अपयश म्हणजे सगळं संपलं नाही

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
गुरुवार, 7 जून 2018

हितगूज
 

२३ मे - आज रिझल्ट लागला. निकालच म्हणायला हवं खरं तर. पुन्हा इयर डाऊन झालो. पाच बॅक राहिले. वर्ष गेलं. सगळे हसणार. अस्मितासुद्धा. कॅम्पस सिलेक्‍शन वगैरे लांबच राहिलं. डोक्‍याचा पार भुगा झालाय. आत्मविश्वास या शब्दाची सुद्धा भीती वाटते. सगळीकडे पराभव.
२४ मे - आज सकाळपासून असह्य झालय सारं. ठरवून टाकलं, संपवून टाकायचं सगळं. डेथ नोट लिहून टाकायची, माझ्या मृत्यूला कुणाला जबाबदार धरू नये. आयुष्यात हरल्यामुळे मी स्वतःच्या जबाबदारीवर हा निर्णय घेत आहे. 

हरीशची डायरी समोर होती आणि समोर खचलेला, हताश हरीश. 
‘सर, जगातला सगळ्यात अपयशी माणूस आहे मी. जगून तरी काय करू? काहीही जमणार नाही मला. माझ्यात नक्की काहीतरी कमी आहे म्हणूनच सगळ्या आघाड्यांवर हार. मग तो अभ्यास असो, प्रेम असो नाहीतर नोकरी. मी जन्माला तरी का आलो असं वाटतं कधी कधी ?.‘ मी त्याला जवळ घेतलं. म्हंटल ‘ हे बघ तुला किती त्रास होत असेल मी समजू शकतो. पण काही सत्य तुला सांगतो. मृत्यू सगळ्यांनाच अटळ आहे रे. पण आपण त्या आधीच्या सुंदर जगण्याचा विचार करू या की! झालंय काय की तू  स्वतः भोवती नकारात्मक विचारांचं असं एक जाळं विणून घेतलंयस. आपण कमी आहोत हा ठाम ग्रह करून घेतलायस. मग परीक्षा असो,  मुलाखत असो. मी अपयशीच होणार ही तुझी स्थायी भावना बनून गेलीय. या भावनेतूनच तू प्रसंगाना सामोर जातोस आणि लहानसं अपयश आलं, की आणखी खचत जातोस. आपल्याला अपयश का येतं त्याची खरी कारणं तू लक्षातच घेत नाहीयस. वस्तुस्थिती अशी आहे, की या जगात कुणीही स्वतःला कमी मानण्याची गरज नाही. प्रत्येकाकडे काहीना काही तरी वैशिष्ट्य आहेच. ते ओळखायचं, आपल्या बलस्थानांचा विचार करायचा आणि आनंदानी पुढे जायचं. यश, अपयश, इतरांशी तुलना करणं या सगळ्या गोष्टी फोल आहेत, आणि एक सांगू आपण सगळे जगतो फक्त दोन शब्दांसाठी ‘आनंद ‘ आणि ‘मन:शांती ‘. ती मिळवणं आपल्याच हातात आहे. त्याच्या साठी साधना आहे, रियाझ आहे. भूतकाळाच ओझं न बाळगता, वर्तमान क्षणात कसं जगायचं हे सगळं शिकणं आहे. आयुष्याचा प्रवास आनंदमय होण्यासाठी महत्त्वाकांक्षा हवी. त्याचसाठी १०० टक्के प्रयत्न हवेत. कारण प्रवासाचा आनंदच खरा आनंद आहे. पण प्रत्येकवेळी मी जिंकलोच पाहिजे, हा अट्टाहास नसावा. प्रवासाचा, प्रोसेसचा आनंद खरा आनंद ! ‘तुला परीक्षा चांगली गेली नाही. निकाल चांगला लागला नाही. किती त्रास होत असेल तुला मी समजू शकतो. पण आयुष्याचा शेवट करण्याचा विचार करणं किंवा व्यसनांच्या आहारी जाणं, हा मार्ग असू शकत नाही. त्यापेक्षा समस्येच्या मुळा पर्यंत जाणं आणि तिचं निराकरण करणं शक्‍य आहे. परीक्षा हा काही जगण्या मरण्याचा प्रश्‍न नव्हे. तुझी समस्या एकाग्रतेची आहेच त्याचबरोबर एकूणच आयुष्यात आपल्याला नेमकं काय मिळालं तर आपण सुखी होऊ याच्या उत्तराची आहे, दृष्टिकोन बदलाची आहे. हरीश  तू यातून निश्‍चित बाहेर येशील. मी तुला मदत करीन. भले या वर्षी तुला मार्क्‍स कमी पडतील, विषय राहतील किंवा अगदी पुन्हा नापास होशील. पण हळू हळू पायरी पायरीने एकाग्रता व्हायला लागेल. आपली एकाग्रता कशामुळे गेली, ती कशी मिळवायची, आयुष्यात काय महत्त्वाचं आहे, हे सगळं तुझ्या लक्षात येईल. अंतिमत: तुझं ध्येय तू गाठशील. आयुष्यात आनंदी होशील आणि इतरांना आनंद देत राहशील. पण उद्या पासून काही गोष्टी करायच्या. आपण या परिस्थितीवर मात करू शकतो. हरीशचे डोळे चमकले. त्याला सांगितलं उद्या पासून आपण काही गोष्टी शिकणार आहोत. भावनांवर ताबा कसा मिळवायचा, आनंद कसा मिळवायचा आणि कसा टिकवायचा ,परिस्थितीशी जुळवून कसं घ्यायचं व समस्येतून मार्ग कसा काढायचा, तणावाचा उगम/स्त्रोत कसा शोधायचा, सकारात्मक दृष्टिकोनाची जोपासना कशी करायची, आयुष्यातील प्राथमिकता कशी ठरवायची/कशी बदलायची, योजनाबद्ध पद्धतीने, पायरी पायरीने विचार व कृती करण्याची सकारात्मक पद्धत शिकायची अर्थात नकारात्मक पद्धत बदलायची. एकाग्रता साधण्यासाठीची तंत्रे शिकायची. हरिश म्हणाला, हे सगळं मला जमेल? मी म्हंटल, का नाही ? अनेकांना हे जमलंय. तणाव नियोजनाच्या विविध पद्धती (Eastern व Western) आपण शिकूया.

