प्रथमोपचार - एक संजीवन तंत्र 

डॉ. अविनाश भोंडवे
सोमवार, 23 डिसेंबर 2019

आरोग्याचा मूलमंत्र
 

प्रथमोपचार म्हणजे अचानक उद्रभवलेल्या आजारात रुग्णाला मान्यताप्रत वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्याची एकूण तब्येत बिघडू नये, त्याच्या जिवाला असलेला धोका कमी व्हावा यासाठी त्याच्यावर केले जाणारे प्राथमिक उपचार. आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका येणे, बेशुद्ध पडणे असे गंभीर आणि प्राणघातक प्रसंग वाढत आहेत. वेगवान वाहने, अत्याधुनिक यंत्रे यामुळे प्राणांतिक अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. नैसर्गिक आणि मानवी आपत्तींमुळे होणाऱ्या विपदा वरचेवर घडत आहेत. या सर्व परिस्थितीत प्रथमोपचाराचे प्राथमिक ज्ञान प्रत्येक सुजाण नागरिकाला आवश्यक ठरते आहे. 
अपघात, इजा अथवा गंभीर स्वरूपाच्या आजाराने जर्जर अशा आपद्ग्रस्त व्यक्तीस वैद्यकीय मदत मिळेपर्यंत किंवा तिला रुग्णालयात नेईपर्यंतच्या कालावधीत जे उपचार केले जातात त्यांना 'प्रथमोपचार' म्हणतात. असे उपचार बहुतांश या विषयाचे प्रशिक्षण घेऊन दिल्यास कित्येक आपद्ग्रस्तांचे प्राण वाचू शकतात, इजेची व्याप्ती न वाढता ती मर्यादित राहू शकते, तसेच रुग्णाचा रुग्णालयात पडून राहण्याचा काळही कमी होतो. 
प्रथमोपचार म्हणजे जखमी व्यक्तीची घरगुती साधनांच्या साहाय्याने ताबडतोब घ्यावयाची जुजबी काळजी, ही प्रथमोपचारांविषयीची संकल्पना आजच्या युगात कालबाह्य होत चालली आहे. आज प्रथमोपचारकाला उपचारांचा अग्रक्रम ठरवता यावा लागतो. मूळ जीवनधारांचे (बेसिक लाइफ सपोर्ट) ज्ञान त्याला असावे लागते आणि या ज्ञानाचा समोर आलेल्या व्यक्तीची शरीरक्रिया सुरू ठेवण्याकरिता त्याला उपयोग करता यावा लागतो.

महत्त्वाच्या गोष्टी
प्रथमोपचाराची मुख्य उद्दिष्टे म्हणजे - समोरच्या व्यक्तीला जिवंत ठेवणे, त्याला झालेली इजा वाढू न देणे आणि तो लवकर बरा व्हावा याची तजवीज करणे. ही अतिशय तातडीक स्वरूपाची कार्यपद्धती असली, तरी वैद्यकीय कामाचा अनुभव असण्याची गरज नसते. सर्वसामान्य लोकांनी, कमीत कमी बाह्य साधनांच्या मदतीने, केवळ साध्या सोप्या तंत्राने गंभीर परिस्थितीतल्या रुग्णाला केलेली ही मदत असते.
प्रथमोपचार म्हणजे त्या व्यक्तीचा, त्या आजारातला वैद्यकीय उपचार नसतो. या उपचारानंतर रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यावर, तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणाऱ्या गुंतागुंतीच्या आणि काही वेळा आवश्यक भासणाऱ्या विशेष उपचारांनाही पर्याय नसतो.

