बरा होणारा रक्ताचा कर्करोग

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

आरोग्याचा मूलमंत्र

आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव हा पेशींनी तयार झालेला असतो. एखाद्या अवयवाच्या पेशींची जेव्हा वारेमाप वाढ होते, तेव्हा त्या अवयवाला कर्करोगाने ग्रासले आहे असे निदान करण्यात येते. शरीरातील रक्त तांबड्या आणि पांढऱ्या पेशींनी तयार झालेले असते. या पेशी आपल्या शरीरातील हाडांच्या अंतर्गत असलेल्या मगजामध्ये (बोन मॅरो) तयार होतात. हाडांच्या या मगजामध्ये काही मूलपेशी असतात, त्या परिपक्व होऊन लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्समध्ये रूपांतरित होतात. 
रक्तातील पेशींची सतत झीज होत असते व या झीज झालेल्या किंवा मृत झालेल्या पेशींच्या जागी ‘बोन मॅरो’ नवीन पेशी तयार करत असतो. असे हे चक्र सतत चालूच असते. पण रक्ताच्या कर्करोगामध्ये या पेशी निर्माण होण्यात आणि त्यांची वाढ होण्याच्या प्रक्रियेत बदल होतो. या रोगात रक्तातील पांढऱ्या पेशी बाधित होतात. या बाधित पांढऱ्या पेशी मृत न होता रक्तात साठत जातात. परिणामी या बाधित पांढऱ्या पेशींची संख्या अपरिमित संख्येने रक्तात वाढते. त्यामुळे रक्ताच्या नेहमीच्या कार्यात बाधा येते, चांगल्या पांढऱ्या पेशी तयार होण्याचे हळूहळू बंद होते. या आजारात मूलपेशींची संख्या अमर्याद वाढते. त्यामुळे रक्तातल्या पांढऱ्या पेशींची संख्याही अमर्याद वाढते. यालाच 'रक्ताचा कर्करोग' किंवा ल्युकेमिया म्हणतात. या कर्करोगात रक्तपेशी, त्या तयार करणारा हाडातील मगज, शरीरातील रसवाहिन्या, रसग्रंथी आणि पाणथरी समाविष्ट असतात. 
रक्ताच्या कर्करोगाचे तीन मुख्य प्रकार आहेत. ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायलोमा. 

ल्युकेमिया 
ल्युकेमिया हा सर्वाधिक आढळणारा रक्ताचा कर्करोग आहे. यामध्ये पांढऱ्या रक्तपेशींची संख्या अमर्याद वाढलेली असते, पण त्या परिपक्व नसतात. जीवाणू-विषाणूंना नष्ट करण्याचे काम पांढऱ्या पेशींचे असते. मात्र, ल्युकेमियामध्ये या पांढऱ्या पेशी अकार्यक्षम झालेल्या असतात. साहजिकच ल्युकेमियाच्या रुग्णांची प्रतिकार शक्ती दुर्बळ होते आणि ते जंतुसंसर्गामुळे सहजपणे बाधित होतात. 
ल्युकेमियाचे चार उपप्रकार आहेत. 

१. अॅक्युट लिम्फोसायटिक ल्युकेमिया (ए.एल.एल.) : आपल्या रक्तात पाच प्रकारच्या पांढऱ्या रक्तपेशी असतात. न्यूट्रोफिल्स, लिम्फोसाइट्स, बेसोफिल्स, इओसिनोफिल्स आणि मोनोसाइट्स. त्यातील लिम्फोसाइट्स प्रकारच्या पेशी बाधित होणारा कर्करोग म्हणजे अॅक्युट लिम्फोसायटिक ल्युकेमिया. हा सर्व वयोगटाच्या लोकांना होतो. 
यामध्ये अपरिपक्व पांढऱ्या पेशी मगजामध्ये जमा होतात आणि मूलपेशींना नष्ट करतात. या ल्युकेमियाच्या पेशी रक्तप्रवाहातून यकृत, प्लीहा, रसग्रंथी, मेंदू आणि अंडकोषात पोचतात. तिथे त्यांची वाढ आणि विभाजन वेगाने होत राहते. यामुळे मेंदूला तसेच मज्जारज्जूंच्या आवरणांना सूज येऊन मेनिनजायटीस होतो. तसेच रक्तातील लाल पेशींची संख्या कमी होऊन अॅनिमिया होतो. या रुग्णांमध्ये यकृत व मूत्रपिंडाचे कार्य कमी होऊन लिव्हर आणि किडनी फेल्युअरसारखे गंभीर आजार होतात. 

