प्रक्रियाकृत अन्नपदार्थ आरोग्यासाठी धोकादायक

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 19 सप्टेंबर 2022

नव्या युगाच्या आहारपद्धतीने जीवनशैलीतील नवी आजारपद्धती निर्माण झाली. जागतिक स्तरावर या आजारांचे प्रमाण एवढे वाढले की ‘असंसार्गिक आजार’ किंवा ‘नॉन कम्युनिकेबल डिसिजेस’ (एनसीडी) ही वैद्यकशास्त्राची एक नवी शाखा मानली जाऊ लागली. आजचा आधुनिक आहार आणि त्यातील आधुनिक घटक हीच या उपरोक्त आजारांमागील मुख्य कारणे आहेत.

निरामय आरोग्यासाठी संतुलित आहार हा एक अपरिहार्य घटक मानला जातो. पण केवळ आरोग्यासाठी नव्हे, तर काही गंभीर आजार होऊ नयेत आणि जीवनमान वाढावे यासाठीदेखील आहाराचे महत्त्व अपरंपार असते. योग्य आहार मिळाला तर जगातील २० टक्के मृत्यू टाळता येतात. 

चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत प्रत्येकाच्या आहारात नैसर्गिक अन्नधान्यांचा, फळफळावळीचा नियमितपणे समावेश असे. पण आजच्या पिढीला आवडणाऱ्या बहुतेक खाद्यपदार्थांवर कसली ना कसली तरी प्रक्रिया केली जात असते. आजचे अन्न म्हणजे रासायनिक रंग, रसायने, अतिप्रमाणात साखर, मीठ आणि प्रक्रिया केलेली तेले यांनी ठासून भरलेली असतात. 

या प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांचा आजच्या तरुण पिढीच्या रोजच्या खाण्यापिण्यात समावेश झाल्यापासून, अतिलठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार, कर्करोग, अल्झायमर्स, मुलींमधील मासिक पाळीचे आजार, वंध्यत्व आणि नैराश्य अशा अशा आजारांचे प्रमाण संसर्गजन्य साथीच्या आजारांच्या तुलनेत बरेच वाढले आणि वाढतच राहिले.                    

आजमितीला जगभरात प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ (प्रोसेस्ड फूड) वापरणे ही एक सर्वसामान्य बाब झाली आहे. या विषयाबाबत वैद्यकीय विश्वात शिरोधार्य मानल्या जाणाऱ्या ‘ब्रिटिश मेडिकल जर्नल’मध्ये नुकतीच दोन संशोधने प्रसिद्ध झाली. यामध्ये अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणजे खूप प्रक्रिया केलेल्या खाद्यांच्या आरोग्यावरील परिणामांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 

    पहिले संशोधन अमेरिकेतील बॉस्टन येथील ‘टफ्ट्स युनिव्हर्सिटी’तर्फे करण्यात आले होते. यात आहारात अल्ट्रा प्रोसेस्ड अन्नपदार्थांचा जास्त प्रमाणात समावेश असल्यास पुरुषांमध्ये गुदद्वाराचा कर्करोग होतो असे दाखवून देण्यात आले.

    दुसऱ्या संशोधनात इटलीमधील पॉझिली येथील ‘आयआरसीसीएस - न्युरोमेड’ या संस्थेने केलेल्या संशोधनात अत्यंत कमी दर्जाचे अल्ट्राप्रोसेस्ड आहार घेतल्याने हृदयविकाराच्या झटका येण्याची शक्यता खूप जास्त असते, तसेच त्यांच्यात अन्य कारणांसाठी मृत्यू उद्‍भवण्याची शक्यतादेखील दुपटीने वाढते असे दिसून आले आहे.

अल्ट्रा प्रोसेस्ड अन्नपदार्थ 
ब्राझीलमधील साओ पाउलो युनिव्हर्सिटीमधील, ‘स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’च्या आरोग्य आणि पोषण केंद्राच्या संशोधकांनी तयार केलेल्या ‘नोव्हा’ अन्न वर्गीकरण प्रणालीमधील एक वर्गीकरण आहे. यामध्ये खाद्यपदार्थांचे वर्गीकरण चार वेगवेगळ्या गटांमध्ये केले गेले आहे.

