लग्न आणि सेटलमेंट 

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
शुक्रवार, 27 जुलै 2018

हितगूज
 

‘‘डिव्होर्स हवाय. मी त्याच्या पासून लांब व्हायचं ठरवलं आहे. आता माझी सहनशक्ती संपलीय. आमचे इगो क्‍लाश होतात. तो मला पुरेसा वेळ देत नाही. बारीक सारीक गोष्टींवरून वादविवाद होतात. आवडी जुळत नाहीत. सारखा संशय घेतो. मला काय मित्र असूच नयेत का? की प्रत्येक मैत्री म्हणजे लगेच अफेअर झालं? बास झालं आता. असं आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे?'' 

''डिव्होर्स हवाय. आमची intellectual level जमत नाहीय. Domination..Domination म्हणजे किती domination ? स्वप्नं काय होती अन जोडीदार कसला मिळाला.'' 

''खरं तर लग्न करणारच नव्हतो. माझं मिशन वेगळच होतं. इतरांच्या दडपणाखाली उगाच आलो. पायावर धोंडा पाडून घेतला. मला घटस्फोट हवाय.''आज अशा आणि अशा सारख्या खूप केसेस दिसतात. कोणाचं बरोबर आणि कोणाचं चुकतंय हा भाग वेगळा. मुळात सेटलमेंट या कल्पनेबाबतच खूप गोंधळ मनात असू शकतो. स्वत:चं स्वत: लग्न जमवलेलं असलं आणि दोघांच्या घरातून होकार असला तर प्रश्न नसतो पण अन्यथा मुलगा, मुलगी विशिष्ट वयाची झाले, की घरात, नातेवाइकांमधे लग्नाची चर्चा सुरू होते. ओळखीची स्थळे सुचवायला सुरवात होते. उद्देश असतो मुलगी किंवा मुलगा लवकरात लवकर सेटल व्हावा. पालकांचा हेतू चांगलाच असतो. याच संदर्भात, म्हणजे लग्नाच्या दृष्टिकोनातून 'सेटलमेंट' या संज्ञेचा नीट विचार व्हायला हवा असं वाटतं. 

सेटल होणे ह्याचा खरा अर्थ 'स्व-स्थ' होणे असा घ्यायला हवा. शांत, आनंदी आणि प्रत्येक क्षण असोशीनं अनुभवू शकणं, यात अनुस्यूत आहे. केवळ लग्न झालं म्हणजे मुलगी किंवा मुलगा सेटल झाले असं म्हणणं धाडसाचं ठरेल. प्रत्येक व्यक्ती जन्म ते मृत्यू या प्रवासात, प्रत्येक कृती केवळ दोन गोष्टी मिळवण्यासाठी करीत असते 'आनंद आणि मन:शांती'. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांबरोबरच मानसिक, भावनिक आणि लैंगिक गरज भागणं अतिशय महत्त्वाचं आहे. भावनिक गरजांमध्ये सुरक्षित वाटणं, दखल घेतली जाणं, पुरेसं स्वातंत्र्य असणं, भावनिक जवळीक वाटणं, विश्वास वाटणं, सपोर्ट मिळणं, स्वत:ची स्पेस मिळणं या गरजा पूर्ण व्हायला हव्यात तेंव्हा लग्नातून किंवा सहजीवनातून आनंद मिळू शकेल. केवळ लग्न झालं म्हणजे मुलगी किंवा मुलगा सेटल झाले असं म्हणणं धाडसाचं ठरेल. 

