मनोविकार : प्राथमिक जाणिवा

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 2 डिसेंबर 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

मानसिक आरोग्य सर्वसाधारण स्वास्थ्याचा अत्यंत महत्त्वाचा हिस्सा असतो. आरोग्य म्हटले म्हणजे आपण फक्त शारीरिक आरोग्याचाच विचार करतो, पण सर्वंकष आरोग्याच्या व्याख्येत शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यालाही तेवढेच स्थान असते. मात्र, आपल्या देशात जिथे शारीरिक आरोग्याकडेच दुर्लक्ष केले जाते, तिथे मानसिक आरोग्याची काय कथा? जागतिक आरोग्य संघटनेने याबाबतीत मागील वर्षी मानसिक आजारांबाबत प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवर नजर टाकली तर कोणत्याही धडधाकट माणसाला गरगरायला लागेल. 

 • कसला तरी मानसिक आजार आहे असे ९ कोटी मनोरुग्ण भारतात आहेत. एकुणातल्या जनसंख्येत हा आकडा ६.५ टक्के भरतो.
 • नैराश्याने ग्रासलेल्या रुग्णांची संख्या ५ कोटी ६० लाख आहे.
 • चिंता आणि त्यामुळे होणारा त्रास ३ कोटी ८० लाख व्यक्तींना आहे.  
 • वय वर्षे १० ते १९ मधल्या दर सहा मुला-मुलीतील एक म्हणजे १६ टक्के मुले नैराश्यग्रस्त आहेत.
 • मानसिक आजारांची सुरुवात वयाच्या १४ व्या वर्षात सुरू होते, सुरुवातीला ते लक्षात येत नाहीत आणि नंतर त्यांचे स्वरूप वाढत गेले की त्याचे निदान होते.
 • पौगंडावस्थेतील म्हणजे १५ ते १९ वर्षे वयोगटातील किशोरांमध्ये होणाऱ्या अकस्मात मृत्यूंमध्ये आत्महत्या हे तिसऱ्या क्रमांकाचे कारण आढळून येते.

मनोविकार
 मेंदू हा भावनिक आणि बौद्धिक कार्य करणारा शरीराचा अवयव असतो. त्याचे कार्य बिघडल्यावर भावनिक किंवा बौद्धिक पातळीवर काही लक्षणे दिसू लागतात. यांनाच मानसिक आजार  म्हटले जाते. मानसिक आजार हे एक प्रकारचे शारीरिक विकारच असतात. आपल्या शरीरातील हृदय, मूत्रपिंडे, फुप्फुसे अशांसारख्या अवयवांप्रमाणे मेंदूसुद्धा ‘आजारी’ पडतो, तेव्हा जे आजार होतात त्यातच हे मनोविकार होतात. 

मनोविकारांची कारणमीमांसा
 मेंदूतील कार्यामध्ये काही बिघाड होतात. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आजार निर्माण होत असतात. याचे मूळ मेंदूतील जैवरासायनिक द्रव्यांमध्ये किंवा मेंदूच्या असंख्य मज्जापेशींच्या जोडण्यांमध्ये असते. 
 मेंदूच्या कार्यात बिघाड होण्यामागची मुख्य कारणे म्हणजे - आनुवंशिकता, परिसराचा प्रभाव, व्यक्तिमत्त्व, शारीरिक स्थिती इत्यादी.
 
