हा काहीच का करत नाही? 

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

हितगूज

हे मंत खासनीस, वय तीसच्या आसपास. गेली दहा वर्षं काहीच करत नाही. घरी बसून असतो. कोनात मिसळत नाही. एकटा एकटा राहातो. मित्र एकही नाही. कंटाळा आला तर बाहेर चक्कर मारून परत येतो. कधी कधी रेडीओवरची गाणी ऐकतो. हवं तेंव्हा उठतो. हवं तेंव्हा झोपतो. दुपारीसुद्धा चार चार तास पडून असतो. जागाच असतो. कसलीतरी दिवास्वप्न बघितल्यासारखा स्वतः:शीच हसतो. समोर येईल ते खातो. आहेत तेच मोजके कपडे वापरत राहातो. कुठलीच मागणी नसते. शिक्षण अपूर्ण राहिलं. मग घरच्यांनी नोकरी लावण्याचा प्रयत्न केला. काही कोर्सेसना घातलं पण हा कशातच रस घेत नाही. मला काहीच जमणार नाही म्हणतो. मी आहे तसा बरा आहे म्हणतो. नातेवाइकांनी खूप प्रयत्न केले. सगळ्यांनी समजावून सांगून झालं. घरातून हाकलून देऊ, इथपर्यंत सांगणं झालं. याच्यावर काहीच परिणाम नाही. त्याच्या हक्काच्या गोष्टी नीट कळतात. त्यामुळे पोकळ धमक्‍यांना घाबरत नाही. कुठलंही व्यसन नाही. मला काहीच जमणार नाही. मला मदत करा मग पाहू जमतं का ते म्हणतो. लग्नसमारंभ, नातेवाइकांना भेटणं टाळतो. कारण सध्या काय करतोस, हा प्रश्न नक्की विचारला जाणार असतो. तज्ज्ञांना दाखवलं ते म्हणतात याच्यात आत्मविश्वासच नाही. सेल्फ इमेज, आत्मप्रतिमा दुबळी आहे. जबाबदारी घेण्याची कुवत नाही. असुरक्षिततेची भावना मनात घर करून बसलीय.           

   सुळ्यांचा आशिष लहानपणापासूनच स्वभावानं तसा शांत, अबोल, साधासुधा होता. शाळेत, क्‍लासेसमध्ये व्यवस्थित जायचा. मार्क्‍स यथातथाच असायचे. पण वागण्यात वेगळं असं काही जाणवत नव्हतं. पण जसा तो तेरा चौदा वर्षाचा झाला तसा त्याचा  अलिप्तपणा जास्त जास्त जाणवायला लागला. सोसायटीमध्ये, मुलांमध्ये फारसा मिसळायचा नाही. किंबहुना कुठल्याही ग्रुप पासून लांब लांबच राहायचा. घरच्या समारंभात जायलाही टाळायचा. विशेष करून हे जाणवायला लागलं तेरा चौदा वर्षांचा असल्यापासून. तेंव्हा हे प्रमाण फारच वाढलं. सुरवातीला असेल स्वभाव एकलकोंडा, अलिप्त राहण्याचा असं म्हणून सुळे दाम्पत्यानं सोडून दिलं. वयात येतानाची काही लक्षणं (Growing pains) म्हणूनही दुर्लक्ष केलं; पण पुढे पुढे प्रमाण वाढत गेलं. वरून शांत, स्वस्थ वाटणारा आशिष सगळ्या आघाड्यांवर मागे रहायला लागला. कसाबसा नापास होत होत पदवीधारक झाला. पण पुढे शिकणं शक्‍य झालं नाही. त्याला नोकरीला चिकटवायचे असंख्य प्रयत्न झाले. एखाद दोन दिवस जायचा. पुन्हा घरी रहायचा. वेगवेगळी न पटणारी कारणं द्यायचा. त्याला कुठलेही व्यसन नव्हते. वयाप्रमाणे वाटणारे कपड्यांचे, वस्तूंचे आकर्षण नव्हते. बाहेर खाणे नव्हतं. कुठलेही व्यसन नव्हतं. त्या अर्थानं तो अगदीच साधासुधा होता. पण मित्रही नव्हते. मैत्रिणी ही गोष्ट लांबच राहिली. तो नुसताच होता. लोकांमध्ये मिसळणं त्याला आवडत नव्हतं, जमत नव्हतं. घरच्यांनी ओरडून पाहिलं. नातेवाइकांनी समजावून झालं. वेळप्रसंगी दमदाटी करून झाली. पण तो कुठल्याच  अर्थानं क्रियाशील नव्हता. बाहेर जायचा. पण एकटाच भटकायचा. कधी कधी तासनतास बागेमध्ये बसून रहायचा. विनामूल्य सार्वजनिक कार्यक्रमात, काव्यवाचन, चर्चा, व्याख्यान अशा ठिकाणी जेथे त्याला कुणी ओळखत नाही अशा ठिकाणी अगदी  थोड्यावेळ मागे कुठेतरी बसायचा. कार्यक्रम सुटण्यापूर्वी, चुकून  कोणी ओळखीचं भेटण्यापूर्वी निघून जायचा. सर्वांनी त्याला आळशी, पुरुषार्थहीन वगैरे विशेषणं लावून टाकली होती. पण कुणालाही त्याला काही प्रॉब्लेम असेल असं वाटलं नाही; आणि मग एक दिवस कोणाच्या तरी सांगण्यावरून सुळे त्याला घेऊन आले. त्याला बरेच प्रॉब्लेम्स होते. तसंच तो Personality disorder ची शिकार होता. पुढे Psychometric tests ते सगळं पुढं आलंच. त्याला इतर प्रॉब्लेम्स बरोबर  Avoidant Perosnality Disorder होती.

