बाळांमधले जन्मजात हृदयविकार 

डॉ. अविनाश भोंडवे
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

जन्मजात हृदयविकार म्हणजे बाळाच्या जन्मापासून असलेले त्याच्या हृदयरचनेतील दोष. तसे पहिले तर तीन टक्के नवजात अर्भकांमध्ये कोणता न कोणता तरी जन्मजात दोष असतोच. मात्र, त्यात हृदयाच्या रचनेत जन्मापासून आढळून येणारे दोष हे संख्येने सर्वांत जास्त असतात. जगभरात जन्माला येणाऱ्या एकूण अर्भकांपैकी एक टक्का बालकांत आढळणाऱ्या या दोषांची माहिती समजण्यासाठी, हृदयाच्या रचनेची आणि कार्याचे थोडे ज्ञान असणे गरजेचे आहे. 

हृदयाचे कार्य
हृदय हे रक्ताभिसरण संस्थेचे महत्त्वाचे इंद्रिय आहे. आकुंचन आणि प्रसरणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे. हृदय हा एक स्नायूंचा पंप आहे. त्याची पंपिंग क्षमता ०.२ एचपी इतकी असते. दोन्ही कर्णिका आणि जवनिकांचे लयबद्ध आकुंचन आणि प्रसरण सतत होत असते. मात्र, त्या एकाच वेळी आकुंचन किंवा प्रसरण पावत नाहीत. ज्यावेळी कर्णिका आकुंचन पावलेल्या असतात, त्यावेळी जवनिका मात्र प्रसरण पावलेल्या स्थितीत असतात. त्याचप्रमाणे, जवनिका आकुंचन पावलेल्या असताना कर्णिका प्रसरण पावलेल्या स्थितीत असतात. हृदयाच्या आकुंचनाला 'सिस्टोल' म्हणतात, तर ते प्रसरण पावत असते त्या स्थितीला 'डायस्टोल' म्हणतात. 

हृदयाचे एकदा आकुंचन व प्रसरणाचे एक चक्र म्हणजे हृदयाचा एक ठोका असतो. एका ठोक्यासाठी ०.८३ सेकंद लागतात. प्रौढ व्यक्तींमध्ये साधारणपणे दर मिनिटाला ७२ ठोके पडतात. झोपेत असताना ५५ ते ६० ठोके पडतात. मात्र लहान मुलांमध्ये प्रति मिनिट १२०-१६० ठोके पडतात. हृदयाच्या ठोक्यांची सुरुवात उजव्या कर्णिकेवरील ''सायनोएट्रीयल नोड' नावाच्या एका भागामध्ये होते. यालाच 'पेसमेकर' म्हणतात. हृदयाच्या ठोक्यांचा दर अनियंत्रित असेल, तर तो नियंत्रित करण्यासाठी एक इलेक्ट्रिक यंत्र शरीरात त्वचेखाली बसवतात, त्याला 'कृत्रिम पेसमेकर'' म्हणतात.

हृदय-रचनात्मक दोष  
नवजात शिशूंमध्ये आढळणारे दोष म्हणजे -

 • हृदयाच्या झडपांमधील दोष -
 • उजवी कर्णिका आणि उजवी जवनिका यामधील द्विदल झडप पूर्ण बंद होत नाही. 
 • डावी कर्णिका आणि जवनिका यांच्यामधील झडप नीट बंद होत नाही.
 • महारोहिणीच्या झडपांमध्ये दोष - एओर्टिक व्हॉल्व स्टीनॉसिस 
 • एबस्टाईन्स अॅनोमली - त्रिदल झडपेमध्ये दोष निर्माण होऊन रक्तप्रवाह जवनिकेतून कर्णिकेकडे वाहणे.  
 • फुफ्फुसाकडे जाणाऱ्या रक्तवाहिनीच्या झडपा नसणे - पल्मनरी व्हॉल्व स्टीनॉसिस
 • दल झडप नसणे - ट्राय कस्पिड अॅट्रेझिया

हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूंना विलग करणाऱ्या पडद्यामध्ये छिद्र 

 • एट्रियल सेप्टल डीफेक्ट (ए.एस.डी.) - उजव्या आणि डाव्या कर्णिकेमधील पडद्याला छिद्र असते.
 • व्हेंट्रिक्युलर सेप्टल डीफेक्ट (व्ही.एस.डी.)- यात उजव्या आणि डाव्या जवनिकेमधील पडद्याला छिद्र असते.   

