चमकी तापाची काळीकुट्ट कथा

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 8 जुलै 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

भारतातील आरोग्यसेवेला दरवर्षी एखाद्या नव्या आव्हानाला सामोरे जावे लागते. गेली काही वर्षे ही प्रथा सुरूच आहे. कधी स्वाईन-फ्लू, कधी बर्ड-फ्लू, नाहीतर डेंग्यू. यांच्या साथी मोठ्या प्रमाणावर उद्‌भवत असतात. याशिवाय क्‍यासनूर फॉरेस्ट डिसीज, निपाह, झिका अशा तोवर कधीही न ऐकलेल्या आजारांच्या साथींची हूल उठतच असते. 
 या वर्षी अशीच एक साथ एप्रिल महिन्यापासून बिहारमध्ये थैमान घालत आहे. या तापाच्या साथीचा केंद्रबिंदू बिहारमधील मुझफ्फरपूर भागात आहे. पण बिहारबरोबरच उत्तरप्रदेश, उत्तराखंड, झारखंड या राज्यांतही या तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. या तापाला तिथल्या प्रादेशिक बोली भाषेत ‘चमकी बुखार’ असे म्हटले जाते. या चमकी तापाला आपल्याकडे मेंदूज्वर म्हटले जाते. वैद्यकीय परिभाषेत याला ‘ॲक्‍युट एन्केफेलायटिस सिंड्रोम’ (एईएस) म्हणून ओळखले जाते. याचाच एक उपप्रकार जॅपनीज एन्केफेलायटिस या नावाने प्रचलित आहे.
 बिहारच्या मुझफ्फरपूर आणि अन्य जिल्ह्यांमध्ये चमकी तापाने रौद्र तांडव घातले आहे. आतापर्यंत बिहारमध्ये सुमारे १५० आणि इतर राज्यात ४० मुले-मुली मृत्युमुखी पडली आहेत. या राज्यातल्या अतिशय गरीब घरातील मुलांना खायला अन्न मिळाले नाही, म्हणून त्यांनी उपलब्ध असलेली लिची नावाची फळे खाल्ली आणि त्यानंतर हा चमकी ताप त्यांना भरला. साधारणतः त्यात पन्नासपेक्षा जास्त मुले दगावल्यावर याबाबत चर्चा सुरू झाली. सर्व देशभर एक दुःखाचे आणि चिंतेचे वातावरण पसरले. त्यामुळे या आजाराच्या व्यापकतेचा आणि त्याच्या उपचारांचा प्रश्न आज ऐरणीवर आलेला आहे.

काय असतो चमकी ताप?
 एवढे सर्व महाभारत आज देशामध्ये घडत असताना, हा चमकी ताप म्हणजे नेमके काय? त्याची लक्षणे कोणती? त्याचे निदान कसे होते? त्यावर उपचार काय करतात आणि या तापापासून आपला बचाव कसा करता येईल? याबद्दल प्रत्येक सुजाण नागरिकाला काही माहिती असणे आजमितीला आवश्‍यक आहे.

चमकी तापाची कारणे  
 हा ताप साधारणपणे उन्हाळ्यात उद्‌भवतो. 
 नुकत्याच जन्मलेल्या अर्भकापासून १५ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या वयोगटात याचे प्रमाण सर्वांत अधिक आहे. तसा तो कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो.

