खुशीची नाराजी!

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

मनतरंग
 

नाराज होणं, कशाबद्दल नाखूश असणं हे काही सकारात्मक नक्की नाही. कितीतरी गोष्टींवर आपण नाराज, नाखूश असतो. पण अनेकदा आपण नाराज होण्यात धन्यता मानतो. फार ‘वेगळा विचार आपण करत आहोत,’ असंही वाटून जातं; ती नाराजी म्हणजे ‘मनासारखं न घडल्यावर’ची नाराजी. काय कारण असावं या मागं असं मनन करत असताना बरंच काही हाती आलं. त्यातला एक विचार आज मांडते.

पहिला विचार म्हणजे... ‘जर तर’चा विचार. हा विचार करताना काही नियम नाहीत. कोणत्याही बाबतीत असं वाटू शकतं, म्हणजे अंगावरच्या कपड्याच्या रंगापासून ते नोकरीवरच्या बॉसच्या वागण्याच्या ढंगापर्यंत...  ‘हे असं असतं तर आणि हे असं नसतं तर,’ असं अनेक वेळा, अनेक गोष्टींबद्दल कोणालाही वाटतं. दुसऱ्याला धडे देताना आपण म्हणतोही, ‘हे आत्ताच कर. नाही तर वाईट वाटेल की असं केलं असतं तर बरं झालं असतं, मग त्यावेळी काही उपयोग नाही पश्‍चात्ताप करून.’ 

हे असं ‘जर तर’ वाटण्यामागं बहुतेक वेळा ते ते प्रसंग घडून गेल्यानंतरचं आलेलं शहाणपण असतं. घडलेल्या घटनेच्या काही बाजू बहुतेक वेळा नंतर समजतात. म्हणून मग सध्याच्या परिस्थितीमधल्या गोष्टींविषयी मनातून नाराजी, नाखुशी असते. ती आपल्याला जमलं नाही किंवा मिळालं नाही याविषयी असते. ही नाराजी किती काळ टिकेल याचा काही नेम नाही. काही वेळा जाऊदे नव्हतच नशिबात, अशी स्वतःची समजूत घालून कोणी पटकन त्यातून बाहेरही पडतो, तर कोणी ही सल सतत मनात राहील असं अनेकांना सांगत राहतो. कोणी पुन्हा सुरुवात करतो, नव्या दमानं. अनेक वेळा वाटतं कॅसेट रिवाइंड करता आली असती, तर फार बरं झालं असतं. 

याच थीमवर एक सिनेमाही येऊन गेलाय. ॲक्शन रिप्ले नावाचा चित्रपट सर्वांनी पहिला असेल. आईवडिलांची भांडणं आणि एकमेकांबद्दलच्या द्वेष भावना पाहून त्यांचा मुलगा लग्न न करण्याचा निर्णय घेतो. लग्न म्हणजे जणू शिक्षा हे त्याच्या समजुतीमध्ये पक्कं बसलेलं असतं. पण आईवडिलांसाठी त्यांच्या आयुष्याची कॅसेट टाइम मशीनद्वारे रिवाइंड करून आईवडिलांचं लग्न ठरण्याआधी जे काही बिनसलेलं असतं ते सुधारून त्यांचं नातं सुंदर करून पुन्हा वर्तमानात पोचतो. हे असं शक्य झालं, तर बहुधा अनेक लोक अनेक घटना मागे करून त्यात सुधारणा करून घेतील आणि त्यात बदल घडवतील. 

एक गमतीचं उदाहरण असं, की माझ्या ओळखीच्या एका काकांना ज्योतिषानं सांगितलं होतं की तुमच्या मनासारखं काही होत नाही, असंच आहे तुमच्या कुंडलीत. तुमची जन्मवेळ चुकली. तुम्ही जर चार मिनिटं आधी जन्मला असतात, तर तुम्हाला राजयोग प्राप्त झाला असता! हे ऐकून मी निःशब्द झाले होते काही काळ. पाहा... कुठपर्यंत या जर तरच्या विचारांनी आपल्याला घेरून टाकलं आहे. 

