जाऊदे, सोडून द्या...

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

मनतरंग
 

कल्पना करा किंवा आठवेलही तुम्हाला, नुकतंच असं काही घडलेलं; की खूप गंभीर चर्चा होते, मनातलं बोललं जातं, प्रश्‍न मांडले जातात, त्यावर उपाय सांगितले जातात... त्यावर आणखी चर्चा होते, कुठल्याच उपायाचा काही उपयोग नाही अशा निष्कर्षाला ती चर्चा येऊन थांबते आणि मग कोणीतरी अनुभवी पटकन बोलून जातो, ‘माझं ऐकाल तर सोडून द्या... काही विचार करू नका, मनातून हा विषय काढून टाका!’ त्यावरही उत्तर तयार असतं, ‘कसं काय सोडून देऊ? इतकं सोपं आहे का ते? शिवाय ज्या गोष्टीनं कित्येक दिवस डोकं खाल्लेलं, दुखावलेलं असं कसं सोडून द्यायचं?’

अशी एखादी चर्चाच नाही, पण अनेक वेळेला सहज कोणी मन मोकळं केलं तरी ‘सोडून द्या’ असं सांगितलं जातं. जसं मोबाइल/काँप्युटर हँग झाला, की किंवा काही छोट्या मोठ्या बिघाडाला ‘रिस्टार्ट’ हे उत्तर दिलं जातं, तसं जगण्यातल्या अनेक प्रश्‍नांवर ‘सोडून द्या’ हे उत्तर दिलं जातं. किती वेळा आपणही ऐकतो असंच आणि अनेकांना सांगतोपण. या ‘सोडून द्या’ उपायावर अनेक सुंदर सुंदर वाक्यंही (कोट्स) आहेत गूगलकाकांकडं. याला इंग्रजीत ‘लेट गो’ करणं असं म्हणतात. यामुळं आपण कसं पुढं पुढंच जायला शिकतो, मनाचा विकास होतो वगैरे... असं बरंच. यावर खूप सारं बोललं गेलंय. जे खरंच मनातला आनंद आणि शांतता परत आणतं.

काय काय सोडून द्यायचं याची यादीही खूप मोठी आहे, बकेट लिस्टपेक्षा मोठी! काय काय करायचं राहून गेलंयपेक्षा काय काय सोडून द्यायला हवं या गोष्टी अधिक. कितीतरी राग, लोभ, आठवणी, दुखलेलं, खुपलेलं, वेदना, पटलेलं, न पटलेलं, दिवसेंदिवस मनात ठसठसत राहिलेलं, अर्धवट राहिलेलं, न जमलेलं, न करू दिलेलं किंवा मनात नसताना करायला लागलेलं, हातातून निसटलेलं, आपलं चुकलेलं, दुसऱ्याचं आपल्याबाबतीत चुकलेलं... अजून बरीच मोठी होईल यादी. मग याचा परिणाम ही बकेट लिस्ट वाढण्यावर होत असावा. कारण जे करायचंय त्यावर नीट लक्षच नाही...!

बरं हे सारं सोडून द्यायचं ठरवलंच तरी दुःख, कारण नकळत ते आपल्या रोजच्या जगण्याचा आधार होऊन बसतं. जणू कुठला खजिनाच! पण समजा, सोडून द्यायचं ठरवलंच, अगदी काय काय सोडायचं हे पक्कं केलं म्हणजे गडी मनावर दगड ठेवून अगदी तय्यार की आता सोडून द्यायचं सर्व.. पण त्याचं असं होतं, की एखादं खोडकर मांजराचं पिल्लू, घरात धिंगाणा घातला म्हणून दूर वनात सोडून यायचं आणि आपण घरी पोचायच्या आधी त्यानंच घरात आपलं स्वागत करायचं. जे जे म्हणून सोडून द्यायचं, विसरून जायचं असं ठरवलं ते मनात ठाण मांडून बसलेलं अनुभवायचं!

दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर... जितका प्रयत्न करावा विसरून जायचा, तितकं तितकं आठवणीत राहतं आणि त्यानं मन अगदी व्याकूळ होतं. कधी ‘पिछा सोडणार’ असं सतत वाटत असलं, तरी ते आपल्याला चिकटून चिकटून बसतं. म्हणजे सोडून दे याचा अर्थ समजत असतो बरं का, पण ते जमत नसतं, कळतंय पण वळत नाही या म्हणीप्रमाणं. याचा अर्थ खरी अडचण सोडून द्यायचं हा निर्णय घेण्यातली नाही, तर ते कसं करायचं हे प्रत्यक्ष न जमण्याची. 

त्याहून पुढची मजा अशी; की असेही भेटतात, जे अगदी विश्‍वासानं सांगतात, ‘मला जमलं बुवा. आजकाल मी काही लक्षात ठेवत नाही. मला कशाचाच त्रास होत नाही. मी सगळं सोडून देते/देतो.’ पण कसं जमलं, ते मात्र समजावून सांगता येत नाही. काळ हे उत्तम औषध, जमेल हळूहळू. प्रयत्न कर. मनातून माफ कर, असं सांगितलं जातं. 

