ये मोह मोह के धागे...

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

मनतरंग
 

एक गोष्ट आहे, अगदी पूर्वीच्या काळातली. त्यावेळी गुरुकुल पद्धत होती. मुलं गुरुजींच्या आश्रमात राहायची, शिक्षण घ्यायची. असाच एक आश्रम होता. अनेक गावातून मुलं तिथं शिकायला यायची. एक दिवस एक नवीन मुलगा, रघू, आश्रमात आला. त्याच्या कपड्यांवरून तो श्रीमंत घरातला वाटत होता. त्याच्या वडिलांनी सर्व मुलांसाठी खाऊ आणला, त्या आश्रमासाठीही काही सुवर्णमुद्रांची देणगी दिली. गुरुजींनी ती स्वीकारली. पण त्यांनी आणलेले उंची कपडे मात्र स्वीकारले नाहीत. त्या मुलाच्या अंगावरचे कपडेही घेऊन जायला सांगितलं आणि त्याला साधं धोतर आणि सदरा घालण्याची आज्ञा केली. तो मुलगा थोडा हिरमुसला. गुरुजींच्या ते लक्षात आलं. त्यावर त्यांनी अत्यंत प्रेमानं सांगितलं, ''हे उंची कपडे, दागदागिने ही सर्व मोहमाया आहे. शिकणाऱ्या मुलांना ते मोह नकोत, त्यांनी दूर राहायला हवं यापासून.'' त्या रघूच्या एवढंच लक्षात आलं, की आश्रमात हे कपडे चालणार नाहीत. कारण इतर मुलंही तशीच साध्याच वेशात होती. पण ''मोह'' म्हणजे काय, हे काही त्याच्या लक्षात आलं नाही. 

तो नवीन होता. लहान होता. त्यामुळं गुरुजींबद्दल अजून भय ही भावना निर्माण झाली नव्हती. त्यामुळं दुसऱ्या दिवशी पाठासाठी सगळे जमले असता, त्यानं सुरुवातीलाच गुरुजींना प्रश्न केला, की गुरुजी मोह म्हणजे काय? पहिल्याच दिवशी हा प्रश्न ऐकून गुरुजी खरं तर खुश झाले. पण लहान मुलाला काय समजावून सांगणार. म्हणून गुरुजी म्हणाले, ''मी सांगतो तसं केलंस, तर तुलाच काय सर्वांना या प्रश्नाचं उत्तर मिळेल.'' रघू लगेच तयार झाला. 

गुरुजी सर्वांना त्या आश्रमातल्या एका मोठ्या वडाच्या झाडापाशी घेऊन गेले. सर्वांना झाडाच्या सावलीत बसवलं. झाडाची सर्व माहिती दिली, त्याची महती समजून सांगितली आणि रघूला म्हणाले, की ''त्या झाडातून अनेक उत्तम चांगले गुण तुझ्यात यावे असं तुला वाटत असेल, तर त्या झाडाला मिठी मार. जितका जास्तवेळ मिठी मारून उभा राहशील, तितके अधिक गुण तुझ्यात उतरतील.'' दहा मिनिटं झाली, अर्धातास झाला, तरी तो तसाच उभा राहिला, त्याचे हात दुखायला लागले, पायाला रग लागली, पण त्याच्या मनात अधिक चांगले गुण हवेत असंच येत राहिलं. 

बऱ्याच वेळानी, गुरुजींनी त्याला सांगितलं, ''झाडानं सोडलं की ये परत.’’ त्यावर, बाकीची मुलं हसू लागली आणि म्हणाली, ''त्यानं झाडाला धरलंय, झाडानं त्याला नाही.'' यावर गुरुजी म्हणाले, ''हेच ‘मोह म्हणजे काय’ या प्रश्नाचं उत्तर आहे. आपल्याला वाटतं, की वस्तूच्या गुणवैशिष्ट्यांनी आपल्याला पकडलंय, पण तसं नसतं, ती वैशिष्ट्यं आपल्या मनात घर करून बसतात... आणि मग मनात लालसा उत्पन्न होते. आपलं मन त्या वस्तूंभोवती फिरत राहतं. कष्ट न करता चांगले गुण मिळतील या इच्छेनं हा मुलगा, त्रास होतोय तरी तिथंच उभा आहे. हाच मोह!’’   