२. अॅक्युट मायलॉइड ल्युकेमिया (ए.एम.एल.) : रक्तातील पांढऱ्या पेशींपैकी लिम्फोसाइट्स सोडून अन्य प्रकारच्या पांढऱ्या पेशी, लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स कॅन्सरग्रस्त झाल्यास मायलॉइड ल्युकेमिया होतो. 

३. क्रॉनिक लिम्फोसायटिक ल्युकेमिया (सी.एल.एल.) : हा आजार दीर्घकाळ शरीरात असतो, पण त्याची लक्षणे बरीच वर्षे जाणवत नाहीत. त्यामुळे हा साधारणतः पन्नाशीच्या आसपास लक्षात येतो. या आजारात बी-लिम्फोसाईट्स या प्रकारच्या पांढऱ्या पेशी रोगग्रस्त होतात. त्याचबरोबर तांबड्या रक्तपेशी आणि प्लेटलेट्सदेखील बाधित होतात. या आजाराचे त्याच्या तीव्रतेप्रमाणे शून्य ते चार असे पाच टप्पे असतात. 

४. क्रॉनिक मायलोसायटिक ल्युकेमिया (सी.एम.एल.) : हा होण्याचे कारण या रुग्णात फिलाडेल्फिया क्रोमोसोम नावाची वेगळी रंगसूत्रे सापडतात. फिलाडेल्फिया रंगसूत्र हे टायरोसिन कायनेज नावाच्या एका वेगळ्या पाचकरसाची निर्मिती करते, त्यामुळे पांढऱ्या रक्तपेशी अमर्याद वाढतात. कोणत्याही वयाच्या आणि लिंगाच्या व्यक्तीला हा आजार होऊ शकतो. पण १० वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये हा आढळत नाही. हा आजार साधारणपणे ४० वर्षे वयाच्या प्रौढांमध्ये होतो. या आजारात रुग्णाला अनेक वर्षे काहीही त्रास होत नाही. मात्र, त्याची पाणथरी आकाराने अमर्याद वाढलेली असते. 

सीएमएलमध्ये बाधित पांढऱ्या पेशी हाडाच्या मगजात निर्माण होतात, पण काही प्रमाणात त्या पाणथरी आणि यकृतातही वाढतात. अॅक्युट ल्युकेमियामध्ये अपरिपक्व पांढऱ्या रक्तपेशी फार मोठ्या प्रमाणात वाढतात, त्या उलट सीएमएलमध्ये सामान्य वाटणाऱ्या पांढऱ्या‍ रक्तपेशी आणि प्लेटलेट्सच्या संख्येतदेखील उल्लेखनीय वाढ होते. या आजारात ल्यू्केमिया पेशी मगजामध्ये प्रवेश करतात आणि इतर रक्तप्रवाहात मिसळून जातात. 

ल्युकेमियाची कारणे 
१. जनुकीय प्राबल्य, २. जन्मजात प्रतिकारशक्तीचा अभाव, ३. ह्युमन टी सेल ल्युकेमिया व्हायरस टाईप-१ आणि २ या विषाणूंचा संसर्ग, ४. ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसचा संसर्ग, ५. किरणोत्सर्ग - अणूंपासून निघालेले किरण, ६. क्ष-किरणांचा जास्त वापर, ७. काही प्रकारचे विषाणू, ८. बेन्झीनसारख्या रसायनांशी शारीरिक संपर्क, ९. स्तनाच्या, फुफ्फुसाच्या आणि वृषणांच्या कर्करोगात वापरली जाणारी औषधे, १०. पर्यावरणातील काही घटक, ११. अॅक्युट मायलॉइड ल्युकेमिया होण्यासाठी फँकोनी अनिमिया हा धोक्याचा घटक मानला जातो. 