 डाव्या किंवा उजव्या कर्णिका आणि जवनिकांच्या रचनेमध्ये दोष -

 • सिंगल व्हेन्ट्रिकल - यात डाव्या आणि उजव्या जवनिकेत पडदा नसतो.
 •  हृदयाच्या स्नायूंमध्ये विकृती
 • अनेक दोष एकत्रित असणे - 
 • कोआर्कटेशन ऑफ एओर्टा - डाव्या जवनिकेतून निघणाऱ्या महारोहिणी मधेच अरुंद असणे.
 • कम्प्लीट एट्रिओव्हेन्ट्रीक्युलर कॅनाल डीफेक्ट (सीएव्हीसी) - दोन्ही कर्णिका आणि दोन्ही जवनिका जेथे एकत्र मिळतात, त्या ठिकाणी मोठे छिद्र असणे.
 • डी-ट्रान्सपोझिशन ऑफ ग्रेट आर्टरीज - हृदयाकडे प्राणवायूयुक्त रक्त आणणाऱ्या आणि हृदयाकडून प्राणवायूविरहित रक्त फुप्फुसांकडे नेणाऱ्या रक्तवाहिन्यांच्या जागांची जन्मजात अदलाबदल झालेली असते. त्यामुळे रक्त शुद्धीकरणाचे प्रश्न उभे राहतात. 
 • आय-ट्रान्सपोझिशन ऑफ ग्रेट आर्टरीज - 
 • यात हृदयाच्या डाव्या आणि उजव्या कर्णिका-जवनिकांमधील कार्यात अदलाबदल होते. उजवीकडे प्राणवायूयुक्त रक्त जाते, तर डावीकडे प्राणवायूविरहीत. 
 • सिंगल व्हेन्ट्रीकल डीफेक्ट - यात मुख्यत्वे दोन उपप्रकार आढळतात.
 • अ) हायपोप्लास्टिक लेफ्ट हार्ट सिंड्रोम - हृदयाच्या डाव्या बाजूची वाढच पूर्ण होत नाही. त्यामुळे एओर्टा आणि डावी जवनिका खूप लहान आकाराच्या राहतात.  
 • ब) पल्मनरी अॅट्रेझिया किंवा इन्टॅक्ट व्हेन्ट्रीक्युलर सेप्टम - यात फुप्फुसांकडून हृदयाकडे येणाऱ्या रक्तवाहिनीचा व्हॉल्व तयार झालेला नसतो. ते नियंत्रण नसल्याने फुप्फुसांकडून हृदयाकडे सतत रक्त येत राहते. 
 • पेटंट डक्टस आर्टिरिओसस - बाळ आईच्या पोटात असताना, त्याची फुप्फुसे बंद असतात. त्यामुळे एका छिद्रावाटे हृदयाच्या डाव्या आणि उजव्याबाजूचे रक्त एकत्रित  होत असते. या छिद्राला डक्टस आर्टिरिओसस म्हणतात. बाळ जन्मल्यावर हे छिद्र बंद होऊन उजव्या बाजूची रक्तवाहिनी खुली होऊन त्याद्वारे ते फुप्फुसात जाऊ लागते. मात्र, काही बाळांत जन्मल्यावर हे छिद्र तसेच खुले राहते आणि दोन्ही बाजूचे रक्त एकत्रित होत राहते.
 • फॅलोज टेट्रालॉजी - जन्मजात हृदयाच्या आजारांमध्ये हा एक महत्त्वाचा आजार असून यात चार दोष एकत्रित आढळतात.

    १. दोन्ही जवनिकांमधील पडद्यात छिद्र. 
    २. हृदयाकडून फुप्फुसांकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा.
    ३. जवनिकांमधील छिद्रावरून महारोहिणी जाणे.
    ४. उजव्या जवनिकेच्या भोवतालचे स्नायू जाड होणे. 