प्रथमोपचाराची मुळाक्षरे
प्रथमोपचाराचे तंत्र समजून घेण्यासाठी काही सर्वमान्य प्राथमिक मूलतत्त्वे आहेत. ए, बी, सी, डी अशा प्रकारात वर्णन केली जाणारी प्रथमोपचाराची ही मुळाक्षरेच मानली जातात.
ए - एअर वे : म्हणजे दुर्घटनाग्रस्त व्यक्तीचा श्वसनमार्ग मोकळा करणे आणि त्याचा श्वास सुरू राहील याकडे लक्ष देणे. अनेकदा अत्यवस्थ व्यक्तीच्या श्वसनमार्गात अडथळा आलेला असतो किंवा त्याचा श्वास अडकलेला नाहीतर कोंडलेला असतो. त्या व्यक्तीच्या जीवनाला हे सर्वांत धोकादायक असल्याने तो मोकळा करणे हे आद्य काम असते. 
बी - ब्रीदिंग : एकदा श्वसनमार्ग मोकळा झाला की त्या व्यक्तीचे श्वसन योग्यरीत्या सुरू होतेय का हे पाहावे लागते. त्याच्या छातीवर विशिष्ट तंत्राने दाब देऊन त्याचे श्वसन सुरू करावे लागते. अन्यथा त्याला कृत्रिम श्वसन द्यावे लागते.
सी - सर्क्युलेशन : रुग्णाच्या हाताची, मानेवरील, जांदोमधील नाडी तपासून त्याचे रक्ताभिसरण सुरू आहे का हे पाहावे लागते. अन्यथा छातीवर दाब देत राहून ते सुरू ठेवावे लागते.
डी - डेडली ब्लीडिंग आणि डीफिब्रिलेशन : म्हणजे रुग्णाचा रक्तस्राव थांबवणे किंवा बंद पडलेले हृदय सुरू करणे. प्रथमोपचाराच्या काही विचारधारांत हा स्वतंत्र चौथा टप्पा मनाला जातो, तर बरेच जण याला तिसऱ्या टप्प्याचाच हिस्सा मानतात.
रुग्णाचे परीक्षण आणि या एबीसीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रथमोपचार करणाऱ्या व्यक्तीला थोड्या प्रशिक्षणाची आणि अनुभवाची गरज असते. एकदा का रुग्णाचे श्वसन आणि रक्ताभिसरण व्यवस्थित झाले की मग त्याला पुढची पावले उचलता येतात. प्रथमोपचार करताना कधीकधी रुग्णाचा श्वास बंद झाला असल्यास आणि त्याची नाडी लागत नसल्यास कृत्रिम श्वसन आणि छातीवर दबाव देणे अशा क्रिया एकत्रित कराव्या लागतात.

प्रथमोपचार सुरू करण्यापूर्वी काही प्राथमिक गोष्टींचे निरीक्षण करून संभाव्य धोके टाळावे लागतात. 
१. अडथळे दूर करणे : उदा. गंभीर अपघात झाला असेल, तर त्या ठिकाणी बऱ्याचदा गडबड गोंधळ उडालेला असतो. भोवतालची बघ्यांची गर्दी कमी करणे आवश्यक असते. रुग्णाच्या अंगावर एखादी जड वस्तू असेल तर ती दूर करावी लागते. आपद्ग्रस्ताला झालेली उघडी जखम दिसत नसली, तरी प्रथम आडवे झोपवून ठेवावे. यामुळे बीपी खूप खाली जाऊन रुग्णाला चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, नाडी मंदावणे, थंड घाम फुटणे या गोष्टी टळतात. तसेच अंतर्गत अवयवांना झालेल्या दुखापती वाढत नाहीत.

२. रुग्णाचा प्रतिसाद : एकदा सर्व अडथळे दूर झाले की रुग्ण शुद्धीवर आहे का? त्याला आजूबाजूची जाणीव होते आहे की तो गुंगीत आहे? याची काही जुजबी प्रश्न विचारून खातरजमा करावी लागते. त्याला स्पर्श समजतोय का? वेदना होत आहेत का? हेसुद्धा पाहावे लागते.  

३. श्वसनास अडथळे : रुग्णाला उताणे झोपवून त्याची हनुवटी उंचवावी. त्याचे डोके मागे कलते करून घ्यावे. जर त्याच्या तोंडात दातांची कवळी किंवा काही अडकलेले असल्यास आपल्या हाताची दोन बोटे आत घालून ते दूर करावे.

४. श्वसनाची खात्री : श्वसनाची खात्री करून घेण्यासाठी त्याची छाती वरखाली होते आहे का? आपला हात त्याच्या नाकापाशी धरून श्वास येतो आहे का हे पाहावे.

