दुर्गम रायगड 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 15 जून 2020

‘गुगल’वारी
शिवाजी महाराजांनी आपल्या लढायांमध्ये सह्याद्रीतील गड-किल्ले, दऱ्याखोऱ्यांचा कुशल वापर केला. या लढाया झाल्या ती ठिकाणे नेमकी कशी होती? आता घरबसल्या त्या ठिकाणांना भेट देणे शक्य आहे, ‘गुगल अर्थ’च्या माध्यमातून. ‘गुगल अर्थ’च्या मदतीने ही ठिकाणे नेमकी कुठे होती हेही जाणून घेता येईल आणि त्यांचा भूगोलही समजावून घेता येईल! 

सह्याद्रीच्या पर्वतरांगांत, रायगड जिल्ह्यात समुद्रसपाटीपासून सुमारे ८४० मीटर उंचीवर किल्ले रायगड आहे. छत्रपती शिवाजी राजांनी रायगडचे स्थान आणि महत्त्व पाहून १६ व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी केले. १९ मे १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला. 

या डोंगराचे प्राचीन नाव ‘रायरी’ असे होते. पाचशे वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. रायगडाचा माथा राजधानी करण्यास सोयीचा व पुरेसा होता. शत्रूला अवघड वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक अवघड असे ठिकाण. गडाला सुमारे १४३५ पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडे टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा ही गडावरची मुख्य ठिकाणे आहेत.   

आजूबाजूला दुर्गम डोंगराळ प्रदेश, प्रचंड उंची, चारही बाजूंनी तीव्र कडे, वर जाण्याचा एकच मार्ग, वर अतिशय विस्तृत पठार या सर्व गोष्टींबरोबरच रायगडाची समुद्राशी असलेली जवळीक असे राजधानीस आवश्यक असलेले सगळे गुण किल्ले रायगडमध्ये शिवरायांना आढळले. त्यामुळेच त्यांनी या गडाची राजधानी म्हणून निवड केली. दूरदृष्टीपणा हा तर महाराजांचा महत्त्वपूर्ण गुण. त्याचीच संपूर्ण साक्ष हा किल्ला देतो.  

रायगडाची दुर्गमता त्याच्या सह्याद्री समीप असलेल्या विशिष्ट भौगोलिक स्थानामुळेच आहे. पूर्वेकडे असलेल्या काळ नदीच्या खोऱ्यामुळे सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून विलग झाल्यामुळे रायगड हा आजूबाजूच्या डोंगराळ भागातील जणू एक द्वीपच झाला आहे. किल्ल्यावरून आजूबाजूच्या विस्तीर्ण प्रदेशावर नजर ठेवता येते हे याचे मोठे बलस्थान आहे.  

गुगल अर्थ ही संगणक संहिता वापरून या प्रदेशाच्या विलक्षण दुर्गमतेची चांगली कल्पना येऊ शकते. आजूबाजूचे तीव्र डोंगरकडे आणि रायगडाचे आजुबाजूच्या डोंगराळ भागातील मध्यवर्ती स्थान कळण्यासाठी या भागाचा उंचीदर्शक छेद (Elevation Profile) मिळवता येतो. यासाठी तुमच्या संगणकावर गुगल अर्थ संहिता download झाल्यावर संगणकाच्या पडद्यावर (Screen) डाव्या बाजूला वरती दिसणाऱ्या Search म्हणजे शोधा या चौकटीत (Window) रायगड फोर्ट असे नाव टाईप करा किंवा 18.237/73.448 असा अक्षवृत्त, रेखावृत्त संदर्भ टाईप करा आणि search या अक्षरांवर मूषक दर्शकावरील  (Mouse) सरकचक्राच्या (Scroll Wheel) डाव्या बाजूला असलेली कळ (Button) दाबून त्याची नोंद करा (Enter). 

रायगड फोर्ट असे नाव दिसल्यावर आता डाव्या बाजूला वरती दिसणाऱ्या Add या संदेशावर क्लिक करा. आता जो तक्ता दिसेल त्यातील Path या शब्दावर क्लिक करा. आता तुम्हाला पुन्हा एक तक्ता दिसेल. त्यातील Name या चौकटीत EW म्हणजे पूर्व पश्चिम दिशेतला छेद असे लिहा. मूषक दर्शकावरील (Mouse) सरकचक्राच्या (Scroll Wheel) मध्यभागी असलेले चक्र तुमच्या दिशेने गोलाकार फिरवून रायगडाची प्रतिमा पूर्ण दिसेल अशी मिळवा. यानंतर मूषक दर्शकाने डावीकडील लहान चौकोन हव्या त्या ठिकाणी कळ (Button) दाबून त्याची नोंद करा (Enter). मिळणारी रेष उजवीकडे नेऊन तिथेही हव्या त्या ठिकाणी कळ (Button) दाबून त्याची नोंद करा (Enter). आता तुम्हाला पूर्व पश्चिम जाणारी छेद रेषा दिसेल. आता पुन्हा डावीकडे दिसणाऱ्या तक्त्यांत खाली दिसणाऱ्या ok शब्दावर क्लिक करा. यानंतर आता डाव्या बाजूला वरती दिसणाऱ्या Edit या संदेशावर क्लिक करा. आता जो तक्ता दिसेल त्यातील show elevation profile या शब्दावर क्लिक करा. तिथे क्लिक केल्यावर संगणकाच्या पडद्यावर तुम्हाला त्या रेषेवरची पार्श्वरेखा दिसेल. 

यावर मूषक दर्शक फिरवून उंचीची, अंतराची आणि उतार प्रमाणाची पूर्ण माहिती मिळेल. निरनिराळ्या दिशांत अशा प्रकारे छेद घेऊन या सगळ्या परिसरातील डोंगरांची उंची, नद्यांची खोली, उतार अशी सगळी माहिती मिळवता येईल आणि हा प्रदेश किती दुर्गम आहे त्याचे मूल्यमापन करता येईल. 

महत्त्वाचे संदर्भ : (पाचाड, उंची ३२४ मी : १८. २३७/७३.४२०, हिरकणीचा कडा, उंची ८४० मी : १८.२३३/७३.४३९, गंगासागर तलाव  १८.२३४/७३.४४०, टकमक टोक : उंची ८०१ मी., १८.२३९/७३.४४१)  

संबंधित बातम्या