दुःखाचं दुःख

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

मनतरंग
 

माणसाचं सर्वांत मोठं दुःख कोणतं? या प्रश्‍नावर अनेक विद्यावाचस्पती घडतील. पण मला या प्रश्‍नाचं उत्तर मिळालंय आणि ते अनेक प्रसंगी मी पडताळूनही पाहिलंय. माणसाचं सर्वांत मोठं दुःख म्हणजे ‘कोणत्याही दुःखाचं दुःख.’ हे काय नवीन असं वाटेल. पण नीट विचार करूया. अनेक घटना घडतात; ज्या दुःखदायक असतात, आजारपणं असतात, वेदना असतात आणि हे सर्व आपल्या बाबतीत घडतं आहे याचं दुःखपण असतं. ते का घडतंय या विचारातून हे दुःखाचं दुःख निर्माण होतं; जे ती दुःखकारक घटना घडून गेली, तरी कितीतरी दिवस शिल्लक राहतं.

हा विचार करायचं कारण काही दिवसांपूर्वी आमच्या घरात घडलं. आमच्याकडं दोन मनीमाऊ आहेत. एकीनं उंचावरून उडी मारली आणि तोंडावर आपटली. तेव्हा प्राण्यांच्या डॉक्टरकडं नेलं. त्यांनी सांगितलं की आतून जबड्याला दुखापत झाली आहे, जबडा दुभंगला आहे. पण याला आपण काहीच करू शकत नाही. काही दिवस नीट खाता-पिता येणार नाही माऊला, पण तिची ती करेल मॅनेज. माझी मुलगी म्हणाली, की किती दुःखी दिसतेय माऊ आमची. त्यावर डॉक्टर हसले. ते म्हणाले, ‘अहो वेदना आहेत म्हणून चेहरा त्रासलेला आहे. असणारच. पण दुःखी वगैरे नाही ती. माणसासारखं स्वतःच्या वेदनेचं दुःख प्राणी कधी करत नाहीत. कारण आपल्याला असं कसं झालं, का झालं हा प्रश्‍न ते विचारत नाहीत. ते आपल्याला दुःखी दिसतात, पण ते वेदनेमुळं. काही दिवसांत पुन्हा उड्या मारायला लागेल पहा. जर नीट काळजी घेतली, तर अत्यंत दुर्धर रोगातूनही प्राणी लवकर बरे होतात. कारण ते सगळी शक्ती विचारात न घालवता बरं होण्याकडं वळवतात.’ 

हा प्रसंग आणि हा विचार माझ्या दृष्टीनं खूपच काही शिकवणारा होता. म्हणजे मोठं दुःख, छोटं दुःख, जास्त वेदना, कमी वेदना असं काही नसतं. वेदना ही वेदना असते. ती सहन करता येते किंवा येत नाही. पण वेदनेचा विचार हा मात्र जास्त वेदना देऊन जातो. अनेक वेळा डॉक्टर सांगतात, की काही विचार करू नका, शांत पडून राहा, औषध दिलंय त्यानं बरं वाटेल. पण आपण कोणते शांत बसायला. कसे आजारी पडलो, आधी का नाही लक्षात आलं, मलाच हे असं होत असतं सारखं, काळजी घेता येत नाही स्वतःची, आपली काळजी कुणी घेत नाही, आपण वाचू का नाही यातून, बरे होऊ का.... असे असंख्य विचार त्या आजारपणाला वाढवतात आणि मग आपण पेशन्स असलेले पेशंट रहात नाही.  

आमची माऊ त्यावेळी इतकी शहाण्यासारखी वागली होती. दोन तीन दिवस फारसं खाल्लं नाही, पाणी पिताना मान तिरकी करून प्यायची, एकावेळी जास्त खायची नाही, पडून राहायची, कारण मी अशी का हा विचारच नव्हता तिच्याकडं. प्राणी करूच शकत नाहीत असा विचार. आता ही परिस्थिती आहे, तर मग कसं वागायला हवं ही प्रेरणा त्यांच्याकडं नक्की असते, जी विचार नसल्यानं अधिक प्रभावी काम करते. आपण माणसं विचार करू शकतो, तर फसतो अशा वेळी. 