रासायनिक असमतोल आणि इतर कारणे
 मानसिक विकारांमागे रासायनिक असमतोलाप्रमाणे -
१. जनुकीय कारणे आणि ठराविक मानसिक आजारांबाबत असलेली कौटुंबिक परंपरा
२. पूर्वायुष्यातील अनुभव : उदा. मानसिक, शारीरिक किंवा भावनिक गैरवर्तन (अब्युज)
३. मद्य किंवा इतर मादक किंवा अमली पदार्थांचे सेवन : दारू व इतर अमली पदार्थाचे व्यसन हळूहळू मानसिक विकृती निर्माण करते. दारूचे व्यसन हे आपल्या समाजात मनोविकाराचे अगदी महत्त्वाचे कारण आहे.
४. काही वैद्यकीय कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या अमली औषधांचे सेवन
५. कौटुंबिक किंवा सामाजिक परिस्थिती : यामधून उद्‌भवणारे तीव्र आघात, एकलेपणा, समाजापासून बहिष्कृत केल्या जाणाऱ्या रितीभाती, सामाजिक विषमता, बेकारी, आर्थिक असुरक्षितता या सर्व गोष्टींमधून नैराश्य, आत्महत्येची प्रवृत्ती, आक्रमकता, गुन्हेगारी, मानसिक असंतुलन, इत्यादी अनेक मनोविकार निर्माण होतात. 
६. कौटुंबिक आधार : बालपणात आईवडिलांचे प्रेम मिळणे मानसिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असते. लहानपणी असुरक्षितपणाची, भीतीची भावना राहिली, प्रेम मिळाले नाही तर मुलांवर मानसिक दुष्परिणाम होतात. 
७. पोषण : बाळाच्या पहिल्या दोन वर्षांत मेंदूची वाढ होत असते. या काळात प्रथिने व उष्मांक योग्य प्रमाणात मिळाली नाहीत, तर बौद्धिक वाढीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. कुपोषणाने जे दीर्घकालीन परिणाम होतात त्यात शारीरिक दुबळेपणाबरोबर मानसिक दुबळेपणा किंवा असंतुलित स्वभाव होण्याची शक्यता असते. कुपोषित मुलांची शारीरिक, मानसिक क्षमता भविष्यात कमी राहते.
८. शारीरिक आजार : काही शारीरिक आजार मानसिक आजारांना कारणीभूत ठरतात. उदा. मेंदूच्या आवरणाचा दाह, मेंदूची सूज, मातेला गालफुगी (गलगंड- मम्प्स) झाल्यामुळे संततीमध्ये बौद्धिक क्षमता कमी असणे, जन्माच्या वेळी किंवा अपघातात मेंदूला इजा व सिफिलिस यांचा समावेश होतो. अल्झायमर्स, कर्करोग, काही दीर्घकाळ चालणारे शारीरिक आजार यामध्ये अनेकदा मनोविकार उद्‌भवू शकतात. 

तपासण्या आणि निदान : एखाद्या व्यक्तीला मधुमेह आहे किंवा नाही हे त्याच्या रक्तातील साखरेच्या तपासणीवरून ठरते, किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्या जीवाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे, हे त्याच्या रक्तात त्या जिवाणूचा शोध घेतल्यास कळू शकते, त्याप्रमाणे मनोविकार झालेल्या रुग्णाचे निदान त्याच्यामधील न्युरो ट्रान्समीटर्सच्या पातळीची मोजणी करून ठरवता येत नाही. त्या व्यक्तीची लक्षणे आणि त्याच्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या काही विशिष्ट बाह्य तपासणीमधूनच त्या आजारांचे निदान होत असते. याशिवाय मानसिक आजार जर केवळ या संप्रेरकांच्या असमतोलामुळे होत असतील, तर रुग्णांना या संप्रेरकांची औषधे बाहेरून दिल्यावर त्या मानसिक आजारातून ते त्वरित बरे व्हायला पाहिजेत. पण असे होत नाही.
निष्कर्ष : मानसिक आजारांमध्ये मेंदूतील संदेश वहन करणाऱ्या रासायनिक पदार्थांचा, (न्युरोट्रान्समीटर्स) असमतोल निर्माण होत असेल, पण ते आजार व्हायला केवळ हा समतोलच कारणीभूत नसतो, तर इतरही कारणे असतात. त्यामुळे उपचारात या संप्रेरकांवर परिणाम करणाऱ्या औषधांबरोबर इतर मानसोपचारांचा एकत्रितपणे वापर करावा लागतो. 

मानसिक आजाराची लक्षणे
आपल्याला किंवा अन्य कोणालाही मानसिक आजार आहे का? हे तपासण्यासाठी काही सर्वसाधारण पण महत्त्वाची लक्षणे जाणून घेणे महत्त्वाचे असते. जसे की अचानक रडू येणे, दु:ख वाटणे, एकटे वाटणे, झोप न लागणे किंवा अधिक झोप येणे, सतत थकल्यासारखे वाटणे, पचन नीट न होणे, आत्महत्येचे विचार येणे, आशावादाचा अभाव असणे, सतत अस्वस्थता वाटणे, एकलकोंडेपणा ही लक्षणे आढळल्यास मानसरोग विशेषज्ञाकडे जाऊन तपासणी करून घेणे गरजेचे असते.

मानसिक आजाराचे प्रकार
१. चिंता आणि घबराट : ज्या व्यक्तींना हा आजार असतो ते काही विवक्षित घटना आणि प्रसंग यांना अत्यंत विपरीतपणे प्रतिसाद देतात. त्यांना या प्रसंगांमध्ये खूप त्रास होतो आणि या त्रासाचे नियंत्रण करून त्याला ते ताब्यात ठेवू शकत नाहीत. या प्रतिसादामध्ये कमालीचे भय आणि घबराट आढळून येते. त्यांच्या छातीचे ठोके वेगाने पडून त्यांना धडधडू लागते, त्यांना अचानक खूप घाम फुटतो. त्यांचे बोलणे, वागणे आणि निर्णय या प्रसंगांमध्ये खूप अतिरेकी प्रमाणात असंबद्ध असतो. चिंताजनक गोष्टींना ते जो प्रतिसाद देतात त्यामुळे त्याच्या दैनंदिन जीवनातल्या साध्यासुध्या गोष्टी पार पाडणे त्यांना अशक्य होऊन बसते. या प्रकारात सर्वसाधारण चिंता, घबराट, सामाजिक बाबतीतील चिंता आणि भयगंड (फोबिया) यांचा समावेश होतो.
२. नैराश्य, उदासीनता (डिप्रेशन) : हा सर्वाधिक आढळणारा मानसिक आजार आहे. या आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीला नेहमी उदास आणि निराश वाटते. दैनंदिन कार्य आणि आनंददायी गोष्टीतील आवड कमी होते. २० ते ३० टक्के व्यक्तींना कधीतरी हा आजार होत असतो. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट असते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, इ.स. २०२० मध्ये नैराश्य हा सर्वाधिक आढळणारा विकार असेल.

