कोण कोणास काय म्हणाले

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

मनतरंग
 

आपल्या या जगात, काय म्हटलं गेलं यापेक्षा कोण म्हणालं याला जास्त महत्त्व आहे. एकमेकांशी वागताना फक्त कोण म्हणालं, काय म्हणालं एवढं पुरे नाही; तर ‘कोण कोणास काय म्हणालं’ हे सर्व महत्त्वाचं ठरतं. कारण तरच आपल्याला त्या ‘म्हटल्याचे’ खरे अर्थ समजतात, असं आपल्याला ठामपणे वाटत असतं. ‘ते अर्थ’ समजले, की एखादा किंवा एखादी आपल्याशी असं बोलूच कशी शकते, काय हक्क आहे बोलायचा, हिंमतच कशी होते वगैरे आपल्या मनात सहज येऊन जातं. अजरामर अशा सासू सुनांचे दाखले द्यायचे झाल्यास, आईनं रागावून ‘काय गं, हे काय केलंस, जमलं नाही...,’ असं म्हटलं तर आपल्याला एखादी गोष्ट जमली नाही असा अर्थ घेतला जातो, पण हे वाक्य सासूनं म्हटलं तर...? मग त्याला बरेच अर्थ चिकटतात. म्हणजेच कोणाचं तरी ऐकायला आपलं मन तयार असतं आणि कोणाचं मुळीच ऐकायचं नसतं.

हे असं कोणीही कोणाला बोललेलं चालत नसल्यानं, आपण दुसऱ्याच कोणाला आपल्या वतीनं बोलण्याची परवानगी देतो. जसं, आपली मुलं आपलं ऐकत नाहीत पण शिक्षकांचं ऐकतात किंवा एखाद्या मावशीवर, आजीवर, दादावर, ताईवर, मामावर जास्त विश्‍वास असतो. मग आपण या लोकांवर ते ‘म्हणण्याची’ जबाबदारी देतो. ‘तू म्हण किंवा तुम्ही बोला, म्हणजे ऐकेल तो/ती... वगैरे. म्हणजे शब्द तेच, सांगणं तेच पण कोण म्हणतंय त्यावर त्यातला भावार्थ पोचेल की नाही हे अवलंबून. 

यात अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे कोण कसं बोललं. म्हणजे बोलताना टोन कसा आहे, आवाजाची पट्टी, खोचकपणे बोलण्याचा आवेश आहे का, मुद्दाम आवडत नाही पण चिडवायला कोणी काही म्हणत आहे का. जेव्हा मुलं आजीचं, मामाचं ऐकतात तेव्हा ते फार कोमलपणे मुलांशी बोलत असतात. म्हणजेच, आपण बोलतो कसं यावर पुढच्या संवादाचा टोन ठरणार असतो. 

संवाद सकारात्मक, मनं जोडणारा केव्हा असेल; जेव्हा एक काही म्हणेल व दुसरा ‘ते म्हणणं-एक मुद्दा’ असं समजावून घेऊन मान्य करेल. हे एकाचं काही म्हणणं, रागावणं असेल, टीका करणं असेल, सूचना देणं असेल किंवा चुका सांगणं असेल. पण हाच संवाद नकारात्मक, एकमेकांची मनं छेडणारा किंवा छेदणारा केव्हा होईल, जेव्हा मुद्दा लक्षात न घेता बोलणाऱ्याचा टोन फक्त लक्षात घेतला जाईल. तेव्हा मग ‘तू कोण मला सांगणारा, तुला सांगितलंय तेवढं कर किंवा याचं का मी ऐकायचं’ या अशा प्रतिक्रिया मनात निर्माण झाल्यामुळं संवादाचा वादविवाद होईल. 

मानसशास्त्राच्या पुस्तकांमध्ये एक छोटा सिद्धांत सापडतो. त्यानुसार प्रत्येक संवाद ही एक देवाणघेवाण आहे. आपण बोलतो म्हणजे जणू क्रिकेट मधल्यासारखे फटके मारत असतो (strokes). हे फटके कोण मारतं? तर आपल्या प्रत्येकात एक पालक असतो, एक बालक असतो आणि एक चालक असतो, यापैकी कोणीतरी हे बोलण्याचे फटके मारत असतं. पालक म्हणजे अधिकारवाणी, आज्ञा देणं, तसंच काळजी, माया दाखवणं. बालक म्हणजे मागण्या, आधार शोधणं, कोणावर तरी अवलंबून असणं, तसं भासवणं. पण चालक म्हणजे तर्कानं विचार करणं. म्हणजेच दर वेळी प्रत्येकामधला पालक, बालक किंवा चालक बोलत असणार, दुसऱ्याच्या पालक, बालक किंवा चालकाशी. त्या क्षणी कोण बोलेल आणि कोण उत्तर/प्रतिक्रिया देईल, यावर तो संवाद कसा पुढे जाईल ते ठरेल. एक अधिकार वाणीनं बोलतोय आणि दुसरा आज्ञाधारकपणे ऐकतोय असं झालं तरी चालेल किंवा एखादा आधार मागतोय, मदत मागतोय, अजिजीनं काही बोलतोय व दुसरा त्याला आधारात्मक काही उत्तर देतोय, तरीही चालेल. अशी परस्पर पूरकता दर वेळी मिळणं थोडं कठीण असतं. घरी काय बाहेर काय, प्रत्येक जण स्वतःला ‘काही एक’ समजत असतो. मनाला छेद देणारं बोललं जाण्याची सहज शक्यता असते. एकाच वेळी दोघांमधली अधिकारशाही जागी व्हायची शक्यता अधिक असते.

