खतनिर्मिती

अल्पना विजयकुमार
सोमवार, 4 मार्च 2019

होम गार्डन
 

कपडे धुण्यासाठी वापरलेले  पाणी साठवून, त्यावर प्रक्रिया करून पुन्हा तेच पाणी बागेसाठी, वाहने धुण्यासाठी वापरता येईल. मैलापाणी मिश्रित न झालेले घरगुती सांडपाणी अशाप्रकारे पुन्हा वापरण्यासाठी अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आता उपलब्ध झालेआहे. मोठया इमारती, सोसायटी यांच्यासाठीच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी (एसटीपी प्लांट)  नियमितपणे विजेचा वापर केला जातो. परंतु आता नवीन विकसित झालेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने विशिष्ट वनस्पती व जिवाणूंच्या साह्याने अशा सांडपाण्याचे शुद्धीकरण केले जाते.अशाच प्रकल्पांसाठी विजेची गरज सुद्धा अतिशय कमी प्रमाणात लागते. अशा प्रकारच्या प्रकल्पांमधून सोसायटी, हॉटेल, मॉल अशा मोठ्या प्रकल्पांमधील सांडपाण्यावर एकत्रितपणे प्रक्रिया केली जाते,त्यापासून पुन्हा एकदा वापरता येण्याजोगे पाणी परत मिळवले जाते. फुलांच्या सानिध्यात हा अशा प्रकारचा सांडपाणी प्रकल्प हा सुशोभित दिसतो. अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठी विशेषतः कर्दळीच्या झाडांचा विशेष उपयोग केला जातो किंवा आपल्या नद्यांमध्ये बेसुमार वाढलेली केंदाळ ही वनस्पती सुद्धा या प्रकारच्या प्रकल्पांमध्ये वापरता येते .अशा प्रकल्पांच्या साठीची मोठ्या प्रमाणात लागणारी जागा ही सर्वात मोठी अडचण आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर करुन छोटे घरगुती प्लॅन्ट तयार होत आहेत.

ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती 
घराभोवतीच्या बागेचा विचार करताना घरामधे निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्या पासून खत कसे तयार करावे, हे तंत्रज्ञान प्रत्येकाला माहिती होणे जरुरीचे आहे.  

आपण घरगुती ओला कचरा म्हणजे स्वयंपाकातील राहिलेले खरकटे व आपल्या बागेमध्ये साठणारा पालापाचोळा वापरून उत्तम प्रकारचे कंपोस्ट कसे करता येईल याची माहिती घेऊ .घरगुती ओल्या कचऱ्यामधे कशाचा समावेश होईल? तर स्वयंपाक घरातील राहिलेले खरकटे अन्न, भाजीपाल्यांचे देठ तसे भाज्या- फळांच्या साली, अशा ज्या काही कुजणाऱ्या सर्व गोष्टी. आपण कोणत्या कोणत्या गोष्टींचा घेऊ नयेत? यामधे फक्त स्वयंपाक घरातील न कुजणारा कचरा म्हणजे नारळाची सोडणे, अंड्याची टरफलं , नारळाच्या शेंड्या चा वापर आपल्याला खत निर्मिती करताना खालच्या बाजूला बेडिंग मटेरियल म्हणून करता येतो. मोठ्या झाडांच्या बिया कुजायला वेळ लागतो. 

हा खत निर्मिती प्रकल्प सोसायटी पातळीवरती सुद्धा राबविता येतो. यासाठी कचऱ्याच्या वजनानुसार प्रक्रिया करण्यासाठी लागणारे कंटेनर ड्रम यांच्या आकारात फरक होईल. प्रक्रिया वेगाने घडण्यासाठी गांडुळे, कंपोस्ट कल्चर किंवा नुसतेच कल्चर बाजारात उपलब्ध आहे. ४ जणांच्या कुटुंबाकडे रोजचा एक किलो ओला कचरा तयार होतो. याकरता उपयोगी येतील असे अनेक छोटे, तयार कंपोस्टींग ड्रम आता बाजारात उपलब्ध आहेत .शास्त्रीय पद्धतीने कंपोस्टींग करताना, एक किलो कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ३x२x२ ची टाकी असावी. ही टाकी बनविण्यासाठी प्लास्टिक फायबर सिमेंट व विटा किंवा फेरोसिमेंट यापैकी कोणतेही साहित्य वापरता येईल. अशा १०० लिटरच्या प्लास्टिक ड्रमला भोकं पाडून कंपोस्टर प्लांटर बनवता येतो. याचा उपयोग ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती व झाडे लावणे या दोन्हीसाठी होतो. (आकृती क्रमांक १)  गृहप्रकल्प किंवा मोठ्या प्रमाणावर खत प्रकल्प राबवितांना सदनिकांची संख्या व उपलब्ध जागा, उदाहरणार्थ बेसमेंट, गच्चीतील जागा यांचा मेळ घालून प्रकल्प उभा करतात. आठवड्यातील सात दिवसाच्या स्वतंत्र टाक्‍या बांधून किंवा फेरोसिमेंट चा वापर करून टाक्‍या

तयार करता येतात. रोज जमा झालेला ओला कचरा रोज एका टाकीत टाकणे, आठ दिवसांनी एकदा कल्चर टाकून, पलटी मारणे या पद्धतीने हा प्रकल्प राबविला जातो. (फोटो क्रमांक १)

खत प्रकल्प उभारताना रचना कशी असावी? पेटी किंवा ड्रमच्या बाजूला तळाशी पाण्याचा निचरा होण्यासाठी आउटलेट व पेटीला झाकण असावे. पेटीमध्ये हवा खेळती राहण्यासाठी पेटीच्या वरच्या बाजूस लहान भोके असावीत. घरगुती ओल्या कचऱ्या बरोबरच बागेतील पालापाचोळा वापरणे उपयुक्त ठरते. सॅनिटरी पॅड्‌स किंवा लहान मुलांचे डायपर यांच्या विघटनासाठी सुद्धा गांडूळांचा वापर करता येईल.

पेटीच्या तळाशी विटांचे तुकडे त्यावर वाळूचा थर नंतर पालापाचोळा व नारळाच्या शेंड्यांचा थर, त्यावर गांडूळ खताचे थर व शेवटी ओला कचरा. प्रत्येक थराची जाडी साधारणपणे चार ते पाच इंचाची असावी. चांगल्या प्रकारे खत तयार होण्यासाठी योग्य प्रमाणात ओलसरपणा राखणे, पाण्याचे प्रमाण योग्य राहण्यासाठी कोकोपीट व पालापाचोळा यांचा वापर करावा. दुर्गंधी टाळण्यासाठी पाणी, नीम ,एक थेंब साबण याचा स्प्रे मारावा. कचरा खालीवर करणे तसेच कंपोस्टिंग कल्चरचा वापर करावा. मुंग्या/ किडे टाळण्यासाठी नीम पेंड किंवा वेखंड पावडरीचा वापर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अशा खतनिर्मितीसाठी पहिल्यांदा तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो .नंतर हा कालावधी कमी होत जातो.  
 

Tags

संबंधित बातम्या