कारणे : नैराश्य निर्माण करणारी कारणे असंख्य असतात. मानसिक आघात, अकारण केलेले आरोप, जिवलगांशी झालेले वादविवाद, गरिबी, बेरोजगारी, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, घटस्फोट, प्रेमभंग, पार्किन्सन्स किंवा हायपोथायरॉइडीझमसारखे शारीरिक आजार, उच्च रक्तदाब, स्टीरॉइड्‌स, काही पित्तशामक औषधे, लहानपणी घडलेला एखाद्या दुर्दैवी प्रसंग, दारू किंवा अमली पदार्थाचे व्यसन, मोबाईल व इंटरनेटचा अतिवापर अशा अनेकविध कारणांमुळे नैराश्य उद्‌भवत असते. नेहमीच्या जीवनातील दगदग, नकार, विरह, अपयश, पैशांचे व्यवस्थापन या गोष्टींनी ताण वाढतो. कधी यापेक्षाही तणावपूर्ण प्रसंगांना सामोरे जावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार, बलात्कार, सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो आणि परिणामी नैराश्य येऊ शकते. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, एचआयव्ही आणि इतर संसर्गजन्य रोग तसेच हृदयरोगानंतर निर्माण होणारे विकारसुद्धा नैराश्याला कारणीभूत असतात. काहीवेळा काही कारण नसतानाही नैराश्य येऊ शकते. हे मुख्यतः मेंदूत होणाऱ्या रासायनिक बदलामुळे किंवा आनुवंशिकतेने होऊ शकते. बाळंतपणानंतर होणाऱ्या संप्रेरकातील बदलामुळे अनेक स्त्रियांना नैराश्य येऊ शकते.
लक्षणे

 • सतत आणि तीव्र स्वरूपाच्या मानसिक वेदना होणे.
 • सतत उदास किंवा निराश वाटते आणि चिडचिड होणे.
 • थकवा जाणवणे, शक्ती नसल्यासारखे वाटते.
 • मन बधिर, अस्वस्थ आणि असमाधानी असणे.
 • भविष्याविषयी विनाकारण काळजी करणे.
 • कोणतेही काम करावेसे न वाटणे.
 • भूक कमी लागणे, जेवणाची इच्छा न होणे किंवा वजन कमी होणे. (काही लोकांमध्ये मात्र विरुद्ध लक्षणे दिसून येतात.)
 • दुःखी असणे, सतत काळजी करणे.
 • सतत रडू येणे.
 • वेळेवर झोप न लागणे, झोपेतून मधेच जाग येणे, झोप पूर्ण होण्यापूर्वी लवकर जाग येणे. (काहीजणांना मात्र खूप झोप लागते)
 • सकाळी उठल्यानंतर उत्साही न वाटणे.
 • निर्णयक्षमता कमी होणे, कामावरती लक्ष न लागणे, इच्छा कमी होणे.
 • स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होणे. स्वतःला दोषी समजणे. जसे, आपण काहीच कामाचे नाही, आपले काहीच चांगले होणार नाही, आपल्याला कोणीही मदत करू शकणार नाही असे वाटते.
 • शरीरसंबंधाची इच्छा न होणे.
 • दैनंदिन कामात अजिबात रस नसणे.
 • आत्महत्येचे विचार मनात येणे किंवा प्रयत्न करणे.

वरील लक्षणे १५ दिवसांच्यावर असल्यास हा आजार असण्याची शक्यता असते.
नैराश्यात वरील लक्षणे कमीजास्त प्रमाणात होत असतात. व्यक्तीमध्ये एकदम बदल होतात, जेव्हा नैराश्याचा वेग आणि प्रमाण जास्त असते आणि ते कमी असेल, तर व्यक्तीमधील बदल खूप हळू होतात आणि तो आजारी आहे हे लक्षात येत नसते. तीव्र मानसिक वेदना हे नैराश्याचे सर्वांत महत्त्वाचे लक्षण आहे.

संबंधित बातम्या