ज्योतिर्गमय...

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

हितगूज
 

‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या बृहदारण्यक उपनिषदातील प्रार्थनेतील ओळीचे सूत्र धरून जायचे, तर आपल्याला ‘सर्वार्थांनी’ अंधारातून प्रकाशाकडे जायचे आहे आणि म्हणूनच सातत्याने जीवनाच्या चांगल्या, प्रकाशमय अशा बाजूकडे आपल्याला पाहायला हवे. चांगले तेच घडेल हा दृष्टिकोन कुठल्याही परिस्थितीत, अगदी विपरीत परिस्थितीत सुद्धा ठेवायला हवा. त्यासाठी आपल्या मनाचे, विचारसरणीचे प्रोग्रॅमिंग, आपला ॲटिट्यूड सातत्याने सकारात्मक आणि फक्त सकारात्मक असायला हवा.          

असे म्हणतात, की Our attitude toward life determines life’s attitude toward us. ते अगदी खरे आहे. आपला आयुष्याकडे, एकूणच जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तरच आयुष्याकडून आपल्याला भरभरून आनंद, सुख, मन:शांती आणि यश मिळत जाते. अर्थपूर्ण आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनाची आवश्‍यकता असते. सकारात्मक दृष्टिकोनामुळे, तुम्ही जीवनाकडे पाहताना नेहमी त्यातली चांगली बाजू पाहाता उत्साही राहाता आणि चांगले तेच घडेल अशा धारणेने जगता.

सकारात्मक दृष्टिकोन (Positive attitude)  तुम्हाला आनंदी आणि कणखर व्हायला मदत करतो. कुठल्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी अशा दृष्टिकोनाची गरज असते. सृजनात्मक कार्य तुमच्याकडून होऊ शकते. इतकेच नव्हे तर असेही आढळून आले, की सकारात्मक दृष्टिकोन दीर्घायुषी होण्यास मदत करतो.

 सकारात्मक दृष्टिकोनामध्ये पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो - सकारात्मक विचार, सृजनात्मक विचार, रॅशनल विचार, उत्साह, आनंदी राहण्याची आस, ध्येय ठरवणे आणि त्याच्या पूर्ततेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, कुठल्याही विपरीत परिस्थितीतून  मार्ग काढण्याची क्षमता, स्वत:ला व इतरांना प्रोत्साहित करणे , अपयश आले तरी पुन्हा पुन्हा यशासाठी प्रयत्न करत रहाणे, स्वत:च्या क्षमतांवर पूर्ण विश्वास असणे, स्वत:तल्या कमतरतांची जाणीव असणे व त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे, विनाकारण भूतकाळात न रमता वर्तमानकाळ आणि भविष्यकाळात काय करू शकू याचा विचार करणे आणि मुख्य म्हणजे अडचणींमध्ये अडकून न राहाता उपाय योजनेच्या दृष्टीने विचार करणे.

पॉझिटिव्ह दृष्टिकोन रुजण्यासाठी पुढील गोष्टी करता येतील 
    आनंदी असणे ही एक वृत्ती आहे. दृष्टिकोन आहे. त्यासाठी आनंद निर्माण होणारा प्रसंगच घडायला हवा असं नाही. मी नेहमी आनंदीच राहीन हा विचार स्वत:मध्ये भिनवायला हवा. तसे झाले, की आपोआपच आसपासच्या घटनांमध्ये मन आनंद शोधायला लागेल. शेजारचे किंवा घरातले रांगते लहान मूल प्रथमच चालायला लागताना दिसले, कुणाला पदवी मिळाली, कुणाला नोकरी मिळाली, कुणाचे पुस्तक प्रकाशित होते, कुणाचे लग्न ठरले. लहान लहान गोष्टी सतत आपल्याला आनंद देत असतात. आपण त्या आपल्याच मनात साजऱ्या करायला हव्यात. सकारात्मक वृत्ती असली, की आकाशातले चांदणे, हिरवळीवर अनवाणी चालणे, अचानक आलेला पाऊस, शांतपणे क्षितिजावर विसर्जित होत असलेला सूर्य सगळ्यातच आनंद घेता येतो.

