लो ब्लड प्रेशर...

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 9 मे 2022

आरोग्यभान

सध्याच्या जगात जीवनशैलीमुळे निर्माण होणारे अनेक आजार आहेत. त्यात उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे अग्रणी आहेत. त्यातील रक्तदाब म्हणजे रक्तवाहिनीतून खेळणाऱ्या रक्ताचा रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर पडणाऱ्या दबाव.

‘मला लो बीपीचा त्रास आहे. कालपासून चक्कर येतेय,’ अशी तक्रार घेऊन अनेक रुग्ण डॉक्टरांकडे येत असतात. यामध्ये सत्तरीपुढचे ज्येष्ठ नागरिक तर असतातच, पण अगदी विशीतिशीतल्या तरुण मुली, एकदोन मुलांच्या आया असलेल्या महिलादेखील असतात. त्यांच्याशी बोलल्यावर आणि तपासणी केल्यावर, पूर्वी कधीतरी त्यांना कुणीतरी डॉक्टरांनी अन्य कारणांसाठी तपासताना सांगितलेले असते, की ‘तुमचे बीपी थोडे कमी आहे.’ बस्स. यापैकी बरेच जण तेवढ्याच एका वाक्यावरून आपले ‘लो बीपी’चे बिरुद मिरवत राहतात. हे ‘लो बीपी’ म्हणजे नक्की काय? उच्च रक्तदाबासारखा असा काही आजार असतो का? हा कमी रक्तदाब असण्याची कारणे काय? त्यावर काही उपचार असतो का? हा त्रास एकदा झाला की कायमचा राहतो का? याबाबत कुणीही चौकशी किंवा विचार केलेला नसतो.       

सध्याच्या जगात जीवनशैलीमुळे निर्माण होणारे अनेक आजार आहेत. त्यात उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे अग्रणी आहेत. 

रक्तदाब आणि उच्च रक्तदाब
आपल्या शरीरात हृदयाद्वारे रक्त बाहेर ढकलले जाते. सर्व रक्तवाहिन्यांतून ते शरीरात खेळवले जाते. रक्ताभिसरणाच्या या क्रियेत हृदय एखाद्या पंपासारखे कार्य करते. त्याद्वारे सर्व रक्तवाहिन्यांत रक्तप्रवाह काही दबावाने (प्रेशरने) पसरत जातो. रक्तवाहिनीतून खेळणाऱ्या रक्ताचा रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर पडणाऱ्या दबावाला रक्तदाब किंवा ब्लड प्रेशर म्हणतात. हे मोजमाप पाऱ्याच्या स्तंभाच्या मिलिमीटर उंचीमध्ये (एचजी)  केले जाते. रक्तदाबामध्ये दोन मोजमापांचा समावेश होतो. 

 • सिस्टॉलिक : हृदय आकुंचन पावताना रक्तप्रवाहाचा रक्तवाहिन्यांवरील दाब.
 • डायस्टॉलिक : हृदय प्रसरण पावताना रक्तप्रवाहाचा रक्तवाहिन्यांवरील दाब.

जागतिक प्रामाण्यानुसार (अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मार्गदर्शक प्रणाली-२०१९)निरोगी रक्तदाब १२०मिमी/एचजी (किंवा त्यापेक्षा कमी) सिस्टॉलिक आणि ८० मिमी/एचजी डायस्टॉलिक धरला जातो. 

जर सिस्टॉलिक रक्तदाब १२० ते १२९ असेल आणि डायस्टॉलिक रक्तदाब ८० असेल तर त्याला वाढलेला रक्तदाब (एलिव्हेटेड बीपी) म्हणतात. 

जर सिस्टॉलिक रक्तदाब १३०-१३९ आणि डायस्टॉलिक ८०-८९ असेल तर प्राथमिक पातळीवरील उच्च रक्तदाब समजला जातो.

सिस्टॉलिक रक्तदाब १४० किंवा त्यापेक्षा जास्त आणि डायस्टॉलिक ९० किंवा  अधिक असेल तर द्वितीय पातळीवरील उच्च रक्तदाब समजला जातो.

सिस्टॉलिक रक्तदाब १८०पेक्षा जास्त आणि डायस्टॉलिक १२० पेक्षा अधिक असेल तर त्याला हायपरटेन्सिव्ह क्रायसिस किंवा उच्च रक्तदाबाची आपत्कालीन स्थिती मानली जाते.

अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि युरोपियन सोसायटी ऑफ हायपरटेंशन यांच्या प्रमाणित आकड्यांमध्ये उच्च रक्तदाबाबाबत थोडे कमीजास्त प्रमाण आहे, मात्र ‘लो बीपी’ असा आजार कोणीही अधिकृतरीत्या सांगितलेला नाही.  

कमी रक्तदाब
वैज्ञानिक व्याख्येमध्ये जरी ‘लो बीपी’ अशी संज्ञा नसली, तरी सर्वसाधारणपणे रक्तदाब जर नॉर्मल बीपीपेक्षा कमी असेल तर, त्याला लो बीपी म्हटले जाते. याचे दोन मुख्य प्रकार असतात. 

 • कोणत्याही शारीरिक त्रासाशिवाय किंवा लक्षणांशिवाय ब्लड प्रेशर कमी असणे.
 • शारीरिक आजारामुळे किंवा अपघातामध्ये रक्तस्राव होऊन रक्तदाब कमी होणे.

यातल्या पहिल्या प्रकाराचा विचार केला तर, जगातल्या प्रत्येक माणसाचे शरीर थोडेतरी वेगळे असतेच. यात वजन, उंची, शारीरिक व्यायाम, आहार, वर्ण, वंश, आनुवंशिकता, आर्थिक परिस्थिती आणि त्या त्या खंडातील भौगोलिक परिस्थिती यांचा शरीरातील अनेक घटकावर परिणाम होतो. त्यामुळे सर्वांचे ब्लडप्रेशर काय किंवा इतर गोष्टी काय, सारख्याच मापाने मोजली तरी एकसारखी असणे शक्य नाही. त्यात कमी अधिक असणारच. म्हणजेच एखाद्या व्यक्तीमध्ये बीपी १२०/८० ऐवजी १००/६० असणेसुद्धा नॉर्मल असू शकते. फक्त त्याला अशा कमी रक्तदाबामुळे सतत चक्कर येणे किंवा अन्य काही त्रास किंवा आजार असू नयेत. 

रक्तदाब कमी होण्याची कारणे
दुसऱ्या प्रकारात नॉर्मल बीपी असलेल्या व्यक्तीचा अनेक गोष्टींमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. यामध्ये-

 • दीर्घकाळ विश्रांती किंवा बिछान्यावर झोपून राहणे
 • अनेक स्त्रियांमध्ये गरोदरावस्थेतील पहिल्या सहा महिन्यात रक्तदाब कमी होतो.
 • रक्ताचे आकारात्मक प्रमाण कमी होणे ः सर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तीच्या शरीरात पाच लिटर रक्त असते. अनेकदा अपघातामध्ये रक्तस्राव होऊन, किंवा उलट्या-जुलाबांसारख्या आजारात शरीरात निर्जलीकरण (डीहायड्रेशन) झाल्यामुळे किंवा अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे रक्ताचे आकारात्मक प्रमाण कमी होऊन रक्तदाब कमी होऊ लागतो. हे प्रमाण जितके कमी होईल तितका रक्तदाब कमीकमी होतो.
 • औषधे ः मूत्रप्रवृती निर्माण करणारी काही औषधे (डाययुरेटिक्स),  उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी वापरली जाणारी काही औषधे (बीटा ब्लॉकर) पार्किन्सन आजाराची औषधे, नैराश्यावरील ट्रायसायक्लिक अँटिडिप्रेसंट, नायट्रोग्लिसरीन असलेली छातीच्या दुखण्यावरील औषधे, इरेक्टाईल डिसफंक्शनवरील औषधे, नशिल्या औषधांपासून तयार केलेली वेदनाशामके अशांनी रक्तदाब कमी राहू शकतो.
 • हृदयाचे आजार ः हृदयाचे ठोके मंदगतीने पडण्याचा आजार (ब्रॅडिकार्डीया), हृदयाच्या झडपांचे आजार, हृदयविकाराचा झटका येणे, हार्ट फेल्युअर (हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी होणे) अशा हृदयाच्या आजारात रक्तदाब हमखास खूप कमी होतो.
 • संप्रेरकांचे आजार ः थायरॉइड ग्रंथीचे स्त्रवण कमी झाल्याने होणारा हायपोथायरॉयडिझम, पॅराथायरॉइड ग्रंथीचे आजार, अॅडरीनल ग्रंथीचे कार्य मंदावणे या आजारात तसेच मधुमेहामध्ये काही रुग्णांमध्ये रक्तदाब कमी राहण्याची शक्यता असते. 
 • अतिप्रमाणातील जंतूसंसर्ग ः जेव्हा एखाद्या अवयवाला जंतूसंसर्ग होतो आणि तो वाढत जातो, तेव्हा हे जंतू रक्तप्रवाहातून सर्व शरीरात पसरतात. अशावेळेस त्या जिवाणूंकडून काही विषारी पदार्थ निर्माण होतात. त्याचा परिणाम रक्तदाबावर होऊन तो धोकादायक पातळीइतका कमी होतो. याला सेप्टिक शॉक म्हणतात. ही एक प्राणगंभीर समस्या असते. 
 • अॅनॅफायलक्टिक शॉक ः पेनिसिलीनसारख्या एखाद्या औषधाची रीअॅक्शन येऊन, वावडे असलेल्या एखाद्या खाद्यपदार्थाचे सेवन केल्यामुळे किंवा काही विषारी कीटकांच्या दंशामुळे शरीरामध्ये कमालीची तीव्र प्रतिक्रिया निर्माण होते. यामध्ये अंगावर गांधी उठतात, सर्वांगाला खाज सुटते, घशाला खूप सूज येते, श्वास घ्यायला त्रास होतो आणि रक्तदाब कमालीचा खालावतो.
 • न्यूरली मिडीएटेड हायपोटेन्शन ः खूप वेळ उभे राहिल्यावर अनेक व्यक्तींना विशेषतः तरुण मुलामुलींना गरगरणे, चक्कर येऊन पडणे असा त्रास होतो. यामध्ये मेंदू आणि हृदय यांच्यातील संकेत वहनामध्ये दोष निर्माण झालेला असतो. 
 • अॅनिमिया ः रक्तात लोह, जीवनसत्वे, क्षार यांची कमतरता असल्यामुळे रक्तदाब कमी राहतो. 