चला आज आपण थोडं मनन करू. मला इथं जे. कृष्णमूर्तींचा एक विचार आठवतो. ते असं म्हणतात, की काय आठवेल किंवा आठवणीत बसेल हे आपण ते कसं साठवलंय त्यावर अवलंबून असतं. काही गोष्टी काळ्या पाषाणावरच्या रेघा, चरे असल्याप्रमाणं मनात उमटतात व तशाच साठवल्या जातात; की ज्या कधी पुसल्या जात नाहीत अथवा त्या पुसट व्हायला फारच कालावधी लागतो. काही गोष्टी मनात वाळूवरच्या रेघेप्रमाणं साठवल्या जातात. सहज पुसता येतात. तर काही गोष्टी पाण्यावरच्या रेघेप्रमाणं उमटतात आणि विरून जातात. पुढं ते म्हणतात, की गोष्टी कशा साठवाव्या हे आपल्या हातात असतं. 

मला ही गोष्ट खूपच महत्त्वाची वाटते, की सोडून द्यायला जमत का नाहीये या विचाराआधी ते धरून का ठेवलंय हा विचार करायला हवा. गजनीनं कसं सूड घ्यायचा होता म्हणून स्वतःच्या अंगावर गोंदवून घेतलं होतं, मेमरी लॉसची समस्या निर्माण झाली होती म्हणून. तसं अमुक एक गोष्ट लक्षात का राहावी, राहायला हवी हे नकळत आपण स्वतःच्या मनाशी बोलत असतो. ‘माझ्या लक्षात आहे सगळं, विसरले नाही मी, बोलत नाहीये आत्ता, पण वेळ आल्यावर बोलेन...’  असं तर किती जणांना सांगतो. कुठंतरी असंही वाटत राहतं, की ‘हे बरंय मला त्रास झाला आणि मग तो/ती का मजा करणार, कधीतरी झापता आलं पाहिजे, चांगलं सुनावता आलं पाहिजे... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं बरोबर हे मान्य झालंच पाहिजे. पहा मग इतकं घट्ट धरून ठेवल्यावर कसं काय सोडून देता येणार? कधी कधी त्यावर नुसतं मनाविरुद्ध नाही, तर हे ‘भयंकर आहे, भयानक आहे’ असादेखील भावनिक मुलामा असतो. मग काय करायचं?  

विसरता येत नाही याचं अजून एक कारण असतं, ते म्हणजे आपण जे विसरायचं ते सारखं आठवत असतो आणि त्यावरच विचार करत असतो. जर मी तुम्हाला असं म्हटलं, की आता इथून पुढं उंटांचा विचार करू नका... तर काय होईल? तुम्हाला उंटच दिसल काही क्षण. खरंतर आत्तापर्यंत विचारही नव्हता, पण कोणीतरी म्हटलं आणि लगेच ती प्रतिमा डोळ्यासमोर आलीच! जे विसरायचं आहे, ते ‘विसरायचं आहे, विचार करायचा नाही’ असं म्हणून कसं विसरता येईल? त्यासाठी मनात दुसरं काही, त्या वेदनेच्या, दुखण्याच्या तोडीचे असे चांगले पर्याय निर्माण करावे लागतील. ज्यात मनोरंजन असेल, सृजनशीलता असेल, नावीन्य असेल, आव्हान असेल, आपल्या क्षमतांचा पुरेपूर वापर असेल. या ठुसठुसण्यामुळं निर्माण झालेली पोकळी सुंदर विचारांनी भरून गेली, तर सोडून द्यायची गरजही नाही. त्याची धार, तीव्रता कमी झाली की झालं.

याचा अर्थ सोडून देण्यासाठी अथवा विसरण्यासाठी जे सोडून द्यायचंय, विसरायचंय त्यावर लक्ष केंद्रित न करता त्यावरचं लक्ष हटवायचं. जे धरून ठेवलंय त्यावरची पकड थोडी ढिली होऊ द्यायची. शक्यतो चांगलंच घडावं प्रत्येकाच्या रोजच्या जगण्यात, तरी ‘काहीही घडू शकतं’ माझ्या आयुष्यात... ते अगदी लगेच नाही पण कालांतरानं, मनाची समजूत घालून, स्वीकारायला माझं मन मी तयार करायचं. आपल्याला अनपेक्षित आहे, पण असं घडतं सर्वत्र कधी कधी. अगदी आपल्याकडूनसुद्धा हे स्वतःला नीट सांगायची फक्त आवश्यकता आहे. जे वाईट वाटलं होतं, राग आला होता, चिडचिड झाली होती, मन हिरमुसलं होतं तेही स्वाभाविक होतं. पण ते धरून ठेवायला नको. म्हणजे ते सुटेल हळूहळू.. आणि भरून जाईल मन पुन्हा आनंदानं.  

अरे हो... जाता जाता हेही सांगायला हवं, की हे सारं पटायला हवंच असं काही नाही बरं का.. पटलं तर घ्या... नाहीतर जाऊद्या हो, सोडून द्या..!

संबंधित बातम्या