उदाहरणार्थ... कोणाचा पाय मोडतो, मग चालता येत नाही. तर त्याचं दुःख अधिक होतं. कसा मी जायबंदी, कसा मी परावलंबी, कधी मी यातून बरा होणार, कधी मी चालू लागणार... वगैरे वगैरे. कित्येक वेळा या दुःखातून उगाच धडपड करत माणसं दुखणं आणखी वाढवून घेतात. फार लवकर असाहाय्य वाटायला लागतं आपल्याला. काही काळ परावलंबित्व येणार हे मान्य होत नाही. जे आपल्यासाठी करतायत त्यांचे आभार मानून आपण त्यांची सेवा घेत नाही. तर माझं असं कसं झालं याचा विचार करत बसतो. यामुळं हल्ली अनेक दुर्धर आजार असणाऱ्यांसाठी सपोर्ट ग्रुप्स असतात, जिथं त्यांना सकारात्मक विचार करायला शिकवलं जातं. आजाराचा विचार न करता याही परिस्थितीत आपण किती आनंदानं जगू शकतो, सृजनशील राहू शकतो हे शिकवलं जातं.  

जसं ही आजारपणं, वेदना तसंच आपल्या आयुष्यात घडलेल्या अनेक दुःखद घटनांचंही असतं. अनेक अडचणी येत असतात रोजच्या जगण्यात. त्या मुळात दैनंदिनी, आपली नियोजनं बिघडवतात. त्याशिवाय ‘असं कसं घडलं...’ हे दुःख आपण स्वतःला अजून देत राहतो. या दुःखाचा सूर बऱ्याच वेळेला ‘माझं नशीब असंच फुटकं,’ असा असतो. कितीही विश्‍लेषण केलं, तरी सत्य मान्य होणं जरा कठीणच असतं. शिवाय इतरांचं कसं बरं चाललंय आणि माझं कसं नाही, हे दुःख. प्रत्येक घटनेमागं काहीतरी कारणं असतातच. ती कारणं पटली तरी सहजासहजी मान्य करून आपली भूमिका सकारात्मक करणं इतकं सोपं नसतं. कारण ‘मला असं का नशीब मिळालं’ हे दुःख राहतंच शेवटी. 

हे असं दुःखाचं दुःख करत बसल्यानं खूप ऊर्जा वाया जाते आपली. एरवी फार ‘इतरांचा विचार करणारे आपण’ या वेळी मात्र अगदी स्वकेंद्री होऊन जातो आणि मग आपलं मन गोठलंय, बंद झालंय असं वाटायला लागतं. किमान याची जाणीव जरी झाली, तरी खूप बदल घडवता येतील. आज कितीतरी उदाहरणं अशीही आहेत, की विदारक अशा दुःखाचा, आजारपणाचा, वेदनांचा सामना करता करता त्यांनी समाजासाठी खूप काही केलं आहे. अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण म्हणजे ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज. त्यांना मज्जातंतूंचा आजार होता. कित्येक वर्षं ते व्हीलचेअरवर होते. पण त्याचं दुःख त्यांनी केलं नाही. उलट भौतिक आणि खगोल शास्त्रातील अफाट काम आज त्यांच्यामुळं शक्य झालं आहे. पुण्यातील मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्राच्या सर्वेसर्वा डॉ. अनिता अवचट यांना कॅन्सर झालेला असतानाही त्यांच्या चेहऱ्यावर कोणी कधी दुःख पहिलं नाही. उलट व्यसनमुक्तीसाठी दाखल झालेल्या तरुणांसाठी त्या शेवटपर्यंत मायेनं, प्रेमानं सेवा करत आल्या. 