५. सर्व शरीराचे निरीक्षण : प्रथमोपचारकाने रक्तस्राव, श्वासोच्छ्‌वास थांबणे, फ्रॅक्चर्स, विषबाधा, रुग्णाला असलेली शारीरिक विकृती, एखाद्या ठिकाणी आलेली सूज यांचा ताबडतोब आढावा घ्यावा. 

यानंतर व्यक्ती जिवंत राहण्याकरिता श्वसनक्रिया आणि रुधिराभिसरण लगेच सुरू कराव्या लागतात. रुधिराभिसरण क्रियेत हृदयक्रिया एकदम बंद पडल्यास आणि त्याच वेळी श्वसनक्रियाही थांबल्यास मेंदूची भरून न येणारी हानी होण्याचा गंभीर धोका असतो. या क्रिया ताबडतोब सुरू करण्याच्या प्रयत्नांना 'हृद्-फुप्फुस संजीवन' म्हणतात. प्रत्येक प्रथमोपचारकाने अशा प्रयत्नांची संपूर्ण माहिती करून घेणे आवश्यक असते.

त्रासमुक्त स्थिती
एखाद्यावेळेस एखाद्या रुग्णाचा श्वास सुरू असला तरी तो बेशुद्धावस्थेत असतो. अशा वेळेस घशात आतवर काही अडथळा असल्यास तो लक्षात येणे कठीण असते. त्यासाठी त्याचे कपडे, पॅंट, धोतर, साडी, ड्रेस, सलवार किंवा पोटावर असलेले वस्त्र सैल केले जातात. रुग्णास त्याचे हात मोकळे ठेवून, एक पाय लांब आणि दुसरा गुडघ्यात वाकवून त्याला कुशीवर वळवून झोपवावे लागते. म्हणजे त्याचा श्वास निर्वेधपणे सुरू राहतो. 

हृद्‌-फुफ्फुस संजीवन (सीपीआर)
सीपीआर म्हणजेच  'कार्डिओपल्मनरी रेसुसाइटेशन.' ही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचे प्राण वाचवणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःहून श्वास घेत नसेल, तर त्याच्या छातीवर सतत दाब टाकला जातो. त्यामुळे मेंदूपर्यंत रक्ताचा पुरवठा सुरू होतो. वैद्यकीय साहाय्य मिळेपर्यंत व्यक्तीच्या मेंदूला रक्तपुरवठा सुरू ठेवावा लागतो. हृदयविकाराचा झटका, विजेचा तीव्र शॉक, बुडालेला व्यक्ती, अपघात, धुरामुळे गुदमरणे अशा परिस्थितीत सीपीआर दिला जातो. 
प्रौढ व्यक्तींना सीपीआर देताना - त्या व्यक्तीच्या खांद्यावर हात ठेवून कसे आहात? हा प्रश्न विचारा. उत्तर येण्याची वाट पाहावी. रुग्ण उत्तर देत नसेल तर त्याचे डोके मागील बाजूस वाकवून हनुवटी आणि छाती थोडी वर करावी. व्यक्ती श्वास घेतोय हे दहा सेकंदापर्यंत पाहून सीपीआर सुरू करावे. दोन्ही हात एकमेकांवर ठेवून रुग्णाच्या छातीच्या मधोमध आपल्या शरीराचे वजन वापरून दाब देण्यास सुरुवात करावी. छातीवर दाब देताना, न थांबता प्रत्येक मिनिटाला १०० वेळा अशा वेगाने छातीवर दाब द्यावा. अशा प्रकारे एकंदरीत ३० वेळा दाब द्यावा. नंतर रुग्णाचे नाक चिमटीत दाबून तोंडाने दोन वेळा त्यांच्या शरीरात हवा भरावी. तोंडाने रुग्णाच्या तोंडात हवा भरणे आणि छातीवर दाब देणे ही प्रक्रिया अजिबात न थांबता, रुग्णाने स्वतःहून श्वास घेईपर्यंत सुरू ठेवावी.
लहान मुलांना सीपीआर देताना - मुलाचे तोंड उघडावे. त्याला पाठीवर झोपवावे आणि हनुवटी किंचित वर करावी. मूल श्वास घेतेय का हे दहा सेकंद पाहावे. नंतर मुलाचे नाक चिमटीत दाबून तुमच्या तोंडाने दोन वेळा त्याच्या शरीरात हवा भरावी. जर मूल शुद्धीवर आले नाही, तर तात्काळ सीपीआर सुरू करावे. दोन किंवा तीन बोटांच्या मदतीने छातीवर दी़ड इंच खोल जाईल अशारीतीने ३० वेळा प्रेशर द्यावे. दोन्ही हातांचे बोटे एकमेकांमध्ये अडकवावीत आणि दोन इंच खोल पुन्हा ३० वेळा प्रेशर द्यावे. छातीवर प्रेशर दिल्यानंतर पुन्हा दोन वेळा त्याच्या शरीरात हवा भरावी. ३० वेळा दाब आणि दोन वेळा हवा भरणे, याचे मिळून सीपीआरचे एक आवर्तन होते.

