स्मृती - विस्मृती 

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
गुरुवार, 28 जून 2018

हितगूज
 

एका नाट्यगृहात एक खूप जुने नाटक पाहायला गेलो होतो. गर्दी जवळजवळ नव्हतीच. इंटर्व्हलला बाहेर चहा पीत उभा होतो. समोरून नाना सोमण - एक ओळखीचे वयस्कर गृहस्थ दिसले. त्यांनी मला पाहिले मी हसलो. पण त्यांच्या चेहऱ्यावर ओळखीचे कोणतेही भाव दिसले नाहीत. ते सरळ समोर असलेल्या स्वच्छतागृहाच्या दिशेने गेले. आत न जाता तसेच परत फिरले. माझ्यासमोरून जाऊ लागले. मी नमस्कार केला. ‘काय म्हणताय नाना, कसं काय?’ वगैरे विचारलं, त्यांच्या चेहऱ्यावर संपूर्ण अनोळखी भाव. कोरा चेहरा. काहीतरी पुटपुटत निघून गेले. पुन्हा फिरले. स्वच्छतागृहापाशी जाऊन परत गेले. पुन्हा तसेच हरवल्यासारखे भाव. असं चारदा झालं. इतक्‍यात किरण, त्यांचा मुलगा आला. त्यांना दंडाला धरून स्वच्छतागृहात जाऊन परत आला. त्याला विचारलं, ‘काय प्रकार आहे?’ तो म्हणाला, ‘आत्तापर्यंत पन्नास वेळा तरी या नाट्यगृहात आलेत. पण आताशा त्यांना काही आठवत नाही. उमजत नाही. चेहरे कधी कधी आठवले तर आठवतात. नावं बहुधा नाहीच. घरातल्यांनासुद्धा नेहमीच ओळखतात असं नाही. कहर म्हणजे आई, त्यांची पत्नी म्हणजे कुणीतरी परकी बाई घरात वावरतेय असं त्यांना वाटतं. त्यांचं आवडतं संगीत नाटक तरी एंजॉय करतायत का बघावं म्हणून घेऊन आलो. पण एका जागी स्वस्थ बसले नाहीत. गाणी सुरू असताना एकदम भान आल्यासारखे जागे व्हायचे काही क्षण. नंतर पुन्हा काही क्षणात हरवून जायचे. चुळबूळ करत राहतात. नाहीतर पुतळ्यासारखे मख्ख.. डॉक्‍टरांनी डिमेंशिया आहे असं सांगितलंय.’  स्मृतिभ्रंश. मला धक्का बसला आणि वाईट वाटलं. 

स्मृती आणि विस्मृती 
एखादी गोष्ट विसरणे ही अगदी सामान्य बाब आहे. प्रत्येकाकडून अधून मधून काही तरी विसरले जातेच. कधी किल्ली कुठे ठेवलीय आठवत नाही, कधी एखादा फोन नंबर (परिचयाचा) आठवत नाही. कधी एखादे तोंडावर असलेले परिचयाचे नाव आठवत नाही. तरुण असताना आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. पण जसं वय वाढत जातं आणि हे वारंवार घडू लागतं तशी काळजी वाटू लागते. आसपास कुणाला अल्झायमर्स झाल्याचं कानावर आलं की काळजी आणखीच वाढते. पण मग केवळ वयामुळं असं होतंय की कुठल्या आजाराची ही सुरवात आहे हे कसं जाणायचं? वयपरत्वे हे होत असेल तर त्याला प्रतिबंध करता येईल का? 

आधी आपण निसर्गनियमाप्रमाणं, वयपरत्वे होणाऱ्या मेमरी लॉसची - स्मृतिभ्रंशाची कारणे पाहूया. 

१. मेंदूतील Hippocampus हा memory formation आणि memory retrieval संदर्भातला महत्त्वाचा भाग, वयपरत्वे जीर्ण होत जाणे. 
२. Neurons च्या वाढीसाठी, जोपासना व संवर्धनासाठी आवश्‍यक प्रथिने व संप्रेरके यांच्यात वयपरत्वे घट होणे. 
३. वयपरत्वे मेंदूला होणारा रक्तप्रवाह मंदावणे. त्याचा स्मृतीवर व cognitive स्किल्सवर परिणाम होणे. 
४. वयपरत्वे मेंदूला आवश्‍यक nutrients शोषण्यात अडथळे येणे. 

