पुरुषांतील लो टेस्टोस्टेरॉन
टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणे ही पुरुषांच्या संपूर्ण आरोग्याला ग्रासणारी समस्या असते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर मात करता येते.
स्त्री आणि पुरुष ही लिंग वैशिष्ट्ये निर्माण करताना निसर्गाने त्यात केवळ बाह्य शारीरिक वेगळेपणाच नव्हे, तर अंतर्गत स्रावही भिन्न प्रकारचे बनवले. पुनरुत्पादन होऊन मानववंश पुढे सुरू राहावा ही निसर्गाची दृष्टी यात निश्चितच दिसून येते. पुनरुत्पादक संस्थेतील अवयव, त्यांची रचना आणि त्यांचे कार्य सुविहितपणे सुरू राहावे यासाठी असलेली संप्रेरके याबाबतीत लक्षणीय ठरतात. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही दोन संप्रेरके स्त्रियांच्या शरीरातील दुय्यम लैंगिक वैशिष्ट्यांचा विकास घडवतात, त्याचप्रमाणे मासिक पाळी येण्यापासून तिच्या नियमनापर्यंत आणि स्त्रीबीज पक्व होऊन, ते मुक्त होण्यापासून गर्भधारणा होईपर्यंत अनेकविध कार्यप्रणालींचे नियमन करत असतात.
पुरुषांच्या बाबतीतही, टेस्टोस्टेरॉन हे प्राथमिक लैंगिक संप्रेरक आणि अॅनाबॉलिक स्टेरॉईड असते. वृषण आणि प्रोस्टेट ग्रंथी या पुरुष पुनरुत्पादक अवयवांबाबत टेस्टोस्टेरॉन जशी महत्त्वाची भूमिका बजावते, तशीच दुय्यम लैंगिक वैशिष्ट्यांचा विकास घडवण्याबाबतही.
पुरुषांच्या दुय्यम लैंगिक वैशिष्ट्यात खालील गोष्टी येतात.
- स्नायूंची वाढ आणि ताकद
- हाडांची घनता, हाडांचे वजन, पर्यायाने उंची
- वयात येताना फुटणारा आवाज
- दाढी-मिशांचे तसेच छाती, हात, पाय यावरील केस
- याव्यतिरिक्त,
- तारुण्यसुलभ भावना, भिन्नलिंगी व्यक्तींबाबत आकर्षण, मूड, वर्तन यामधील फरक
- ऑस्टिओपोरोसिसचा प्रतिबंध
- या गोष्टींचा समावेश असतो.
टेस्टोस्टेरॉन हे अँड्रॉस्टेन वर्गातील एक स्टेरॉईड असून, रक्तातील कोलेस्टेरॉलपासून अनेक टप्प्यांत जैवसंश्लेषण होऊन हे संप्रेरक बनते. यकृतामध्ये निष्क्रिय चयापचयांमध्ये रूपांतरित होते. अँड्रोजन रिसेप्टरला बंधनकारक आणि सक्रिय करून त्याचे कार्य प्रेरित करते. टेस्टोस्टेरॉन मुख्यतः पुरुषांच्या अंडकोषातून स्रवते. स्त्रियांच्या बीजांडकोशातूनही ते काही सूक्ष्म प्रमाणात स्रवत असते. पण पुरुषांमध्ये वृषणात तयार होणाऱ्या टेस्टोस्टेरॉनची पातळी महिलांपेक्षा वीस पट जास्त असते.
पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वयाच्या तिशीनंतर दरवर्षी कमी होऊ लागते. काही पुरुषांमध्ये ही घट लक्षणीय असते. सर्वसाधारणपणे ३० ते ६० वयाच्या मध्यमवयीन पुरुषांपैकी ३० टक्के पुरुषांत टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असते. तीस वर्षांखालील काही तरुण आणि पौगंडावस्थेतील काही मुलातदेखील ती कमी आढळते.
टेस्टोस्टेरॉनच्या कमरतेची लक्षणे
टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणे हे सामान्यपणे वृद्धत्वाचे लक्षण असते. अंडकोषामध्ये पुरेसे टेस्टोस्टेरॉन तयार न झाल्याने पुरुषांमध्ये हायपोगोनाडिझम हा विकार निर्माण होतो. हायपोगोनाडिझम आयुष्याच्या तीन टप्प्यात होऊ शकतो.
