साथसंगत

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

मनतरंग
 

साथ... हा शब्दच किती आधार निर्माण करणारा आहे. या शब्दाचा प्रत्यक्ष जगण्यातला अर्थ खूप सुंदर आहे. या संकल्पनेची स्केल खूप मोठी आहे. यात रक्ताची नाती आहेत, जोडलेली नाती आहेत, नुसतं बरोबर असणं आहे, मदत करणं आहे, एकत्र काम करणं आहे, मी आहे तुझ्या बरोबर हे सांगणं आहे, कधीतरी प्रश्‍न सोडवताना सहभाग घेणं आहे... असे अनेक आयाम आहेत या संकल्पनेला. 

या साऱ्या जीवसृष्टीचं वास्तव हे, की येताना आपण एकटे असतो, जातानाही एकटे असतो. पण या जन्ममृत्यूच्या मधे जे जगणं आहे, त्यासाठी कोणाची ना कोणाची साथ असतेच. आई, वडील, भावंडं, वरिष्ठ, शिक्षक, मित्र हे तर आपल्याला सांभाळतात; त्याहीखेरीज काम करताना आपले सहकारी आपल्याला आपल्या ध्येयपूर्तीसाठी साथ करतात. ज्याचे विचार आपल्याला आवडतात तो वैचारिक साथ करतो आहे, असं नेहमी वाटतं.

अजाणतेपणीही अनेक लोक असतात आपल्या आसपास. ते कायम साथ करतील असे नसतात. परंतु, ते बरोबर आहेत यातच हायसं वाटतं. जसं रात्री कधी रस्त्यावरून एकटं जाताना, कोणी माणसं दिसली की बरं वाटतं. प्रवासात एकटं चाललो असलो, तरी सहप्रवासी असतातच आणि संकटकाळी त्यांची साथच आपल्याला तरून नेते. एरवीही रस्त्यात काही घडलं, तर ओळखपाळख नसतानासुद्धा अचानक मदतीला धावून येणारे असतातच की! म्हणजेच त्या त्या क्षणी आपण ज्या प्रसंगातून जात असतो, तेव्हा कोणी नुसतं बरोबर असलं तरी हुरूप येतो. हे नुसतं बरोबर असणं, प्रेमाची माणसं असण्याइतकंच आश्‍वासक आहे. 

आज यावर आपण विचार करतोय तो यासाठी, की निराशा आणि काळजी यातून येणारं एकटेपण ‘अशी निरपेक्ष आणि अनपेक्षित साथसंगत आहे,’ हे आपल्याला विसरायला लावतं. कारण मनातून ‘त्या क्षणी आपल्याला ‘हव्या असणाऱ्या माणसाकडूनच’ ती साथ हवी असते पण त्या वेळी मिळत नसते,’ म्हणून मन खट्टू होतं. कितीतरी माणसं आसपास, पण आपण मात्र मनातून एकटे असतो... म्हणजे त्या वेळी तसंच वाटतं. 

म्हणून असा विचार करून पाहूया, की कोणाची ना कोणाची कळतनकळत साथ असतेच, असतंच कोणी ना कोणीतरी आसपास. आपलं मन अशा वेळी मोकळं करता येईल का? ‘आपलंच माणूस हवं’ हा विचार बाजूला ठेवून... थोडं कोणाशी बोलून मदत मागता येईल का? उगाच एकटेपणा येऊन मनात झालेली गुंतागुंत बाजूला ठेवून जगणं सोपं करता येईल का? सगळेच मदत करतील असं नाही, पण कोणी ना कोणी नक्की मिळेल. 

याची दुसरी बाजूही लक्षात घेऊया, ती अशी की कोणाची तरी साथ मिळायला हवी, अशा गोष्टींवर मन खूप विचार करतं. पण ‘मी कोणालातरी साथ द्यायला हवी’ यावर आपण किती विचार करतो? म्हणजे अशी साधी सोपी साथसंगत करायला ‘जमेल तेव्हा मी तयार आहे’ असा विचार केला तर? असंपण आहे, की मदत म्हणून ज्याचा हात आपण पकडू, तोही तुमचा हात पकडणार आहेच ना. ज्याच्या बरोबर तुम्ही आहात, तोही तुमच्या बरोबर आहेच ना. मग जर तुम्हाला एकटं वाटत असेल, तर तुम्ही दुसरा एकटा शोधला तर? फार लांब जायची गरज नाही. शेजारीपाजारी असे भरपूर सापडतील. ज्यांना सांगता येईल... ‘चला एकटं वाटत असेल, तेव्हा एकमेकांना साथ करूया.’ 

कोणी अशीही शंका उपस्थित करेल, की आपण एका मर्यादेपलीकडं काही करू शकत नाही. कारण ज्याला प्रश्‍न आहेत, त्याचे प्रयत्न जास्त महत्त्वाचे असतात. जो तो आपापले प्रश्‍न सोडवत असतो. पण तरी विश्‍वास ठेवा किंवा कधीतरी आपण सर्वांनी हे अनुभवलं असेलच... की जर प्रत्यक्ष मदत करता नाही आली, तरी किमान कुणी असं म्हटलं, ‘काही लागलं तर सांग, मी आहे’ तर बरं वाटतंच. थोडा धीर येतोच. नुसतं कोणाबरोबर त्याची कामं करायला जाणं हासुद्धा खूप छान अनुभव असतो. कोणीतरी बरोबर आहे ही कल्पनाच खूप धीर देणारी असते.