दुसऱ्या शब्दांत सांगायचं, तर उंची वस्त्रं, दागदागिने, यामुळं मला कायमचा आनंद मिळेल, सुख मिळेल, समाधान मिळेल असं वाटत राहतं आणि आपण त्याच्या मागं धावतो... हाच मोह. 

मला ही गोष्ट फार आवडते. आपल्याला असंच वाटत आलंय, की गोष्टींमध्ये मोह उत्पन्न करण्याची ताकद आहे. जरा असा विचार करा, की मला एखादं काही आवडतं म्हणून मोह होतो. जे मला आवडत नाही त्याचा मोह होत नाही. काहीजण असतात, की त्यांना आंबे आवडत नाहीत, मग त्यांच्यासमोर तुम्ही गोड, रसाळ, आंब्यांचा ढीग उभा करा ते ढुंकूनही पाहणार नाहीत. त्या उलट, मधुमेह असणाऱ्या माणसाला दुरूनही गोड पदार्थ दिसतात. कारण त्यांना बंदी घातलेली असते खाण्याची... 

वस्तूंची विक्री करताना या मोह तत्त्वावर कितीतरी जाहिराती केल्या जातात... पुरुषांच्या अंडरवेरच्या जाहिरातींपासून ते परफ्युमच्या जाहिरातींपर्यंत एक तरी सुंदर मुलगी असतेच. साबण, शांपू या जाहिरातींमध्ये स्वतःला सुंदर बनवण्याचं आवाहन असतं आणि कळत नकळत आपणही या वस्तूंकडं आकर्षिले जातो. हे सगळं होतं ते आपल्या मनात निर्माण होतं. ती आवड, निवड, ते हवं असणं, ते मिळालंच पाहिजे असं वाटणं, हे आपल्या मनाचं निर्माण केलेलं असतं. म्हणजेच कोणी आपल्याला मोहात पाडत नाही, आपण आपलंच मोहात पडतो.

शराबी चित्रपटातलं गाणं... त्यातली एक ओळ आठवली.. ''नशा शराब में होता तो नाचती बोतल!'' किती खरं आहे की नाही हे. इथं काही लोक म्हणतील की दारू आणि इतर ड्रग्जमध्ये निकोटीन असतं, ते आपल्या मेंदूत डोपामाईन जास्त प्रमाणात रिलीज करतं, त्यामुळं जी उगाच आनंदाची जाणीव निर्माण होते त्याच्या आहारी माणूस जातो. ही जैविक घटना आहे, फक्त मानसिक नाही.       

आजकाल मोबाइल स्क्रीनच्या आहारी गेलेली तरुण पिढी पाहतोय आपण. त्याचं स्क्रीनमुळं  डोपामाईन रिलीज होणं, मग त्याचा नाद लागणं, त्यावर बंदी घातली, की आक्रमक प्रतिक्रिया देणं... हेही यातंच मोडतं.  

आजकालच्या जंक फूडचंही तसंच म्हणता येईल. या पदार्थांनी जिभेचे चोचले पुरवले जातात. पण पोटभरून शांतता येत नाही.

