 • जलमार्गाने (क्रूझ, बोट) परदेश प्रवास करणारे लोक
 • लस न घेण्याची शिफारस  
 • गरोदर स्त्रिया किंवा वैद्यकीय उपचारामध्ये पुढील चार आठवड्यांत गर्भधारणा होण्याची शक्यता असलेल्या स्त्रिया.
 • जिलेटिनला, निओमायसिन या प्रतिजैविकाला किंवा एमएमआर लशीच्या आधीच्या डोसला ज्यांना प्राणघातक स्वरूपाची अॅलर्जीक रीअॅक्शन आलेली असेल अशांना तसेच कर्करोग, रक्ताचा विकार किंवा अन्य आजारांसाठी रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करणारी औषधे घेणाऱ्या रुग्णांनी लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 • रुबेला विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींनी आपले कुटुंबीय, मित्रपरिवार आणि रोजचे सहकारी यांना आपल्या आजाराची कल्पना द्यावी. मुलांना रुबेला झाल्यास १५ दिवस शाळेत किंवा बाहेर पाठवू नये.

लशीचे दुष्परिणाम
बहुतेक लोकांना लशीचे कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीत. लसीकरणानंतर सुमारे १५ टक्के लोकांना ७ ते १२ दिवसांदरम्यान ताप येतो. सुमारे ५ टक्के लोकांना सौम्य पुरळ येते. काही किशोरवयीन आणि प्रौढ महिलांना लस घेतल्यावर २ ते ३ दिवस सांधे दुखणे, सांधे कडक होणे असा अनुभव येतो. उपलब्ध आकडेवारीनुसार रुबेलाच्या लशींच्या १० लाख डोसपैकी एका डोसला गंभीर अॅलर्जीक रीअॅक्शन येते. 
एमएमआर लस आणि आणि ऑटिझम एमएमआर लशीत गोवर, गालगुंड आणि रुबेला एकत्रितपणे दिली जाते. या एकत्रीकरणामुळे मुलांमध्ये ऑटिझम ही विकृती निर्माण होते, असा अपप्रचार काही वर्षांपूर्वी केला गेला होता. परंतु अमेरिकन अॅकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स, नॅशनल अॅकॅडमी ऑफ मेडिसिन आणि सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) यांनी केलेल्या एका विस्तृत संशोधनपर अहवालातून एमएमआर लशीमुळे ऑटिझम निर्माण होत नाही, आणि त्या लशी वेगळ्या केल्यामुळे कोणताही वैज्ञानिक फायदा होत नाही असा ठाम निष्कर्ष काढला गेला आहे.

या संशोधनांतून असे सिद्ध झाले की बहुधा ऑटिझम हा विकार १८ ते ३० महिने वयाच्या मुलांमध्ये होत असतो. याच वेळेस मुलांना एमएमआर लस दिली जाते. परंतु लस आणि ऑटिझम यांच्यात फक्त वेळेचे साधर्म्य आहे, याचा अर्थ लशीमुळे असे घडते असे म्हणायचे कोणताही शास्त्रीय पुरावा मिळालेला नाही.

संबंधित बातम्या