लहानपणीच त्यांना जपा!

डॉ. विद्याधर बापट
गुरुवार, 19 जुलै 2018

अमेय वय वर्षे चार. खूप चंचल आहे. अस्वस्थ आहे. इरा अशीच एक लहान मुलगी - तिला अंधाराची, भुताची भीती वाटते. स्वयमला आपले आईबाबा एकमेकांना सोडून जातील आणि पर्यायाने आपल्याला कुणा एकाच्या किंवा दोघांच्या सहवासाला मुकावे लागेल असे वाटते. तो खूप रडतो. हट्टी झालाय. कधी कधी आक्रमक होतो. अनन्याला शाळेत जायचे नसते. मुलांमध्ये गेले की तिला खूप दडपण येते. अभ्यासात जराही लक्ष लागत नाही. हल्ली अशा अनेक केसेस पाहायला मिळतात. हे सगळे काय आहे? या डिसऑर्डर्स असू शकतात. 

अमेय वय वर्षे चार. खूप चंचल आहे. अस्वस्थ आहे. इरा अशीच एक लहान मुलगी - तिला अंधाराची, भुताची भीती वाटते. स्वयमला आपले आईबाबा एकमेकांना सोडून जातील आणि पर्यायाने आपल्याला कुणा एकाच्या किंवा दोघांच्या सहवासाला मुकावे लागेल असे वाटते. तो खूप रडतो. हट्टी झालाय. कधी कधी आक्रमक होतो. अनन्याला शाळेत जायचे नसते. मुलांमध्ये गेले की तिला खूप दडपण येते. अभ्यासात जराही लक्ष लागत नाही. हल्ली अशा अनेक केसेस पाहायला मिळतात. हे सगळे काय आहे? या डिसऑर्डर्स असू शकतात. 

हल्ली लहान मुलांमध्ये अस्वस्थतेच्या डिसऑर्डर्सचे, भावनिक असमतोलाचे प्रमाण बरेच वाढले आहे. मोठेपणी मानसिकदृष्ट्या स्वस्थ व्यक्तिमत्त्व निर्माण व्हायला हवे असेल, तर लहानपणी असू शकणाऱ्या अस्वस्थतेच्या डिसऑर्डर्सकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण मोठेपणी निर्माण होणाऱ्या समस्यांचे मूळ लहानपणात असू शकते. म्हणूनच लहानपणीचे मानसिक अस्वास्थ्य समजून घ्यायला हवे. त्याची कल्पना असायला हवी. म्हणजे वेळीच त्यावर उपचार होऊ शकतात. बऱ्याचवेळा लहानपणी जाणवलेली काही लक्षणे - ग्रोइंग पेन्स (Growing pains) सर्वसामान्य स्वाभाविक वर्तनसमस्या म्हणून सोडून दिल्या जातात. म्हणूनच नॉर्मल म्हणजेच लहानपणीचे खरोखरच दुर्लक्ष केल्या तरी चालतील अशा समस्या आणि ज्या समस्यांकडे गांभीर्याने पाहायला हवे अशा गोष्टी यांच्यातला फरक समजून घेणे आवश्‍यक ठरते. 

नवीन शाळेत जाताना, नव्याने शाळेत जाताना किंवा नवीन घरात राहायला गेले, अनोळखी ठिकाणी गेले की मुलांना थोडी अस्वस्थता वाटणे स्वाभाविक आहे. अस्वस्थता म्हणजे भीती, काळजी; थोडक्‍यात चिंतेची भावना! भवतालची परिस्थिती बदलली, थोडीशी जरी तणावपूर्ण बनली की मुलांवर त्याचा परिणाम होतोच. पण मुले नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकतात. निसर्ग त्यांना ते शिकवतो. परंतु काही मुलांच्या बाबतीत मात्र त्यांचे दैनंदिन रुटीन, अभ्यास, शाळा, खेळ, झोप इत्यादींवर त्याचा परिणाम व्हायला लागतो आणि मग समस्या - प्रॉब्लेम्स निर्माण व्हायला लागतात. अशा मुलांना मग मदतीची गरज भासू शकते. काहीवेळा त्यांना childhood anxiety disorder चा प्रॉब्लेम निर्माण झालेला असू शकतो. 