जसं दोन मुलांची भांडणं सोडवायला दोघांच्याही आया येतात आणि दोघी भांडत बसतात. कारण दोघीही पालक, अधिकार दोघींकडेही, मग माघार कोणी घ्यायची? तिकडं ती मुलं भांडण विसरून खेळायलाही लागतात किंवा चक्क या भांडणाची मजा घेतात. आता याच आयांमधले ‘चालक’ बोलू लागतात, तेव्हा काय होऊ शकेल... एक म्हणेल, ‘माझा मुलगा जरा आहेच खोडकर, त्यानं खोडी काढली असेल. पण मी काळजी घेईन, कोणाला दुखापत करायची नाही हे समजावून सांगेन.’ त्यावर दुसरी म्हणेल, ‘होय हो, मुलं भांडण करणारच. मीपण सांगेन माझ्या मुलाला, की इतकं मनावर नाही घ्यायचं.’ अर्थात, जेव्हा चालक बोलतील एकमेकांशी तेव्हा ‘कोणीच कोणाला काहीच’ म्हणणार नाही, जो तो आपापली जबाबदारी मान्य करेल. 

अधिकारशाही जशी भेदक तसंच बालक मनोवृत्तीचं परावलंबित्वही. कोणी कोणाला समजून घ्यायचं हा यामधला मुख्य प्रश्‍न. 

एक जोडपं, त्यांच्यातला हा संवाद -

तो - तू लवकर यायला हवं होतंस, माझी खूप पंचाईत झाली. 

ती - ए दर वेळी काय मीच, मलाही कामं असतात. मी बसून नसते, थोडं आपलं आपण करायला काय झालं?

तो - तू असं कसं बोलू शकतेस माझ्याशी... 

ती - तू माझ्याशी कसं बोलतोयस ते पहा... 
वाचकांना अंदाज येईल, की हा संवाद असाच किती काळ आणि कसा सुरू राहील. इथं दोघांनाही दुसऱ्यानं समजून घेण्याची अपेक्षा आहे, दोघांमधली बालकं एकमेकांकडं काही मागत आहेत. कोण मोठं होणार मग?  

यापेक्षा हा संवाद असा झाला तर..? 

तो - तुला लवकर यायला जमलं नाही का, मी बरीच वाट पाहत होतो तुझी आज. 

ती - नाही ना जमलं. माझंही लक्ष होतं घराकडं, पण कामं संपवायची होती बरीच. 

तो - दमली आहेस का, करशील का मला मदत..?

ती - नक्की करेन, मला अजून थोडा वेळ दे. फ्रेश होते, कॉफी करते मग येतेच मदतीला..   

दोन्ही सकारात्मक संवाद जर पहिले, तर असं लक्षात येईल की मुद्दा तोच आहे. पण मांडलाय दुसऱ्याला समजून घेऊन.

तरी हे खूपच सरळ सरळ, आमने-सामने बोलणं झालं. हे ओळखता येतं, अंदाज बांधता येतो. आपला आवाज चढतोय, आपण चिडलोय, हे लक्षात आलं; तर स्वतःमध्ये बदल करता येतो. काही वेळा तर वरवर दुसऱ्याला समजून घेऊन बोललं गेलं आहे असं वाटतं, पण मनात हेतू वेगळाच असतो. जसं टोमणे मारणं, लेकी बोले सुने लागे असं काही बोलणं. यात सुरुवातीला, हसत हसत सुरू झालेल्या शब्दफैरी मोठ्या कडाक्याच्या भांडणात रूपांतरित होऊ शकतात. जसं - 

ती - किती छान नं, लोकांना कसा वेळ मिळतो नाही फिरायला... 

तो - असं करतो, मी नोकरी सोडून घरी बसतो, मग आपल्यालाही वेळ मिळेल.

या दोन वाक्यांनंतर काय होईल त्या घरात, हे चाणाक्ष वाचक सहज ओळखतील. या ऐवजी, ‘तुला वाटेल मी सारखीच मागं लागते, पण मला खूप इच्छा आहे फिरायला जायची, ठरवूया का कधी, तुझ्या सोयीनं..’

याला वेगळं उत्तर यायची शक्यता वाढते. 

म्हणजे सुरुवात जर चालक मनोवृत्तीतून झाली तर फरक नक्कीच पडणार आहे. चला, सुरुवात आपण करू, कोणी कसं का बोलेना, आपण मुद्दे नीट मांडू आणि उत्तरांमधील मुद्द्यावर लक्ष केंद्रित करायचं असं ठरवू. पहा किती फरक पडतो. इथं आपण काही खोटं खोटं चांगलं बोलत नाही, फक्त वाद-विवाद टाळत आहोत. नीट समोर बसून बोलून जे गुंतलेले मुद्दे सुटू शकतात, ते केवळ प्रश्‍नाला उत्तर देऊन सुटतात असं नाही. एखाद्या वेळी तर शांत बसणं हाही पर्याय उत्तम असतो. दरवेळी अशी समजूतदार भूमिका घ्यायला जमेल असंही नाही, परंतु जेव्हा जाणवेल की आपणही जरा मनाला लागेल असंच बोललो, तेव्हा मनापासून माफी तर मागता येईल. यातून काय चांगलं होईल, चांगलं होईलच का ते माहीत नाही. पण आपलं बोलणं साधं, तर्कशुद्ध, स्पष्ट पण दुखावण्याची धार नसलेलं झालं, तर आपलंच मन शांत राहील. 

तरी एक मुद्दा मनात शिल्लक राहील; मी बदलेन हो, पण बाकीचे बदलतील का... पण आपण तर बदलून पाहू.. ते तर आपल्या हातात आहे.

संबंधित बातम्या