खरं तर लग्न ही एक समाजानं ठरवलेली आणि परंपरेनं केली जाणारी कृती आहे. समाजाच्या आणि व्यक्तीच्या आरोग्यासाठी ती महत्त्वाची आहे, असं मानलं तरी जर वर उल्लेखलेल्या गोष्टी त्यातून पूर्ण होत नसतील तर एखाद्या व्यक्तीसाठी ती बेडी ठरू शकते. पुरुषप्रधान रचनेमध्ये तर नक्कीच. बऱ्याचदा अशी व्यक्ती नको असलेल्या लग्नातून मुक्तही होऊ शकत नाही. खरं तर लहानपणापासून आपल्याला नैसर्गिकपणे फुलू देण्याची व्यवस्थाच समाजात नाही. शिक्षणपद्धतीपासून सगळ्याच गोष्टींमध्ये आपल्याला निवडीची संधी नसते. मेंदू पूर्ण विकसित झाल्यावरही रूढी, परंपरा तपासून मग योग्य अयोग्य याचं मूल्यमापन करून आपण त्या स्वीकारल्या असं घडू शकत नाही. लग्नाच्या बाबतीत एखाद्या मुलानं किंवा मुलीनं लग्न करायचं नाही हा निर्णय पूर्ण विचारांती, त्याचे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन घेतला तरी समाजात त्याला पाठिंबा मिळणं कठीण असतं, आणि समाज ही गोष्ट आपल्या कुटुंबापासून सुरू होत असल्यानं घरातून जबरदस्त विरोध होतो. हीच गोष्ट लग्नानंतर मूल न होऊ देण्याच्या निर्णयाबद्दल घडते. आता याउलट लग्न करायचं हा निर्णय एखाद्या व्यक्तीने घेतला तरी त्यावर कुटुंबाच्या, समाजाच्या रूढी परंपरांचे परिणाम अटळ असतात. हा भाग सोडला तर लग्न आणि आयुष्य आनंदी होण्यासाठी काही गोष्टींचा लग्नापूर्वी विचार होणं अतिशय गरजेचं असतं. काही गोष्टी समजून घेण्याची आणि स्वीकार करण्याची दोघांचीही तयारी असावी लागते. मुख्य म्हणजे अहंकार सोडून देण्याची तयारी लागते. कसं आहे की आपण एखादी वस्तू विकत घेतो त्याच्याबरोबरती कशी चालते, कुठल्या काळज्या घ्याव्यात हे सगळं सांगणारी एक पुस्तिका(manual ) येते. नातं जोडताना ते कसं टिकेल, कसं बहरेल, त्यासाठी काय करावं हे सांगणारी कुठलीही पुस्तिका नसते. जोडीदाराला समजून घेत घेतंच संसार सुखी होऊ शकतो. पण त्यासाठी काही निश्‍चित अशा टिप्स आहेत. आपला जोडीदार सर्वार्थाने परिपूर्ण असलाच पाहिजे ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. त्यामुळे तो अट्टहास नसावा. तसा कुणीच सर्वगुणसंपन्न असू शकत नाही. प्रत्येकाची भावनिक वीण, मनाची धाटणी वेगवेगळी असते. ती ओळखणं, मान्य करणं आणि त्यानुसार सुरवातीला जमवून घेण्याचा प्रयत्न करणं महत्त्वाचं. नंतर सूर जसे जमत जातील तशी समोरची व्यक्ती आणि आपणसुद्धा बदलत जातो. समोरची व्यक्ती एकदम बदलू शकत नाही. त्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा ह्याची जाणीव ठेवावी. 

सुखी लग्नामध्ये जोडीदाराकडून आपण किती सुख घेतोय यापेक्षा त्याला किती सुख देतोय, हा विचार सर्वात महत्त्वाचा. हे सगळं साधण्यासाठी आपण आतून स्वस्थ असणं महत्त्वाचं. ते तसं नसेल तर त्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणं, जरूर भासल्यास मदत घेणं फार महत्त्वाचं आहे. अन्यथा जोडीदाराला समजून घेणं ही गोष्ट अशक्‍य होऊन बसते. सुखी वैवाहिक जीवनासाठी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे शारीरिक सुख देण्या-घेण्याची क्षमता, भावना समजून घेण्याची क्षमता, जोडीदाराला योग्य तो आदर आणि सन्मान देणं, त्याच्या भावनांची कदर करणं, योग्य आर्थिक नियोजन, काळानुसार पुरुष श्रेष्ठत्वाच्याकल्पना बदलणं, एकमेकांशी एकनिष्ठ राहणं, एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर, त्याला किंवा तिला व्यावसायिक मित्र किंवा मैत्रिणी असणारच हे मान्य करणं (विशिष्ट मर्यादेपर्यंत मैत्री), एकमेकांना वेळ देणं, जोडीदाराचा उत्कर्ष होण्यासाठी त्याला प्रोत्साहन देणं, याबाबतीत अहंकार आडवा न येऊ देणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जोडीदारावर पूर्ण विश्वास असणं. इगो किंवा अहंकार हा वैवाहिक जीवन उध्वस्त करू शकतो. किंबहुना घटस्फोटा सारख्या सध्याच्या गंभीर समस्ये मागेहेच प्रमुख कारण आहे. 

आयुष्यातल्या किंवा संसारातल्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये दोघांनीही सहभागी होणं महत्त्वाचं, त्याचबरोबर प्रत्येकवेळी माझाच निर्णय बरोबर तो मी लादणार हे चुकीचं आहे. दोघांमध्ये शांतपणे चर्चा व्हाव्यात. दुसऱ्याची बाजू ऐकून घायची तयारी हवी. मत मांडण्याची पद्धत खूप महत्त्वाची आहे. आक्रस्ताळेपणा, चढलेला आवाज संवाद घडू देत नाही. फक्त कटुता निर्माण होते. सध्याच्या काळात दोघंही पतिपत्नी कमवत असतात. जर पत्नीचा पगार जास्त असेल तर तो भांडणाचा मुद्दा बनू नये. कारण यामागे केवळ अहंकार दुखावला जाणे हेच कारण असते. अर्थात पत्नीचीही वागण्याची पद्धत समजूतदारपणाची हवी. दोघात निर्माण झालेले प्रेम असे मुद्दे निर्माणच होऊ देत नाहीत. 