१. गर्भ विकासादरम्यान, २. तारुण्यात ३. प्रौढत्व आल्यानंतर.
- गर्भ विकासादरम्यान ः गर्भाच्या विकासादरम्यान टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असल्यास हायपोगोनॅडिझम होतो. त्यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाच्या बाह्य लैंगिक अवयवांची वाढ योग्य पद्धतीने होत नाही. या मुलांमध्ये काही दोष संभवतात.
- तारुण्यादरम्यान ः तरुणपणी हायपोगोनॅडिझम झाल्यास सामान्य पुरुषत्वाची दुय्यम लक्षणांची वाढ न झाल्याने:
- स्नायू अविकसित, दुर्बळ राहणे,
- आवाज न फुटणे
- दाढी-मिशा व शरीरावरील केस निर्माण न होणे
- गुप्तांग अविकसित राहणे
- हातपाय अशक्त पण लांबसडक बनणे
- स्तनवृद्धी होणे (गायनेकोमास्टिया)
- प्रौढत्वादरम्यान ः वयाच्या तिशीनंतरच्या आयुष्यात टेस्टोस्टेरॉनची कमतरता निर्माण झाल्यास-
- ऊर्जा पातळी कमी राहणे
- स्नायूंचे आकारमान मर्यादित आणि सडपातळ राहणे
- वंध्यत्व
- स्तंभन दोष (इरेक्टाईल डिसफंक्शन)
- समागमाची ओढ कमी होत जाणे
- केसांची वाढ खुंटणे, केस गळणे
- हाडांची घनता कमी होणे
- स्तनवृद्धी होणे (गायनेकोमास्टिया)
टेस्टोस्टेरॉन कमी असलेल्या पुरुषांमध्ये शारीरिक थकवा आणि मानसिक अस्थिरता ही सर्वसामान्यपणे जाणवणारी मानसिक आणि भावनिक लक्षणे असतात.
टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेची कारणे ः
- टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे उद््भवणाऱ्या हायपोगोनॅडिझमचे प्राथमिक आणि दुय्यम असे दोन मूलभूत प्रकार असतात.
- प्राथमिक हायपोगोनॅडिझम ः वृषणाची कार्यक्षमता खालावल्यामुळे प्राथमिक हायपोगोनॅडिझम होतो. इष्ट शारीरिक वाढीसाठी आणि आरोग्यासाठी पुरेसे टेस्टोस्टेरॉन वृषणातून स्रवत नाही. याची तीन कारणे असतात.- १. आनुवंशिकता
- २. अपघात ३. आजार
- टेस्टोस्टेरॉनच्याआनुवंशिक कमतरतेसाठी खालील गोष्टी कारणीभूत असतात...
- अंडकोष ः बाळाच्या जन्मापूर्वी जेव्हा अंडकोष पोटातून वृषणांमध्ये खाली उतरत नाहीत.
- क्लाइनफेल्टर्स सिंड्रोम : पुरुष एक्स, एक्स आणि वाय या तीन लैंगिक गुणसूत्रांसह जन्माला येतो.
- हिमोक्रोमॅटोसिस : रक्तात लोहाचे प्रमाण योग्य पातळीच्या वर राहिल्याने टेस्टिक्युलर फेल्युअर किंवा पिट्यूटरी ग्रंथीला इजा होते.
अपघाती इजा व आजार
- शारीरिक इजा : दोन्ही अंडकोषांना दुखापत झाल्यास टेस्टोस्टेरॉनची पातळी घटते.
- गालगुंड : गालगुंडाच्या (मम्प्स) संसर्गामुळे अंडकोषांना इजा होणे.
- कर्करोगाचे उपचार : केमोथेरपी किंवा रेडिएशनमुळे अंडकोषांना इजा होणे.
