चष्मा 

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

मनतरंग
माणसाचं मन हे एक अजब रसायन आहे. आपल्याला येणारे अनुभव, आपल्या आसपासच्या घडामोडी कळत-नकळत आपल्या मनःपटलावर उमटत असतात आणि अनेकदा आपल्या कृतीमधून त्या प्रतिबिंबित होतात. बऱ्याचदा असंही होतं, की मनात एक असतं; पण बोलण्यातून, कृतीतून दुसरंच काहीतरी समोर येतं. कधीकधी मनाच्या निरनिराळ्या कोपऱ्यांमध्ये बरंच काही साठवून, दडवून-दडपून ठेवलं जातं. अशा या न दिसणाऱ्या; पण मानवी आयुष्यावर प्रभाव असलेल्या मनाला कंगोरे अनेक, त्याची रूपं अनेक! त्याच कंगोऱ्यांचा, रूपांचा मागोवा घेणारं 
नवीन सदर... ‘मनतरंग’

डोळे या इंद्रियांचा उपयोग भोवतालचं जग पाहायला शिकणं हा आहे खरा, पण हे जग आणि आपले डोळे यामध्ये एक इंद्रिय असतं, ते म्हणजे आपलं मन. जे खरोखरी असतं तेच आपण पाहतो का, हा तर युगानुयुगं तत्त्वज्ञानानं हाताळलेला प्रश्‍न आहे. जसजसं आपण वयानं वाढत जातो आणि आपण पाहिलेल्या व प्रत्यक्षात असलेल्या अनेक गोष्टीत तफावत आहे असं आढळतं; तेव्हा खात्री पटते की आपण लहानपणापासून ‘पाहायला’ शिकत नाही, तर आपण जे पाहिलं त्याचे अर्थ लावायला शिकतो. 

असंही जाणवतं, की म्हणूनच आपल्या आजूबाजूचे लोक हे जग पाहण्यासाठी आणि त्याचा अर्थ लावण्यासाठी एक चष्मा घेऊन वावरत आहेत. तो चष्मा कधी समाजाचा आहे, जाती-धर्माचा आहे, कधी शिक्षणाचा आहे, तर कधी प्रत्यक्ष आलेल्या अनुभवातून समजलेल्या अर्थांचा आहे. पण प्रयत्न हाच आहे, की सत्य समजावं; स्वतःबद्दल, या जगाबद्दल, आपल्या क्षमता, असणाऱ्या संधी याबद्दल. मला काय करता येईल, पुढं कसं जाता येईल याबद्दल. तसंच मी जे वागते आहे ते बरोबर आहे की नाही, तेही माझं मलाच समजावं याबद्दल. मग आपलीही सुरू होते धडपड... एक चष्मा तयार करण्याची. ही धडपड असते अनेकांच्या चष्म्यांप्रमाणे घडलेल्या घटना, पंचज्ञानेंद्रियांनी आपल्या मनःपटलावर उमटवलेले घटनांचे.. वस्तूंचे ठसे.. त्या मागचं सत्य... या साऱ्याचे अर्थ समजून घेत सत्य दाखवणारा आपला असा चष्मा तयार करायची. 

तयारही होतो बरं का हा चष्मा.. जो साथ करतो निरंतर..! ‘मला काय हवं, कुठं जायचंय, काय करायचंय हे सगळं समजून घ्यायला’ आपणही मग बिनधास्त होत जातो. आपल्या क्षमता आणि आवडीनिवडी याच्या जोरावर अनेक गोष्टी मिळवतो. आपण करतो आहोत ते बरोबर, असा विश्‍वासही येत जातो. 

पण मग होतं असं, की आपण जसजसं ‘मोठं’ होतो तसतशा या मनःपटलावरच्या उलाढाली वाढत जातात. जे आधी कल्पिलेलं असतं त्यापेक्षा वेगळंसुद्धा घडत जातं. ते समजून घेताना आपल्याबद्दल, आपल्या भोवतालाबद्दल आपल्याला समजलेल्या सत्याबरोबर एका भासाचीही जाणीव करून देतात तेच सत्य म्हणून... आणि काय चूक, काय बरोबर, नाय्य की अन्याय्य असे प्रश्‍न मनात संभ्रम निर्माण करतात. 

याचं कारण ज्ञानेंद्रियांना समजलेल्या गोष्टी समजून घेण्यासाठी मनाबरोबर अजून एक गाळणी लागते ती ‘मी’पणाची. माझा अनुभव, माझं शिक्षण, माझा व्यवसाय, माझी प्रतिमा, अशा मीपणाच्या नवीन काचा त्या चष्म्यावर लागत जातात. मग अधिक स्पष्ट दिसण्याऐवजी थोडं धूसरच दिसू लागतं. माणूस म्हणून भूमिका मागं पडत जाते आणि महत्त्वाच्या होतात अनेक कुटुंबातल्या, समाजातल्या, व्यवसायातल्या भूमिका. मग सुरू होते गंमत, जे आहे ते स्वीकारण्याऐवजी आपल्याला झेपणारा एक अर्थ, पर्यायानं तेच सत्य मानण्याची, स्वीकारण्याची.. तिथंच होते थोडी फसगत! 