 • आर्थिकदृष्ट्या गरीब आणि कुपोषित मुलांमध्ये हा होण्याची शक्‍यता जास्त असते. 
 • खाण्यापिण्याची मारामार असलेल्या आणि पौष्टिक अन्न न मिळाल्याने या बालकांच्या रक्तातील साखर आणि सोडिअम कमी होते. 
 • लिची या फळात एक असे रसायन असते, की ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची आणि सोडिअमची पातळी एकदम कमी होते आणि हा आजार उद्‌भवतो. बिहारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या रुग्णातील ८० टक्के मृत्यू हे रक्तातील साखर कमी झाल्यामुळे (हायपोग्लायसीमिया) झाले आहेत. रात्रीचे जेवण न केल्याने मध्यरात्रीनंतर या रुग्णांच्या रक्तातील साखर कमी होते. अशा वेळेस ऊर्जा निर्माण करण्यासाठी शरीरातील चरबीचे (फॅटी ॲसिड्‌स) ज्वलन होते. त्यामुळे काही विषारी पदार्थ मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन मेंदूला सूज येते. 
 • ‘द लॅन्सेट’ या जगातील नामांकित वैद्यकीय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार लिचीमध्ये ‘हायपोग्लायसिन ए’ नावाचे नैसर्गिक रासायनिक द्रव्य असते. यामुळे शरीरात चरबी किंवा फॅटी ॲसिड तयार होण्यास व्यत्यय येतो. यामुळे रक्तशर्करेचे प्रमाण आणखी घसरून मेंदूला सूज येते. 
 • बिहारच्या मुजफ्फरपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील गरीब कुटुंबातील मुले आधीपासूनच कुपोषित आहेत. ही मुले अन्न न मिळाल्याने रात्री उपाशी राहतात आणि सकाळी नाश्‍ता करण्याऐवजी अनशापोटी लिची खातात. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी अचानक कमी होते. 
 • उत्तरप्रदेश, झारखंड, बिहार, पश्‍चिम बंगाल, आसाम आणि तमिळनाडू या राज्यांत या आजाराचे रुग्ण जास्त करून सापडतात.

या आजारात १०४ अंशांपर्यंत तीव्र ताप येतो. त्याचा मेंदूवर आणि मज्जासंस्थेवर परिणाम होऊन मेंदूतील पेशी आणि मज्जातंतूंना सूज येते. त्यामुळेच याला ‘मेंदूज्वर’ म्हणतात.  
या तापाचे कारण निरनिराळे विषाणू (व्हायरस), जिवाणू (बॅक्‍टेरिया), परजीवी (पॅरासाईट्‌स), शैवाल (स्पायरोचीट), रसायने, विषारी पदार्थ यामध्ये असते. व्हायरस, बॅक्‍टेरिया किंवा अन्य काही कारणांमुळे हा आजार होत असल्याने याला ‘सिंड्रोम’ (रोगसमूह) म्हणतात. विषाणू आणि जिवाणूंमुळे होणारे मेंदूज्वर हे संसर्गजन्य ठरतात. 
मेंदूज्वराचे मुख्य विषाणू म्हणजे हर्पीस व्हायरस, मम्प्स, डेंग्यू, कांजिण्या, एन्ट्रोव्हायरस, वेस्ट नाईल, जपानी एन्केफेलाइटिस, ईस्टर्न इक्वाइन व्हायरस, टीक-बोर्न व्हायरस हे असतात. याव्यतिरिक्त निपाह आणि झिका व्हायरस यांच्यामुळेदेखील एन्केफेलाइटिस होऊ शकतो. मेंदूज्वर ज्या सूक्ष्म जिवाणूंमुळे पसरतो त्यात एन्केफेलाइटिस बॅक्‍टेरिया, फन्गाय, मलेरियाचे परजीवी येतात. 
भारतात ॲक्‍युट एन्केफेलायटिस सिंड्रोम होण्याचे मुख्य कारण जॅपनीज एन्केफेलाइटिस व्हायरस असल्याचे मानले जाते. इ.स. १८०० पासून जपानमध्ये याच्या साथी येत होत्या. १९२४ मध्ये आलेल्या साथीत ६१२५ रुग्ण बाधित आढळले होते. त्यातील तब्बल ३७९७ जण मृत्युमुखी पडल्याचे नमूद आहे. १९३५ मध्ये या ज्वराने मरण पावलेल्या रुग्णांच्या शवविच्छेदनात मेंदूमध्ये या आजाराचे कारण असलेला हा व्हायरस सापडला. त्यानंतर त्याला जॅपनीज एन्केफेलाइटिस व्हायरस म्हणू लागले. १९३८ मध्ये हा व्हायरस डासांच्या क्‍युलेक्‍स प्रजातीच्या दंशाद्वारे पसरतो हे सिद्ध झाले. आजमितीला दक्षिण आशियायी देशात दरवर्षी तीस हजारांहून अधिक लोकांना या आजाराची बाधा होत असते. भारतातसुद्धा गेल्या १५ वर्षांत तीन ते सात हजार लोकांना या आजाराची लागण झाली आहे. 
 जॅपनीज व्हायरसचे चार उपप्रकार आहेत. त्यातील क्र.१ पश्‍चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशात आढळतो, तर क्र.३ सर्व भारतभर आढळतो. क्र.२ आणि ४ भारतात आजवर सापडलेले नाहीत. संशोधनामध्ये गाई-म्हशींच्या पाठीवर बसणाऱ्या बगळ्यांमध्ये आणि डुकरांमध्ये हे व्हायरस सापडले आहेत. 
 भारतात गेल्या काही वर्षांत आलेल्या चमकी तापाच्या साथीत जॅपनीज व्हायरस ऐवजी चंडिपुरा व्हायरस हा ऱ्हॅब्डो व्हायरस आणि एन्टेरो व्हायरस आढळून येत आहेत.  