या डिसऑर्डरमध्ये लाजाळूपणा, असुरक्षिततेची भावना आणि आपल्याला नाकारलं जाईल अशी सतत भीती असते. या व्यक्ती स्वतः:ला इतरांपेक्षा नेहमी कमी लेखतात, आणि या सगळ्या गोष्टींचा ह्या व्यक्तींना आतून कमालीचा त्रास होत असतो. ही डिसऑर्डर साधारणपणे पौगंडावस्थेत सुरू होते आणि इतरही डिसऑर्डरची co-morbidity असू शकते. प्रामुख्यानं  depressive disorders, अस्वस्थतेचे आजार, न्यूनगंड, सोशल फोबिया, Dependent Personality disorder, schizoid personality disorder वगैरे . या डिसऑर्डरमध्ये पुढीलपैकी जास्तीत जास्त लक्षणं आढळतात.

 •     आपल्याला नाकारलं जाईल, आपल्यावर टीका होईल या भीतीनं नोकरी व्यवसाय करणं टाळलं जातं .
 •     विशिष्ट आवडत्या परिचित व्यक्ती सोडून इतरांशी संबंध टाळला जातो. 
 •     आपली टिंगल होईल, नाकारलं जाईल या भीतीनं नवीन नातं जोडणं, प्रेम व्यक्त करणं या गोष्टी टाळल्या जातात.
 •     सार्वजनिक ठिकाणी आपल्याला टाळलं जाईल, आपली नाचक्की होईल, चेष्टा केली जाईल ह्या भीतीनं सार्वजनिक समारंभ टाळले जातात. 
 •     आपले व्यक्तिमत्त्व अगदी वाईट आहे, आपण इतरांपेक्षा सर्वार्थानं कमी आहोत ही भावना मनात रुजलेली असते.
 •     आयुष्यात कुठलीही जोखीम घेण्याची तयारीच नसते. 
 •     अत्यंत दुर्बल आत्मप्रतिमा, आत्मविश्वासाचा अभाव आढळतो.   

Avoidant Perosnality Disorder असणाऱ्या व्यक्तींमध्ये साधारणपणे पुढील personality traits आणि विचार करण्याची चुकीची धाटणी आढळते.  या गोष्टी इतर Perosanality disorders असलेल्या व्यक्तींमध्येही आढळू शकतात.