मग येतात कित्येक अवघड वळणं; जोडलेली नाती सांभाळताना, कर्तव्य बजावताना, हक्क का अधिकार यामध्ये काही एक निवडताना, माझी आवड का आत्ता या क्षणी माझ्या भूमिकांची गरज, मजबुरी, माझ्या मनासारखं की समाजानं नेमून दिलेलं, अशा काही प्रश्‍नांना, प्रसंगांना सामोरं जाताना. या अशा प्रसंगी.. तो झेपणारा अर्थ सांगणारा चष्मा संभाळत जाताना आपली त्रेधा उडते.. अखेर कधीतरी तो चष्माही काही दाखवण्याचं बंद करतो. मग सुरू होते एक जीवघेणी कसरत. इतकी वर्षं गृहीत धरलेलं, प्रयत्नांनी हाताशी आलेलं आपलंच सत्य हरवून जातं अचानक.. कोलमडतो आपण.. गडबडतो.. दृष्टिहीन होऊन जातो. लोक मिड लाइफ क्रायसिस वगैरे नावं देतात आणि ते समजून घ्यायचं सोडून भलत्याच गोष्टीत अडकवतात. 

काही असेही येतात, मदत करायची भाषा करत. पुन्हा एकदा.. आपण जगलेल्या क्षणांचा आपल्यालाच अर्थ समजावून सांगायला.. अन्‌ करून टाकतात पार गोंधळ आपल्या मनाचा. कारण ते त्यांच्या चष्म्यातून बोलत राहतात आणि त्यांच्या चष्म्यातून पाहिलेलं जग आपल्याला दिसत नाही. मग वाटतं दृष्टीच काय पण आभास व्हायला लागतात, मनःपटलही पार निकामी झाल्याचे. मग काही वेळा चुकाच दिसायला लागतात फक्त. अपराधीपण आणि भीती वाढत जाते. रोज ज्या रस्त्यानं जायची सवय होती, ती वाटही निसरडी वाटू लागते. 

तरी इथंच घाबरायचं नाही, मित्र-मैत्रिणींनो... होतं असं प्रत्येकाला.. दुसऱ्यानं कसं पाहावं हे सांगणारे बरेच असतात. परंतु, जगण्याच्या एका टप्प्यावर असाच माझा चष्मा हरवल्यानं, समोरचं दिसण्याचं बंद होऊन मीही धडपडलो होतो, त्यातून मी कसा बाहेर पडलो हा अनुभव कुणी सांगत नाही आपल्याला. कदाचित आपणच तयार करत गेलो होतो, नको त्या काचा आणि माझा धूसर चष्मा हे त्यांनाही जाणवलेलं नसतं. वाट निसरडी नाही, तर नको असलेल्या भिंगांच्या काचा लावल्यात आपण, हे समजत नाही. 

म्हणजेच काय मंडळी ‘चष्मा’च हरवलेला असतो आपला. पण आपली इंद्रियं शाबूत असतात. एक हरवलं तर दुसरं शोधण्याच्या मागे असतात. काही काळ जातो दृष्टिहीन असल्याप्रमाणं... अशावेळी आपल्या ज्ञानेंद्रियांवर विश्‍वास निश्‍चित ठेवायला हवा.. त्यांची थोडी डागडुजी करून नवनवीन अनुभव घेत थोडं इकडं तिकडं भटकायला हवं. जगण्याच्या नव्या टप्प्यावर आवश्‍यक अशा क्षमता, कौशल्य विकसित करायला हवीत. या नवीन वातावरणातूनच मिळतील नवीन भिंगं आणि काचा. त्या मिळवून स्वतःला एक नवीन चष्मा करायला हवा... उमगत जातं मग पुन्हा, की चूक-बरोबर, काळं-पांढरं असं काही नसतं, तर जगणं रंगीबेरंगी असतं. स्वतःसकट काहीच तोलायचं नाही. योग्यायोग्यतेच्या परिमाणात, जे जे नवीन, अनपेक्षित असं काही घडलं आजूबाजूला किंवा आपल्याकडून ते... जगणं असंही असतं, बस ते मान्य करत पुढं जायचं. 

दोस्तांनो... एक मात्र आठवणीनं करायचं. आपल्याला जे जमलं ते जाणीवपूर्वक इतरांनाही सांगायचं... कोणी आलंच सल्ला घ्यायला, तर उपदेश न करता धीर द्यायचा, की दिसेल नीट नक्की.. फक्त धूसर झालेला आधीचा चष्मा टाकून द्यायला हवा. जे आधी केलं नव्हतं ते करून पाहायला हवं. आपण आपल्या पुरतं, आपल्याला झेपणारं जग जे सीमित करून घेतलं होतं, ते थोडं विस्तारायला हवं. भीती, चिंता मागं टाकून जमेल आपल्याला, हा विश्‍वास हवा. 

तसंच सत्य आणि भास यातला फरक सांगणारा.. जगण्याच्या प्रत्येक टप्प्यावर.. दर वेळी एक नवीन चष्मा हवा. 

संबंधित बातम्या