लक्षणे
कोणत्याही कारणाने रक्तदाब कमी झाल्यास पुढीलपैकी बरीच विशेष लक्षणे अनुभवली जातात- डोके हलके झाल्यासारखे वाटणे, गरगरणे, मळमळ, चक्कर येऊन अचानक खाली पडणे, खूप तहान लागल्याची भावना होणे, मन एकाग्र करण्यास असमर्थता वाटणे, नजर अंधूक होणे, हातपाय गार पडणे, चेहरा एकदम फिक्कट पडणे, छोटे छोटे श्वास घेणे व श्वासाची गती वाढणे, कमालीचा थकवा जाणवणे, अचानक खूप निराशा येणे. 

काही व्यक्तींना झोपलेल्या अवस्थेतून बसल्यास किंवा उभे राहिल्यास त्यांचा रक्तदाब क्षणिक कमी होऊन गरगरते. याला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेंशन म्हणतात.   

विशेष काळजी
रक्तदाब कमी असल्यास त्याची कारणे शोधून काढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर त्याबरोबर छातीत दुखणे, उलट्या होणे, चालता येणे कठीण होणे, तोल जाणे असे काही त्रास असल्यास रुग्णालयात दाखल होऊन चाचण्या करून उपचार घ्यावेत.

उपचार
ब्लड प्रेशर नेहमीच लो असेल आणि काहीही त्रास होत नसेल, कोणतीही लक्षणे जाणवत नसतील त्यावर उपचार करण्याची गरज नसते. मात्र काही आजारांची सुरुवात म्हणून जर रक्तदाब कमी राहू शकतो. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोणताही आजार नाही याची खात्री करणे गरजेचे असते.

किरकोळ कारणांमुळे बीपी कमी झाले असेल तर पाण्याचे प्रमाण वाढवणे, मीठ-साखर-पाणी असे ओआरएस घेणे आवश्यक असते. उन्हात जाण्याचे टाळणे, दीर्घकाळ 

झोपून उठताना सावधगिरीने उठणे, खूप वेळ उभे राहावे लागत असेल तर पायांची हालचाल करणे अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे. 

आजारांमुळे कमी होणाऱ्या रक्तदाबासाठी कारणांसाठी वैद्यकीय उपचार आवश्यक असतात. यात मूळचा आजार नियंत्रित ठेवण्यासाठी नियमितपणे औषधोपचार करावेत. गंभीर आजारात हॉस्पिटलमध्ये त्वरित भरती होणे उत्तम.

संबंधित बातम्या