पुरंदर परिसराचा वेध 

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 18 मे 2020

‘गुगल’वारी
महाराष्ट्रातील किल्ल्यांची व अजुबाजूच्या भूप्रदेशाची माहिती ‘गुगल अर्थ’च्या सहाय्याने... 

मित्रांनो, आज आपण पुरंदर किल्ला आणि त्याचाच भाग असलेला वज्रगड यांच्या आजूबाजूचा भूप्रदेश कसा आहे त्याचा ‘गुगल अर्थ’ संहितेच्या साहाय्याने वेध घेऊया. त्यासाठी मागच्या अंकांत तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीचाच वापर करायचा आहे. यासाठी तुमच्या संगणकावर गुगल अर्थ संहिता download झाल्यावर संगणकाच्या पडद्यावर (Screen) डाव्या बाजूला वरती दिसणाऱ्या Search म्हणजे शोधा या चौकटीत (Window) पुरंदर असे नाव टाइप करा किंवा 18.276, 73.969 असा अक्षवृत्त, रेखावृत्त संदर्भ टाइप करा आणि search या अक्षरांवर मूषक दर्शकावरील (Mouse) सरकचक्राच्या (Scroll Wheel) डाव्या बाजूला असलेली कळ (Button) दाबून त्याची नोंद करा (Enter). 

पुरंदर नावाजवळ तुम्हाला दिसणाऱ्या स्थानदर्शक चिन्हावर मूषक दर्शक म्हणजे माऊस नेल्यावर संगणकाच्या पडद्यावर सगळ्यात खाली दिसणाऱ्या आडव्या पट्टीवर त्या ठिकाणाचे  अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय स्थान (Lat Long location), समुद्रसपाटीपासून उंची (Elevation) आणि तुम्हाला दिसणारी प्रतिमा केव्हा घेतलेली होती त्याची तारीखही दिसेल. यानंतर ‘गुगल अर्थ’ प्रतिमेच्या screen च्या उजव्या कोपऱ्यातील दिशादर्शक चिन्हावरील (Direction icon) उत्तर दिशा (N) दाखविणारा बिंदू वायव्य (Northwest), पश्‍चिम (West), नैऋत्य (Southwest) आणि दक्षिण (South) अशा विविध दिशांनी फिरवून त्या प्रदेशाचे त्रिमिती (3D) चित्र मिळावा. दिशादर्शक चिन्हाच्या खाली असलेल्या दुसऱ्या लहान चक्रावरील बाणाचे चिन्ह वापरून चित्र उजवीकडे, डावीकडे, वर आणि खाली फिरवून हा प्रदेश निरनिराळ्या कोनातून कसा दिसेल ते पाहता येईल.  याच पद्धतीने पुढील ठिकाणे शोधा आणि इतिहासातील त्यांचे स्थानमहात्म्य या लेखात दिलेल्या माहितीवरून समजून घ्या-

वज्रगड ( 18.284,73.988), भैरवखिंड (18.281, 73.984), केदारेश्वर (18.277, 73.971), नारायणपूर (18.301, 73.975), खंदकडा (18.279, 73.981),  बालेकिल्ला (18.279, 73.974).

सिंहगडाजवळून पूर्वेकडे जाणारा सह्याद्रीच्या रांगेचा एक फाटा आहे. याला भुलेश्वर रांग असे म्हणतात. आतकरवाडीजवळ या रांगेला दक्षिणेकडे एक शाखा फुटते. या रांगेत पुरंदर किल्ला आहे. पुरंदरची पायथ्यापासूनची उंची ४६२ मीटर व समुद्रसपाटीपासून १३३८ मीटर आहे. पुरंदरच्या पूर्वेला एक छोटा गड आहे, तो आहे पुरंदरचा उपदुर्ग वज्रगड ऊर्फ रुद्रमाळ. याची उंची १२९९ मीटर आहे. वज्रगडाचा माथा फारसा रुंद नाही. गडाच्या पायथ्याशी उत्तरेला फार प्राचीन असे नारायणपूर गाव आहे. पुरंदर गडाच्या माथ्यावर तीन शिखरे आहेत, खंदकडा, राजगादी आणि केदारेश्वर. यापैकी राजगादीवर छत्रपतींचा वाडा होता. 

पुरंदर आणि वज्रगड हे दोन्ही किल्ले साधारणपणे सारख्याच उंचीच्या डोंगरधारेवर उभे आहेत. पुरंदर आणि वज्रगड यामध्ये एक खिंड आहे. तिला म्हणतात भैरवखिंड. या दोन गडात केवळ २३०० मीटरचे अंतर आहे. वज्रगडाहून पुरंदरवर सहज तोफेचा मारा होऊ शकत असे आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी १६६५ मध्ये आखलेल्या पुरंदर मोहिमेच्यावेळी मोगलांनी  आपले जास्तीत जास्त बळ याच वज्रगडावर एकवटले होते.  वज्रगडाच्या भौगोलिक स्थितीचा अंदाज घेतल्यावर मोगलांनी तोफखान्यातील मोठ्या तोफा काढल्या व वज्रगडाच्या उत्तरेच्या सोंडेवरून वर चढवायला सुरुवात केली. ही सोंडही टप्प्याटप्प्याने चढत वर जात असल्यामुळे वज्रगडावरून इथे मारा होऊ शकत नव्हता. पुरंदरवरून तर इथे काय चालले आहे याचा पत्ताच लागत नव्हता. तोफा वर ओढल्या जात होत्या. साडेतीन दिवसांच्या परिश्रमानंतर शत्रूने तोफा वर आणल्या आणि तोफखान्याने वज्रगडाच्या तटा-बुरुजांवर मारा सुरू केला. 

मोगली सैन्य वज्रगडाच्या माचीवर पसरले. तोफांच्या माऱ्यामुळे वज्रगडाचा बुरुज व बाजूचा तट ढासळला. इथून वर चढायला सोपे होते. दिलेरखानाने आपल्या सैन्याला गडावर 
चढाईचा हुकूम दिला. आता या अवघड डोंगरी उतारावर मराठे व दिलेरचे सैनिक यांची हातघाईची लढाई जुंपली. मराठे बुरुज सोडून वरच्या तटाच्या आत गेले. मोगली सैन्य जागा धरून राहिले. मिर्झाराजाने आणखी कुमक वज्रगडाकडे पाठवली आणि अखेरीस मोगलांनी वज्रगड काबीज केला होता. 

संबंधित बातम्या