कारणमीमांसा
गरोदरपणात पहिल्या दोन महिन्यांत बाळाचे हृदय तयार होते. यावेळी गर्भवती महिलेला संसर्ग झाल्यास बाळाला ही समस्या उद््‌भवू शकते. याशिवाय सध्याच्या वातावरणातील प्रदूषणही हृदयावर विपरीत परिणाम करते. यामुळे गर्भवती महिलांनी स्वच्छ वातावरणात राहणे गरजेचे आहे. याशिवाय आता आयव्हीएफ यांसारख्या नवनवीन उपचारपद्धती विकसित झाल्या आहेत. अनेकदा यातून जन्मलेल्या बाळांनाही हृदयविकाराचा धोका संभवू शकतो. इतकेच नाही, तर काही बाबतीत आनुवंशिक कारणेही जबाबदार असतात. बाळाला जन्मजात हृदयाचा आजार आहे याचे निदान लगेच होऊ शकत असले, तरी तो आजार होण्यामागील निश्चित कारणे समजणे तसे अवघड असते. याबाबत काही घटक जोखमीचे मानले जातात. 

 • कौटुंबिक इतिहास : जर आई-वडिलांपैकी एखाद्याला किंवा त्या बाळाच्या भावाला किंवा बहिणीला असाच जन्मजात हृदयात दोष असेल, तर त्या बाळामध्येसुद्धा जन्मजात हृदयदोष असण्याची शक्यता जास्त असते.
 • जनुकीय आजार : डाउन्स सिंड्रोम असलेल्या बालकात असे हृदयदोष हमखास आढळतात.
 • जंतू संसर्ग : गरोदरावस्थेत जर मातेला कांजिण्या, गोवर, रुबेलासारखे काही आजार झाले असल्यास तिच्या बाळामध्ये असे दोष निर्माण होण्याची शक्यता बळावते. 
 • मधुमेह : मधुमेह असलेल्या मातेने गरोदरावस्थेत रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य न ठेवल्यास तिच्या बाळामध्ये असे दोष येऊ शकतात.
 • व्यसने : मातेला धूम्रपान, अतिरिक्त मद्यपान अशी व्यसने असल्यास दोष येऊ शकतात.
 • औषधे : गरोदरावस्थेत स्त्रीने वर्ज्य असलेली काही औषधे घेतल्यास किंवा काही विशिष्ट रसायनांशी तिचा सातत्याने संपर्क आल्यास जन्मजात हृदयदोष होण्याच्या शक्यता खूप जास्त असतात.
 • पालकांचे वय : बाळाच्या जन्माच्या वेळी आईचे किंवा वडिलांचे वय जास्त असल्यामुळे दोष येतात.

लक्षणे
हृदयाच्या रचनेमध्ये ज्याप्रमाणे दोष आढळतात, त्याप्रमाणे त्याची लक्षणे आणि उपचारही वेगळे असतात. ही लक्षणे काही आजारात बाळ जन्मल्यापासून आढळतात, तर काही आजारात बाळ थोडे मोठे झाल्यावर लक्षात येतात. परंतु, जन्मजात हृदयरोग असलेल्या काही बालकांमध्ये कुठलीही लक्षणे आढळत नाहीत आणि ती निरोगी आणि ठणठणीत राहतात.
नवजात शिशूंमध्ये आजार गंभीर अवस्थेत असेल, तर काही लक्षणे निश्चितपणे दिसून येतात. यामध्ये -

 •  श्वासाची गती खूप जास्त असणे.
 •  ओठ, नखे आणि त्वचा निळसर पडणे.
 •  सतत रडणे, दमणे.
 •  स्तनपान घेताना बाळाला दम लागणे.

हृदयाच्या ठोक्यांदरम्यान काही विशिष्ट घरघर असा आवाज येणे (मरमर). हे आवाज डॉक्टरांना त्यांच्या स्टेथोस्कोपनेच ऐकू येतात. किंवा ते खूप तीव्र असल्यास छातीवर हात ठेवल्यावर त्यांच्या वेगळ्या स्पंदनाची जाणीव देतात.
बाळ मोठे झाल्यावर दिसून येणाऱ्या लक्षणांमध्ये दम लागणे, हृदयातील मरमर, थकवा येणे, सतत घाम येणे, फुप्फुसांत रक्त व पाणी भरणे, पायात, पावलात किंवा घोट्यात पाणी होणे, वाढ खुरटणे, सतत आजारी पडणे, न्यूमोनिया होणे, अशा प्रकारची विविध चिन्हे दिसून येतात.

