मधुमेहाचे नवे प्रकार

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 4 जुलै 2022

मधुमेहाचे प्रामुख्याने दोन प्रकार मानले जातात.  टाइप-१ मधुमेह आणि टाइप-२ मधुमेह. पण गेल्या पाच-सात वर्षात मधुमेहाचा इलाज करताना असंख्य डॉक्टरांना आणि मधुमेही रुग्णांनादेखील काही मुद्दे नव्याने जाणवले. अनेक रुग्ण या दोन्ही प्रकारात पूर्णपणे न बसणारे आहेत, कित्येक किशोरवयीन आणि तरुण मुलामुलींना जन्मजात मधुमेह नव्हता, पण नंतरच्या काळात त्यांना मधुमेह झाला आणि कित्येक प्रौढांमध्ये मधुमेह पस्तीशीनंतर उद्‌भवला.

मधुमेह हा आजार भारतीयांना अजिबात नवीन नाही. अधिकृत आकडेवारीनुसार भारतातील सात कोटी सत्तर लाख लोक मधुमेहग्रस्त आहेत. भारतातली मधुमेही रुग्णांची संख्या २००७पासून वेगाने वाढतेच आहे. मधुमेहींच्या एकूण जनसंख्येबाबत आपला जगात दुसरा क्रमांक लागतो. 

आपल्या शरीरातील स्वादुपिंडामध्ये असलेल्या काही विशेष पेशींपासून (आयलेट ऑफ लँगरहँस) स्रवणाऱ्या इन्सुलिन या संप्रेरकाद्वारे शरीरातील शर्करेच्या पातळीचे नियंत्रण होत असते. कोणत्याही कारणाने एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हे संप्रेरक बनू शकले नाही, किंवा आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात बनले, तर तिच्या शरीरातील साखरेची पातळी नॉर्मल पातळीपेक्षा वाढू लागते. यालाच मधुमेह म्हणतात.

सतत लघवीला होणे, सतत भूक लागणे आणि सतत तहान लागणे ही मधुमेहाची मुख्य लक्षणे. त्याचबरोबर वजन कमी होणे, वरचेवर जंतुसंसर्ग होणे अशीही कारणे आढळून येतात. 

मधुमेहाचे दोन प्रकार प्रामुख्याने मानले जातात.   

 • टाइप-१ मधुमेह- व्यक्तीच्या शरीरात जन्मापासून किंवा नंतरच्या आयुष्यात काही कारणांमुळे इन्सुलिन तयार होणे बंद होते. साधारणतः जन्मापासून प्रतिकार प्रणालीमध्ये आपोआप होणारे बदल याला कारणीभूत असतात.  
 • टाइप-२ मधुमेह - शरीरातील चयापचय क्रियेमध्ये होणाऱ्या बदलांमुळे इन्सुलिन तयार होणे कमी कमी होत जाते. अनेकदा वजनवाढ किंवा चयापचय क्रियेत निर्माण होणारे काही दोष याला कारणीभूत असतात.   

  पण गेल्या पाच-सात वर्षात मधुमेहाचा इलाज करताना असंख्य डॉक्टरांना आणि मधुमेही रुग्णांनादेखील पुढील काही मुद्दे नव्याने जाणवले -

