आत्महत्या हा उपाय नाहीच!

डॉ. विद्याधर बापट, मानसोपचार व ताणतणाव नियोजन तज्ज्ञ
सोमवार, 10 जून 2019

हितगूज
 

काळीज हादरून जावं अशा दुर्दैवी घटना सध्या काही तरुणांकडून घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी मुंबईत उंच इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उडी मारून एका युवकानं आत्महत्या केली. पुण्यात, आईवडिलांनी आवडता मोबाईल घेऊन दिला नाही, म्हणून रागाच्या भरात एका मुलानं आत्महत्येचा प्रयत्न केला. अशा घटना वारंवार घडत आहेत. भावना अनावर होऊन असं कृत्य होऊ शकतं किंवा योजना आखूनही.

 आत्महत्येचा विचार करणाऱ्या बऱ्याच तरुणांना खरं तर मृत्यू नको असतो, पण त्यांना कुठल्यातरी मानसिक वेदनेतून सुटका हवी असते. आत्महत्या करणाऱ्या बऱ्याच जणांनी तशा प्रकारचा इशाराही बोलण्यातून, वागण्यातून, लिहिण्यातून दिलेला असतो. खरं तर ती मदतीची हाक असून ती ओळखायला हवी.

 परीक्षेच्या अतिरिक्त ताणामुळं, नोकरीतील कटू अनुभवांमुळं, प्रेमभंगासारख्या घटनांमुळं, अपरिपक्व विचारसरणीमुळं, नैराश्‍यामुळं, फुलणाऱ्या कळ्या, उमलणारी व्यक्तिमत्त्वं कोमेजून जातात. वेळेवर काळजी घेतली, तर आपण असं घडणं टाळू शकतो. त्यांना पुन्हा एकदा सुंदर आयुष्य जगायला मदत करू शकतो.

 अजयची डायरी समोर होती आणि समोर खचलेला, हताश अजय. डायरीत गेल्या काही महिन्यांतल्या घटना होत्या. प्रेमभंगापासून परीक्षेतल्या अपयशापर्यंतच्या सगळ्या. डायरी वाचून मी वर बघितलं. अजय बोलू लागला. बोलता बोलता बांध फुटून पाणी व्हायला लागलं. ‘सर, मी जगातला सगळ्यांत अपयशी माणूस आहे. मग जगून तरी काय करू? मला काहीही जमणार नाही. माझ्यात नक्की काहीतरी कमी आहे, म्हणूनच मला सगळ्या आघाड्यांवर अपयश येतं. मग तो अभ्यास असो, प्रेम असो नाहीतर नोकरी. कधी कधी असं वाटतं, मी जन्माला तरी का आलो?’ मी त्याला जवळ घेतलं आणि म्हटलं, ‘हे बघ तुला किती त्रास होत असेल, मी समजू शकतो. पण काही सत्य तुला सांगतो. मृत्यू सगळ्यांनाच अटळ आहे रे. पण तो मागून येत नाही. आत्महत्या करण्याचे कितीतरी प्रयत्न फसलेत. अनेकांच्या बाबतीत मरण आलंच नाही आणि मणका दुखावण्यापासून स्मृती जाण्यापर्यंत अनेक गोष्टी घडल्या आहेत. मृत्यू ही एक नैसर्गिक घटना आहे. तो आणण्याचा प्रयत्न करणं अनैसर्गिक आहे. त्यापेक्षा आपण त्या आधीच्या सुंदर जगण्याचा विचार करू या की!  झालंय असं, की तू स्वतःभोवती नकारात्मक विचारांचं असं एक जाळं विणून घेतलं आहेस. आपण कमी आहोत हा ठाम ग्रह करून घेतला आहेस. मग परीक्षा असो, इंटरव्ह्यू असो, मी अपयशीच होणार, ही तुझी स्थायी भावना बनून गेली आहे. या भावनेतूनच तू प्रसंगांना सामोरं जातोस आणि लहानसं जरी अपयश आलं, की आणखी खचून जातोस. आपल्याला अपयश का येतं? त्याची खरी कारणं तू लक्षातच घेत नाहीस. वस्तुस्थिती अशी आहे, की या जगात कुणीही स्वतःला कमी मानण्याची गरज नाही. प्रत्येकाकडं काही ना काही तरी गुणवैशिष्ट्य असतंच. ते ओळखायचं, आपल्या बलस्थानांचा विचार करायचा आणि आनंदानं पुढं जायचं. यश, अपयश, इतरांशी तुलना करणं या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत... आणि एक सांगू, आपण सगळे जगतो ते फक्त दोन शब्दांसाठी, ‘आनंद’ आणि ‘मन:शांती’. ती मिळवणं आपल्याच हातात आहे. त्याच्यासाठी साधना आहे, रियाज आहे. भूतकाळाचं ओझं न बाळगता, वर्तमान क्षणांत कसं जगायचं हे सगळं शिकणं आहे. आयुष्याचा प्रवास आनंदमय होण्यासाठी महत्त्वाकांक्षा हवी. त्याचसाठी १०० टक्के प्रयत्न करायला हवेत. कारण प्रवासाचा आनंदच खरा आनंद आहे. पण प्रत्येकवेळी, ‘मी जिंकलोच पाहिजे’ हा अट्टहास मात्र नसावा. प्रवासाचा, त्या प्रक्रियेचा आनंदच खरा आनंद!’  