रक्ताच्या कर्करोगाची लक्षणे 

 • वरचेवर जंतुसंसर्ग होणे, फ्लू, घसा दुखणे, टॉन्सिल्स सुजणे, खोकला, लांबणारा ताप येणे. 
 • रात्री खूप घाम सुटणे. 
 • दाताच्या हिरड्यांतून, नाकातून रक्तस्राव होतो. 
 • शरीरात जागोजागी अवधानाच्या कठीण, घट्ट पण न दुखणाऱ्या गाठी येतात. 
 • अॅनेमिया – रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे, चेहरा पांढुरका दिसू लागणे. सतत थकवा येणे. 
 • पोटात डाव्या बरगडीखाली असणारी पाणथरी वाढून पोट दुखणे. ही पाणथरी वाढून कधीकधी बेंबीपर्यंत किंवा त्याखालपर्यंत येते. 
 • सतत हाडे दुखणे.  
 • मुलांमध्ये वजन न वाढणे, वाढ कमी होणे हे दोष आढळू शकतात. 

निदान  

 • रुग्णाचा वैयक्तिक आणि कौटुंबिक आजारांचा इतिहास 
 • तपासणीत पोटामध्ये पाणथरी आणि यकृताच्या आकाराची वाढ झालेली आढळणे. 
 • हिमोग्रॅम या रक्ततपासणीत पांढऱ्या पेशींची संख्या अमर्याद आढळणे. 
 • सूक्ष्मदर्शक यंत्राखाली केलेल्या रक्ततपासणीत अॅक्युट मायलॉइड ल्युकेमियामध्ये ओअर रॉड्स नावाचे घटक आढळतात, तर अॅक्युट लिम्फोसायटिक ल्युकेमिया आणि अॅक्युट मायलॉइड ल्युकेमियामध्ये ब्लास्टसेल्स नावाच्या पेशी दिसून येतात. 
 • बोन मॅरो बायोप्सी - रक्ततपासणीतील निष्कर्ष बोन मॅरो बायोप्सी करून पक्का होऊ शकतो.
 • जनुकीय चाचण्या (सायटोजेनिक टेस्टिंग) करून फिलाडेल्फिया क्रोमोसोम (बीसीआर-एबीएल-१ फ्युजन जीन) शोधला जातो. त्यामुळे सीएमएल ल्युकेमियाचे निदान होऊ शकते. 
 • फ्लो सायटोमेट्री व इम्युनोफिनोटायपिंग - यात रुग्णाच्या रक्तातील आणि बोन मॅरो बायोप्सीमधील पेशींवर विशेष मार्कर वापरून त्यांचे परीक्षण केले जाते. 
 • मॉलिक्युलर टेस्टिंग - यामध्ये पॉलिमरेज चेन रिअॅक्शन तंत्र वापरून पेशींमधील डीएनए पातळीवरील बदल तपासले जातात. 

उपचार 
ल्युकेमियाचा प्रकार, रुग्णाचे वय, प्रकृती आणि ल्युकेमियाच्या पेशी मेंदूतील द्रावामध्ये (सेरेब्रोस्पायनल फ्लुइड) पसरल्या आहेत, की नाही यावर उपचारपद्धती अवलंबून असते. 
ल्युकेमियाच्या उपचारांमध्ये केमोथेरपी (ल्युकेमियासाठी परिणामकारक ठरणारी उपचारपद्धती आहे), रेडिएशन थेरपी, बायोलॉजिकल थेरपी, टारगेटेड थेरपी आणि स्टेम सेल प्रत्यारोपण या उपचारपद्धतींचा समावेश आहे. या उपचारपद्धती संयुक्तपणेही वापरल्या जाऊ शकतात. 
ल्युकेमियाचे निदान झाल्यावर तो प्राथमिक स्वरूपात असताना त्यावर त्वरित उपचार करावे.  सौम्य ल्युकेमिया उपचार करून बरा केला जाऊ शकतो, पण गंभीर स्वरूपाच्या ल्युकेमियावर उपचार करून पूर्णपणे बरा करता येत नाही. मात्र, त्यात उपचार करून कर्करोगाची लक्षणे नियंत्रणात आणली जातात. गंभीर स्वरूपाचा ल्युकेमिया असलेल्या काही रुग्णांवर स्टेम सेल प्रत्यारोपण करता येऊ शकते. त्यामुळे कदाचित ल्युकेमिया पूर्ण बरा होऊ शकतो.  