चमकी तापाची लक्षणे 

 •      खूप कडक ताप येणे. तसेच जुलाब होणे. 
 •      सतत मळमळणे आणि उलट्या होणे.
 •      कमालीच्या जास्त प्रमाणात डोके दुखणे.
 •      अचानक चिडचिडेपणा येणे. दैनंदिन वागण्यात बदल होणे.
 •      मानसिकदृष्ट्या गोंधळलेल्या अवस्थेत असणे. तसेच स्मृतीभ्रंश होणे.
 •      हातपाय, मान, पाठ खूप दुखणे किंवा हातापायांना कंप सुटणे. 
 •      बोलताना आणि ऐकताना त्रास होणे.
 •      वाईट स्वप्ने पडणे.
 •      कमालीचा आळस येणे.
 •      असंबद्ध बोलणे.
 •      हातापायातली ताकद कमी होऊन लकवा मारणे. झटके येणे.
 •      शुद्ध हरपून रुग्ण कोमात जाणे. 

रोगनिदान
रुग्णाच्या लक्षणांवरून आणि विविध शारीरिक तपासण्यांतून या आजाराचा अंदाज डॉक्‍टरांना येऊ शकतो. निदान करण्यासाठी केल्या जाणाऱ्या तपासण्या -

 • एमआरआय : मेंदूच्या एमआरआय तपासणीत हायपोथॅलॅमस, बेझल गॅन्ग्लिआ, ब्रेन स्टेम आणि लहान मेंदू या भागांवर सूज आढळते.
 • ईईजी : मेंदूमधील विद्युतलहरींचा आलेख म्हणजे इलेक्‍ट्रो एनसीफलोग्राफ. या आजारामध्ये लहरींमधील उंचवटे (स्पाईक्‍स) ध्यानात येतात. हर्पीस व्हायरसमुळे होणाऱ्या मेंदूज्वरात मेंदूच्या टेम्पोरल लोबमधून निघणाऱ्या लहरीत असे उंचवटे प्रामुख्याने आढळतात. 
 • पाठीतील पाणी : मज्जारज्जूच्या भोवती असलेल्या द्रावाची चाचणी केल्यास त्यात पांढऱ्या पेशी विशेषतः लिम्फोसाईट्‌स वाढलेल्या दिसतात. त्यातील प्रथिनांचे प्रमाण खूपच अधिक असते. या पाण्याच्या मेंदूज्वराची पीसीआर ही चाचणी केल्यास किंवा कल्चर तपासणी केल्यास आजाराचे पक्के निदान होऊ शकते.
 • रक्तचाचणी : मेंदूज्वराची आयजीएम अँटिबॉडी तपासणी आजार झाल्यापासून ३ महिन्यांच्या आत केल्यास खात्रीलायक निदान होऊ शकते.