निदान
काही वेळेस गर्भवती स्त्रियांच्या सोनोग्राफी तपासणीत मोठ्या स्वरूपातले दोष लक्षात येतात. बाळाच्या जन्मानंतरच्या तपासणीत शंका आल्यास काही विशेष तपासण्या करून जन्मजात दोषांचे निदान होऊ शकते. 
१. ईसीजी - थोड्या मोठ्या बालकांबाबत शंका आल्यास या तपासणीत हृदयातील रचनेचा दोष लगेच कळू शकतो.  
२. इकोकार्डिओग्राफ - हृदयातल्या कप्प्यांची जडणघडण, हृदयाकडे रक्त घेऊन येणाऱ्या रक्तवाहिन्या, हृदयातून शरीराकडे किंवा फुप्फुसांकडे रक्त नेणाऱ्या रक्तवाहिन्या, हृदयामधील झडपा, हृदयाच्या स्पंदनाची आणि कार्याची क्षमता आपल्याला इकोकार्डिओग्राफीमुळे समजते. सर्व प्रकारचे जन्मजात हृदयरोग या एका चाचणीने लक्षात येऊ शकतात.
३. पल्स ऑक्सिमेट्री - यात बाळाच्या रक्तातील प्राणवायूचे घटलेले प्रमाण लक्षात येते.
४. छातीचा एक्स-रे - हृदयाचा आकार गोलसर असतो. हृदयाच्या वरच्या बाजू आणि खालील बाजूंचे प्रमाण व्यस्त दिसते. फुप्फुसांत पाणी झाले असल्यास समजते. 
५. कार्डिअॅक कॅथेटरायझेशन - हृदयाच्या आतील बाजूच्या रचनेतील दोष लक्षात येतो. 
६. कार्डिओव्हॅस्क्युलर एमआरआय - मोठ्या मुलांमध्ये आणि वयस्क व्यक्तीत जन्मजात हृदयविकार नंतर लक्षात येतो. अशा वेळेस या तपासणीने रचनेतील दोष अधिक चांगल्या रीतीने ध्यानात येतात.

प्रतिबंध
कौटुंबिक इतिहास असल्यास किंवा जनुकीय आजार असल्यास जन्मजात हृदयरोग टाळणे शक्य होत नाही. पण इतर बाबतीत याबाबत काळजी घेतल्यास गर्भवती माता आणि तिचे जन्माला येणारे मूल यांचे पुढील गंभीर धोक्यांपासून संरक्षण करता येते. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी पाळणे आवश्यक ठरते.

 • गर्भवती स्त्रियांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मनाने कोणतेही औषध घेऊ नये.
 • आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरल्या जाणाऱ्या कोणत्या रासायनिक पदार्थांनी त्यांच्या पोटातील बाळाला त्रास होईल याची माहिती घ्यावी.
 • गर्भवती स्त्रीला आधीपासून मधुमेह असेल किंवा गर्भावस्थेच्या काळात जर तो सुरू झाला असेल, तर त्यांनी आपली रक्तशर्करा पूर्णपणे आणि सदोदित नियंत्रणात ठेवावी.
 • सर्व मुलींना लहान वयातच रुबेला प्रतिबंधक लस द्यावी. 

उपचार
न्मजात हृदयदोषांवर ते तीव्र असल्यास ताबडतोब इलाज करावे लागतात. सर्वसामान्यपणे तीन दोष बालकांमध्ये जास्त करून आढळतात. त्यातील -

 • पेटंट डक्टस आर्टिरिओसस (पीडीए) - हा एक वर्षापर्यंत आपोआप बरा होऊ शकतो. 
 • एट्रियल सेप्टल डीफेक्ट (एएसडी) -  हादेखील एक वर्षापर्यंत आपसूक बरा होतो.
 • व्हेंट्रिक्युलर सेप्टल डीफेक्ट (व्हीएसडी) - सहा वर्षांपर्यंत काही उपचार न करता बंद होऊ शकतो.

 त्यामुळे बालकात हे दोष आढळून आल्यास प्रथम औषधोपचार करण्यात येतो. ठराविक काळ वाट पहिल्यार तो बरा होत नसल्यास, किंवा औषधोपचारांमुळे बाळाची लक्षणे ठीक होत नसल्यास, वजन वाढत नसल्यास, वारंवार न्यूमोनिया होत असल्यास या बालकांना शस्त्रक्रिया करून घेण्याची गरज पडते.यामध्ये ओपन हार्ट सर्जरी क्लोज्ड हार्ट सर्जरी या दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया असतात.

संबंधित बातम्या