हे पशुत्व येतं कुठून? 

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
गुरुवार, 12 जुलै 2018

हितगूज
 

हल्ली बऱ्याचदा, बऱ्याच शहरात असं घडताना दिसतं. सगळं काही नेहमीसारखं नीट सुरू असतं. सगळं जनजीवन सुरळीत चालू असतं. आनंदात सगळे दैनंदिन व्यवहार चालू असतात.. आणि अचानक लांबवर कुठंतरी आरडाओरडा सुरू होतो. सगळे त्या दिशेनं धाव घेतात. तिथं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू असते. वातावरणात क्रोध खदखदत असतो अन अचानक हिंसा सुरू होते. ठरवून टार्गेट केल्यासारखा काही व्यक्तींवर हल्ला होतो. हत्यारे वापरली जातात किंवा मिळेल ते घेऊन किंवा दगडांनी काही व्यक्तींना अक्षरशः ठेचून काढलं जातं. त्यात त्यांचा मृत्यू होतो. या सगळ्या क्रौर्यात संबंध नसलेले लोकही ओढले जातात. विशेषतः तरुण! मग तिथं संख्येनं जास्त असलेल्यांचा विजय होतो. एक भीतीदायक शांतता आणि अमानवी, अमानुष उन्माद सगळ्या वातावरणात भरून राहातो. 

हे पशुत्व कुठून येतं? 
अनेक तज्ज्ञांनी या विषयावर अभ्यास केला आहे. थिअरीज मांडल्या आहेत. 
डॉ. वेंडी जेम्सनी त्यांच्या The Psychology of Mob Mentality and Violence या लेखामध्ये तीन थिअरीज दिल्या आहेत - 

Contagion Theory अनुसार एखाद्या गटाचा किंवा व्यक्तीचा एक प्रकारचा संमोहित करणारा प्रभाव गर्दीवर होतो आणि कुठलाही सारासार विचार न करता त्यांच्याकडून विवेकशून्य आणि भावनाविरहित अशी क्रूर कृती होते. 
Convergence Theory अनुसार अशी अमानुष कृती एखाद्या समविचारी (like minded) व्यक्तींच्या एकत्रितपणे घेतलेल्या हिंसेच्या निर्णयामुळे होते. गर्दीनंतर त्यांची भावना, मानसिकता पटून त्या निर्णयाचा, मानसिकतेचा भाग होते आणि हिंसेत सहभागी होते. 

तिसरी आहे Emergent-Norm Theory जी या दोन्ही theories एकत्रितपणे मांडते. तिच्यानुसार गर्दी एखाद्या व्यक्तीच्या, गटाच्या, क्रोधाच्या मानसिकतेच्या प्रभावाखाली येऊन, संमोहित होऊन अशा हिंसेत सहभागी होते. 

डॉ. मायकल वेल्नेर या मानसशास्त्राच्या प्राध्यापकांच्या मतानुसार अशा मॉब व्हायलन्समध्ये लुटमारीपासून खूनापर्यंतच्या सगळ्या समाजविघातक गोष्टी होतात. त्यांची सुरवात अगदी कमी नियोजनाने होते. तरुण मुलं ज्यांची मानसिकता तामसी असते, ती एक्‍साइटमेंट आणि आपण कोणीतरी आहोत ही खुमखुमी दाखवण्यासाठी अशा कृत्यात सहभागी होतात. दारू, ड्रग्ज यांचा त्यांच्यावर प्रभाव असला तर परिस्थिती एकदम बिघडते. एकदा हिंसा सुरू झाला, की आजूबाजूचे विवेकहीन पण गुन्हेगारी विशेष नसलेले लोक यात ओढले जातात. 

भावनांवर ताबा नसणारे, विशेषतः क्रोधावर ताबा नसणारे, अतिअहंकारी, मतलबी, तामसी लोक या कृत्याची आखणी किंवा सुरवात करून देतात. एकदा अशी घटना घडायला सुरवात झाली, की घटनेशी संबंध नसलेले लोक समूहशक्तीची ताकद लक्षात घेऊन यात उतरतील याची त्यांना जाणीव असते. हे असे दुसऱ्या फळीतले लोक जणूकाही अशा कृत्यात सहभागी होऊन स्वतःतल्या क्रोधाच्या, नैराश्‍याच्या, अपयशाच्या, अपराधाच्या भावनेला याद्वारे वाट करून देतात. 

एखाद्याचा जीव घेऊन, त्याचं किंवा त्यांचं अस्तित्व या जगातून संपवून टाकावं या टोकाच्या पराकोटीच्या निर्णयामागं धार्मिक, जातीय, आर्थिक किंवा वैयक्तिक अशी कारणं असू शकतात. पण विकृत मानसिकतेबरोबर क्रोध असतोच असतो. 

अशा सर्वच लोकांच्या मानसिकतेमध्ये एक अस्वाभाविक - विचित्र क्रोध असतो. म्हणूनच पुन्हा क्रोध या भावनेकडे विशेषत्वानं पाहावं लागेल; विशेषतः तरुण पिढीच्या! कारण त्यांच्या हातूनही अशा घटना घडल्या आहेत. 