 •     आपण नाकारले जाऊ, आपल्यावर टीका होईल, आपल्यातली कमतरता उघड होईल ह्या भीतीपायी वैयक्तिक व व्यावसायिक नातेसंबंध टाळले जातात किंवा तोडलेही जातात.
 •     एखादा प्रॉब्लेम आला तर या लोकांच्या मनामध्ये त्या प्रॉब्लेम मधून मार्ग कसा काढायचा या विचारापेक्षासुद्धा प्रॉब्लेम कुणामुळे निर्माण झाला त्याला दोष देत राहायचे, हेच चालू असते. 
 •     मी कायम अपयशीच असणार कधीच यशस्वी होणार नाही ही वाक्‍य रुंजी घालत असतात. ‘कायम‘ आणि ‘कधीच ‘ हे दोन शब्द यासंदर्भात विचारप्रक्रियेत असतातच. 
 •     आपल्या बाबतीत वाईट तेच घडणार त्यामुळे शक्‍यतो कृती करणं पुढे पुढे ढकलायचं.
 •     ज्यातून काहीही निष्पन्न होणार नाही असे न संपणारे वाद घालत रहायचे . 
 •     या व्यक्ती कुणावरतरी भावनिक दृष्ट्या अति अवलंबून असतात. तसेच सोप्या, साध्या निर्णयांसाठीही अवलंबून असतात. 
 •     बऱ्याचदा नैराश्‍याच्या आजारची शिकार असतात. 
 •     स्वतः:ला मदत मिळावी, सहानभुती मिळावी म्हणून इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्याची सवय असू शकते. 
 •     स्वतः:च्या मनोराज्यात (fantasy), दिवास्वप्नात  रमण्याची सवय असते ज्यात यांना सुरक्षित वाटेल.
 •     आपल्या प्रयत्न न करण्याबद्दल दुसरी व्यक्ती जबाबदार आहे हा ठाम ग्रह करून घेतलेला असतो. 
 •     FOG  (fear Obligation Guilt ) कुठल्यातरी गोष्टीचं सतत दडपण, भीती, गंड, अपराध गंड मनात असतो. 
 •     आपण कुणीच नाही आहोत ही भावना सतत मनात असते. 
 •     कुणावरही विश्वास ठेवायला तयार नसतात. अपरिचित व्यक्ती, ठिकाणं, प्रसंग यावर पारखून घेऊन विश्वास ठेवता येतो हे मान्यच नसतं. 
 •     आपण केलेल्या किंवा करत असलेल्या कुठल्याही कृतीमध्ये आत्मविश्वासाची भावनाच नसते.  
 • उपचार डिसऑर्डर

कुठलीही पर्सनॅलिटी डिसऑर्डर ही treat करायला तशी अवघडच असते . कारण अतिशय खोलवर रुजलेल्या चुकीच्या कल्पना, विचार, भावना आणि पक्‍क्‍या झालेल्या चुकीच्या वर्तनाच्या पद्धतीमध्ये अडकलेल्या व्यक्तींना आतून विलक्षण त्रास होत असतो तसंच नाती जोडण्याची इच्छाही असते. त्यामुळे ताणतणाव वा नैराश्‍यासाठीच्या औषधांबरोबरच  सुयोग्य मानसोपचार पद्धती उपयोगी पडतात. कुठली पद्धत उपयोगी पडेल हे त्या त्या व्यक्तीची बौद्धिक, भावनिक व वैचारिक जडणघडण लक्षात घेऊन तज्ज्ञ ठरवतात. तसेच ग्रुप थेरपीही काही प्रमाणात उपयोगी ठरू शकते. या डिसऑर्डर बरोबरच इतर आजार असतील तर त्यावरही उपचार घेणं जरूर असतं. इतकं नक्कीच की वर्तनात जर वरील लक्षणं आढळली तर ताबडतोब तज्ज्ञांची मदत घेणं केंव्हाही चांगलं. कारण जसजसा जास्त काळ जाईल तसतशी केस क्रॉनिक होत जाते. साधारणपणे पौगंडावस्थेत याची सुरवात जास्त वेळा होते. त्याकाळात मुलामुलींकडे लक्ष ठेवणं महत्त्वाचं! 

फोटो फीचर

संबंधित बातम्या