अशा समस्यांची लक्षणे कुठली? 

१. अभ्यासातली एकाग्रता कमी होणे. २. नीट झोप न येणे. मधेच दचकून जागे होणे. उठून बसणे. ३. जेवणाखाण्यात लक्ष नसणे. ४. पटकन रागावणे, चिडचिड करणे. ५. सारखा हट्ट करणे. हवी ती गोष्ट न मिळाल्यास सारखे रडणे, प्रसंगी आदळआपट करणे. ६. सारखी काळजी करणे. नकारात्मक विचार करणे. ७. चंचलता वाढणे. ८. पोटात दुखतेय, डोके दुखतेय अशा तक्रारी सतत करणे. ९. शाळेत जाण्याची टाळाटाळ करणे. 

अस्वस्थतेची लक्षणे आणि कारणे वयानुरूप बदलू शकतात. उदा. अगदी लहान मुलांना Separation Anxiety (आवडत्या व्यक्तीपासून दूर जाण्याची किंवा तोडले जाण्याची भीती) असू शकते. तर जरा मोठ्या मुलांना शाळेतली, अभ्यासातली प्रगती, मैत्री तुटण्याची भीती, आपल्यावर शाळेत व नातेवाइकांमध्ये होणाऱ्या टीकेची भीती, अशा पद्धतीची वरकरणी कारणे दिसू शकतात. 

मुलांमध्ये आढळून येणाऱ्या सर्वसाधारण Anxiety disorders पुढीलप्रमाणे असू शकतात. ही लक्षणे अगदी नॉर्मल असू शकतात. परंतु जर मुलांच्या दैनंदिन रुटीनमध्ये, प्रगतीमध्ये ती आड येऊ लागली तर त्यांच्याकडे डोळेझाक करू नये. त्यांची आज अगदी थोडक्‍यात ओळख करून घेऊया. 

    विशिष्ट गोष्टींचा फोबिया ः लहानपणी गोष्टीतल्या भुताची, अंधाराची भीती वाटणे स्वाभाविक असते. मोठे होताना ती आपलीआपणच नाहीशी होते. पण भूत, अंधार, पाणी, कुत्री यांची प्रमाणाबाहेर भीती वाटत राहिली आणि ती बराच काळ टिकली व मुलांच्या रुटीनच्या, प्रगतीच्या आड येऊ लागली तर दुर्लक्ष करू नये. तसेच इतर काही फोबिया असण्याची शक्‍यता वाटली तरी दुर्लक्ष करू नये. 

    सेपरेशन अस्वस्थता (Separation Anxiety) ः आईवडिलांपासून आपण दूर जातोय की काय, तोडले जातोय की काय ही भीती सेपरेशन अस्वस्थतेत असते. सहा महिन्यांच्या बाळापासून ते नुकत्याच शाळेत जाऊ लागलेल्या मुलांपर्यंत ती असू शकते. त्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलांमध्ये ती असेल तर कुठली तरी अन्य असुरक्षिततेची भावना त्यांच्यात असण्याचीही शक्‍यता असते. घरातील व्यक्ती किंवा आईवडिलांमधील पराकोटीचे मतभेद आणि त्यातून वारंवार होणारी भांडणे ही कारणेही असू शकतात. 