निराशेतून आत्महत्या अशा केसेसच्या बाबतीत आपण पाहतो, की आपल्याला आता कोणीच वाली नाही, वाचवू शकत नाही, मदत करणारं नाही, या प्रसंगातून बाहेर काढणारं नाही... हेच वाटून गेलेलं असतं आणि त्या माणसाच्या मृत्यूनंतर असंख्य हळहळ व्यक्त करतात, की अरेरे समजलं नाही आपल्याला, आपण नक्की काहीतरी केलं असतं.

मला माझी एक विद्यार्थिनी आठवते. लवकर लग्न झालं होतं तिचं आणि खरंच छळ होत होता घरात. खूप सोसलं तिनं. पण जेव्हा जेव्हा समुपदेशनासाठी यायची तेव्हा मी, इतर शिक्षक तिला सांगायचो की काही झालं तरी जिवाचं बरं-वाईट करायचं नाही. जगणं अशक्य वाटलं, तर तू घरून पळून आमच्या घरी ये. काय करायचं हे पाहू. पण टोकाचा विचार करायचा नाही. खरंच त्यावेळी ती पळाली असती, तर आम्ही काय केलं असतं माहीत नाही, पण आम्ही सर्वांनी तिला हा विश्‍वास नक्की दिला होता. यामुळं मोठ्या हिमतीनं तिनं तिच्या सासरी बरेच बदल घडवले. इथं ‘कायम आम्ही बरोबर आहोत,’ हा विश्‍वास तिला लढायला बळ देत होता. 

एक महत्त्वाची बाब अशी, की अशी साथ कोणाला हवी असणं हे काही कमीपणाचं लक्षण नाही. कोणी तेवढ्यात परावलंबी होणार नसतो. उलट पुढं जायचं असतं, प्रसंगातून बाहेर पडायचं असतं म्हणून तर मदत मागितली जाते. जगण्यासाठी आवश्यक आत्मसन्मान आहेच. पण त्याहीपेक्षा आपण ज्यात अडकलोय, फसलोय त्यातून बाहेर पडण्याची इच्छा महत्त्वाची आहे. 

म्हणून मोकळेपणानं मदत/साथ मागायची आणि जरूर पडेल तेव्हा इतरांना करत राहायची. जे जमतंय ते करायचं आहे. जेव्हा वेळ आहे तेव्हाच करायचं आहे. कोणाला कसं जगावं हे तत्त्वज्ञान शिकवण्याची गरज नसते. आपल्याला कल्पनाही येणार नाही अशा अवघड परिस्थितीतून लोक वाट काढत पुढं येत असतात. क्वचित छोट्या छोट्या तांत्रिक अडचणी येतात जिथं काही कौशल्यं कमी पडतात. तिथं तेवढीच मदत, तेवढीच साथ आवश्यक असते. उदाहरणार्थ, समजा आपल्या बिल्डिंगमध्ये कोणी एकटे आजीआजोबा आहेत. आपण एखादवेळेस पटकन आजीला भाजी आणून दिली, तर तिचं काम होणार असतं. कशी आजची नवीन पिढी, म्हाताऱ्या लोकांना टाकून देते; यावर चर्चा करायची गरज नाही किंवा त्यांच्या मुलांना भाषण देण्याची गरज नाही. पण आपण नेमकं तेच करतो, जे त्यावेळी काही उपयोगाचं नसतं. कारण, बापरे उगाच अंगावर काम पडलं तर काय करा, असाही विचार येतो... आणि मग आपण काम करू शकत नाही याचं समर्थन म्हणजे लोकांना कसं जगता येत नाही, त्यांचं कसं चुकतं ही चर्चा असते. 

समजा एखाद्यावेळी ‘यात फारच अडकलो बुवा’ असं वाटलंच किंवा कोणी गैरफायदा घेऊ लागलं, तरी स्पष्ट पण मायेनं सांगता येईलच ना! नाही कसं म्हणायचं ते कदाचित शिकावं लागेल, पण त्या भीतीनं छोट्या मदतीचा आनंद घेण्यापासून स्वतःला का वंचित ठेवायचं? या छोट्या छोट्या मदतीनं ज्यांना ती मदत मिळते त्यांना फार कौतुक असतं. कारण अशी साथ फार दुर्मीळ ठरते. ती निरपेक्ष असते. एखादं अनामिक नातंही निर्माण होतं. जे कोणत्याही रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक दाट वाटतं. 

यातून प्रश्‍न सुटतील की नाही ते माहीत नाही, पण मनातून एकटेपण नक्की दूर होईल. धीर येईल. आपल्याला धीर आला, की दुसऱ्याला देता येईल. दुसऱ्याला मदत करता करता आपल्या प्रश्‍नांची तीव्रताही कमी होते. मग चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य कायम राहतं. आपल्या आसपास अशी माणसं आहेत, त्यांना शोधूया, आपला एकटेपणा घालवूया आणि आपणही असा कोणाचा शोध असू, तर त्याला बरोब्बर वेळेला सापडूया...!

संबंधित बातम्या