सर्वांत जास्त अंतर

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

मनतरंग
 

आज एका प्रश्‍नाचं मनन करूया. प्रश्‍न असा की या जगात सर्वांत जास्त अंतर कशात आहे, की जे मोजता येणं थोडं अवघड आहे? पृथ्वीचे कोणतेही दोन खंड? दोन ध्रुवं? या विश्‍वातले कोणते तरी दोन तारे? की दोन माणसांची मनं? सर्वांत जास्त अंतर कशात आहे? विचार करायला गेलो तर असे पर्याय अनेक असतील. आज काही अंतरं काटेकोर मोजता येतील. काही काटेकोर नाही पण अंदाजे नक्कीच सांगता येतील. जसं दोन मनातील अंतर हे दोन विश्‍वांमधील अंतराएवढं असतं असं म्हटलं जातं. पण ज्याचा अंदाजही बांधता येणं अवघड आहे, असं अंतर असतं ते; ‘आपण माणसं जे बोलतो ते आणि जे वागतो ते यामधलं.’ जे जे आपण सहजपणे बोलून जातो, ते ते तसं आपण वागत नाही किंवा वागू शकत नाही. आपण काय बोलू आणि काय वागू याचा अंदाज बांधणंही थोडं अवघड असतं. म्हणजेच उक्ती आणि कृती यांच्यामध्ये सर्वांत जास्त अंतर असतं. अशी एक म्हणपण आहे, ‘बोलणं सोपं पण करणं अवघड.’

संत तुकारामही म्हणून गेलेत, ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.’ म्हणजे जो बोलण्याप्रमाणे वागतो तो पूजनीय आहे. कारण ते सहज सोपं नाही. त्या मागं एक गाढ विश्‍वास आहे, एक मनोभूमिका आहे, वाटेल ते सहन करण्याची ताकद आहे. कितीतरी कथा, चित्रपट यांमधून अशी ‘बोलू तसे वागू’ हे तत्त्व पाळणारी माणसं आपण पाहतो, त्यांचे समाजात झालेले हाल पाहतो. कधीतरी स्फुरणही चढतं आपल्याला, पण ते काही काळ असतं आणि सरतेशेवटी छे; हे आदर्श आहे, हे सिनेमात ठीक आहे, प्रत्यक्ष फारच अवघड आहे असंही म्हणतो. 

थोडा विचार करूया, की का अवघड असावं... जे बोलू ते आणि ते किंवा त्याप्रमाणे करणं?

ढोबळमानानं असं दिसतं, की मनात काहीही विचार येऊ शकतात. आपली कल्पनाशक्ती अफाट आहे. आपण अक्षरशः काही विचारात आणू शकतो. तसंच आपल्याला काहीही वाटू शकतं (feel). त्यामुळं बोलताना आपण मोठ्यानं विचार केल्याप्रमाणं बोलतो (Loud Thinking). म्हणजे नुसते विचार एकासमोर एक मांडत जातो. काही वेळा समोरच्याला दिलासा म्हणून, तो प्रेरित व्हावा म्हणून, त्याची समजूत घालायची म्हणून आपण काहीही बोलू शकतो. पण होतं ना असं एखादवेळेस, की समोरचा पकडतो आपल्याला, की तू म्हणाला होतास/म्हणाली होतीस असं करता येईल, तसं करता येईल, मग करूया. जर ते करणं वास्तविक (Practical) असेल तर ठीक, नाहीतर पंचाईत होते. यामुळं काही लोक पहा, अगदी जपून बोलतात. बहुतेक वेळा त्याचं कारण ‘आपण पटकन काही बोलून जायचो आणि व्हायची पंचाईत,’ असंच असतं.

उक्ती आणि कृती यातील अंतराचं अजून एक उदाहरण म्हणजे जे आपण अनेकदा, अनेकांना सल्ला म्हणून सांगत असतो ते आपल्यावर वेळ आली की करू शकत नाही... किंवा अनेकांना जे करू नका सांगितलेलं असतं ते आपल्याला करायची वेळ आली की तेच करतो. साधं म्हणजे कमी मार्क्स पडले तर मुलांना ओरडू नका, समजून घ्या हे इतरांना समजावून सांगणं सोपं असतं, पण आपल्या मुलाला मार्क्स कमी पडले की आपला तिळपापड होतो. पालकांची तक्रार अशीही असते, की मुलं बिनधास्त ‘अभ्यास करतो’ म्हणतात पण काही करत नाहीत. रागावणं टाळण्यासाठी ‘हो करतो अभ्यास’ म्हणणं सोपं आहे, पण अभ्यास करणं अवघड! ती एक साधनाच असते. अनेक प्रलोभनांवर विजय मिळवावा लागतो. नेटानं बसावं लागतं. 

‘नको फार विचार करू, नको मनाला लावून घेऊ,’ असा सल्ला सर्वांकडूनच दिला जातो. पण आपल्यावर वेळ आली, की आपण तेच करतो. कारण फार विचार न करणं, मनाला लावून न घेणं हे जमायला खूप प्रयत्न करावे लागतात. आपल्या मनोभूमिका, विश्‍वास यावर खूप काम करावं लागतं. पण, कोणी कसं वागावं याचं व्याख्यान आपल्याकडं तयार असतं. 