ही पिढी अशी का वागते? - अनेकांशी बोलताना असं आढळलं, की जणू काही त्यांच्या आत लाव्हा उकळतो आहे. आत निराशा, असुरक्षितता, व्यवस्थेविषयीचा राग, स्वतःविषयीचा राग दबला आहे. मग हा लाव्हा सारखा सारखा बाहेर येतो; क्रोधाच्या रूपात! आक्रमकतेच्या रूपात! तेल ओतायला आजूबाजूला सवंग करमणूक आणि ओंगळ भ्रष्टाचारी राजकारण आहेच. विविध माध्यमांद्वारे सहज उपलब्ध असलेली, लैंगिकदृष्ट्या उत्तेजित करणारी सवंग करमणूक आणि त्या भावनेचं शमन होण्यासाठी चुकीचे मार्ग, काहींच्या बाबतीत त्या भावना दाबाव्या लागणं. सुख मिळवण्याच्या चुकीच्या कल्पना. स्पर्धात्मक वातावरणाचा ताण आहेच. मग शिक्षण असो, नोकरी असो वा व्यवसाय असो. अपेक्षेप्रमाणंच सगळं मला मिळायला हवं आणि तेही ताबडतोब. खरं सुख भौतिक सुखातच आहे. जे चकाकतं तेच सोनं आहे. मी ते मिळवीनच. दिलं तर सरळ, नाहीतर ओरबाडून. त्यासाठी मी आक्रमक व्हायलाच हवं. इतरांनी माझ्या मनासारखं वागायलाच हवं. आज दुर्दैवानं अनेक तरुणांची ही मानसिकता झाली आहे. क्रोधातून मग त्यांच्यातल्या काहीजणांच्या हातून घडणारे गुन्हेही वाढले आहेत. सगळ्यांच्याच हातून टोकाच्या गोष्टी घडताहेत असं नाही पण एकूणच युवावर्गात अति राग येण्याचं व तो चुकीच्या पद्धतीनं व्यक्त होण्याचं प्रमाण वाढलं आहे. आंतरिक सुखाची व्याख्या चुकते आहे. आनंद व मनःशांतीसाठी रागासारख्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण कसं मिळवायचं हे म्हणूनच समजून घ्यायला हवं. रागासारख्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवला तर तरुणांच्या हातून सृजन घडेल. समाजस्वास्थ्य वाढेल. 

एक लक्षात घेऊया, राग व्यक्त होताना त्यामागं अनेक अंतर्प्रवाह असतात. दबलेल्या भावना, असुरक्षिततेची भावना, पूर्वी घडलेल्या घटना, आपला नकारात्मक दृष्टिकोन इत्यादी मधून निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा एकदम व्यक्त होत असते. थोडक्‍यात, आत्ता प्रसंग घडला आणि केवळ त्या बद्दलची प्रतिक्रिया म्हणून विशिष्ट प्रमाणात रागावलो, असं थेट नसतं. आपल्या एकूणच भावनात्मक जडणघडणीचा त्यात वाटा असतो. रागाच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची पायरी म्हणजे रागाचं मूळ शोधून काढणं. ते नाहीसं करण्याचा प्रयत्न करणं. 

एका अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सर्वेक्षणात काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या आहेत. स्वास्थ्याच्या दृष्टीनं त्या सध्याच्या काळात फार महत्त्वाच्या आहेत. सर्वेक्षणात प्रातिनिधिक स्वरूपात असं लक्षात आलंय, की बऱ्याच व्यक्तींना राग व्यवस्थित व्यक्त करता येत नाही, अनेकदा गिळावा लागतो. कुढत बसावं लागतं. या सगळ्याचा नातेसंबंधावर विपरीत परिणाम होतो. तसंच मुख्य म्हणजे राग व्यक्त न करण्याचा शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. हे असं होण्याचं कारण म्हणजे ‘राग’ या नकारात्मक भावनेचं व्यवस्थापन नीट होत नाही. खरं तर रागाबरोबरच भीती, असुरक्षितता, अहंगंड वगैरेंचंही व्यवस्थापन नीट होत नाही. व्यक्तिमत्त्व दुबळं होत जातं. कधी विकृतीकडं झुकू लागतं.. आणि मग जेव्हा भावनांचा अतिरेक होतो तेव्हा एकतर स्वतःला संपवणं किंवा दुसऱ्याचा बळी घेणं अशी प्रवृत्ती निर्माण होते. हिंसा करण्याकडं प्रवृत्ती वाढायला लागते. 

‘राग’ ही एक अतिशय नैसर्गिक भावना आहे. बहुतेक वेळा ती, अपेक्षाभंग, मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना, नैराश्‍य, मनाविरुद्ध वागणारी माणसं वगैरेबद्दलची आपल्याकडून व्यक्त होणारी सहज बचावात्मक प्रतिक्रिया (Defence Mechanism) असते. राग जर संयमितरीत्या, योग्य वेळी, योग्य प्रमाणात, शांतपणं व्यक्त करता येत नसेल तर त्याचे परिणाम स्वतःसाठी आणि काही जणांच्या बाबतीत समाजासाठी अत्यंत घातक होऊ शकतात. थोडक्‍यात, अस्वस्थ, विवेक हरवलेल्या व्यक्तीकडून मॉब व्हायलन्ससारख्या गोष्टी घडतात. 

म्हणूनच आंतरिक स्वस्थतेसाठी प्रयत्न, ही आज अतिशय आवश्‍यक गरज बनली आहे. कारण व्यक्ती शांत, विवेकशील तर व्यक्तींचा समूह म्हणजेच समाज शांत आणि विवेकशील राहू शकेल. स्पर्धेच्या युगात बाह्य ताणतणाव वाढतच जाणार आहेत. म्हणूनच व्यक्तिगत आंतरिक शांतता हा आता कळीचा मुद्दा असेल.

संबंधित बातम्या