हल्ली हा असा का वागतो?

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
गुरुवार, 17 जानेवारी 2019

हितगूज
नाचणारी बागडणारी मुलं अचानक शांत का होतात. ते एकाकी का पडतात? आक्रस्ताळेपणा का करतात? त्यांच्या वर्तनात बदल का होतात? याचे विश्‍लेषण आणि उपाय...

अमेय वय वर्षे चार. खूप चंचल आहे. अस्वस्थ आहे. इरा अशीच एक लहान मुलगी तिला अंधाराची, भुताची भीती वाटते. स्वयमला आपले आई बाबा एकमेकांना सोडून जातील आणि पर्यायाने आपल्याला कुणा एकाच्या किंवा दोघांच्या सहवासाला मुकावे लागले असे वाटते. तो खूप रडतो. हट्टी झालाय. कधी कधी आक्रमक होतो. अनन्याला शाळेत जायचे नसते. मुलांमधे गेले, की तिला खूप दडपण येते. अभ्यासात जराही लक्ष लागत नाही. गौतम वय वर्षे आठ, सध्या आईबरोबर रहातो. आई वडिलांच्या घटस्फोटा नंतर विलक्षण अबोल झालाय. एकटा एकटा राहातो, अभ्यासातही मागे पडत चाललाय. श्रीधन, वय वर्षे सात, टि.व्ही. वरील वाईट बातम्या, दृश्‍य पाहिल्यापासून सतत भीतीच्या दडपणाखाली असल्यासारखा जाणवतो. त्याला कसे समजवायचे कळत नाही. भोवतालच सगळच जग वाईट आहे, असे त्याला वाटते. खूप असुरक्षित वाटते त्याला. सारिका, वय वर्षे अकरा, समजूतदार मुलगी, पण एकाएकी आक्रस्ताळेपणा करायला लागलीये. उलटून बोलायला लागलीये. मोबाईल फोनच्या अक्षरशः आधीन झाली आहे. ही आणि अशी अनेक उदाहरणे आसपास दिसू लागली आहेत. मानसोपचार तज्ज्ञ या आणि अशा अनेक समस्यांमध्ये मदत करू शकतात.
हल्ली लहान मुलांमध्ये अस्वस्थतेच्या डिसऑर्डर तसेच भावनिक असमतोलाचं प्रमाणात वाढले आहे. मोठेपणी मानसिकदृष्ट्या स्वस्थ व्यक्तिमत्त्व निर्माण व्हायला हवे असेल तर लहानपणी असू शकणाऱ्या अस्वस्थतेच्या डिसऑर्डरकड दुर्लक्ष करून चालत नाही. कारण मोठेपणी निर्माण होणाऱ्या समस्यांचे मूळ लहानपणात असू शकते. म्हणूनच लहानपणीचं मानसिक अस्वास्थ्य समजून घ्यायला हवी. त्याची कल्पना असायला हवी. म्हणजे वेळीच त्यावर उपचार होऊ शकतात. बऱ्याचवेळा लहानपणी जाणवलेली काही लक्षणे Growing pains, सर्व सामान्य स्वाभाविक वर्तनसमस्या म्हणून सोडून दिल्या जातात. म्हणूनच नॉर्मल म्हणजेच लहानपणीचे खरोखरच दुर्लक्ष केले तरी चालतील असे प्रॉब्लेम्स आणि ज्या प्रॉब्लेम्सकडे गांभीर्याने पहायला हवे अशा गोष्टी यांच्यातला फरक समजून घेणे आवश्‍यक ठरतं.

लहानपण हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यात मुलांचा, व्यवस्थित, बौद्धिक, मानसिक, भावनिक व शारीरिक विकास व्हायला हवा. म्हणजे पौगंड, तारुण्य व प्रौढावस्थेतील अनेक समस्या आपण टाळू शकतो. मानसोपचार तज्ज्ञ मुलांना व पालकांना ताणतणाव तसेच वेगवेगळ्या भावनिक व वागणुकीच्या समस्यांना योग्य रीतीने सामोरे जायला शिकवतात.  शाळेतले ताणताणाव, गृहपाठ, परीक्षेचे दडपण, सहाध्यायी मित्रांचा ताण इत्यादी अनेक बाबतीत मुलांना मदतीची गरज असते. काही मुलांना, पालकांविषयी तसेच घरगुती समस्यांविषयी बोलून मोकळं व्हायचं असतं. त्यातल्या काही समस्या गंभीर असतात उदा. घटस्फोट, घरातले आजारपण. या सगळ्याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मुलांच्या वागणूक, मूड, झोप, भूक, शैक्षणिक प्रगती तसेच समाजात, नातेवाइकांत मिसळणे इत्यादींवर परिणाम दिसू लागतो. गेले काही दिवस मुले रडवेली, तणावपूर्ण,  अस्वस्थ झाली आहेत आणि आपल्या समजावण्याने परिस्थिती बदलत नाही, असे जाणवल्यास तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्यावा.