- दुय्यम हायपोगोनॅडिझम ः पिट्यूटरी ग्रंथी किंवा हायपोथॅलॅमस हे मेंदूचे भाग वृषणाद्वारे होणाऱ्या संप्रेरकांची निर्मिती नियंत्रित करतात. त्यांना होणाऱ्या इजेमुळे दुय्यम हायपोगोनॅडिझम होतो. या प्रकारामध्येही आनुवंशिकता, काही आजार आणि शारीरिक परिस्थितीजन्य बाबी कारणीभूत ठरतात.
- पिट्यूटरीचे विकार- काही विशिष्ट औषधांमुळे, मूत्रपिंड निकामी झाल्याने, छोटे ट्यूमर झाल्याने
- कॉलमन सिंड्रोम- हायपोथालेमसच्या कार्यामध्ये बिघाड होऊन ही स्थिती निर्माण होते.
- दाहक रोग- क्षयरोग, सारकायडोसिस, हिस्टिओसायटोसिस अशा पिट्यूटरी ग्रंथी आणि हायपोथालेमस परिणाम करणाऱ्या आजारांमुळे
- एचआयव्ही-एड्स- पिट्यूटरी ग्रंथी, हायपोथालेमस आणि वृषणांवर या आजारात परिणाम होतो.
खालील परिस्थितीजन्य कारणांमुळे दुय्यम हायपोगोनॅडिझम होऊ शकतो :
- वृद्धत्व : हार्मोन्सच्या निर्मितीवर आणि प्रतिसादावर वृद्धत्व परिणाम करते.
- लठ्ठपणा : शरीरात चरबीचे प्रमाण जास्त वाढल्याने हार्मोन निर्मिती आणि प्रतिसादावर परिणाम होतो.
- औषधे : ओपिओइडपद्धतीची वेदनाशामक औषधे आणि स्टिरॉइड्समुळे पिट्यूटरी ग्रंथी आणि हायपोथॅलॅमसच्या कार्यावर परिणाम होतो.
- सहव्याधी : गंभीर भावनिक ताण, काही शस्त्रक्रिया, तसेच सिकलसेल रोग, थॅलसेमिया किंवा अतिरेकी मद्यसेवन अशा काही आजारांमुळे प्रजनन प्रणाली तात्पुरती बंद होऊ शकते.
प्रतिबंधक उपाय
टेस्टोस्टेरॉन कमी असल्याची लक्षणे जाणवत असल्यास, जीवनशैलीतील बदल करणे गरजेचे ठरते. यामध्ये एरोबिक आणि एनोरेबिक पद्धतीचे व्यायाम, शरीरातील चरबी कमी करण्यासाठी समतोल आहार, डॉक्टरांच्या सल्ल्याने पुरेशी जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतील असा आहार सुनिश्चित करणे, ग्लुकोकॉर्टिकॉइडसारखी औषधे, ओपिओइड पद्धतीची वेदनाशामक औषधे टाळणे उपयुक्त ठरू शकते. भावनिक त्रास किंवा नातेसंबंधातील समस्या येत असल्यास व्यावसायिक समुपदेशन घेणेही उचित ठरते.
- औषधोपचार ः जीवनशैलीतील बदल उपयुक्त न ठरल्यास टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपीची (टीआरटी) आवश्यकता भासते. हायपोगोनॅडिझम असलेल्या किशोरवयीन आणि तरुणांच्या पौरुषत्वामध्ये सुधारणा होण्याबाबत टीआरटी महत्त्वाची ठरते. टेस्टोस्टेरॉन पातळी योग्य प्रमाणात राहिल्यास प्रौढ पुरुषांमध्ये आरोग्य आणि समाधान राखले जाते.
- टीआरटीचे दुष्परिणाम ः या औषधोपचाराचे काही दुष्परिणाम आढळून येतात.
- चेहऱ्यावर पुरळ येणे
- प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होणे
- झोपेत श्वसनक्रिया काही क्षण बंद होणे (स्लीप अॅप्नीया)
- वृषणाचे संकुचन होणे
- स्तनवृद्धी होणे
- लाल रक्तपेशींची संख्या वाढणे
- शुक्राणूंची संख्या कमी होणे
याकरिता प्रत्येक रुग्णाची शारीरिक परिस्थिती आणि वय काळजीपूर्वक लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने टीआरटी उपचार आणि परिणामांचे सतत सर्वेक्षण लागते. तरुण मुलांना कमी मात्रेमध्ये टेस्टोस्टेरॉन दिल्यास टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढून दुष्परिणाम कमी राखता येतात.