ज्ञानेंद्रियांद्वारे गोळा झालेली माहिती स्मृतींच्या वेगवेगळ्या प्रकारात साठवली जाते. उदा. आज सकाळी कुठली भाजी केली होती किंवा काही वेळापूर्वी भेटलेल्या व्यक्तीचे नाव हे लघुस्मृती (short term memory) मध्ये साठवले जाते. ते लवकर विसरले जाते. बालपणातील स्मृती या दीर्घस्मृती (long term memory) मध्ये साठवल्या जातात. त्या दीर्घकाळ टिकून राहतात. 

आता नैसर्गिकदृष्ट्या वय झाल्यावर खालील गोष्टींवर साधारणपणे परिणाम होत नाही - 
१. वर्षानुवर्षे आपण नेहमी करीत असलेल्या सवयीच्या गोष्टी. 
२. आयुष्यभराच्या अनुभवांती आलेले शहाणपण व ज्ञान. 
३. आपला आंतरिक कॉमन सेन्स. 
४. आपली विचारांती निर्णय घेण्याची सर्वसाधारण क्षमता. 
आता नैसर्गिकदृष्ट्या वय होणे हा भाग सोडून, स्मृतीवर परिणाम करणारी इतर कारणे कोणती? ती आहेत - डिमेंशिया (dementia) एक आजार ज्यात स्मृती, विचार करू शकणे, निर्णय घेणे, भाषा व वागणूक या मेंदूच्या क्षमतांवर गंभीर परिणाम होतो. अल्झायमर्स हा डिमेंशियाचा नेहमी आढळणारा प्रकार आहे. 

तीव्र नैराश्‍य, काही औषधांचे दुष्परिणाम, मेंदूतील रक्तस्राव, व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता, थायरॉईडची समस्या, व्यसने इत्यादी.

नैसर्गिकदृष्ट्या वयामुळे आलेला विसराळूपणा आणि डिमेंशियाची सुरवातीची लक्षणे यातील फरक खालीलप्रमाणे आहे. 

  • वयामुळे प्रासंगिक विसरणे सोडल्यास व्यक्ती दैनंदिन कामे स्वतंत्रपणे बिनचूक करू शकते. 
  • डिमेंशियाच्या सुरुवातीच्या लक्षणामुळं वर्षानुवर्षं करीत आलेल्या गोष्टी उदा. स्वतःचे कपडे करणे, बिले भरणे, बाजारातून एखादी वस्तू आणणे, नेहमीची कामे इत्यादी करण्यात अडचणी येतात. 
  • वयामुळे विसरलो तो प्रसंग कुठला होता व काय विसरलो होतो हे नंतर आठवू शकते. 
  • डिमेंशियाच्या सुरुवातीच्या लक्षणामुळं  विसरलो तो प्रसंग कुठला होता व काय विसरलो होतो हे नंतर आठवू शकत नाही. 
  • वयामुळे दिशा आठवताना त्रास पडतो, परंतु ओळखीच्या ठिकाणी हरवून जायला होत नाही. 
  • डिमेंशियाच्या सुरुवातीच्या लक्षणामुळं  ओळखीच्या ठिकाणीसुद्धा चुकायला होते. नेमकं कुठं जायचं याची दिशा लक्षातच येत नाही. 
  • वयामुळे संभाषण करताना एखादा शब्द आठवत नाही पण संवाद साधू शकतो. 
  • डिमेंशियाच्या सुरुवातीच्या लक्षणामुळं  सतत शब्द विसरायला होतात, चुकीचे वापरले जातात, त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात. 
  • वयामुळे परिस्थितीचा अंदाज व निर्णयक्षमता पूर्वीसारखीच असते. 
  • डिमेंशियाच्या सुरुवातीच्या लक्षणामुळं  निर्णय घेताना, निवड करताना अडचणी येतात. कधी कधी सार्वजनिक ठिकाणी चुकीची किंवा अयोग्य वर्तणूक घडते. 