पुढील लक्षणे आढळल्यास तज्ज्ञांची मदत जरूर घ्यावी 

 • बोलायला शिकणे, भाषेचे ज्ञान तसेच टॉयलेट ट्रेनिंग इत्यादी गोष्टी शिकायला वेळ लागणे.
 • सतत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न.
 • वागणुकी संदर्भातील प्रश्न, अति चिडणे, राग राग करणे, अति खाणे किंवा कमी खाणे, सतत खोटे बोलणे, अंथरुणात मूत्र विसर्जनाची सवय.
 • अचानक परीक्षेत कमी मिळायला लागणे.
 • क्षुल्लक कारणावरून रडणे, निराश होणे.
 • एकटे एकटे रहाणे, समूहात मिसळणे टाळणे. 
 • इतर मुलांना त्रास देणे किंवा त्यांचा त्रास सहन करीत रहाणे. 
 • पूर्वी ज्या गोष्टी आवडायच्या त्यातला रस अचानक संपणे. 
 • अति प्रमाणात झोप किंवा अगदी कमी झोप.
 • शाळेतील सततची अनुपस्थिती.
 • सारखा मूड बदलत रहाणे उदा.क्षणात आनंदी तर थोड्याच वेळात दुःखी
 • डॉक्‍टरांनी काही झाले नसल्याचा निर्वाळा देऊनही पोटदुखी, डोकेदुखी वगैरेची तक्रार करीत राहाणे.
 • आई वडिलांचा घटस्फोट व त्यामुळे आलेले नैराश्‍य.
 • घरातील कुणाचा तरी मृत्यू व ते वास्तव स्वीकारताना त्रास होणे.
 • बॉम्बस्फोट, दंगली, अत्याचार वगैरे  सारख्या सामाजिक घटना व त्यामुळे मनात निर्माण होणारी भीती

उपचार पद्धती  
मुलांसाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत, तसेच आवश्‍यक असल्यास परिणामकारक औषधे आहेत ज्यांची मदत घेता येते. विशिष्ट समस्येसाठी सुयोग्य अशी पद्धती किंवा एकत्रितपणे वेगवेगळ्या पद्धती, तज्ज्ञ वापरतात. मुलाशी तसेच पालकांशी एकत्र व वेगवेगळे थेरपी सेशन करण्यात येतात. 
त्यातील महत्त्वाची थेरपी म्हणजे C.B.T (Cognitive Behavioural थेरपी). या मधे नकारात्मक भावना व विचारांचे, सकारात्मक आणि परिणामकारक विचार पद्धतीत रूपांतर करायला शिकवले जाते. यात ताण नियोजनाच्या पद्धती, स्वस्थ होण्याचे प्रशिक्षण, परिस्थितीला तोंड देण्याची कौशल्य, गेलेला आत्मविश्वास परत मिळवण्याची तंत्रे यांचाही समावेश होतो. शरीर व मनाला स्वस्थ अवस्थेत नेऊन सकारात्मक स्वयंसूचनांचा वापर काही प्रशिक्षित तज्ज्ञ करू शकतात. Guided imageries तंत्राचाही परिणामकारक उपयोग होऊ शकतो.

पालकांसाठी खास सूचना

 • कुठल्याही परिस्थितीत मुलांसमोर वाद विवाद टाळावेत. मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
 • मुलांशी मोकळेपणाने बोलावे. त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. जेव्हा ती अस्वस्थ असतील, समस्याग्रस्त असतील तेव्हा त्यांना मायेने जवळ घ्यावे.
 • स्वत: मानसिक व शारीरिक दृष्ट्या स्वस्थ राहण्यासाठी प्रयत्न करावा. त्याने मुलांसमोर आदर्श निर्माण होईल.
 • भोवताली घडणाऱ्या सामाजिक दुर्घटनां विषयी ( बॉम्ब स्फोट, दहशतवाद इ.) मुलांना सौम्म्य शब्दात समजावून सांगावे. त्या विषयी त्यांच्या मनात अवास्तव भीती किंवा राग निर्माण होणार नाही, हे पाहणे फार महत्त्वाचे आहे.
 • अयोग्य वर्तनाबद्दल तज्ज्ञांच्या साहाय्याने मुलांसाठी काही शिस्तीचे नियम तसेच वागणुकीची पथ्ये ठरवून घ्यावीत.
 • थेरपी दरम्यान तज्ज्ञांच्या संपर्कात राहावे व थेरपी सेशन्स नियमितपणे पूर्ण करावे.

समस्यांसाठीच्या उपचाराबरोबरच, मुलांचा आत्मविश्वास, एकाग्रता व एकूणच व्यक्तिमत्त्व विकासासाठी सुद्धा तज्ज्ञ मदत करू शकतात. लहानमुलांसाठी ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती विकसित झाल्या आहेत. एकूणच स्वस्थता आणि पुढील आयुष्यात कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्याची तयारी तज्ज्ञ करून घेऊ शकतो. दिवसेन दिवस अस्थिर व गुंतागुंतीच्या होत जाणाऱ्या वातावरणात स्थिर, स्वस्थ व शांत राहून आनंदी जीवन जगायला शिकवणे हे ही मानसोपचाराचे उद्दिष्ट असायला हवे. 

संबंधित बातम्या