चमकी तापावर उपचार  
 चमकी तापाने पीडित मुलांना वेळ न घालवता त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करावे लागते. त्याठिकाणी हे उपचार हे अतिदक्षता विभागात (आयसीयू) करावे लागतात. मेंदूत सूज पसरण्यापासून रोखण्यासाठी बारकाईने निरीक्षण करत उपचार करावे लागतात. यामध्ये तापातील चढउतार, रक्तदाब, हृदयाचे ठोके, श्वसन, रक्तातील साखर, क्षार सतत तपासावे लागतात. 
रक्त तपासणीत जिवाणू न सापडल्यास प्रतिजैविके देऊ नयेत.  
काही रुग्णांत एसायक्‍लोविर सारखी विषाणू विरोधी औषधे (अँटिव्हायरल) वापरल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.
मेंदूची सूज कमी करण्यासाठी मॅनिटॉल, मेंदूच्या आतील भागांच्या जागा सरकल्या असल्यास (हर्नियेशन) हायपरटोनिक सलाईन वापरतात. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यासदेखील सलाईन तसेच ओआरएस वापरावे लागते. 
ताप, उलट्या, झटके यासाठी ही लक्षणे नियंत्रित करणारी औषधे वापरावी लागतात. जास्त ताप आल्यास संपूर्ण शरीराला थंड पाण्याने सतत स्पंजिंग करावे लागते.
कोमामध्ये असलेल्या मुलांना व्हेंटिलेटरद्वारे कृत्रिम श्वासोच्छ्‌वास द्यावा लागतो.
या आजारात ५ ते ३५ टक्के बालके ७ ते ९ दिवसांत मरण पावतात, तर ५० टक्के मुलांमध्ये बरे झाल्यावरही मज्जासंस्थेला झालेल्या इजेमुळे काही गंभीर लक्षणे दीर्घकाळ राहतात.  

प्रतिबंधक उपाय 
या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी सर्व पातळीवरील अन्नपुरवठा व्यवस्था उत्तम व्हायला हवी. भारतातील एकही बालक किंवा नागरिक उपासमारीने पीडित व्हायला नको. कुपोषणावर नियंत्रण आणले पाहिजे. 
या आजाराचे वाहक असलेल्या डासांची पैदास रोखणे, बगळ्यांमधील जिवाणूंचे वहन रोखणे याकडे लक्ष द्यायला हवे. त्यासाठी सांडपाणी साचून न देणे, तलाव आणि नद्या स्वच्छ ठेवणे, डबकी साफ करणे आणि पाण्याने भरलेले खड्डे बुजविणे अशा प्रकारच्या सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे.
आजाराची लक्षणे दिसताच त्याची सरकारी दफ्तरात नोंद होऊन त्वरित उपचार करायला हवेत. जितका उशीर होईल तितके या आजाराचे गांभीर्य वाढत जाते. बिहारमधील सध्याच्या साथीमध्ये आजाराचे निदान आणि त्यावरील उपचार या दोन्ही गोष्टींना खूप उशीर झाल्याने या आजारात मृत्यू झालेल्यांची संख्या वाढली असे मानले जाते.
लसीकरण - मेंदूज्वराची लस बाजारात सर्वत्र मिळते. या लसीचे दोन डोस एका महिन्याच्या अंतराने दिले जातात. ही लस अतिशय सुरक्षित आणि प्रभावी असते. सरकारी लसीकरणात याचा समावेश आहे. खासगी डॉक्‍टरांकडे ती नियमितपणे दिली जाते. मात्र, ती महाग असल्याने पालक ती घेणे टाळतात. साहजिकच ही लस एकतर रास्त दरात सर्वत्र उपलब्ध व्हावी अन्यथा सर्वांनी सरकारी सेवेचा फायदा घ्यावा. जेणेकरून यामुळे अशा साथी निर्माण होणार नाहीत. 
मात्र, आजवर मेंदूज्वरासाठी केवळ जॅपनीज एन्केफेलायटीस व्हायरसचेच निरीक्षण आणि लसीकरण केले जात होते. आजमितीला मेंदूज्वर हा अनेक आजारांचा समूह झाला आहे. साहजिकच त्यासाठी कारणीभूत असलेल्या सर्व घटकांचा पूर्ण प्रतिबंध करावा लागणार आहे. 
चमकी वात किंवा मेंदूज्वराच्या या साथीमधून एक गोष्ट सहज लक्षात येते, की भारतीय आरोग्यसेवा नेहमीच एखाद्या आजाराच्या प्रादुर्भावाचा झटका बसल्याशिवाय जागी होत नाही. या आजाराच्या नियंत्रणासाठी आणि प्रतिबंधासाठी तत्पर आणि सक्षम आरोग्यसेवा, स्वच्छ पाण्याचा पुरवठा, सांडपाण्याचा बंदोबस्त आणि ग्रामविकास खात्याची सतर्कता या सर्व गोष्टी हातात हात घालून घडल्या पाहिजेत.

संबंधित बातम्या