    सकाळच्या रुटीनची आखणी करावी. त्यात शारीरिक, मानसिक व्यायाम, ध्यान यांचा जरूर अंतर्भाव असावा. सेरोटोनीन आणि इतर उपयुक्त संप्रेरके स्त्रवतील. उत्साह आणि चांगल्या मूडमध्ये दिवसाची सुरवात होईल.  

    ‘कर्त्याची’ भूमिका, ‘कर्त्याचा’ भाव मनात ठेवावा. म्हणजेच आपण जे काम करतोय, जी कृती करतोय त्याची जबाबदारी, त्याच्या परिणामांची जबाबदारी  मनात स्वीकारायला सुरवात करावी. आपोआप दृष्टिकोन बदलायला लागेल. मीच माझ्या भविष्याचा, आयुष्याचा शिल्पकार आहे हा भाव मनात जोपासावा. त्याने दृष्टिकोन सकारात्मक होईल.  

    माझ्या ‘वाट्याला‘ आलेले आयुष्य हा भाव न ठेवता, ‘माझ्यासाठी’ माझ्या ‘आनंदा’साठी निर्माण झालेली जीवन जगण्याची संधी हा भाव जगताना ठेवायला हवा. आयुष्यात येणारी विपरीत परिस्थिती किंवा संकटे मला काहीतरी ‘शिकवून’ जाण्यासाठी आहेत. मला जास्त जास्त कणखर बनवत आहेत. मला उन्नतीप्रती नेत आहेत. माझ्या आयुष्याचा ‘खेळ’ रंगतदार करत आहेत ही भावना ठेवायला हवी. त्यासाठी साक्षीभाव, ‘माइंडफुलनेस’ सारखी तंत्रे शिकून घेता येतील.    

    सतत फक्त आणि फक्त सकारात्मक विचार करायला हवा. स्वत:चा स्वत:शी असलेला संवाद (Self Talk) सकारात्मक असायला हवा. मी माझ्या ‘आत’ एक संरक्षक भिंत निर्माण करायला हवी. ज्यायोगे इतरांनी केलेली अनाठायी टीका, अपमान, चुकीचे आरोप, वाईट हेतूने आणलेले दडपण इत्यादी माझ्यावर परिणाम करणार नाहीत. मी शांत, स्वस्थ, स्थिर राहीन. माझ्या मनाचा आतला गाभा कायम शांत राहील. हे जमू शकते. मनाचे पॉझिटिव्ह प्रोग्रॅमिंग शक्‍य आहे. त्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करायला हवेत.

    माझ्या आयुष्याला काहीतरी उद्दिष्ट असेल तर सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होईल. मी माझ्यासाठी काही शॉर्ट टर्म तर काही लाँग टर्म गोल्स ठरवायला हवेत. त्याने मला काही ध्येय मिळेल.

    आयुष्यात घडणाऱ्या घटना, भेटणारी माणसं यांच्यातल्या चांगल्या गोष्टी पाहायला हव्यात. कितीही प्रतिकूल गोष्ट असेल तरी त्यात काहीतरी चांगले असतेच. There can be a silver lining to a black cloud. फक्त पाहण्याची नजर हवी.

    आयुष्यात नेहमी फक्त चांगलेच घडेल, आपल्याला अनुकूल अशाच गोष्टी घडतील, ही अपेक्षा चुकीची आहे. त्यापेक्षा कितीही प्रतिकूल घडले तरी त्याला तोंड देण्याचे सामर्थ्य माझ्यात आहे हा ठाम विश्वास असायला हवा. हा विश्वास असेल तर खरोखरच परिस्थितीला तोंड देण्याची ताकद निर्माण होऊ शकते. जीवनात कित्येक संकटे लीलया पेलणाऱ्या व्यक्तींची चरित्र आपल्यासमोर आहेत.  

    सकारात्मक स्वयंसूचना उपयोगी ठरतात. उदा. मी परिस्थितीशी जुळवून घेऊ शकेन. ती क्षमता माझ्यात आहे. कितीही कठीण परिस्थिती आली तरी मी निर्धाराने पुढे जात राहीन. चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी कष्ट करावेच लागतात आणि मी ते करेन.