    सामाजिक अस्वस्थता (Social Anxiety) ः ही अँक्‍झायटी जरा मोठ्या मुलांमध्ये दिसते. समारंभ, शाळेतील गॅदरिंग, नवीन लोकांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये मिसळायला आवडत नाही. कारण दडपण येते. खरे तर सुरवातीला बऱ्याच मुलांच्या बाबतीत हे घडते. ते नॉर्मल आहे. परंतु हा प्रकार चालूच राहिला, त्यात प्रमाणाबाहेर भीती दिसू लागली, तसेच रोजच्या व्यवहारात उदा. दुकानात, मार्केटमध्ये जाणे, अनोळखी व्यक्तींशी फोनवर बोलणे इत्यादीमध्ये अडचणी येऊ लागल्या की लक्ष देणे गरजेचे आहे. 

    शाळेत जाण्यासंबंधी अस्वस्थता (School based Anxiety) ः काही मुलांना शाळेत जाताना दडपण जाणवते. अभ्यास करताना दडपण जाणवते. परीक्षेची भीती वाटते. मार्क्‍स कमी पडले तर सगळे हसतील, आपल्यावर टीका होईल अशी भीती वाटते. अशी मुले डोके दुखतेय, पोटात दुखतेय अशा सबबी सांगत राहतात आणि शाळेत जाणे, परीक्षेला बसणे टाळू लागतात. सतत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. 

    अनाकलनीय अस्वस्थता (Anxiety for no apparent reason) ः काही मुलांच्या बाबतीत कसली भीती वाटतेय, कसले दडपण येतेय हेच लक्षात येत नाही. पण मुले सतत चंचल, अस्वस्थ, अशांत दिसतात. अशा मुलांच्या बाबतीत लक्ष देणे, वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक ठरते. पौगंडावस्थेत - टीनएजमध्ये किंवा मोठेपणी आढळणाऱ्या, अस्वस्थतेच्या आजाराची (Generalized anxiety disorder) ती सुरवात असू शकते. 

    इतर अस्वस्थतेचे आजार ः दुर्दैवी घटना घडल्यानंतर जडलेला अस्वस्थतेचा आजार (Post-traumatic stress disorder), मंत्रचळ (obsessive compulsive disorder), अचानक विलक्षण भीती आणि अस्वस्थता वाटू लागणे ( panic attacks) व इतर साधारणपणे मोठ्या वयात असणाऱ्या डिसऑर्डर्स क्वचित लहान मुलांमध्येही आढळू शकतात. 

    Attention deficit hyperactivity disorder (ADHD) व Autistic spectrum disorders निर्माण होणारी अस्वस्थता ः ADHD किंवा ASD या खरे तर एक neurodevelopmental psychiatric disorder आहेत. पण त्यामुळे मुलांमध्ये आणि पालकांमध्ये विलक्षण अस्वस्थता जाणवू शकते. अतिशय चंचलपणा, अति अस्वस्थता, अस्थिरता आणि कुठल्याही गोष्टीत एकाग्र न होता येणे, आसपासचे भान नसणे, सतत अति हालचाली करणे, एका जागी स्थिर न राहू शकणे अशा पद्धतीची लक्षणे मुलांमध्ये या आजारात दिसतात. 

लहान मुलांमधील अस्वस्थतेची कारणे 
    आनुवंशिकता आणि व्यक्तिमत्त्वः काही मुलांमध्ये जन्मतःच ताण सहन करण्याची क्षमता इतरांपेक्षा कमी असते. तसेच पालकांमध्ये जर अस्वस्थतेचा आजार असेल तर मुलांमध्ये तो येण्याची शक्‍यता असते. 

 तणावपूर्ण वातावरण

घरातील किंवा आजूबाजूचे वातावरण तणावपूर्ण असेल, तर मुलांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते. काही जणांमध्ये ती डिसऑर्डरमध्ये बदलू शकते. आईवडिलांमधील दृश्‍य भांडणे, वेगळे होणे, घटस्फोट, घरातील व्यक्तींचे जुनाट आजारपण, मृत्यू, दोन मुलांमध्ये झालेली तुलना, शाळेत झालेले रॅगिंगसारखे प्रकार, शाळेतील व्रात्य मुलांचे त्रास देणे, आसपास घडणाऱ्या मनःस्वास्थ्यावर परिणाम करणाऱ्या सामाजिक घटना अशा गोष्टींचा परिणाम असू शकतो. 

