किल्ले राजगड

डॉ. श्रीकांत कार्लेकर
शुक्रवार, 29 मे 2020

‘गुगल’वारी
शिवाजी महाराजांनी आपल्या लढायांमध्ये सह्याद्रीतील गड-किल्ले, दऱ्याखोऱ्यांचा कुशल वापर केला. या लढाया झाल्या ती ठिकाणे नेमकी कशी होती? आता घरबसल्या त्या ठिकाणांना भेट देणे शक्य आहे, ‘गुगल अर्थ’च्या माध्यमातून. ‘गुगल अर्थ’च्या मदतीने ही ठिकाणे नेमकी कुठे होती हेही जाणून घेता येईल आणि त्यांचा भूगोलही समजावून घेता येईल! 

राजगड हा शिवकाळातील एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला. तेराशे पंचवीस मीटर उंचीचा हा डोंगर मुळात मुरुंबदेवाचा म्हणून ओळखला जाई. स्वराज्य स्थापनेच्या काळात शिवाजी महाराजांना जवळच्या तोरणा गडावर काही धनसंपत्ती मिळाली आणि याच संपत्तीचा उपयोग स्वराज्यासाठी करत त्यांनी शेजारच्या या मुरुंबदेवाच्या डोंगरावर एक बुलंद गड आकारास आणला. सह्याद्रीच्या पूर्वेकडे पसरत गेलेल्या एका रांगेवर हा किल्ला असून त्याला बलदंड अशा तीन भुजा आहेत आणि मधोमध एक विस्तीर्ण सपाट पठार आहे! ‘मुरुंबदेवा’च्या परिसराचा सगळा भूगोलच नैसर्गिकदृष्ट्या असलेला त्याचा अभेद्यपणा दाखवणारा आहे.

शिवाजी महाराजांनी १६४७ नंतर मावळातील निरनिराळे गड आपल्या ताब्यात घेतले. त्याबरोबरच मुरुंबदेव आपल्या ताब्यात घेतला आणि त्याला राजगड हे नाव देऊन ते आपले राजधानीचे ठिकाण केले. छत्रपती शिवाजी महाराजांची सुरुवातीची राजधानी येथे होती. हा किल्ला पुणे जिल्ह्यात, वेल्हे तालुक्यातील  वेल्हे गावाच्या आग्नेय दिशेला १६ किमी.वर समुद्रसपाटीपासून १३२४ मी. उंचीवर आहे. पायथ्यापासून किल्याची उंची ६०० मी. आहे.    

पुणे-बंगळूर महामार्गावर पुणे जिल्ह्यातील नसरापूरहून एक फाटा वेल्ह्याकडे वळतो. या मार्गावरच मार्गासनी हे गाव लागते. या गावातून साखर, गुंजवणे, वाजेघर, पाली आणि भूतोंडे गावाकडे एक वाट जाते. या सर्व गावांच्या बरोबर मध्यभागी हा गड दिसून येतो. गुंजवण्यातून गुंजण दरवाजाने, साखरमधून चोरदिंडीने, वाजेघर-पालीतून पाली दरवाजाने आणि भूतोंडेतून अळू दरवाजाने राजगडात शिरता येते. यातली पाली दरवाजाची वाट इतर वाटांपेक्षा थोडी सुकर आहे. पाली दरवाजा हा गडावर येण्याचा महामार्ग असून दोन दरवाजे पार करून किल्ल्यावर पोचता येते. पाली गाव किल्ल्याच्या पश्‍चिमेला आहे, तर गुंजवणे हे गाव गडाच्या ईशान्येला आहे. सध्या प्रचलित आणि लोकप्रिय असलेली वाट गुंजवणे गावातून चोर दरवाजामार्गे पद्मावती माचीवर येते. पाली दरवाजा हा मुख्य महामार्ग असून ही वाट रुंद आणि पायऱ्यांची आहे. 

राजगडाला उत्तरेस पद्मावती, पूर्वेला सुवेळा आणि नैऋत्येस संजीवनी अशा तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. याचा तट व बुरूज अनेक ठिकाणी दुहेरी म्हणजे चिलखती आहे. गडावर येण्यास गुंजवणे आणि पाली व्यतिरिक्त अळू, काळेश्‍वरी, भूतोंडे असे दरवाजे व तीन दिंड्या आहेत. पद्मावती माची पुष्कळ लांब-रुंद असल्यामुळे राजगडावरील मुख्य वस्ती येथेच होती. सुवेळा व संजीवनी या दोन्ही माच्यांवर आणि बालेकिल्ल्यावर त्या मानाने कमी वस्ती होती. खुद्द छत्रपती शिवाजी महाराज कुटुंबासह या बालेकिल्ल्यावर राहात असत. सुवेळा आणि संजीवनी माची चिंचोळी आहे. गडावरील मुख्य देवता आहे पद्मावती.  तिचे मंदिर पद्मावती माचीवर आहे. पद्मावती माचीवर बऱ्यापैकी सपाटी असल्याने शिवकाळात इथे मोठी वहिवाट होती. राजांचा राहता वाडा, हवालदार-किल्लेदारांचे वाडे, शिबंदीची घरे, रत्नशाळा, सदर, पद्मावती-रामेश्‍वराचे मंदिर, सईबाईंची समाधी, पद्मावती तलाव व अन्य तळी, धान्याची-दारूगोळ्याची कोठारे, चोरदिंडी, गुंजण दरवाजा हे सगळे याच माचीवर आहे. 

तीन टप्प्यांत उतरणारी पश्‍चिमेकडील संजीवनी माची सव्वा किलोमीटर लांब पसरलेली आहे. या दरम्यानच्या तटात तब्बल १९ बुरूज येतात. या एकात एक असलेल्या बुरुजांमध्ये ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग ठेवलेले आहेत. माचीच्या आतील मोकळ्या जागेत घरांचे काही अवशेष दिसतात. त्यांच्यासाठी टाक्या खोदत पाण्याचीही जागोजागी सोय केलेली आहे. पूर्वेकडे असलेल्या सुवेळा माचीच्या प्रदेशात डोंगरात आरपार पडलेले छिद्र आहे. या भौगोलिक आविष्कारास ‘नेढे’ म्हणतात.   

राजगडाच्या परिसरातील या सगळ्या विलक्षण शौर्याचा इतिहास लाभलेल्या ठिकाणांचा गुगल अर्थ संहितेचा वापर करून आनंददायी पुनर्वेध घेता येतो.  बालेकिल्ला, उंची १३२४ मी. (१८.२४५/७३.६८२). सुवेळा माची, उंची १२३५ मी. (१८.२४२/७३.६८६). संजीवनी माची, उंची ११२१ मी. (१८.२४०/७३.६७१). पद्मावती तलाव, उंची ११८३ मी. (१८.२५१/७३.६८३).       

संबंधित बातम्या