आता वयामुळं होणाऱ्या स्मृतिभ्रंशाला प्रतिबंध करता येईल का? होय. निश्‍चितच. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं खालील उपाय करणं आवश्‍यक आहे. 
 नियमित शारीरिक व्यायाम : यामुळं हृदयविकार, डायबेटीस इत्यादीबरोबरच मेंदूलाही भरपूर फायदे होतात. मेंदूत नवीन नवीन पेशी तयार होणे, त्यांना भरपूर प्राणवायूचा पुरवठा होणे, नैराश्‍य, ताणतणाव नाहीसे होणे. या सर्व गोष्टी मेंदूच्या विकासासाठी पूरक आहेत. भरपूर चालण्याचा मेंदूच्या स्वास्थ्यासाठी फायदा होतो हे आता संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. 

आहार - चौरस आहार - भरपूर फळे, भाज्या, ओमेगायुक्त पदार्थ खाणे. मेदाम्लयुक्त स्निग्ध पदार्थ टाळणे. 

 ताणतणावाचे नियोजन : तणावामुळे निर्माण होणारे कॉर्टिसॉल हे संप्रेरक स्मृतीवर अनिष्ट परिणाम करू शकते. त्यामुळे वेळीच तणाव नियोजनासाठी प्रयत्न करा. आवश्‍यक भासल्यास तज्ज्ञांची मदत घ्या. 

 पुरेशी झोप : स्मृतीचे संवर्धन, जोपासना, नवीन न्यूरॉन्सची वाढ, एकाग्रता इत्यादीसाठी पुरेशी झोप घ्या. 

 सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहा : विशेषतः धूम्रपान -  स्मोकिंग, ज्याने स्ट्रोक, होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळे निर्माण होतात.

स्मृतिसंवर्धनासाठी व स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी मेंदूचे काही व्यायाम  
मेंदूला जितका व्यायाम होईल, मेंदू आपल्याला जितका वापरता येईल तितका आपल्याला फायदा होणार आहे. त्यासाठी कोडी सोडवणे, सुडोकू, पझल्स, क्रॉसवर्डस इत्यादी ज्यात बुद्धी वापरावी लागेल, नियोजन करावे लागेल असे बुद्धिबळासारखे खेळ खेळणे, नवीन नवीन विषयात रस घेणे, नवीन भाषा शिकणे, नवीन ठिकाणे शोधणे, नेहमीच्या ठिकाणी नवीन व अनोळखी मार्गाने पोचण्याचा प्रयत्न करणे, स्वतःची काही कामे विरुद्ध हाताने करण्याचा प्रयत्न करणे जसे शर्टची बटणे लावणे, भांग पाडणे, विरुद्ध हाताने लिहिण्याचा प्रयत्न करणे. 

तज्ज्ञांचा सल्ला : जेव्हा स्वतःला व कुटुंबातील इतरांना स्मृतिविषयक समस्येची जाणीव होईल तेव्हाच तज्ज्ञाचा सल्ला वेळ न दवडता घ्यावा. तेच समस्या गंभीर आहे किंवा काय हे ठरवू शकतात व पुढील उपाययोजना करू शकतात किंवा न्युरोसायकॉलॉजिस्टकडे जाण्यास सुचवू शकतात. योग्य त्या चाचण्या घेतल्यावर, वेगवेगळ्या मानसिक क्षमता व कॉग्निटिव्ह स्किल्स याविषयी माहिती मिळू शकते. आवश्‍यक वाटल्यास तणाव नियोजन व इतर मानसिक व समस्या दूर करण्याविषयी मदत मिळू शकते. समस्या गंभीर वाटल्यास न्यूरोफिजिशियन किंवा न्युरॉलॉजिस्टकडे मेंदूच्या चाचण्यांसाठी (CT or MRI स्कॅन, SPECT or PET स्कॅन वगैरे) पाठवले जाते. Mild cognitive impairment तसेच early Alzheimer’s disease साठी वेगवेगळी औषधे उपलब्ध आहेत, ज्यांचा स्मृती व मेंदूसाठी उपयोग होऊ शकतो. 

शेवटी, स्मृती म्हणजेच आपले अस्तित्व आहे. आपण जिवंत असल्याचे आत्मभान आहे, आपण आहोत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या