केमोथेरपी : या पद्धतीमध्ये ल्युकेमिया किंवा इतर कर्करोगाच्या वेगाने विभाजित होणाऱ्या पेशी नष्ट केल्या जातात.  

बायॉलॉजीकल थेरपी : यात अॅबनॉर्मल पेशींना ओळखण्यासाठी शरीरातील रोग प्रतिकार शक्ती राबवणाऱ्या यंत्रणेला मदत केली जाते. या पेशी शोधल्या गेल्यावर त्यांच्यावर आक्रमण करून त्या नष्ट केल्या जातात.

टार्गेटेड थेरपी : यामध्ये औषधे वेगाने वाढणाऱ्या कर्करोगाच्या सगळ्या पेशींना नष्ट करत नाहीत पण त्या पेशीच्या गुणधर्मांमध्ये हस्तक्षेप करतात. या थेरपीमध्ये टार्गेटेड पेशींना नष्ट न करता, तर कर्करोग पसरवणाऱ्या विशिष्ट रेणूंमध्ये हस्तक्षेप करून त्यांची वाढ थांबवली जाते. 

रेडीएशन थेरपी : या पद्धतीत उच्च पातळीवरील रेडिएशन्स लहरी टार्गेट पेशींवर सोडण्यात येतात. मेंदूपर्यंत पसरलेल्या ल्युकेमियावर उपचार करण्यासाठी किंवा ल्युकेमियाच्या पेशी पाणथरी किंवा शरीरात ज्या ठिकाणी जमा झालेल्या आहेत त्या भागाला लक्ष्य करण्यासाठी वापरल्या जातात. 

स्टेमसेल थेरपी : स्टेम सेल किंवा मूलपेशी प्रत्यारोपणात केमोथेरपी अथवा रेडिशनचे हाय डोस देऊन किंवा दोन्ही पद्धती वापरून ल्युकेमियाच्या पेशी आणि नॉर्मल बोन मॅरो नष्ट केला जातो. त्यानंतर रुग्णाच्या रक्तवाहिनीमध्ये सलाईन दिल्याप्रमाणे मूलपेशींचा पुरवठा केला जातो. नव्या रक्तपेशी निर्माण करण्यास सुरुवात करतात.  

 लिम्फोमा 
लिम्फोमा हादेखील एक प्रकारचा रक्ताचा कर्करोग असतो. हा आजार आपल्या शरीरातील रसग्रंथी (लिम्फ नोड्स) आणि रस वाहिन्यांशी (लिम्फॅटिक्स) तसेच या संस्थेशी संबंधित असलेल्या टॉन्सिल्स, पाणथरी, थायमस अशा शरीरातील अवयवांशी संबंधित आहे. रक्तवाहिन्यांप्रमाणेच रसवाहिन्यांचे जाळे शरीरभर पसरलेले असते. 
 शरीरातल्या या लिम्फॅटिक संस्थेला कर्करोगाने ग्रासले जाते तेव्हा त्याला लिम्फोमा म्हणतात. यात लिम्फोसाईट्सची संख्या अमर्याद वाढते आणि रसग्रंथी आकाराने खूप मोठ्या होतात. साधारणपणे ८५ टक्के लिम्फोमा बी-लिम्फोसाईट्समध्ये आढळतो. 
लिम्फोमामध्ये जेव्हा रिड्स स्टेनबर्ग सेल्स बाधित होतात त्यांना हॉजकिन्स लिम्फोमा म्हणतात. तर त्या न आढळणाऱ्या लिम्फोमांना नॉन हॉजकिन्स लिम्फोमा म्हणतात.

 मायलोमा
रक्तामध्ये पांढऱ्या, तांबड्या रक्तपेशी, प्लेटलेट्स वगळता प्लाझ्मा हा एक घटक असतो. शरीराच्या रोग प्रतिकारक शक्ती प्रणालीचा तो एक महत्त्वाचा भाग असतो. याचीदेखील निर्मिती मगजामध्ये होते. या घटकाला जेव्हा कर्करोग होतो, त्याला मायलोमा म्हणतात. यामध्ये मगजात या पेशींची संख्या एवढी वाढते, की त्याचा पांढऱ्या व तांबड्या रक्तपेशींच्या निर्मितीवर परिणाम होतो. परिणामतः शरीरावर गंभीर परिणाम होतात. 

संबंधित बातम्या