पण एक प्रश्न स्वतःला विचारू, की या गोष्टींकडं मन का आकर्षित होतं, पावलं का वळतात? जेव्हा आनंद आपण आपल्या मनात नाही, तर एखाद्या वस्तूमध्ये शोधतो, तेव्हा गरज नसतानाही त्या वस्तूंच्या आहारी आपण जातो. लोक व्यसनाच्या आहारी जातात, कारण त्यातून आनंद मिळेल, आपले प्रश्न सुटतील, किमान मी ते विसरेन, अशी कुठंतरी त्याक्षणी खात्री वाटत असते. खरं तर असा आनंद काय किंवा प्रश्नातून मुक्ती काय हे दारूतच काय, पण कोणत्याही भौतिक गोष्टीत नाही. ते माहीत असूनही मन त्यात घोटाळत राहतं, त्या आनंदाच्या प्रतीक्षेत. असंही वाटून जातं, वाटतं, की हे शेवटचं, फॉर लास्ट टाइम, ते पटकन मिळालं तर बरं होईल, त्याचा आनंद मिळाला की त्या मोहातून बाहेर पडता येईल, अशा अर्धवट इच्छा मनात राहायला नको.

पण असं फार क्वचित होतं, की एकदा ती इच्छा पूर्ण झाली आणि मग मनानं त्याची पुन्हा मागणी नाही केली. अथवा या अशा गोष्टींमुळं मन शांत झालं. कदाचित दोन मागण्यांमधला कालावधी वाढेल, पण मनात हवंस वाटलंच नाही आणि त्याविषयी असमाधान राहणार नाही हे ‘मनाचं प्रशिक्षण केल्याशिवाय जमणं जरा कठीण आहे.’ हे मोह फक्त दारूचे किंवा मोबाइलचे नाहीत, कशाचेही असतात. पैशांच्या मोहापासून ते घरातल्या चमचा-वाटी... कशाचेही. दारू इतकं त्यानं नुकसान होत नाही. पण सतत काही हवं आणि नाही मिळालं, की नाराजी, निराशा, तसंच कधीकधी आक्रमकता हे होतच राहतं.

परंतु, हे सारं लक्षात येऊन या मोहातून बाहेर पडलेलं आपण पाहतोच की. खरी गरज आणि इच्छा यातला फरक त्यांना समजलेला असतो. म्हणजेच बाहेरचं जग तसंच असतं. पण माणसानं आपल्या विचारांचे आयाम बदललेले असतात. आपली क्रियाशीलता, सृजनशीलता त्यांना समजलेली असते. तात्पुरत्या आनंदापेक्षा सुंदर असं काही निर्माण करून कायमचं समाधान मिळतं हे त्यांनी अनुभवलेलं असतं. हे मनाचं शिक्षण करणं, विचारांचे आयाम बदलणं नक्कीच सोपं नाही, पण अशक्यही नाही. 

कोणी म्हणेल काय हरकत आहे, एकच आयुष्य आहे, जे आवडेल ते करा, मस्त मज्जा करा, आहे त्या गोष्टींचा उपभोग घ्या. हो, काहीच हरकत नाही, पण मिळालं नाही, तर जी निराशा आणि नाराजी येते त्याचं काय? आणि फक्त नाराजी येते असं नाही, तर आपण मिळालं नाही म्हणून अनेकांना जन्मभर दोष देत राहतो; हे उपयोगाचं नाही. 

हे मोहाचे धागे माझ्याच मनात निर्माण झाले आहेत, एवढं जरी मनोमन पटलं तरी खूप फरक पडतो. सुरुवातीच्या कथेमध्ये गुरुजी काही गोष्टी करायला बंदी घालतात. पण हा मार्ग नेहमीच उपयोगी पडतो असं नाही. कारण संधी मिळाली, की पुन्हा लक्ष त्याच गोष्टींकडं जातं. आपल्याला नक्की त्या गोष्टींची गरज आहे का, मिळालं तर आनंद नक्कीच होणार आहे, पण मिळालं नाही, तर अस्वस्थता, नाराजी येणार आहे का? तसं होणार असेल तर ती गरज नसून तो लोभ आहे, मोह आहे. असा विचार करून तर पाहूया. हे मिळालं नाही, ते मिळालं नाही असं वाटून उगाचच येणारी निराशा, नाराजी टाळूया. 

अर्थात सर्वांना हे रुचेलच आणि मान्य होईल असंही नाही, याचा तरी मोह कसा करावा?

संबंधित बातम्या