उपचार ः आवश्‍यक असल्यास औषधोपचारांबरोबरच लहान मुलांसाठी असलेल्या स्पेशलाइज्ड कौन्सिलिंग थेरपीजचा उपयोग, विशिष्ट समस्येसाठी योग्य अशी पद्धती किंवा एकत्रितपणे वेगवेगळ्या पद्धती, तज्ज्ञ वापरतात. मुलाशी तसेच पालकांशी एकत्र व वेगवेगळे थेरपी सेशन्स करण्यात येतात. 
त्यातील महत्त्वाची थेरपी म्हणजे CBT (Cognitive Behavioural थेरपी). यामध्ये नकारात्मक भावना व विचारांचे, सकारात्मक आणि परिणामकारक विचार पद्धतीत रूपांतर करायला शिकवले जाते. यात ताण नियोजनाच्या पद्धती, स्वस्थ होण्याचे प्रशिक्षण, परिस्थितीला तोंड देण्याची कौशल्ये, गेलेला आत्मविश्‍वास परत मिळवण्याची तंत्रे यांचाही समावेश होतो. शरीर व मनाला स्वस्थ अवस्थेत नेऊन सकारात्मक स्वयंसूचनांचा वापर काही प्रशिक्षित तज्ज्ञ करू शकतात. गायडेड इमेजरीज तंत्राचाही परिणामकारक उपयोग होऊ शकतो. 

पालकांसाठी खास सूचना 
    समस्या जाणवल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. खरोखर काही डिसऑर्डर आहे का हे तेच ठरवू शकतात. कुठल्याही परिस्थितीत मुलांसमोर वादविवाद टाळावेत. मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मुलांशी मोकळेपणाने बोला. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा ती अस्वस्थ असतील, समस्याग्रस्त असतील तेव्हा त्यांना मायेने जवळ घ्या.  स्वतः मानसिक व शारीरिकदृष्ट्या स्वस्थ राहण्यासाठी प्रयत्न करा. त्याने मुलांसमोर आदर्श निर्माण होईल. 
    भोवताली घडणाऱ्या सामाजिक दुर्घटनांविषयी (बॉम्बस्फोट, दहशतवाद, अत्याचार इत्यादी) मुलांना सौम्य शब्दांत समजावून सांगा. त्या विषयी त्यांच्या मनात अवास्तव भीती किंवा राग निर्माण होणार नाही हे पाहणे फार महत्त्वाचे आहे.  अयोग्य वर्तनाबद्दल तज्ज्ञांच्या सहाय्याने मुलांसाठी काही शिस्तीचे नियम तसेच वागणुकीची पथ्ये तज्ज्ञांच्या सहाय्याने ठरवून घ्या. थेरपीदरम्यान तज्ज्ञाच्या संपर्कात राहा व थेरपी सेशन्स नियमितपणे पूर्ण करा. 
    समस्यांसाठीच्या उपचाराबरोबरच, मुलांचा आत्मविश्‍वास, एकाग्रता व एकूणच व्यक्तिमत्त्व विकासासाठीसुद्धा तज्ज्ञ मदत करू शकतात. लहान मुलांसाठी ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती विकसित झाल्या आहेत. एकूणच स्वस्थता आणि पुढील आयुष्यात कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी, तज्ज्ञ करून घेऊ शकतो. लहानपण हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे ज्यात मुलांचा, व्यवस्थित, बौद्धिक, मानसिक, भावनिक व शारीरिक विकास व्हायला हवा. म्हणजे पौगंड, तारुण्य व प्रौढावस्थेतील अनेक समस्या आपण टाळू शकतो. 
 

संबंधित बातम्या