पावसाच्या पाण्याचे नियोजन

अल्पना विजयकुमार
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

होम गार्डन
 

पर्जन्यजल संकलन व संधारण  यासाठी ‘पर्जन्यजल साठवण व पुनर्भरण’ असेही प्रतिशब्द वापरतात. यामधे  इमारतींच्या गच्चीवर, सज्जामध्ये पडणारे पावसाचे पाणी साठवून त्यावर प्रक्रिया करून पुन्हा वापरणे, यालाच पर्जन्यजल संकलन व संधारण असे म्हणतात. या पाण्याचा उपयोग बगीच्यासाठी पाणी, वाहने धुणे, संडासच्या फ्लशसाठी वापरणे यासाठी करता येईल. अशाच प्रकारे फक्त इमारतींच्या गच्चीवर किंवा छपरावर पडणारे पाणी योग्य पद्धतीने साठवून, त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केल्यास त्याचा उपयोग पिण्यासाठी सुद्धा करता येतो. राजस्थान मध्ये प्राचीन काळापासून असे साठविलेले पाणी पिण्यासाठी वापरले जात होते. शहरी भागांमधे अशाप्रकारे साठविलेले पर्जन्यजल प्रक्रिया करून आपल्या गरजेनुसार वापरणे ही पद्धत आता सर्वत्र वापरली जाऊ लागली आहे . सोसायटीमधील इमारती,बंगले या दोन्ही करता ही पद्धत उपयुक्त आहे.

अशा प्रकल्पांची आखणी करताना पावसाचे प्रमाण, आपली पाण्याची गरज, गच्चीचे क्षेत्रफळ या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. आपण ज्या भागांमध्ये राहतो त्या भागांमध्ये पडणारे पावसाचे प्रमाण, आपण राहणाऱ्या इमारतीचे गच्चीचे क्षेत्रफळ, इमारत आवारामध्ये जिथे सिमेंटचा कोबा केलेला आहे अशा आवाराचे क्षेत्रफळ आणि साठवणूक केलेल्या पाण्याचा विनियोग कशाकशासाठी होणार, मुख्यतः टाकीच्या बांधकामाचा खर्च याचा सखोल अभ्यास करावा लागतो. यासाठी अंदाजे वीस रुपये प्रती लिटर इतका खर्च येईल. या प्रकल्पांच्या रचनेमध्ये छपरावरून पडणारे पाणी गोळा करण्यासाठीची पन्हाळी, गच्चीवर पडणाऱ्या पाण्याची जमिनीपर्यंत आणण्यासाठीचीचे पाइप, साठवणूक टाकी, पाणी गाळण्यासाठी असलेली विशिष्ट फिल्टरची रचना, टाकीतील जास्त झालेले पाणी सोडून देण्यासाठी ओव्हरफ्लो व्हाल्व, तसेच टाकीचे झाकण, मोटर या सर्वांची जरुरी आहे. (आकृती क्र.१ पहा ) मोठ्या इमारतींमध्ये अशा प्रकारच्या प्रकल्पांची रचना थोडी अधिक क्‍लिष्ट असते. म्हणजे पाइप व फिल्टरची संख्या जास्त. हे पाणी पुन्हा एकदा वर खेचून, वापरण्यासाठी इतरत्र फिरविण्यासाठी मोटर्स अशी रचना असेल. (आकृती क्र.२ पहा) पर्जन्यजल संकलनाच्या प्रकल्पांमध्ये पाणी साठविण्याची टाकी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. शहरी भागांमध्ये जागेच्या अभावाने टाक्‍या जमिनीखाली, पार्किंग मधे ठेवतात. ग्रामीण भागातील एका घरासाठीच्या प्रकल्पाचा विचार करताना टाकी जमिनीखाली ठेवण्याची गरज नाही .

अशाप्रकारे साठविलेल्या पर्जन्य जलाच्या शुद्धीकरणासाठी विशिष्ट रचना केलेली असते. महत्त्वाचे म्हणजे या पाण्यावर सूर्यप्रकाश पडू न देण्यासाठी टाकीला झाकण लावावे. या पाण्यावर सूर्यप्रकाश पडल्यास पाण्यामधे शेवाळ वाढेल व पाण्याला वास येईल. हे पाणी प्यायला व वापरायला सुद्धा अयोग्य होईल. अशा प्रकारे साठवलेले पाणी वाहने धुणे, बगीच्यासाठी वापरणे, संडासच्या फ्लशसाठी वापरले जाते. परंतु हे साठवलेले पाणी पिण्यासाठी वापरायचे असल्यास विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे. यासाठी फक्त छप्पर किंवा गच्चीवर पडलेल्या पावसाचे पाणी जमा करायला पाहिजे. त्याआधी तेथील धूळ किंवा कचरा साफ करणे, पहिल्या २-३ पावसाचे पाणी हे टाकीत जमा न करता बाहेर सोडून द्यावे. नंतरचे पाणी गोळा करताना सुद्धा ते फिल्टर करून मगच टाकीत सोडावे . यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गच्चीतील पाणी जिथे एकत्र होऊन गोळा होईल अशा ठिकाणीसुद्धा पाने व कचरा या पाण्यामध्ये साठू नये म्हणून विशिष्ट प्रकारची जाळी बसवावी. हे पाणी पिण्याच्या साठी वापरायचे असले तर, पावसाळ्यापूर्वी पाण्याची साठवण टाकी आतून घासून घ्यावी तिला चिरा व फटी नाहीत याची खात्री करावी किंवा याचा संपर्क जमिनीतील पाण्याबरोबर येणार नाही, याची काळजी घ्यावी. हे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी किंवा जंतुविरहित होण्यासाठी योग्य प्रमाणात पोटॅशियम परमॅग्नेटचा वापर करावा. तसेच या पाण्याची नियमित तपासणी करून एम.पी.एन. टेस्ट करणे महत्त्वाचे आहे. 

बगीच्यासाठी अशा प्रकारच्या वॉटर हार्वेस्टिंगने जमा केलेले पाणी वापरायचे असल्यास, वर्षभरासाठी बागेला पाणी किती लागेल याचा हिशोब व आपण किती पाणी साठवू शकतो याचा ताळमेळ घालून एकूण प्रकल्पाचा आर्थिक जमाखर्च मांडावा लागेल. नवीन बांधकामे विशेषतः निवासी घरे , बहुमजली इमारती यांना केलेले आहे. अशा सोसायट्यांना किंवा घरांना कार्पोरेशनच्या टॅक्‍समध्ये सवलती देण्यात आलेल्या आहेत. 

संबंधित बातम्या