जर एखादी व्यक्ती प्रथमच सीपीआर देत असेल, तर दर मिनिटाला १०० च्या गतीने फक्त छातीवर दाब देणे एवढेच काम करावे. सीपीआरचे प्रशिक्षण सर्वांना महत्त्वाचे असते.  असे प्रशिक्षण मिळाले असल्यास आणि किमान २५-३० वेळा सीपीआर देण्याचा अनुभव असल्यास त्यांनी त्याच वेगाने छातीवरील दाब आणि दर ३० दाबांनंतर दोन वेळा तोंडाने श्वास देणे या दोन्ही गोष्टी कराव्यात. आपत्कालीन परिस्थितीत सीपीआरमुळे अनेकांचे प्राण वाचवता येतात.

प्रशिक्षित प्रथमोपचारकास ऑटोमेटेड एकस्टर्नल डीफिब्रीलेटर (ए.इ.डी.) ज्ञान असल्यास हृदय बंद पडलेल्या व्यक्तीला त्या यंत्राच्या साहाय्याने एक शॉक द्यावा आणि त्यानंतर दोन मिनिटे वेगाने छातीवर दाब द्यावा. त्यानंतर हृदयाचे ठोके, नाडी म्हणजेच रक्ताभिसरण सुरू झाले नाही, तर पुन्हा एक झटका द्यावा. 

प्रत्येक व्यक्तीला बेसिक लाइफ सपोर्टबद्दल जुजबी माहिती असणे गरजेचे आहे. वेळ-प्रसंग काही सांगून येत नाही. आणि सीपीआर शिकणे, हे वाटते तितके अवघडही नाही. कसलेही वैद्यकीय शिक्षण न घेतलेल्या व्यक्तीनेसुद्धा अशा प्रसंगी सीपीआर दिला तरी चालतो. 

प्रगत देशांमध्ये प्रत्येक पालकाला, नर्सरी किंवा प्री-स्कूल चालवणाऱ्या शिक्षकांना, पोहणे शिकवणाऱ्या शिक्षकांना बेसिक लाइफ सपोर्टचे शिक्षण घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, आपल्या देशात सीपीआर हे काहीतरी धोकादायक प्रकरण वाटते. अनेकांना ते फार काहीतरी वेगळे, नवीन किंवा सर्वांनी शिकण्यासाठी अनावश्यक गोष्ट वाटते. पण युके, अमेरिका किंवा इतर प्रगत देशांमध्ये राहणाऱ्यांना याचे तंत्र चांगलेच अवगत असते. त्या देशांत शाळेतील मुलांनासुद्धा सीपीआरचे प्रशिक्षण देतात आणि ते दिले जावे असे अमेरिकन हार्ट असोसिएशनचे मत आहे. 

सीपीआरचे अधिकृत प्रशिक्षण घेणे केव्हाही हितावह ठरते. असे प्रशिक्षण दोन तीन तासांचे असते. इंडियन मेडिकल असोसिएशनसारख्या संस्था याचे प्रशिक्षण देत असतात. शक्य असेल तर सर्वांनीच असे प्रशिक्षण घ्यावे आणि दर दोन वर्षांनी त्याची उजळणी करण्याचा प्रयत्न करावा.

संबंधित बातम्या