प्रतापगडची युद्धभूमी 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
रविवार, 7 जून 2020

‘गुगल’वारी
शिवाजी महाराजांनी आपल्या लढायांमध्ये सह्याद्रीतील गड-किल्ले, दऱ्याखोऱ्यांचा कुशल वापर केला. या लढाया झाल्या ती ठिकाणे नेमकी कशी होती? आता घरबसल्या त्या ठिकाणांना भेट देणे शक्य आहे, ‘गुगल अर्थ’च्या माध्यमातून. ‘गुगल अर्थ’च्या मदतीने ही ठिकाणे नेमकी कुठे होती हेही जाणून घेता येईल आणि त्यांचा भूगोलही समजावून घेता येईल! 

आजुबाजूच्या सगळ्या निसर्गाचे, डोंगर-दऱ्यांचे, नदी नाल्यांचे अचूक आणि सम्यक ज्ञान आणि त्याचा युद्धनीतीत नेमका वापर या शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्रातील विलक्षण आविष्काराचा कळस म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांनी केलेला अफझलखानाचा वध. आग्र्यातील अटकेपेक्षाही राजांच्या जीवनातील हा अति धोकादायक प्रसंग होता. त्यांनी यासाठी वापरलेले अप्रतिम युद्धतंत्र पाहून मन थक्क होऊन जाते. 

महाबळेश्‍वरपासून महाड रस्त्याला २० कि.मी.अंतरावर प्रतापगड आहे. १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची स्थापना केली. प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी राजांनी अफझलखानाचा वध केला हे जरी खरे असले, तरी ती जागा निवडण्यापूर्वी शिवाजी राजांनी जो विलक्षण दूरदर्शीपणा दाखवला होता, त्यामुळेच तो प्रसंग निभावता आला हे विसरून चालणार नाही. जावळीचे खोरे हे वाईपासून साधारण २५ मैलांवर. जावळी आणि वाईच्यामध्ये महाबळेश्‍वरचे पठार. जावळीच्या पश्‍चिमेस प्रतापगड. मधे कोयनेचे खोरे. आजूबाजूचा सगळाच प्रदेश दुर्गम, कठीण. अरुंद घळ्या आणि तीव्र उत्तर. पूर्वेकडे आणि आग्नेयेकडे पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगाच रांगा यामुळे संपर्क साधणे जवळ जवळ अशक्यच. आजूबाजूस इतके घनदाट अरण्य की वाट चुकली, तर वाटाड्याशिवाय पुन्हा मूळ ठिकाणी येणे अशक्य. खूपच कमी मनुष्य वस्ती. थोड्याशाच पायवाटा, पण वाटेकडे न पाहता चालणे कठीण. समुद्रसपाटीपासून १०८२ मीटर उंचीवर असलेला प्रतापगड हेच टेहळणीचे उत्कृष्ट ठिकाण. 

सध्याचा वाई - महाबळेश्‍वर - प्रतापगड हा मार्ग शिवकालात फारसा उपयोगात नसावा असे काही उल्लेखावरून वाटते. कृष्णेच्या खोऱ्यातून महाबळेश्‍वरपर्यंत व नंतर कोयनेच्या खोऱ्यातून जावळी, परपार सोनपारकडून प्रतापगड असा मार्ग कदाचित जास्त उपयोगात असावा असे वाटते. प्रतापगड विस्ताराने तसा लहानच, पण तीव्र उतारांच्या शिखरांभोवती बांधलेला. या सर्व दुर्गम भूमिप्रदेशाची राजांना खडानखडा माहिती होती. त्यामुळे अफझल भेटीची जागा ठरवताना त्यांच्या युद्धनीतीतून एकेक हुकमी अस्त्र बाहेर न पडते तरच नवल!

कुठल्याही परिस्थितीत राजांना लवकरात लवकर पकडणे हा अफजलखानाचा मुख्य हेतू होता आणि त्या तसल्या दुर्गम प्रदेशात लढाई त्याला नको होती. भेटीची जागा निश्‍चित झाल्यावरच शिवाजी राजांची योजना साकार होऊ लागली. खानाला भेटणे, शक्य झाल्यास त्याला ठार मारणे आणि त्याचबरोबर खानाच्या सैन्याचीही कत्तल करणे हा राजांचा उद्देश निश्‍चित झाला. 

दहा नोव्हेंबर १६५९ रोजी दुपारी १२ वाजता प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली. भेटीची ही शिवाजी राजांनी ठरविलेली जागा म्हणजे त्यांच्या युद्ध कौशल्याची जिवंत निशाणीच! ही जागा गडाच्या आग्नेयेस साधारणत: साडेचारशे मीटर अंतरावर सोनपार-पेटपार गावापर्यंत पसरलेल्या पर्वताच्या सोंडेवर (Spur) आहे. भेटीचा शामियाना येथे उभारण्यात आला होता. यावेळी राजांनी पारघाट आणि आंबेनळी घाटापाशी मोरापंत पिंगळे यांना त्यांच्या सैन्यासह दबा धरून बसण्यास पाठवले. भेटीच्या ठिकाणालगतच काही मावळे डोंगरदऱ्यात दडून राहिले. प्रत्यक्ष भेटीच्यावेळी तर राजांनी सावधपणाची कमाल केली. गडाच्या भक्कम तटबंदीत बसू‌न भेट घेण्यापेक्षा निसर्ग निर्मित दुर्गमतेचा फायदा घेऊन कोयनेच्या खोल अरुंद खोऱ्यात शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी स्वतःच जाण्याचा असा निर्णय घेणारे शिवाजी महाराज म्हणूनच एक उत्तम योद्धा म्हणून लक्षात राहतात. 

प्रतापगडाचा हा सगळा दुर्गम परिसर, अफझल वधाची जागा, सोनपार, पेटपार, आंबेनळीचा घाट आणि पारघाट ही सगळी ठिकाणे प्रत्यक्ष पाहणे अतीव आनंद देणारे आहे. याचा तितकाच आनंददायी पुनर्वेध गुगल अर्थ या संगणक संहितेतून आपल्याला आता सहजपणे घेणे शक्य झाले आहे. पुढे दिलेल्या अक्षवृत्त रेखावृत्त संदर्भांचा वापर करून हा आनंद जरूर मिळवा. 

(प्रतापगड, उंची १०८२ मी: १७.९३७/७३.५७७, अफझल खान वधाची जागा, उंची ९५० मी : १७.९३०/७३.५८३, सोनपार, उंची ७०५ मी : १७.९१८/७३.५८९, पेटपार, उंची ७७६ मी : १७.९१९/७३.५९६, आंबेनळी घाट, उंची ४५८मी : १७.९३२/७३.५५१, पारघाट, उंची ७३६ मी : १७.९१७/७३.५७३)

संबंधित बातम्या