खरं तर असं होणं शक्य आहे का, की जे जे मनात आणलं, नियोजन केलं, ते ते प्रत्येक वेळा झालं. अगदी मनात जस्सं होतं तस्सं झालं. तर्क सांगतो की हे शक्य नाही. अनेक बाबी त्याच टप्प्यावर पूर्णपणे कळून येतील असं नसतं. पण हे स्वीकारायची तयारी नसते. परिस्थितीचा साकल्याने विचार वगैरे न होता विशफुल थिंकिंग अधिक झालेलं असतं. म्हणजे मला जसं, ज्या पद्धतीनं होऊ शकतं असं वाटतं आहे, तसंच घडायला हवं. तसंच नेमकं काय हवं आहे त्या बाबतीतही गोंधळ असतो मनाचा, सतत द्वंद्व चाललेलं असतं. आयुष्यात नेमकं काय करावं या प्रश्‍नाचा मागोवा घेताना काही तडजोडी कराव्या लागतात, अनेक न पटणाऱ्या गोष्टींशी समायोजन करावं लागतं, अनेक लोकांशी जुळवूनही घ्यावं लागतं. हे सारं आपण करतोही, पण तरी मग मनात काही एक न घडल्याच्या भावना घर करून राहतात.

अशी काही वाक्यं आहेत. जी आपणही म्हणतो आणि अनेकांना म्हणताना ऐकतो - 

जर माझ्या मनासारखं काम मिळालं असतं, तर मी अधिक चांगल्या प्रकारे केलं असतं. माझ्या अंगी कोणती कला असती, तर बरं झालं असतं. मला असं वातावरण मिळायला हवं होतं, मग मी अजून चांगल्या प्रकारे घडले असते. जर त्या वेळी मला हे सुचलं असतं, तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. मला ही संधी मिळाली असती, तर मी किती पुढं गेलो असतो. मी वेळेवर जागा झालो असतो, तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. त्याच वेळी मी असं बोललो असतो, तर माझा आजचा दिवस वेगळा असता.

काही वेळा तर फक्त स्वतःबद्दल नाही, तर इतरांच्या वागण्याबद्दलही असा विचार होतो. जसं आपल्या आईवडिलांनी काय करायला हवं होतं, हा तर अनेक जण अगदी म्हातारपणापर्यंत विचार करतात. माझ्या आईवडिलांनी त्यावेळी असा विचार केला असता, तर आज आम्ही कुठल्या कुठं असतो. कोणी मला साथ दिली असती तर बरं झालं असतं. आईवडिलांवर, नातेवाइकांवर, मित्रमंडळींवरही नाराज असतात अनेक लोक यामुळं. 

स्वाभाविक आहे असा विचार करणं, कारण जे जमलं नाही त्याची कारणमीमांसा व्हायला हवीच. पण त्यातच किती काळ राहावं? बराच वेळ या विचारात जातो आणि सृजनात्मक काही करण्याचे क्षण वाया घालवतो. अपघात आणि अचानक मृत्यू या प्रसंगांचे आघात खूप मोठे असतात. त्यामुळं त्या प्रसंगी असे विचार मनात राहणं अगदी शक्य असतं. अनेक गोष्टींपुढं माणूस हतबल असतो, हवालदिल असतो. पण अनेक बाकीच्या छोट्या छोट्या घटनांमध्ये गुंतून ना राहता त्यातून बाहेर पडणं हे श्रेयस्कर असतं. नाहीतर छोट्या छोट्या गोष्टीतून येणारी खुशी ही अशा छोट्या नाराजीमुळं झाकोळली जाते.  

याच नाराजीमागचा दुसरा विचार म्हणजे, ‘जे नाही तेच हवं असतं.’ मनुष्य स्वभाव असाच आहे, की जे नसतं तेच हवं असतं. जे अनुभवण्यास आलं आहे, जे काही सुंदर मिळालं आहे ते सोडून कदाचित कल्पनेतलं, कधीतरी इच्छा केलेलं ते नेमकं आठवतं. आत्ताचं माझ्या मनासारखं हे नाही असं जाणवत राहतं. 