या उपचारात...
- दर १५ दिवसांनी स्नायूत घेण्याचे टेस्टोस्टेरॉन इंजेक्शन, खांदे, दंड आणि पोटावर चोळण्याचे जेलस्वरूपी मलम वापरले जाते. जेल लावल्यानंतर ४ ते ५ तास अंघोळ करणे टाळावे, तसेच दुसऱ्या व्यक्तीशी त्वचेचा संपर्क येऊ देऊ नये.
- रात्री झोपताना दंड, पोट, मांडी या भागांपैकी एका ठिकाणी टेस्टोस्टेरॉन असलेले स्कीन पॅच लावता येतात. पॅचची जागा दर दोन आठवड्यांनी बदलावी लागते.
- टेस्टोस्टेरॉन गोळ्यांच्या स्वरूपातही उपलब्ध आहे. तथापि, कालांतराने अशा तोंडाने घेण्याच्या टेस्टोस्टेरॉन गोळ्यांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते आणि हृदय तसेच यकृताच्या समस्यांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे दीर्घकालीन वापरासाठी ते वापरू नये.
- बक्कल पॅच- वरच्या जबड्यातील दातांच्या हिरड्यांवर टेस्टोस्टेरॉनचा छोटा पॅच लावला जातो. थोड्या काळाने हा पॅच मऊ होऊन शरीरात हार्मोनचे स्रवण करतो. डिंकासारखा दिसणारा हा पॅच साधारणपणे दर १२ तासांनी बदलता येतो. पॅच चघळणे किंवा गिळणे टाळावे लागते.
- पिट्यूटरी संप्रेरक औषधे- पिट्यूटरी ग्रंथीच्या समस्येमुळे उद््भवलेल्या हायपोगोनॅडिझमवर उपचार करण्यास ही औषधे मदत करू शकतात. प्रौढांमध्ये, पिट्यूटरी हार्मोन रिप्लेसमेंट गोळ्यांच्या स्वरूपात दिल्याने शुक्राणूंचे उत्पादन वाढू शकते. मुले आणि पौगंडावस्थेतील पुरुषांमध्ये, हे अंडकोषांच्या वाढीस मदत करू शकते.
- पिट्यूटरी ग्रंथीवर गाठ आढळल्यास, त्यावर शस्त्रक्रिया, औषधोपचार किंवा रेडिएशन थेरपीद्वारे उपचार केले जाऊ शकतात.
- टीआरटीचे दुष्परिणाम ः टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंटमुळे मूत्रविसर्जनाबाबत, त्रास होऊ शकतो. हृदय, यकृत किंवा मूत्रपिंडाचे आजार असलेल्या लोकांमध्ये शरीरातील पाणी मूत्रावाटे विसर्जित न झाल्याने तसेच यकृताद्वारे दूषित पदार्थ शरीरातून बाहेर न टाकले गेल्याने शरीरावर सूज येते. टेस्टोस्टेरॉन थेरपीमुळे स्लीप अॅप्नीया होऊ शकतो. पुरुष प्रजननक्षमतेमध्ये व्यत्यय येतो. तोंडाने घ्यायची टीआरटी दीर्घ कालावधीसाठी वापरल्यास, यकृताचे आजार, हृदयरोग आणि कोलेस्टेरॉलची पातळी प्रमाणाबाहेर वाढण्याचा धोका संभवतो.
उपचारादरम्यान रक्तातील पेशींची तपासणी, प्रोस्टेट स्क्रीनिंगच्या चाचण्या आणि हार्मोन्सच्या पातळीच्या चाचण्या दर तीन, सहा आणि बारा महिन्यांनी कराव्या लागतात. असे निरीक्षण करत उपचाराचे समायोजन केल्यास एचआरटीशी संबंधित जोखीम कमी होऊ शकते. थोडक्यात, सांगायचे झाले तर टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होणे ही केवळ पौरुषालाच नव्हे, तर संपूर्ण आरोग्याला ग्रासणारी समस्या असते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर मात करता येते.