आज कितीतरी मुलं, माणसं, खेळाडू, कलाकार असे आहेत, की ज्यांना पूर्ण शरीर-मनसंपदा प्राप्त झालेली नाही, पण त्या कोणी उणिवांचे वाईट वाटून घेत नाही. तर, त्यावर मात करून अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर ते आपले सामर्थ्य सिद्ध करतात. कसं काय जमत असेल अशी मनोभूमिका घ्यायला, काय मनाची साधना असेल या लोकांची. आपल्याला काय जमेल असा विचार मी नेहमी करते. अनेकांशी यावर बोलते. त्यातून छोटे छोटे विचार समजतात, की ज्यातून मोठं तत्त्वज्ञान तयार होईल.

सर्व प्रथम माणूस मात करायला शिकतो ते या वेदनांच्या, दुःखाच्या भीतीवर. आता मला दुखणारच आहे, मला अडचणी येणारच आहेत, अनेक अडथळे येणारच आहेत हे जणू मान्य केलेलं असतं आणि दुखऱ्या गोष्टींकडं वैताग म्हणून न पाहता प्रेमानं पाहिलेलं असतं. चिकन सूप फॉर द सोल यामध्ये मी एक गोष्ट वाचली होती, की एका मुलीला स्तनांचा कर्करोग असतो आणि तिचे स्तन काढावे लागतात. ती वाचते पण आपलं सौंदर्य गेलं म्हणून दुःखी होते. तर तिला तिची समुपदेशक असं सांगते, की तू अजून ‘नसलेल्या स्तनांचा भाग,’ तुझ्याच शरीराचा भाग म्हणून स्वीकारत नाहीयेस. तू रोज एकदा त्याकडं प्रेमानं पहा. बघ तुझं दुःख कमी होईल. ज्यानं तू वाचलीस त्या उपचाराकडं प्रेमानं पहा, तू यापुढचं आयुष्य अधिक सुंदर पाहू शकशील... हा विचारच किती सुंदर आहे. 

दुसरं मला जाणवून गेलं, की दुःख, वेदना असूनही आनंदी राहू शकणारी माणसं फार चर्चा, विश्‍लेषण करत नाहीत. हे असं नशीब का, याचं अगदी सुरुवातीला वाईट नक्की वाटलेलं असतं. पण नंतर ते परिस्थितीकडं ‘प्रश्‍न’ म्हणून न पाहता ‘संधी’ म्हणून स्वतःला पाहायला शिकतात, शिकवतात. काही तर असं म्हणतात, की नॉर्मल असतो तर हे करूच शकलो नसतो. काहीतरी बिघडलं तेव्हा क्षमतांची पूर्ण जाणीव झाली, त्याचा कस लागला. किती महत्त्वाचा विचार आहे हा. एरवी गुडी गुडी सर्व सुरू राहिलं, तर सर्व क्षमता समजणारच कशा? कितीही वाईट परिस्थितीत आपण तग धरू शकतो, हे वाईट प्रसंग आल्याशिवाय समजणार कसं? प्रश्‍नच आले नाहीत सोडवायला, तर उत्तर योग्य आहेत का नाही हे समजणारच कसं? 

तिसरा महत्त्वाचा विचार ही आनंदी माणसं शिकवून जातात ती त्यांच्या विनोदबुद्धीतून. काहीही झालं तरी ते त्याची चेष्टा मस्करी करून हसू शकतात. शाब्दिक कोट्या करतील, विनोदी रूपकं वापरतील, कशी मज्जा झाली अशा थाटात घडलंय त्याचं वर्णन करतील. भीती, चिंता यांना बहुधा शिवतच नाही. राजेश खन्नाच्या ‘आनंद’ चित्रपटासारखं. याची कितीही उदाहरणं देता येतील. यावर स्वतंत्रपणे लिहिणंच योग्य ठरेल. सगळं काही झट की पट जमेल असं नाही, पण सुरुवात तर करूया. दुःखावर आनंदानं मात कशी करता येईल, हा विचार करून तर पाहूया! 

संबंधित बातम्या