काळजी करण्याचा आजार 

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

हितगूज
 

एखादं घर जर महिनोन महिने अंधारात असेल तर तिथे पाली, झूरळं, किडे मकोडे घरं करतात. घर कोळ्याच्या जाळ्यांनी, कोळीष्टकांनी भरून जातं. कधीतरी आपण तिथे जाऊन दिवा लावला, की लख्ख उजेडात या सगळ्या गोष्टी एकाएकी आपल्याला दिसतात. याचा अर्थ उजेडामुळे त्या गोष्टी एकदम तेथे आल्या असा नाही. त्या आधीच तेथे होत्या. उजेडामुळे त्या दिसल्या इतकंच आणि त्या साफ, स्वच्छ करण्याची जबाबदारी आता आपल्याकडे आली. काही मानसिक शारिरीक आजारांच्या बाबतीत असंच म्हणता येईल. विशेषत: ताणतणाव ज्यांच्या मुळाशी असतात, असे आजार. आतमध्ये दबून राहिलेल्या असुरक्षितता, अनामिक भीती, राग इत्यादी गोष्टी अती काळजीच्या आजारात supportive reasons म्हणून असू शकतात. आधीच त्या त्या वेळी जर या नकारात्मक गोष्टी दूर केल्या गेल्या तर त्या साठून राहात नाहीत. अति काळजी करणं, हा एक प्रकारचा अस्वस्थतेचा आजार आहे. मुख्यत: यात जैविक कारणं आहेत. मेंदूतील रासायनिक असंतुलनामुळे हे आजार होतात. त्याचे परिणाम आणि उपाय दोन्ही पाहू.    

Psychoneuroimmunology (PNI ) या शास्त्राप्रमाणे मन व शरीर यांचा एकमेकावर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो.  

माझा मित्र अक्षय, पत्नी अर्पिताला घेऊन माझ्याकडे आला तेंव्हा प्रथम मी तिला पटकन ओळखलच नाही. पूर्वीची हसरी, खेळकर सदा टवटवीत आणि तब्येतीनं ठणठणीत अर्पिता पार बदलून गेली होती. मलूल, वजन विलक्षण घटलेलं, निस्तेज. म्हंटल ’’काय ग, काय झालं ?’’ ती कसंतरी हसली. अक्षय म्हणाला ’’ काही नाही रे. सगळ्या तपासण्या झाल्या काही निघालं नाही. अति काळजी करत बसते. आधीपासून स्वभाव होताच. आता वर्षभरात जास्तीच वाढलय. त्याचा हा परिणाम. तूच समजाव आता.’’ अर्पिता मलूल हसली. म्हणाली ’’होतंय खरं असं. पण कसं थांबवायचं कळत नाहीय. अस्वस्थता वाढतच चाललीय. काळजीचे विचार थांबत नाहीत. कधी मुलांची, कधी याच्या नोकरीची, तब्येतीची, कधी पुढे कसं होणार याची. दुष्टचक्र थांबत नाहीय. म्हणून तुझ्याकडे आलोत.’’ मी म्हटलं ’’ सगळं ठीक होईल. आधी आतून स्वस्थ होऊ. मग मुळात तुला वाटणारी काळजी वाजवी आहे का, तिला काही आधार आहे का ते तपासू.’’ अतिकाळजीमुळे, अस्वस्थतेमुळे अर्पिताच्या तब्येतीवर परिणाम झाला होता. 

काही प्रमाणात काळजी वाटणं किंवा ताण येणं हे स्वाभाविक आहे आणि चांगलं सुद्धा आहे. कारण ते आपल्याला कार्यप्रवृत्त करतं, सतर्क करतं. जसा अभ्यासाचा, परीक्षेचा, हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्याचा ताण. पण अति प्रमाणात व काही तरी वाईटच घडेल अशी काल्पनिक भीती असलेली काळजी घातकच.

काळजी वाटणं, काळजी घेणं आणि सतत काळजी करत राहण्याची सवय असणं यात फरक आहे. सतत काळजी करण्याच्या सवयीचा मन व शरीर दोन्हींवर घातक परिणाम होऊ शकतो. आपली भावनिक प्रकृती चांगली नसण्याचं ते एक लक्षण आहे. आपल्या नकारात्मक किंवा सदोष विचारपद्धतीचा तो भाग आहे. काळजी वाटणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे. पण सतत काळजी करणे हे अस्वस्थतेच्या आजाराचं (Generalized anxiety disorder ) लक्षण आहे. अति काळजी करण्यामुळे ताण निर्माण होतो आणि शरीरात रासायनिक प्रतिक्रिया सुरू होतात andrenalin किंवा cortisol सारखी स्ट्रेस हार्मोन्स अति प्रमाणात स्त्रवतात. हे सतत घडायला लागलं, की शरीरावर विपरीत परिणाम व्हायला सुरवात होते.  

यावर उपाय काय आहेत? तर तातडीनं तज्ज्ञांचा सल्ला, औषधोपचार, समुपदेशन आणि स्व-मदत. तज्ज्ञांच्या साहाय्याने स्वस्थ होऊन त्रयस्थपणे स्वत:च्या विचारप्रक्रीयेकडे पहायला शिकणे. मेंदूमध्ये नकारात्मक विचार करण्याचे, काळजी करत रहाण्याचे neuronal patterns तयार झालेले असतात ते बदलायला या सगळ्याची मदत होते. Cognitive Behavioural थेरपी (CBT ) सारख्या थेरपीज च्या साहाय्याने नकारात्मक विचार करण्याची पद्धत बदलता येते. इतरही थेरपीजद्वारे मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. या सर्व थेरपीजचा हेतू वाटणाऱ्या काळजीतील फोलपणा आणि वास्तवाची जाणीव करून देणे हा असतो. Mindfulness सारखी तंत्रे तुम्हाला वर्तमान क्षणात जगायला शिकवतात. श्वासावर आधारित ध्यानाच्या काही पद्धती उपयुक्त ठरतात. काही गोष्टींचा आपण विचार करणं आवश्‍यक आहे. उदा. भविष्यात घडणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्याच घडतील हे शक्‍य नाही. म्हणजेच आयुष्यातील अनिश्‍चितितता आपण स्वीकारायला हवी. नेहमी वाईटच घडेल असा विचार करणं योग्य आहे का? आपण आपल्या कडून सर्व प्रयत्न करणं आवश्‍यक आहे आणि त्यानंतर शांतपणे, विनाअट, परिस्थितीचा स्वीकार करायला हवा. हे सर्वच बाबतीत लागू आहे. आणि सर्वांच्या बाबतीत, म्हणजे स्वत:च्या व इतर ज्यांच्या बाबतीत आपण काळजी करतोय त्यांच्या. मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी उत्तर द्यायला शिकायला हवं. उदा. मी जी काळजी करतोय/करतेय त्याला आधार काय आहे? मी काळजी केल्याने परिस्थिती सुधारणार आहे का? की फक्त मीच आणखी अस्वस्थ होत जाणार आहे ? ज्या गोष्टीची काळजी वाटतेय तिच्या सर्व बाजूंचा विचार मी केलाय का? की फक्त नकारात्मक बाजूच विचारात घेतलेय?

चिता एकदाच जाळते तर चिंता आयुष्यभर हे खरंच आहे. अति काळजी करणं हे सर्वच दृष्टीनं घातक ठरू शकतं.  

Tags

संबंधित बातम्या