तुला किती त्रास होत असेल, मी समजू शकतो. पण आयुष्याचा शेवट करण्याचा विचार करणं किंवा व्यसनांच्या आहारी जाणं हा मार्ग असू शकत नाही. त्यापेक्षा समस्येच्या मुळापर्यंत जाणं आणि तिचं निराकरण करणं शक्‍य आहे. तुझी समस्या एकाग्रतेची आहे, नकारात्मक दृष्टिकोन बदलाची आहे. त्याचबरोबर एकूणच आयुष्यात आपल्याला नेमकं काय मिळालं, तर आपण सुखी होऊ याच्या उत्तराची आहे. अजय तू यातून निश्‍चित बाहेर येशील. मी तुला मदत करीन. भले यावर्षी तुला मार्क्‍स जरा कमी पडतील, विषय राहतील किंवा अगदी नापास होशील. पण हळूहळू पायरी पायरीनं एकाग्रता व्हायला लागेल. आपली एकाग्रता कशामुळे गेली आहे, ती कशी परत मिळवायची, आयुष्यात काय महत्त्वाचं आहे, हे सगळं तुझ्या लक्षात येईल. अंतिमत: तुझं ध्येय तू गाठशील. आयुष्यात आनंदी होशील आणि इतरांनाही आनंद देत राहशील. पण त्यासाठी उद्यापासूनच काही गोष्टी करायच्या. आपण या परिस्थितीवर मात करू शकतो.’ अजयचे डोळे चमकले. त्याला सांगितलं, ‘उद्यापासून आपण काही गोष्टी शिकणार आहोत. भावनांवर ताबा कसा मिळवायचा, आनंद कसा मिळवायचा आणि कसा टिकवायचा, परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं व समस्येतून कसा मार्ग काढायचा, तणावाचा उगम/स्रोत कसा शोधायचा, सकारात्मक दृष्टिकोनाची जोपासना कशी करायची, आयुष्यातील प्राथमिकता कशी ठरवायची/कशी बदलायची, योजनाबद्ध पद्धतीनं, पायरी पायरीनं विचार व कृती करण्याची सकारात्मक पद्धत शिकायची. अर्थात नकारात्मक पद्धत बदलायची. एकाग्रता साधण्यासाठीची तंत्रं शिकायची.’ अजय म्हणाला, ‘हे सगळं मला जमेल?’ म्हटलं, ‘का नाही? अनेकांना हे जमलं आहे. तणाव नियोजनाच्या विविध पद्धती (इस्टर्न व वेस्टर्न) आपण शिकूया.’

प्रत्येक क्षणात, वर्तमानात, स्वस्थ कसं राहावं, तसंच तटस्थपणे स्वतःकडं व परिस्थितीकडं कसं पहावं हे शिकूया. काही ध्यानाच्या पद्धती शिकूया, जेणेकरून चित्त शांत व्हायला मदत होईल... आणि या बरोबरच रोज भरपूर व्यायाम पण करूया. ज्यामुळं चांगली संप्रेरकं शरीरात स्त्रवतील. आपलं औदासिन्य कमी व्हायला मदत होईल. अभ्यासात एकाग्रता व्हायला लागेल. हे आयुष्य सुंदर आहे, हे जाणवायला लागेल. अजय प्रथमच हसला. म्हणाला, ‘सर, तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं. भेटूया आपण उद्या आणि उद्यापासूनच सुरुवात करू.’ त्याचं हे बोलणं ऐकून आता मी स्वस्थ झालो होतो, एक आयुष्य मार्गी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली होती. 

