चांगल्या गोष्टींचं पारडं

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

मनतरंग
 

समुपदेशन करताना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. खूप काही जगावेगळ्या नसतात त्या. कधीतरी आपल्या सर्वांच्या बाबतीत घडलेल्या असतात. ज्याला इंग्रजीमध्ये आपण phenomena म्हणू शकू, अशा एका गोष्टीचं आज आपण थोडं मनन करूया. 

अनेकदा समुपदेशन घ्यायला आलेल्या व्यक्तीला असं सांगितलं जातं, की निराशा, चिंता, काळजी यावर मात करताना फार पुढचा विचार करायचा नाही, रोजच्या दिवसावर लक्ष केंद्रित करायचं. रोजचा दिवस आनंदानं, चांगलेपणाच्या भावनेनं घालवायचा. किमान प्रत्येक क्षणी हे लक्षात राहणार नाही, तर रात्री झोपताना तरी आजचा दिवस कसा गेला यावर पाच-दहा मिनिटं विचार करायचा. चांगलं जे घडलंय त्याची सतत स्वतःला आठवण करून द्यायची.  

सामान्यपणे आपण प्रत्येक जण हा विचार कळतनकळत करतोच. दिवसभरातल्या चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी आपल्या मनात येतात. पण आपलं मन कोणत्या गोष्टी जमा करतं किंवा कोणत्या गोष्टींची बेरीज करतं हे पाहायला हवं, तिथं जरा जाणीवपूर्वक लक्ष ठेवायला हवं. चांगल्या गोष्टी अधिक जाणवल्या, तर दिवस छान गेला असं वाटतं. तर, अगदी वाईट नाही पण चांगल्या म्हणता न येणाऱ्या गोष्टी अधिक असं जाणवलं; तर दिवस फारसा चांगला गेला नाही असं वाटतं. दिवस छान गेला तर त्या दिवशी छान वाटतं, पण ते फार काळ टिकत नाही. पण दिवस छान गेला नाही असं वाटलं, तर ते कदाचित नंतर काही काळ स्मरणात राहतं... आणि लागोपाठ काही दिवस असे ‘फार चांगले नाही गेले’ तर मग काय फारच नाराज होऊन जातं मन. फार काही मोठ्ठे प्रश्‍न नसताना, उगाच मनाला नाराज राहायची सवय लागते. काही नकारात्मक भावनांच्या आहारी आपण जातो. मग सुरू होतात तक्रारी. बहुधा त्या तक्रारी घरचे, बाहेरचे यांच्याबद्दलच असतात. आपण कसं नीट, छान आणि आपण सोडून बाकीचं जग कसं त्रासदायक, असं आपण आपल्याच मनाला सांगत जातो. 

परंतु, कित्येक वेळा अत्यंत गंभीर असे आर्थिक, सामाजिक, तब्येतीचे प्रश्‍न असताना अनेक जण हसत हसत जगणारे असतात. नुसते तेच हसत किंवा आनंदी नसतात तर आपल्यासमोर कायम सुखद, आनंद देणाऱ्या गोष्टींची गोळाबेरीज करून आपल्यालाही क्षणार्धात प्रसन्न करून जातात. मग कसं काय जमतं हे त्यांना. याचं कारण, त्यांच्या प्रत्येक दिवसातलं त्यांच्या मनात त्रासदायक आणि दुःखद गोष्टींपेक्षा चांगल्या गोष्टींचं पारडं जड असतं. 

दोन अगदी साधी, छोटी, फार गंभीर नसलेली स्वगतं पाहू; त्यावरून समजेल की मनात बहुतेकवेळा चांगल्या न वाटणाऱ्या घटनांची मालिका कशी तयार होते. ‘काय ना आजचा दिवस खराबच होता, सकाळी सकाळी कामवाल्या बाईचा फोन आला की ती येत नाही. मग काय, छान वाटलं होतं की रविवारचा दिवस जरा आरामात घालवावा, तर पदर खोचून कामाला लागायला लागलं, मूडच गेला सगळा. त्यात भरीसभर म्हणजे लाइटच गेले, वेळेवर कामं झालीच नाहीत. बाहेर पडायचं होतं खरं, किती दिवसांपासून दोन-तीन ड्रेस मटेरियल तसेच पडलेत, ते शिवायला टाकायचे होते, ते राहून गेलं. आता काय आठवडा सुरू झाला की कसला वेळ होतो. बरं हे सगळं माझ्याच बाबतीत. हे आणि मुलं मजेत होती, त्यांचं रुटीन काही म्हणजे काही बिघडलं नाही...’ 

‘अरे काय सांगायचं, काल रात्रीच घरी येताना गाडीचं टायर पंक्चर. नेमका आज सकाळी गॅरेजवाला उशिरा आला, मग ऑफिसला यायला उशीर. उगाच मी काल सबमिशनची फाईल घरी घेऊन गेलो; काम तर झालं नाहीच, त्यात उगाच घरच्यांशी खिटपिट झाली. छे... लिंकच गेली, पटापट हे काम संपवून त्या दुसऱ्या प्रोजेक्टचं डिझाइन आज मला सुरू करायचं होतं. हे असं नेहमी होतं... आणि तेही माझ्याच बाबतीत.’  