आजकाल सोशल मीडियावर इतकं तत्त्वज्ञान पाजळलं जातं, की जो तो स्वतःला फार भारी समजतो. किती घणाघाती टीका, टोमणे, चिडवाचिडवी, नावं ठेवणं हेच वाचलं जातं. जणू काही लिहिणारा माणूस धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे. असेलही, पण खोलवर विचार करायला गेलो तर असंच घडत आलं आहे, की जे बोलू इतरांच्या बाबतीत ते स्वतः करायची वेळ आली किंवा तसा प्रसंग स्वतःच्या बाबतीत घडला, तर आपण कसे वागू याची खात्री नाही. टीका करणारे खूप दिसतात पण बदल घडवायला मदत करणारे, बदल घडवू शकणारे किती असतील? प्रमाण कमीच असणार हे. एका कथेत वाचलं होतं, की एक चित्रकार त्याचं चित्र भर चौकात ठेवतो व असं आवाहन करतो की या चित्रात अनेक त्रुटी आहेत, तर त्या मला सांगा, दिवसभरात शेकडो सूचना येतात. मग दुसऱ्या दिवशी तो असं म्हणतो, की आता या दुरुस्त कशा करायच्या ते सांगा... तर कोणीही पुढं येत नाही!

फेसबुकच्या सुरुवातीच्या काळात मीही मारे ऐटीत भरपूर काय काय सुंदर सुंदर विचार पोस्ट करायची. एकदाच मला माझ्या एका सरांनी सांगितलं, की तेच लिही, जे तू वागली आहेस, ज्यातून तू गेली आहेस, जे तुला जमलं आहे... माझा दृष्टिकोनच बदलून गेला यामुळं. 

उक्ती आणि कृती यामधील अंतराचा अजून एक पैलू असा, की बोलताना, काही संकल्प करताना जी परिस्थिती असते तीच कायम राहत नाही. आपले विश्‍वास बदलत राहतात, आपलं अनुभवातून शिक्षणही होतं. बाह्य परिस्थितीही बदलत राहते. याचा परिणाम असा, की जे पूर्वी म्हटलं होतं ते, त्यात आपणही बदल करण्याची आवश्यकता असते. मूळ विचार तोच राहतो, पण तो साध्य करण्याची साधनं, मार्ग, माध्यमं बदलत राहतात. मग जे ठरवलेलं असतं ते, तसं तंतोतंत नाही करता येत. जे ठरवलेलं असतं तसं करता येत नाही... हा तर घरातल्या प्रत्येक गृहिणीचा अनुभव. कारण तिचं वेळापत्रक इतरांच्या वेळापत्रकावर अवलंबून असतं. तसंच कितीतरी आर्थिक नियोजनं ही अनेक बाह्य कारणांमुळं कोलमडलेली आपण पाहतो. म्हणजेच वैयक्तिक आयुष्यापासून ते राष्ट्रीय परिस्थितीपर्यंत जे बोलू, ठरवू ते आणि तेच होतं, करता येतं असं नाही. 

म्हणून हे सत्य स्वीकारणं खूप महत्त्वाचं वाटतं मला. यातून आपली निराशा तर टळेलच, पण आपण इतरांकडंही सौहार्द दृष्टीनं पाहू शकू. कारण अनेकदा आपण चुकलो याची चीड येत नाही, पण समोरचा करायला चुकला याची चीड प्रचंड असते. आपण स्वतःसाठी उत्तम वकील, तर दुसऱ्यासाठी उत्तम न्यायाधीश असतो. 

जगण्याचे हे प्रवास सर्वांसाठी सारखेच असतात. इतरांना ‘असं का वागलास तू?’ हा विचारलेला प्रश्‍न आपल्याही वाटेला येतो. असं का वागतात लोक असं म्हटलं, की आपल्यावर कधीतरी ती वेळ येणार हे निश्‍चित असतं. कारण स्वतः त्यातून गेल्याशिवाय त्याचं खरं उत्तर मिळत नसतं. हा निसर्गाचा नियम आहे आणि न्यायही. जितक्या लवकर हे समजत जाईल, तेवढं आपल्याकडून कमीत कमी विश्‍लेषण होईल आणि स्वतःला तसंच इतरांना आपण जास्तीत जास्त स्वीकारत जाऊ. मोजकं असं नाही पण जे शक्य आहे तेच बोललं जाईल आणि आपल्यातला विरोधाभास कमी होत जाईल. आपल्यावरचा कोणताही प्रसंग, वेळ कधीच टाळता येणार नाही, कोणालाच... पण अनेकांचं जगणं थोडं विशाल दृष्टिकोनातून पाहता येईल. सर्वांचा आदर करणं अधिक सुकर होईल.  

अर्थात जे मनात आहे ते ते करण्याचा आणि आपल्या बोलण्याचा आदर आपल्या कृतीतून करण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू ठेवायला हवा. त्यातून एक वेगळीच ताकद मिळत जाते. आपण अनेक गोष्टी स्वतःमधल्या बदलू शकतो, त्यावर ताबा येऊ शकतो. आपल्याला जमलं तर दुसऱ्याला मदत करू शकतो. पण त्याआधी उक्ती आणि कृती यातील अंतर मान्य करूया. स्वतःला आणि इतरांना अधिक स्वीकारूया. त्यातून किमान आपण आणि आपली माणसं यांमधली अंतरं तर कमी होतील.   

संबंधित बातम्या