 • गट १: प्रक्रिया न केलेले किंवा मामुली प्रक्रिया केलेले पदार्थ
 • गट २: प्रक्रिया केलेले स्वयंपाकासाठी वापरले जाणारे पदार्थ (तेल, चरबी, मीठ आणि साखर)
 • गट ३: प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ
 • गट ४: अल्ट्रा प्रोसेस्ड म्हणजेच अतिरिक्त प्रक्रिया केलेल्या एक किंवा अनेक घटकांपासून बनलेले अन्नपदार्थ

अल्ट्रा प्रोसेस्ड अन्नपदार्थात वापरले जाणारे घटक पदार्थात, पूर्णपणे रासायनिक पद्धतीने कारखान्यात तयार केलेले पदार्थ असतात. काही अल्ट्रा प्रोसेस्ड अन्नपदार्थात या सोबत वनस्पतिजन्य पदार्थही वापरले जातात. अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांच्या निर्मितीत-
    सर्वसामान्य प्रोसेस्ड फूडमध्ये आढळणारे साखर, चरबी आणि प्रिझरव्हेटिव्ह असतातच
    नैसर्गिक आणि प्रक्रिया न केलेल्या पदार्थांसारखे कृत्रिमरीत्या तयार केलेले पदार्थ 
    खाद्यपदार्थांच्या चवीत भर टाकणारे रंग, आणि इतर समावेशक पदार्थ (अॅडेटिव्ह) 
    माल्टोडेक्सट्रिन, हाय-फ्रुक्टोज कॉर्न सिरप, मॉडिफाइड स्टार्च आणि हायड्रोजिनेटेड फॅट्स अशा नैसर्गिक अन्न पदार्थांपासून तयार केलेले पदार्थ यांचा समावेश असतो.

अल्ट्रा-प्रोसेस्ड अन्न पदार्थ

 •     शीतपेये, कोला पेये, कृत्रिम घटक वापरून गोडी वाढवलेले फळांचे रस  
 •     खेळताना ऊर्जा टिकावी आणि वाढावी म्हणून वापरली जाणारी पेये 
 •     एनर्जी बार
 •     पावडर स्वरूपातील भाज्या आणि इन्स्टंट सूप
 •     मार्गारीन
 •     हायड्रोजनेटेड फॅट्स, साखर आणि अॅडिटिव्हज वापरून मोठ्या प्रमाणावर उत्पादित केलेले पॅकेज्ड ब्रेड, केक, बिस्किटे, कुकीज आणि इतर बेकरी प्रॉडक्ट्स
 •     पिझ्झा, हॉट डॉग्स, चिकन नगेट्स आणि फिश स्टिक्स यासारखे रेडीमेड भोजन पदार्थ
 •     लहान बाळांच्या दुग्धजन्य किंवा तत्सम डबाबंद पावडर स्वरूपातील खाद्यपदार्थ
 •     आहार म्हणून घेण्याची पेये, प्रोटीन शेक्स
 •     मोठ्या प्रमाणात तयार केले जाणारे आइस्क्रीम
 •     मिठाई, कँडी
 •     गोड चवीचे पॅकबंद दही, योगर्ट

पाश्चात्त्य आणि अमेरिकीन जीवनपद्धतीत आहाराचा ५८ टक्के हिस्सा अल्ट्राप्रोसेस्ड अन्नपदार्थांचा असतो, असे दिसून आले आहे.