या स्वगतांमध्ये अगदी दैनंदिनीतल्या म्हणाव्या तशा घटना आहेत, पण त्या त्या क्षणी मनात नाराजी उत्पन्न करणाऱ्या आहेत. असे अनेक संवाद ऐकतो आपण, बोलतो आपण. असा विचार करूया, की रोज.. अगदी रोज असणारच नाही का असं काही, चांगलं न म्हणता येणारं. आपला ज्यावर ताबा नाही अशा तर असंख्य गोष्टी असतील, कोणीतरी वाद घालेल, कोणी फसवेल, आपलंही चुकेल, कधी अन्याय वाटेल, कधी काही तर कधी काही... सुरुवात अशीच छोट्या गोष्टींनी होते आणि चांगल्या न वाटणाऱ्या गोष्टींची बेरीज अधिक होत जाते. प्रश्‍न, समस्या या किचकट असतातही. पण त्यांच्याकडं पाहताना या ‘चांगल्या न वाटणाऱ्या’ गोष्टींची बेरीज अधिक असेल तर त्या जास्तीच गंभीर वाटू लागतात. 

इथे वाईट वाटणं, मन नाराज होणं, खट्टू होणं, थोडं निराश होणं... याबद्दल काहीच आक्षेप नाही. आपण माणसं आहोत, सर्व भावना जाणवणार आणि जाणवायलाही हव्यात. पण नकारात्मक विचारांची बेरीज अधिक नको. नाहीतर मग ज्या गोष्टी चांगल्या आहेत, पण त्या क्षणी जाणवत नाहीयेत, त्यांची बेरीज करायला आपण कधी शिकणार?

ही बेरीज शिकायची म्हणजे काय करायचं? खरंतर फार काहीच करायला लागणार नाही. आपण जे भराभरा बोलत आहोत, स्वतःला सांगत आहोत, त्यात थोडा बदल केला की खूप फरक पडेल. एखाद्या न्यूज चॅनलवर कसं, काही घडलं की दिवसभर तेच तेच सांगत राहतात. म्हणजे एकच गोष्ट असते, पण ती सतत थोड्या थोड्या वेळानं सांगितल्यामुळं त्याचा मनावर खूप परिणाम होतो. तसं होतं आपलं काहीसं. आपणच आपल्यासाठी वृत्तनिवेदक होतो... आणि मग जे बिनसलंय ते सतत सांगत राहतो. जसं की - ‘छे.. असं घडायला नको, का असं होतंय सारखं, किती वाईट आहे हे, आयुष्य बकवास झालंय वगैरे वगैरे.’ आपल्याला बेरीज करायला शिकायची म्हणजे हे शब्द जरा बदलायचे आहेत.

वरच्या पहिल्या स्वगतात त्या गृहिणीनं असं काही म्हटलं तर... की आजचा सुट्टीचा दिवस जरा बिझी गेला खरा, पण काही हरकत नाही. आज अजूनही कोणत्याही क्षणी जर सगळी कामं अंगावर पडली, तर मी एकटी ती छान पार पाडू शकते ते समजलं. लाइट गेल्यानं जरा वैताग आला, पण मग त्या वेळात जरा विश्रांतीही मिळाली. ड्रेस शिवायला टाकायचं राहून गेलं, पण आता मी ते नीट प्लॅन करून करेन काम, आणि हो.. बाकी घरी सगळे मजेत.. मी कामात असं झालं आज. पण असं परत झालं तर मी कोणती कामं न करता स्वतःला वेळ ठेवू शकेन, हेही मला यातून शिकायला हवं आणि सर्वांनाच घरकामात सहभागी व्हायला सांगेन.

दुसऱ्या घटनेतील तो ऑफिस मॅन असं म्हणाला तर - गॅरेजवाला उशिरा आला, त्यामुळं उशीर झाला पण दहा-पंधरा मिनिटं शांततेत गेली. काल घरी जरा भांडणं झाली होती, मीही वैतागलो होतो. उगाच बोललो, पण आता शांत वाटलं. गॅरेजमध्ये वाट पाहताना कलकल कमी झाली. आता फ्रेश वाटतंय, पटापट आधीची कामं संपवतो आणि दुसऱ्या प्रोजेक्टला सुरुवात करतो.

म्हणजे या दुसऱ्या सकारात्मक स्वगतांमध्ये आपण काय केलं? घटना बदलल्या नाहीत, त्यावेळी त्यातून निर्माण झालेले भावही नाकारले नाहीत. पण थोडी वाक्यरचना बदलली. त्रास झाला असं सतत म्हणायच्या ऐवजी माझ्या क्षमतांचा कस लागला, असं स्वतःला सांगितलं. त्याचबरोबर मग नकळत त्रासदायक गोष्टी चांगल्या गोष्टीत रूपांतरित झाल्या आणि त्या चांगल्या गोष्टींचं पारडं जड झालं. 

एक छान विचार मला इथे आठवतो. माणसाकडं तिन्ही त्रिकाळ मौल्यवान असं काय आहे? तर, दोन डोळे..  हे सुंदर जग पाहायला, दोन कान.. छान सूर ऐकायला, दोन हात.. मस्तपैकी काम करायला, एक डोकं.. विचार करायला आणि एक हृदय.. करुणा, प्रेम यांची जाणीव व्हायला...! रोज सकाळ होते आहे, नवीन ऊर्जा घेऊन येते आहे, आपल्याला जगण्यासाठी अजून एक संधी देते आहे. वाचायला तत्त्वज्ञान वगैरे वाटेल हे, पण स्वतःला सांगता आलं, तर रोजच्या दिवसाची चांगल्या गोष्टींची बेरीज कायमच अधिक होत जाईल. असं नेहमी झालं तर काहीही घडो, त्या प्रसंगातून बाहेर पडताना मन शांत आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू येईल... ही माझ्याकडून खात्री.

संबंधित बातम्या