समुपदेशनाला आलेले पालक अनेक वेळा त्यांच्या मुलांविषयी असं सांगतात. की जे समोर आहे ते नको आहे, जे नेमकं नाही ते हवं आहे. बहुतेक वेळेला कपडे घालणं, खेळ किंवा काही वस्तू हवी असणं. तसंच, अनेक वेळा खाण्याविषयी या तक्रारी असतात. घरातले मोठे रागावतात मग यावर. पण मोठ्यांनाही रागवायचा अधिकार असतो की नाही काय माहीत. कारण आपण वयानं मोठ्या माणसांना ही अशी एक सवय म्हणजे ‘समोर जे दिसतंय त्याची दखल न घेता जे तिथं नाही त्याबद्दल बोलत बसायचं.’ 

साधं जेवायला बसलं की जी चटणी नाही, जी भाजी केलेली नाही त्याची आठवण येते. काही लोकांना तर न चुकता ताटात वाढलेला पदार्थ कधी काळी कोणाच्या हातचा खाल्लेला आठवत असतो. समोर कोण प्रेमानं करून वाढतंय यापेक्षा अमक्याचं कसं छान होतं हे आठवतं. समोर जे आहे त्याचा निर्भेळ आनंद आपण बहुतेक लोक घेऊच शकत नाही आणि मग नकळत आजच्या आणि पूर्वीच्या परिस्थितीमध्ये तुलना सुरू होते आणि आत्ताची स्थिती कित्येक पटीनं चांगली असताना भूतकाळात किंवा पूर्वीच्या काळातच मन अडकतं. नकळत आपल्याकडूनही अनेक जण दुखावले जातात. आपल्या मनात नसतं तसं, पण काही गोष्टींची सवय लागून जाते बोलायची, ते बोलणं म्हणजे मनमोकळं बोलणं, स्पष्ट बोलणं असं वाटतं. पण ते समोरच्याला दुखावणारं असू शकतं. 

अशा तऱ्हेनं विविध अतार्किक अपेक्षा करण्यात व अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत याबद्दल नाराज राहण्यात आपण फार ‘परफेक्शनिस्ट’ होतो. ही नाराजी खुशीची नाराजी असते. कारण मग ती आपली समर्थता, कमीपणा यावर पडदा टाकायला मदत करते. आपण कमी पडलो ही भावना जरा त्रासदायक असते. तसंच आपल्या खुशीची जबाबदारी आपल्याला दुसऱ्यावर टाकता येते.

हे असं आहे हे पटणं जरा अवघड आहे. जर ते पटलं तर मग सुधारणा फार सोपी. कारण मनाचं प्रशिक्षण करायला आपली तयारी होते. एकदा पूर्वी काय घडलं याचा विचार करून झाला किंवा जे हवं आहे ते आता समोर नाही हे स्वीकारलं की मग सद्यःस्थितीबद्दल समाधानी राहायला स्वतःला शिकवता येतं. नुसतं बोलायला काय हरकत आहे, हा विचार आपल्याला त्यातच गुंतवत राहतो. त्यापेक्षा हा तर्क चुकीचा आहे. माझ्या हातात जेवढ्या गोष्टी आहेत त्यापेक्षा हातात नाहीत अशा गोष्टी कितीतरी पटींनी अधिक आहेत. तसंच ही मनाची बेकार समजूत घालणं नाही, तर भूतकाळातून स्वतःला पुढं नेऊन भविष्यकाळ अधिक शहाणपणानं जगण्यासाठी तयार केलेली मनाची बैठक आहे, एवढं जरी पटलं तरी खूप झालं. 

हे नक्की कसं जमेल... हा प्रश्‍न राहतोच. आहेत ना कितीतरी शहाणे समुपदेशक, त्यांना भेटा. लवकरात लवकर!

संबंधित बातम्या