गुदाशयाचा कर्करोग
अमेरिकीन लोकांमध्ये गुदाशयाचा कर्करोग हा एकूण कर्करोगांमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मृत्यूचे कारण आहे. भारतात अजून या आजाराचे रुग्ण भारतात दर एक लाख व्यक्तींमागे ४.१ ते ४.४ या दरम्यान आढळतात.
‘टफ्ट्‍स युनिव्हर्सिटी’मधील संशोधकांनी गुदाशयाच्या कर्करोगाच्या ३२०० रुग्णांचा इतिहास, त्यांची आहारपद्धती यांचा अभ्यास करून मांडलेल्या संशोधनानुसार आहारात-

 •     प्रोसेस्ड मांस आणि लाल मांस सतत वापरणे, 
 •     पोल्ट्री आणि मासे यांचे अल्ट्रा प्रोसेस्ड अन्नपदार्थ आहारात अधिक असणे
 •     आहारात तंतूमय अन्नपदार्थांचा (फायबर) वापर नसणे  
 •     टरफलासहित तृणधान्यांचे (होल ग्रेन्स) प्रमाण नगण्य असणे या कारणांमुळे गुदाशयाचा कर्करोग होतो असे दिसून आले.  

याबरोबरच अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थात चरबीचे आणि कृत्रिम साखरेचे प्रमाण कमालीचे जास्त असमुळे वजनवाढ होते. हेही कारण गुदाशयाच्या कर्करोगास चालना देते.
या कारणांमुळे गुदाशयाच्या कर्करोगाची शक्यता २९ टक्क्यांनी वाढते. प्रोसेस्ड मांस आणि शीतपेये, फळांचे तयार डबाबंद रस यांचे एकत्रित सेवन केल्यास या कर्करोगाची शक्यता अधिक असते. 

आहारात जर ताजे नैसर्गिक अन्नपदार्थ वापरले, तर त्यायोगे शरीरात निर्माण होणारे दाह कमी होतात, आतड्यातील उपकारक जीवाणूंची संख्या वाढते आणि रोगप्रतिकार प्रणाली मजबूत होते. मात्र प्रोसेस्ड अन्नपदार्थांमध्ये हे फायदे मिळत नाहीत. आजच्या तरुण पिढीत प्रोसेस्ड अन्नपदार्थांचा आणि शीतपेयांचा सोस अधिक असल्याने तरुणवयातल्या कर्करोग रुग्णांची संख्या वाढते आहे.

हृदयविकार आणि मृत्यू
दरवर्षी जगभरातील एकूण मृत्यूंपैकी ३२ टक्के मृत्यूचे कारण हृदय आणि रक्तवाहिन्यांचे निरनिराळे आजार असते. आपल्या दैनंदिन जीवनातला आपला रोजचा योग्य आहार हाच हृदयविकार आणि तत्सम आजारांबाबत प्रतिबंधक उपायांपैकी एक महत्त्वाचा आहार ठरतो. आहाराचे पोषणमूल्यही यात महत्त्वाचे असते. अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ जास्त असलेल्या आहारामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार होण्याची शक्यता अधिक असते.

इटलीमधील पॉझिली येथील ‘आयआरसीसीएस न्यूरोमेड’ या संस्थेतील एपिडमियोलॉजी आणि प्रतिबंध विभागातील वरिष्ठ महासाथशास्त्रज्ञ डॉ बोनासिओ मारियालाउरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आहाराबाबतच्या खालील दोन भिन्न पद्धतींची तुलना केली: 
 अन्नामधील केवळ पौष्टिक घटकांवर आधारित त्यांचा दर्जा ठरवण्याची परंपारिक पद्धत आणि  ब्राझीलच्या अन्न मानक संस्थेने ‘न्यूट्रिएंट प्रोफाइलिंग सिस्टीम’ आणि नोव्हा वर्गीकरणप्रणालीद्वारे ठरवलेली आधुनिक पद्धत या संस्थेने केलेल्या संशोधनात सहभागी झालेल्या रुग्णांना मृत्यूचा धोका भावी काळात नक्की कशाने होऊ शकतो, हे ठरवण्यासाठी परिशीलन केले. वर उल्लेखलेल्या दोन दृष्टिकोनांपैकी कोणता दृष्टिकोन सर्वात जास्त महत्त्वाचा आहे, हे पाहणे त्यांचे मूळ उद्दिष्ट होते.