    Creative Visualization ची तंत्रे खूप उपयुक्त ठरतात. जेव्हा परिस्थिती बिकट असते तेव्हा आपण त्यातून चांगल्या रीतीने बाहेर पडत आहोत. यशस्वी होत आहोत अशा पद्धतीची Creative Visualizations उपयोगी पडू शकतात. फक्त ही व्यवस्थित शिकून घ्यायला हवीत. नेल्सन मंडेला जेव्हा अनेक वर्षे तुरुंगात होते तेव्हा त्यांना बराच काळ जेमतेम सहा फूट रुंदी असलेल्या अंधाऱ्या, कोंदट सेल मध्ये ठेवले होते. त्यांनी म्हटले आहे, त्याकाळात मी सतत सकारात्मक विचार करायचो. वारंवार positive visualizations करायचो. त्याचा मला मनोधैर्य टिकवायला आणि वाढवायला खूप उपयोग झाला. अतिशय बिकट आणि भयानक परिस्थितीतसुद्धा अशा व्यक्ती सकारात्मक दृष्टिकोन बाळगतात. आपल्या रोजच्या जीवनातल्या चढउतारांना पेलायला आपला ॲटिट्यूड सकारात्मक बनवायला हवा.        

    सतत तक्रारी करण्याची सवय असेल तर ती बदलायलाच हवी. त्यातून नकारात्मक दृष्टिकोनच तयार होत जातो. गोष्टी, घटना मनाविरुद्ध घडत असतील तर काही काळ त्यातून मानसिक दृष्ट्या बाजूला होणे, तटस्थपणे  विश्‍लेषण करणे,  काही उपाय निघतो का ते पहाणे, निघू शकत नसेल तर शांतपणे विनातक्रार आहे त्याचा स्वीकार करणे महत्त्वाचे.

    आयुष्यातले विनोदाचे महत्त्व समजून घ्यायला हवे. सतत हसत रहाण्याने आपण आनंदी राहातो आणि समोरच्यालाही प्रसन्न वाटते. स्वत:वरही हसता यायला हवे. इतरांनी आपल्यावर केलेले विनोद एन्जॉय करता यायला हवेत. मुळात या जगात गांभीर्याने घ्यावी अशी एकही गोष्ट नाहीय. हे आयुष्य म्हणजेच एक Cosmic Joke आहे असेही म्हणता येईल.

    आपल्यात कृतज्ञ राहण्याची भावना रुजवायला हवी. जे जे आपल्याला या जीवनाने दिले त्याबद्दल आपण कृतज्ञ असायला हवे. योग्य वेळी योग्य व्यक्तींशी आपण ही भावना व्यक्त करायला हवी. सकारात्मक दृष्टिकोन तयार होण्यासाठी कृतज्ञता वाटणे आणि त्याचबरोबर आवश्‍यक तेथे क्षमा मागण्याचा मनाचा मोठेपणा आपल्याजवळ असणे खूप महत्त्वाचे आहे.  

    सकारात्मक दृष्टिकोन हा तसा संसर्गजन्य असतो. आपण जितके सकारात्मक विचारसरणी असलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहू , तितका आपल्यातही सकारात्मक दृष्टिकोन रुजायला मदत होईल. त्याच बरोबर स्फूर्तिदायक आणि सकारात्मक लेखन वाचणे, विचार ऐकणे याचाही उपयोग होऊ शकेल.  

आनंदी आणि अर्थपूर्ण जगण्यासाठी सकारात्मक विचारसरणीची गरज आहे. त्यामुळेच प्रतिकूल परिस्थितीचे अनुकूल परिस्थितीत रूपांतर होऊ शकते. लहानपणापासून मुलांमध्ये सकारात्मक दृष्टिकोनाचे बीज रुजवायला हवे. त्यानेच त्यांची व्यक्तिमत्त्व खऱ्या अर्थाने फुलतील.
A Negative Thinker sees a Difficulty in Every Opportunity, A Positive Thinker sees an Opportunity in every Difficulty.
       

फोटो फीचर

संबंधित बातम्या