 1. या दोन्ही प्रकारात पूर्णपणे न बसणारे अनेकजण आहेत.  
 2. पौगंडावस्थेतील कित्येक किशोरवयीन आणि तरुण मुलामुलींना जन्मजात मधुमेह नव्हता, पण नंतरच्या काळात त्यांना मधुमेह झाला. 
 3. कित्येक प्रौढांमध्ये मधुमेह पस्तीशीनंतर उद्‌भवला, पण मधुमेहाच्या प्रचलित प्रकारांच्या ठोकताळ्यानुसार त्यांचे वजनही जास्त नव्हते, त्यांच्या कुटुंबातही मधुमेहाचा इतिहास नव्हता, आणि त्यांना सतत जंतुसंसर्ग होत होता. 
 4. हे प्रकार नक्कीच वेगळे आहेत, हे ओळखून अनेक वैद्यकीय शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आणि मधुमेहाचे आणखी दोन नवे प्रकार जगाच्या निदर्शनास आणून दिले. टाइप-१ आणि टाइप-२ हे या मुख्य प्रकारात न बसणारे हे दोन नवे वेगळे प्रकार म्हणजे- 
 • तरुणांना परिपक्वता येताना होणारा मधुमेह (मॅच्युरिटी ऑनसेट डायबेटिस ऑफ यंग- किंवा एमओडीवाय- ‘मॉडी’) 
 •  प्रौढांमधला सुप्त स्वयंप्रतिकारामुळे होणारा मधुमेह (लेटंट ऑटोइम्युन डायबेटिस इन अॅडल्ट्स - एलएडीए - ‘लाडा’). 

या दोन्ही प्रकारात टाइप-१ आणि टाइप-२ या प्रकारांमधील वैशिष्ट्यांची सरमिसळ आढळते. परंतु त्यांची स्वतःची लक्षणे लक्षात घेऊन आता त्यावर उपचारदेखील केले जात आहेत.
मॅच्युरिटी-ऑनसेट डायबेटिस ऑफ द यंग (मॉडी)

मॉडी हा प्रकार किशोरवयीन किंवा तरुणांमध्ये आढळणारा आहे. त्यांच्यात होणाऱ्या जनुकीय बदलांमुळे किंवा म्युटेशनमुळे हा उद्‌भवतो. यामुळे शरीरातील इन्सुलिनच्या निर्मितीचे प्रमाण आणि गुणवत्ता कमी होत जाते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढून मधुमेह होतो.

मॉडीचे प्रमाण एकूण मधुमेही रुग्णसंख्येच्या तुलनेत पाच टक्क्यांपर्यंत आढळून येते आहे. 

 • मॉडीची लक्षणे या विकाराची सर्वसाधारण लक्षणे सौम्य असतात आणि हळूहळू दिसून येतात, आणि बदलूही शकतात. कोणत्या जनुकीय उत्परिवर्तनामुळे त्या रुग्णाला मॉडी होत आहे यावर ते अवलंबून असते. या लक्षणात प्रामुख्याने, सतत तहान लागणे, वारंवार लघवीला जावे लागणे, दृष्टी अंधूक होत जाणे, वारंवार जंतुसंसर्ग होणे यांचा समावेश होतो. 

सर्वसाधारणपणे, ही लक्षणे आढळल्यावर रक्त तपासणी केल्यावर रक्तातील साखरेची पातळी खूप वाढल्याचे दिसून येते आणि या आजाराचे प्राथमिक निदान होते. 

 • मॉडीचे निदान- रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी तपासल्यावर मधुमेह आहे, हे लक्षात आले तर खालील गोष्टी अमलात आणून मॉडीचे निदान केले जाते. 

    पौगंडावस्थेत किंवा प्रौढावस्थेत मधुमेहाचे निदान

 • कुटुंबातील मागील किमान तीन किंवा अधिक पिढ्यांपासून मधुमेहाचा इतिहास असणे. 
 • टाइप-१ किंवा टाइप-२ मधुमेहाची प्रमुख वैशिष्ट्यांचा अभाव असणे, उदा. लठ्ठपणा नसणे, उच्च रक्तदाब नसणे 
 • सतत त्वचेचे जंतुसंसर्ग होणे
 • यीस्ट प्रकारातले संसर्ग सातत्याने होणे 
 • मॉडी पद्धतीचा मधुमेह जनुकीय बदलांमुळे होत असल्याने त्याचे पक्के निदान करण्यासाठी साहजिकच काही जनुकीय चाचण्या कराव्या लागतात. रुग्णाच्या रक्तातून आणि लाळेद्वारे या चाचण्या केल्या जातात. यामध्ये-
 • हीपॅटोसाइट न्यूक्लिअर फॅक्टर १ अल्फा 
 • (एचएनएफ वन अल्फा) 
 • हीपॅटोसाइट न्यूक्लिअर फॅक्टर ४ अल्फा 
 • (एचएनएफ फोर अल्फा) 

    ग्लुकोकायनेज (जीसीके) या तीन मार्कर जनुकांची तपासणी केली जाते.

