बायोगॅस स्लरीचे खत

अल्पना विजयकुमार
सोमवार, 25 मार्च 2019

होम गार्डन
 

अलीकडील काळात म्हणजेच मागील १५ वर्षांपासून घरगुती ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करण्याची संकल्पना अस्तित्वात आली. याआधीही म्हणजे ५० वर्षांपासून आपल्याकडील ग्रामीण भागात शेणापासून गोबरगॅस आणि गोबरगॅसची स्लरी यांचा उपयोग केला जात असे.
घरगुती ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करता येतो. त्याबरोबर तयार होणाऱ्या बायोगॅस स्लरीचा (द्रवयुक्त खताचा) उपयोग करून घरगुती बाग फुलवता येते. या संकल्पनेचा प्रसार करण्याचे काम आम्ही पाच-सहा वर्षे करीत आहोत. या प्रकल्पातील सुधारित बायोगॅस संयंत्रात स्वतःच्या घरातील कचरा, त्याचबरोबर शेजारच्या कुटुंबांचा ओला कचराही जिरवला जातो. त्यापासून मिळणाऱ्या बायोगॅसमुळे एलपीजी गॅस वापरामध्ये ५०% बचत होते. तसेच या संयंत्रातून मिळणाऱ्या स्लरीचा झाडांच्या वाढीसाठी विशेषतः फळझाडे आणि भाजीपाला यांच्यासाठी चांगला उपयोग होतो.

घरगुती बायोगॅस संयंत्र
प्लॅस्टिक, स्टील, सिमेंट अशा विविध प्रकारच्या साहित्याचा वापर करून घरगुती बायोगॅस संयंत्र तयार केले जाते. हे संयंत्र २ ,५ ,१०, २० आणि ५० किलो अशा विविध क्षमतांमधे उपलब्ध आहे. आपल्याकडे असलेला ओला कचरा किंवा इतर सेंद्रिय टाकाऊ पदार्थ, शेण यांच्या उपलब्धतेनुसार संयंत्राची क्षमता ठरविली जाते. शिवाय हे संयंत्र कार्यरत राहण्यासाठी सात ते आठ तास थेट सूर्यप्रकाश आणि त्या प्रमाणात पाणी यांची उपलब्धता महत्त्वाची आहे. शहरातील एका कुटुंबाकडून रोज साधारण एक किलो ओला कचरा निर्माण होतो. एकत्र कुटुंबात हेच प्रमाण दोन ते तीन किलो एवढे होईल, असे गृहीत धरावे. यापेक्षा जास्त ओला कचरा उत्पन्न होणारी ठिकाणे म्हणजे हॉटेल, कॅंटीन, हॉस्टेल इत्यादी. याठिकाणांसाठी १० ते ५० किलो एवढ्या क्षमतेचे बायोगॅस संयंत्र उपयोगी पडेल. तर, दोन किलो ओला कचरा वापरून बायोगॅस तयार करणारे संयंत्र घरगुती स्तरावर अतिशय उपयोगी ठरते. 

दोन किलोच्या बायोगॅस संयंत्राची रचना
शास्त्रीय भाषेत याचे आकारमान ०.२५ क्‍युबिक मीटर एवढे असते. त्याचा व्यास तीन फूट आणि उंची साडेतीन फूट असते.
कचरा आत टाकण्यासाठी आणि स्लरी बाहेर पडण्यासाठी मोठ्या तोंडाची रचना असते. स्वयंपाक घरातील ओला कचरा, खरकटे, भाजी, खराब झालेली पिठे आपण यात टाकू शकतो. तयार झालेला बायोगॅस साठवण्यासाठी एक टाकी आणि गॅस बाहेर नेण्यासाठी नळासारखे एक आउटलेट, अशी रचना असते.

झाडांसाठी बायोगॅसच्या द्रवरूप स्लरीचा वापर -
फळझाडे : लिंबू, अंजीर, डाळिंब, केळी यासारख्या मोठ्या झाडांना स्लरी आणि पाणी एकास एक प्रमाणात मिसळून आठवड्यातून एकदा घालावी.
भाजीपाला : स्लरी आणि पाणी एकास पाच या प्रमाणात मिसळून आठवड्यातून एकदा घालावी.

बायोगॅस स्लरीचे गुणविशेष

  • रोजच्या रोज मिळणारे विनाखर्चाचे सेंद्रिय खत. 
  • सेंद्रिय घटक, ह्यूमस आणि मातीची सुपीकता वाढवणारे उत्कृष्ट खत.
  • याच्या वापरामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते .
  • बागेतील तणांची वाढ ५० टक्‍क्‍यांनी कमी होते.
  • झाडांवर फवारल्यास लाल कोळी, मावा या किडींचे नियंत्रण होते.
  • बायोगॅस स्लरीमुळे जमिनीतील नायट्रोजन स्थिरीकरण करणारे आणि फॉस्फेट विरघळवणारे सूक्ष्मजीव वाढतात.

कंपोस्ट आणि बायोगॅस स्लरी यांच्यामधील नत्र (N), स्फुरद (P), पालाश (K) या घटकांची तुलना केल्यास बायोगॅस स्लरीच्या परिणामकतेची कल्पना येईल.
मातीसाठी पोषक घटक         कंपोस्ट मधील प्रमाण (%)         बायोगॅस स्लरी मधील प्रमाण (%)
नत्र (N)                             ०.५ - १.५                                 १.४ - १.८
स्फुरद (P)                         ०.४ - ०.८                                 १.१ - २.०
पालाश (K)                        ०.५ - १.९                                 ०.८९ - १.२

घरगुती ओला कचरा इथे-तिथे न टाकता, उलट त्यापासून स्वयंपाकाचा गॅस व स्लरीचा वापर करून घरगुती, ताजा आणि सेंद्रिय भाजीपाला पिकवता येणे ही कल्पना अतिशय उपयुक्त आहे. बाहेर उघड्यावर टाकलेला कचरा, त्याची दुर्गंधी, त्याच्यावर बसणाऱ्या माशा आणि इतर उपद्रवी कीटकांची वाढ, पसरणारी अस्वच्छता व रोगराई, कचऱ्यातून निर्माण होणारा मिथेन वायू तसाच हवेत सोडला तर पर्यावरणाला घातक आहे. बायोगॅस संयंत्रामध्ये याच मिथेन वायूचे ज्वलन होऊन त्यामधून स्वयंपाक बनवण्यासाठी आवश्‍यक असणारी ऊर्जा मिळते. याशिवाय उघड्यावर पसरणाऱ्या कचऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांनाही आळा घालणे शक्‍य होते. अशा पर्यावरणपूरक संकल्पनांची सुरुवात प्रत्येक घरापासून व्हायला हवी.

संबंधित बातम्या