मला जाणवलं, की तरुणांच्या मनात असे विचार न येण्यासाठी त्यांची व्यक्तिमत्त्वं कणखर व्हायला हवीत. त्यासाठी लहानपणापासूनच प्रयत्न व्हायला हवेत. तरुणाईच्या आत्महत्येमागची कारणं अनेक असू शकतात. त्यापैकी पुढील काही ठळक कारणं असू शकतात  - 
आनुवंशिक जैविक कारणं 

 • तीव्र नैराश्‍याचा आजार 
 • प्रेमभंग व घटस्फोट 
 • परीक्षेतील व इतर क्षेत्रातील अपयश पचवता न येणं 
 • सदोष व्यक्तिमत्त्व 
 • मित्रमैत्रिणींचे ताणतणाव, रॅगिंग इत्यादी 
 • मानसिक आजार 
 • लैंगिक तसंच भावनिक अत्याचार 
 • लहानपणापासून झालेली भावनिक आबाळ.       

मुलांमधील नैराश्‍याची लक्षणे  

 • पाल्यात तीव्र नैराश्‍य आढळणं. 
 • पूर्वी केलेला आत्महत्येचा अपयशी प्रयत्न.
 • आत्महत्येची धमकी देणं, बोलून वा लिहून दाखवणं. 
 • सतत मृत्यूचे विचार मनात येत राहणं. 
 • सर्वच गोष्टींतून अचानक निवृत्त होणं (withdrawal).   

पालकांनी घ्यायची काळजी

 • हा मुलगा किंवा मुलगी केवळ स्वत:कडं लक्ष वेधून घेण्यासाठी आत्महत्येची धमकी देत आहे असा विचार करून दुर्लक्ष करू नये. ती कदाचित गंभीर बाब असू शकते.
 • पाल्य जर निराश वाटत असेल, तर त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 
 • पाल्याबरोबर अतिशय विश्वासाचा, प्रेमाचा संवाद असावा, ज्यायोगे तो मोकळेपणानं पालकांशी बोलेल. तो असा काही प्रयत्न करेल अशी शंका आल्यास त्याच्याशी प्रेमानं पण थेट बोलावं. 
 • पाल्याच्या बदललेल्या सवयींकडं लक्ष द्यावं. उदा. खाणं-पिणं, झोप, शारीरिक स्वच्छता, दारू, ड्रग्ज इ. व्यसनं. 
 • आवश्‍यक वाटल्यास वेळ न दवडता तज्ज्ञांची मदत घ्यावी.

 त्याचबरोबर शिक्षण संस्था, मीडिया यांनी या बाबतीत काही जबाबदारी उचलायला हवी. या बाबतीतले विशेषत: नैराश्‍याचा आजार, व्यक्तिमत्त्व विकास इत्यादी विषयी सामूहिक आणि वैयक्तिक समुपदेशन, कार्यशाळा इत्यादी आयोजित केल्या जाव्यात. मित्र-मैत्रिणींची जबाबदारी फार मोठी आहे. त्यांना आपल्या मित्र-मैत्रिणींच्या वागणुकीत, मन:स्थितीत काही विशेष वेगळं जाणवल्यास किंवा त्यांना मदतीची गरज आहे असं जाणवल्यास, त्यांनी ही बाब लगेच शिक्षक आणि पालक यांना सांगणं गरजेचं आहे.
 आज अजय या संकटाच्या उंबरठ्यावरून परतला आहे. पण दर आठवड्याला समजणाऱ्या आत्महत्येच्या घटनांच्या बातम्या मन विषण्ण करतात. आपण लवकर जागं व्हायला हवं. कणखर व्यक्तिमत्त्वाची, आनंदी तरुण पिढी निर्माण व्हावी ही आपलीही जबाबदारी आहे.   

संबंधित बातम्या