 • मॉडीचा उपचार - मधुमेहाचा हा प्रकार विशेष असला, तरी त्याच्या उपचारात, 

    शरीराला आवश्यक असतील तेवढ्याच उष्मांकाचा संतुलित आहार, दिवसातून चार वेळा, दर चार तासांनी विभागून घेणे,  एरोबिक पद्धतीचा व्यायाम म्हणजे भरभर चालणे, धावणे, जॉगिंग, सायकलिंग, पोहणे असे व्यायाम नियमितपणे रोज करणे सल्फोनिल युरिया पद्धतीच्या तोंडाने घेण्याच्या गोळ्या, ज्या स्वादुपिंडाला अधिक इन्सुलिन तयार करण्यास मदत करतात दिवसातून एक किंवा आवश्यकतेनुसार दोन वेळा इन्सुलिन घेणे मॉडीसाठी  केले जाणारे रुग्णाचे उपचार पर्याय आणि ते किती उत्तम कार्य करतील, हे कोणत्या आनुवंशिक उत्परिवर्तनामुळे मधुमेह उद्‌भवला यावर अवलंबून असते. काही रुग्णांमध्ये फार तीव्र उपचारांची गरज भासत नाही. मात्र पेडिअॅट्रिक एंडोक्रायनॉलॉजिस्टचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

प्रौढांमधला सुप्त स्वयंप्रतिकारामुळे होणारा मधुमेह (लाडा) मधुमेहाच्या या प्रकारामध्येही टाइप-१ आणि टाइप-२ या दोन्ही प्रकारांचे मिश्रण आढळते. मात्र लाडा हा प्रकार पूर्णपणे टाइप-१ जसा नसतो, तसाच तो टाइप-२ सुद्धा नसतो. त्यामुळे या प्रकाराला मधुमेह ‘टाइप-१.५’ असेही म्हटले जाते. आजमितीला प्रौढ रुग्णांपैकी साधारणतः दोन ते बारा टक्क्यापर्यंत रुग्णांमध्ये लाडा या प्रकारचा प्रादुर्भाव जाणवतो. जगामध्ये विविध देशानुसार हे प्रमाण कमी जास्त आढळते.

हा प्रकार उद्‌भवण्याचे कारण म्हणजे शरीरातील प्रतिकार प्रणाली (इम्युन सिस्टीम) अशी काही प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) बनवते की ती आपल्याच शरीरातील स्वादुपिंडावर किंवा त्यातील इन्सुलिन बनवणाऱ्या पेशींवर किंवा स्वादुपिंडाच्या पाचक रस बनवण्याच्या क्रियाप्रणालीवर हल्ला करतात. याचा परिणाम म्हणून स्वादुपिंडाची इन्सुलिन बनवण्याची क्षमता कमी होते किंवा नष्ट होते. साहजिकच शरीरातील साखरेच्या नियंत्रणाचा बोजवारा उडतो आणि साखरेची पातळी वाढून मधुमेहाला सुरुवात होते.

मात्र रुग्णाच्या इन्सुलिन बनवणाऱ्या पेशींची क्षमता हळूहळू नष्ट होत जाण्यामुळे एकतर निदान उशिरा होते आणि निदान झाल्यानंतर अनेक महिने किंवा वर्षे फारशा तीव्र उपचारांची आवश्यकता भासत नाही.

लाडाची लक्षणे- या प्रकाराची लक्षणे टाइप-१ किंवा टाइप-२ मधुमेहासारखीच असतात. उदा. सतत तहान लागणे, वारंवार लघवी होणे, दृष्टी कमी होणे, सतत भूक लागणे, भरपूर खाऊनही वजन कमी होत जाणे वगैरे.  