या संशोधनात असे स्पष्ट झाले, की पारंपरिक पद्धतीच्या विचारात पोषणमूल्याबाबत जो निकृष्ट आहार समजला जातो, अशामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आजार गंभीर होत जाऊन त्यात मृत्यूची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर नोव्हा वर्गीकरण प्रणालीवर आधारित सर्वाधिक प्रक्रिया केलेले, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड नित्यनेमाने सेवन करणाऱ्या व्यक्तींनाही हृदयविकार आणि त्यातून उद्‌भवणाऱ्या मृत्यूचा धोका तितकाच असतो.
या दोन्ही अन्नपद्धतींमध्ये तुलनात्मक विश्लेषण केल्यावर सिद्ध झाले, की आहाराच्या खराब पोषक गुणवत्तेपेक्षा अल्ट्रा प्रोसेस्ड अन्नपदार्थांनी हृदयविकार होण्याची आणि तो गंभीर होऊन त्यात रुग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते.

प्रक्रियाकृत आहाराबाबत सूचना
शहरीकरणामुळे प्रक्रियाकृत अन्नाचा वापर आणि मागणी वाढली आहे. पारंपरिक पद्धतीने शिजवलेल्या अन्नाच्या जागी प्रक्रियाकृत अन्न घेण्याची सवय वाढू लागली आहे. प्रक्रियाकृत आणि तयार अन्नपदार्थ संयमानेच खावेत. मीठ आणि साखर आवश्यक तेवढेच असावेत. प्रक्रियाकृत अन्नात अनेक प्रकारचे रासायनिक आणि कृत्रिम घटक असतात. प्रक्रियाकृत अन्नपदार्थ हे फोर्टिफाईड किंवा मजबुतीकरण केलेले नसतील तर पोषणदृष्ट्या संतुलित नसतात. साखरदेखील एक प्रक्रियाकृत अन्नपदार्थ आहे. त्यातून केवळ पोकळ उष्मांक मिळतात. साहजिकच साखर आणि प्रक्रियाकृत अन्नाचे सेवन अत्यंत कमी प्रमाणात ठेवावे. त्याऐवजी घरी तयार केलेल्‍या पारंपरिक अन्नाला प्राधान्य द्यावे. जेवणाच्यावेळी प्रक्रियाकृत स्नॅक्स टाळावेत. फोर्टिफाईड प्रक्रियाकृत पदार्थ एकवेळ चालतील. शरीरावर अन्न समावेशकांचा भार कमी करण्यासाठी प्रक्रियाकृत अन्नाचे प्रमाण मर्यादित ठेवावे. अन्नपदार्थांवरील लेबलवर दिलेली त्या पदार्थाचे आयुष्यमान आणि त्यात वापरलेले समावेशक यांची डब्यांच्या वेष्टणावर छापलेली माहिती नक्की वाचावी. 

नव्या युगाच्या या आहारपद्धतीने जीवनशैलीतील नवी आजारपद्धती निर्माण झाली. जागतिक स्तरावर या आजारांचे प्रमाण एवढे वाढले की ‘असंसार्गिक आजार’ किंवा ‘नॉन कम्युनिकेबल डिसिजेस’ (एनसीडी) ही वैद्यकशास्त्राची एक नवी शाखा मानली जाऊ लागली. आजचा आधुनिक आहार आणि त्यातील आधुनिक घटक हीच या उपरोक्त आजारांमागील मुख्य कारणे आहेत. आजच्या पिढीला भावणाऱ्या जगातील अनेक नव्या फॅशन्सप्रमाणे या जंकफूड, फास्टफूडची सुरुवातही अमेरिकेत झाली. त्यानंतर हा आहार ज्या ज्या खंडात गेला, ज्या देशांत लोकप्रिय झाला तिथे लठ्ठपणा, हृदयरोग, स्ट्रोक आणि मधुमेह याची जणू काही एक साथच आली. 

हे आजार नव्या जीवनशैलीतील आहारातल्या प्रोसेस्ड अन्नपदार्थांच्या अतिरिक्त वापरामुळे पसरत होते. आहारातले यांचे स्थान कमी केले, तर कदाचित या आजारांच्या व्यापक प्रसारावरसुद्धा नियंत्रण आणता येईल.

संबंधित बातम्या