 प्रत्येक क्षणात, वर्तमानात, स्वस्थ कसं राहावं, तसंच, तटस्थपणे स्वतःकडे व परिस्थितीकडे कसं पहावं हे शिकूया. काही ध्यानाच्या पद्धती शिकूया,ज्या योगे चित्त शांत होईल, या बरोबरच रोज भरपूर व्यायाम करुया ज्याने चांगली संप्रेरक शरीरात स्त्रवतील. आपलं औदासिन्य कमी व्हायला मदत मिळंल अभ्यासात एकाग्रता व्हायला लागेल. हरीश प्रथमच हसला. म्हणाला ‘सर खूप बर वाटलं तुमच्याशी बोलून. उद्या भेटूया आपण. सुरू करू.‘  मी स्वस्थ झालो होतो, एक आयुष्य मार्गी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली होती.

परीक्षेच्या अतिरिक्त ताणामुळे, अपरिपक्व विचारसरणीमुळे, नैराश्‍यामुळे, फुलणाऱ्या कळ्या, उमलणारी व्यक्तिमत्व कोमेजून जातात. वेळेवर काळजी घेतली तर आपण असं घडणं टाळू शकतो. त्यांना पुन्हा एकदा सुंदर आयुष्य मिळायला मदत करू शकतो.

विद्यार्थी आणि परीक्षेचा ताण
परीक्षेचा चांगला ताण अभ्यास करायला प्रवृत्त करतो परंतु अपरिमित ताण कदाचित सर्व भवितव्य विस्कटून टाकू शकतो. परीक्षेचा अतिरिक्त ताण येण्याची  कारणे - 

  • अभ्यासात मन एकाग्र न होणे आणि वेळेत अभ्यास पूर्ण न होण्याची भीती 
  • मेंदूतील रासायनिक असंतुलन
  • अपयश येणारच हे गृहीत धरणे व ते पचविण्याची तयारी नसणे.
  • नकारात्मक विचारसरणी व नकारात्मक स्व- संवाद  
  • स्वत:कडून अवास्तव अपेक्षा  
  • अभ्यासाची अपूर्ण तयारी 
  • आयुष्यात अचानक घडणारे न टाळता येणारे महत्त्वाचे बदल (पालकांची बदली, त्याच्यातील घटस्फोट, आर्थिक संकट इ).
  • प्रेमभंग  
  • अभ्यासात मन एकाग्र न होणे आणि वेळेत अभ्यास पूर्ण न होण्याची भीती 

 एकाग्रता म्हणजे सोप्या शब्दात सर्व ज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे. अभ्यास करताना ज्ञानेन्द्रीयान्द्वारे माहिती स्वीकारली जाणे. ती मेंदूतसाठवली जाणे, आणि आवश्‍यक तेव्हा आठवून चांगल्या  पद्धतीने सादर करता येणे. या क्रिया चांगल्या होणे व त्यांच्यात कॉडीनेशन असणे फार महत्त्वाचे आहे. अभ्यासातील एकाग्रता का होत नाही तर मुख्यत: - ध्येयासक्ती नसणं, योग्य ध्येयच डोळ्यासमोर नसणं, भावनिक समस्या असणं, अभ्यास करायची मनापासून तयारी नसणं, विषयामधे रस नसणं, विषय अवघड वाटणं, शारीरिक व मानसिक थकवा असणं.

मेंदूतील रासायनिक असंतुलन
मुळात  मन स्वस्थ, स्थिर नसेल तर एकाग्रता साधनं शक्‍य नाही. त्यासाठी मन अस्वस्थ असण्याची कारणे जी आपल्याला  माहीत आहेत, त्यांची एक लिस्ट करावी. विश्वासातील घरातली व्यक्ती किंवा तज्ज्ञ यांच्या मदतीने त्यांचे निराकरण करावे. जी कारणे सांगता येत नसतील, उमजत नसतील त्यांच्या निराकरणासाठी तज्ज्ञांचे साहाय्य घ्यावे. भावनिक समस्या (emotional disorder) किंवा अस्वस्थता असेल तर त्यासाठी देखील वेळ न दवडता तज्ज्ञांचे उपचार घ्यावेत.  मी पाहिलं, हरिशच्या चेहेऱ्यावर तजेला येत होता. ही सुरवात तर चांगली होती. डोळ्यांत चमक दिसू लागली होती. आत कुठेतरी सृजनाची, उत्साहाची ठिणगी पडली होती हे नक्की !

फोटो फीचर

संबंधित बातम्या