मात्र या लक्षणांसोबत आणखी काही लक्षणे दिसून येतात.
    वारंवार जंतुसंसर्ग होणे
    कमालीचा अशक्तपणा आणि थकवा जाणवणे
    त्वचा शुष्क होणे आणि सतत खाज सुटणे
    हातापायांना मुंग्या येणे

लाडाचे निदान - या निदानात खालील गोष्टी पाहाव्या लागतात. 
१.     रक्तातील साखर अपरिमित वाढत जाणे.
२.     रुग्णाचे वय ३५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असणे
३.     अतिरिक्त वजनवाढ झालेली नसणे  
४.     रुग्णाला सुरुवातीला गोळ्यांनी बरे वाटणे परंतु काही काळाने त्याला त्या कमी पडत जाऊन इन्सुलिनची गरज भासणे. 

लाडाच्या प्राथमिक निदानाची पुष्टी करण्यासाठी स्वादुपिंडाच्या इन्सुलिन बनवणाऱ्या पेशींविरोधी कार्य करणाऱ्या जीएडी-६५, आयलेट सेल अँटिजेन-२, इन्सुलिन ऑटो अँटीबॉडीज अशा चाचण्या कराव्या लागतात. रुग्णांमध्ये वरील चार लक्षणांपैकी दोन लक्षणे असल्यास लाडा असण्याची शक्यता ९० टक्के असते.

त्याचप्रमाणे शरीर किती इन्सुलिन तयार करत आहे याची माहिती मिळवण्यासाठी सी-पेप्टाइड नावाची प्रोटिनची पातळीदेखील तपासली जाते. या रुग्णांमध्ये ती नॉर्मल पातळीपेक्षा कमी आढळते.

उपचार- या आजारामध्येही संतुलित पण कमी उष्मांक असलेला आहार, नियमित व्यायाम यांची गरज रुग्णाला पटवून सांगावी लागते. जर रुग्णाचे निदान लवकर झाले तर औषधांच्या बाबतीत सल्फोनिल युरिया गटातील औषधे वापरता येतात. त्याचप्रमाणे नव्याने आलेली ग्लिप्टिन म्हणजेच डीपीपी-४ पद्धतीची, त्याचप्रमाणे एसजीएलटी-२ अशी तोंडाने घेण्याच्या गोळ्यांच्या स्वरूपातील औषधे वापरली जातात.

मात्र बऱ्याच रुग्णांना लाडाचे निदान उशिरा झाल्याने उपाशी पोटी आणि जेवणानंतर दोन तासांनी तपासलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण खूप जास्त येते. या रुग्णांची दीर्घ नियंत्रणाबाबत असलेली एचबीए१सी ची पातळीसुद्धा अतिशय जास्त वाढलेली आढळते. अशा रुग्णांमध्ये टाइप-१ मधुमेहाप्रमाणे इन्सुलिन इंजेक्शनचा वापर करावाच लागतो.

गुंतागुंत- लाडा किंवा टाइप-१.५च्या रुग्णांनी काटेकोरपणे 

आपल्या साखरेचे नियंत्रण योग्य पातळीत न राखल्यास शरीरात अनेक आजार निर्माण होऊ शकतात. यामध्ये मूत्रपिंडे निकामी होणे, दृष्टिदोष वाढत जाणे, मज्जातंतूंची सूज वाढत जाणे, रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप वाढणे, हृदयविकाराचा त्रास, लकवा होण्याची शक्यता 

अशा गंभीर गुंतागुंतींना सामोरे जावे लागते. लाडामध्ये रुग्णांना डायबेटिक कीटो अॅसिडोसिस नावाचा गंभीर त्रास उद्‌भवून ते कोमामध्ये 

जाण्याची शक्यता अधिक असते. या गुंतागुंतीच्या आजारांमुळे रुग्णांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे.

संबंधित बातम्या