सध्याच्या काळात ऑफिसमधील कामाचे प्रेशर वाढलेले असते. टार्गेट्‌स पूर्ण करायची असतात. तसेच इतर वाहतुकीसारखे प्रश्न असतात. घरी आल्यावर थकून जायला होतं. अशावेळी स्वस्थता हवी असते, हे दोघांनीही समजून घ्यायला हवे. हे सगळं समजून घेतल्यावर भांडणं होणारच नाहीत असं नाही पण पुरेसं प्रेम, विश्वास याचा पाया असेल तर समेट लवकर होईल. नात्यात कायमची कटुता निर्माण होणार नाही. 

आता महत्त्वाचे म्हणजे दोघांची शारीरिक तपासणी आणि दोन्ही व्यक्तिमत्त्व एकमेकांना अनुरूप आहेत की नाहीत हा मुद्दा? लग्नापूर्वी दोघांनीही रक्त व इतर शारीरिक तपासणी करून घेणे व कुठलाही निष्कर्ष एकमेकांपासून न लपवणे अतिशय महत्त्वाचे आहे. लग्नापूर्वी अनेकदा भेटणे व जोडीदाराला जाणून घेण्याचा प्रयत्न करणे तितकेच महत्त्वाचे. आपल्या कल्पना व अपेक्षा मोकळेपणाने सांगणे अत्यावश्‍यक. लग्नापूर्वी सर्वच बाबतीत तज्ज्ञांशी बोलणे महत्त्वाचे आहे. काही व्यक्तिमत्त्वे एकमेकांना पूरक नसू शकतात. काय काळज्या घ्याव्यात किंवा कुठल्या सुधारणा करणे शक्‍य आहे हे तज्ज्ञाना सांगू शकतात. 

लग्न करताना बाह्य व्यक्तिमत्वापेक्षाही, ती व्यक्ती समजूतदार, आनंदी आणि शारीरिक , मानसिक व सामाजिक दृष्टीने जबाबदार आहे , की नाही हे महत्त्वाचे. तिच्या "दिसण्या" पेक्षा "असणे" महत्त्वाचे ठरते. हे सगळं महत्त्वाचं असलं तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोडीदाराला स्वस्थ होण्यासाठी, आनंदी होण्यासाठी, राहाण्यासाठी मदत करणे हे दोघांचंही कर्तव्य असायला हवं. आपलं आणि जोडीदाराचं अस्तित्व दोघांसाठी शेवटपर्यंत आनंददायी ठरायला हवं. 

आता एखाद्या मुलीला किंवा मुलाला पूर्ण विचारांती लग्न करायचं नसेल तर तिच्या इच्छेचा सन्मान कुटुंबाकडून आणि समाजाकडून व्हायला हवा. तिच्याकडे एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे किंवा विक्षिप्त व्यक्तीप्रमाणे पाहिलं जाऊ नये. कारण लग्न न करण्याची काही तार्किक कारणं तिच्याकडे असतील. त्याचे परिणाम स्वीकारण्याची तयारी तिच्याकडे असेल. हीच गोष्ट लग्न कधी करायचं, कुणाशी करायचं आणि मूल कधी होऊ द्यायचं किंवा होऊ नाही द्यायचं या अत्यंत व्यक्तिगत बाबींकडे पाहण्याची. याबाबतीतला त्या व्यक्तीनं, cause आणि effects च्या परिणामांचा विचार करून घेतलेल्या निर्णयाचा मान राखला जायला हवा. लग्न न करणे किंवा करणे ह्याचा निर्णय प्रत्येकानं जबाबदारीनं घ्यायला हवा आणि त्याचे चांगले वाईट, जे होऊ शकतील ते परिणाम अनुभवण्याची तयारी स्वत: ठेवायला हवी. 

म्हणजेच स्वेच्छेने लग्न केलेल्या व्यक्तीच्या सर्वं मानसिक, भावनिक गरजा पूर्ण होऊन नातं समाधानी असेल आणि व्यक्ती आनंदी आणि शांत होण्याच्या वाटेवर असेल तरच लग्न आंतरिक स्वस्थतेच्या प्रवासाला उपकारक ठरलं असं मानायला हवं. तरच ती व्यक्ती आयुष्यातल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक, (एकमेव नव्हे) अशा 'लग्न' किंवा सहजीवन या बाबतीत सेटल झाली असं मानायला हवं.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या