विनोदाची रुपेरी किनार

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

मनतरंग

निराशा, काळजी, भीती, दुःख, अस्वस्थता या मानसिक व्याधींनी काळवंडलेल्या मनालाही रुपेरी किनार लाभते, ती हास्य निर्माण करणाऱ्या विनोदामुळं. असा विनोद हे गोड औषधच जणू. कित्येक वेळा विनोदी शाब्दिक कोट्या करून आपल्याला हसवणारी आणि तंग वातावरण एकदम निवळायला मदत करणारी माणसं आपण पाहतो. असं वाटतं, कसं काय बुवा जमतं असं बोलायला? आपण आपल्या परिस्थितीशी समायोजन करण्यासाठी, मनःस्थितीची जुळवाजुळव करत असताना, हे अगदी सहजपणे वावरताना दिसतात आपल्याला. इतक्या गंभीर परिस्थितीमध्ये विनोद कसा काय सुचू शकतो, अशीही शंका येते. सतत विनोदी चुटकुले सांगणारी माणसं आयुष्याविषयी गंभीर नाहीत की काय असंही वाटतं.

इतिहास तपासायला गेलो, तर असं दिसेल की ‘विनोद’ हा सर्व धर्म, संस्कृतींमध्ये अनेक युगांपासून आहे. कथा, पुराणापासून सर्व साहित्यात, कविता, नाटक, चित्रपट यांतही हा विनोद ठासून भरलेला आहे. पण या विनोदाचं हे उपचारात्मक अंग अगदी अलीकडं प्रस्थापित होऊ लागलं आहे. विनोद म्हणजे कोणालातरी चिडवायचं, दुसऱ्याच्या व्यंगाला हसायचं, अनेकांच्या चुकांची खिल्ली उडवायची, स्वतःला फार ग्रेट समजायचं या समजुतीमधून मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक या विनोदाला बाहेर काढत आहेत. कुणाजवळ आपलं मन मोकळं करताना हमसाहमशी रडल्यानंतर जितकं बरं वाटतं त्यापेक्षा कितीतरी ताजंतवानं आणि मोकळं, हलकं विनोदी मालिका, सिनेमा पाहिल्यावर खळखळून हसल्यानंतर वाटतं. 

आज मनन करायचं आहे; विनोद या साहित्यप्रकारावर नाही, तर जगताना थोडं हास्य आणि मनाला हायसं वाटून देणाऱ्या विनोदाला निर्माण करणाऱ्या विनोदी, खेळकर, हसऱ्या स्वभावावर. ज्याला इंग्रजीमध्ये आपण सेन्स ऑफ ह्युमर असं म्हणतो. हा सेन्स किंवा ही जाण अथवा वृत्ती सकारात्मक दृष्टिकोनाचा अप्रतिम नमुना आहे. कितीही वैताग निर्माण करणारी परिस्थिती असो, घुसमट असो, दुःख असो, ही हास्यवृत्ती नकळत आपल्यासमोर आहे त्या परिस्थितीतून मनानं बाहेर पडण्याचे नवनवीन मार्ग निर्माण करत जाते आणि आपण मग त्या परिस्थितीला सामोरं जायला सिद्ध होतो. सत्य कटू असतं असं आपण म्हणतो, पण असे विनोदी भाव निर्माण करणाऱ्या शब्दांतून मांडलेलं सत्य हे नेहमी आपल्याला मनोमन पटतं. ते स्वीकारण्याची आपली क्षमता वाढली आहे, असं मनात वाटू लागतं. 

एरवी आपण लोक कसे वागतात, कसा कॉमन सेन्स नाही म्हणून चिडलेले असतो. पण मजेमजेमध्ये वर्णन करताना चीड निघून जाते. असतात लोक असे, जाऊदे सोडून देऊ, सांभाळून घेऊ, असं नकळत मनात निर्माण होऊ लागतं. म्हणजेच स्वतःच्या दुःखाचा आणि निराशेचा विचार करणारे आपण नकळत इतरांचा विचार करायला लागतो. तसंच आपण केलेल्या विनोदी ढंगातल्या सूचनाही स्वीकारण्याची समोरच्या माणसाची तयारी होते. नेहमी अपमान करून बोललं पाहिजे किंवा जो चुकतो त्याला घालूनपाडून बोललं पाहिजे असं नसतं. मुद्दा पटला पाहिजे आणि संवाद कायम राहिला पाहिजे, हे जमणं महत्त्वाचं नाही का. वरिष्ठ अनेकदा दुखावणारे शब्द वापरून आपल्याला खाली दाखवायला पाहत असतात. आपल्याला सर्वांसमोर त्यांना उत्तर देता येत नाही कित्येकदा. आपण पदाचा, वयाचा मान राखत असतो. पण ते जे बोलून गेले, ते स्वतःला सांगताना जर आपण गंमतशीर पद्धतीनं सांगितलं किंवा त्यातून थोडी विनोदनिर्मिती झाली, तर त्या प्रसंगाचा नकारात्मक प्रभाव आपल्या मनावर राहात नाही. या विनोदावरची चारोळी मला इथं आठवते.

हसून साजरे सारेच करावे 
अंतरीची धून सोडू नये.. 
आत आत सारे स्वच्छ असो द्यावे.. 
कोणास कधी तोडू नये..!
किती छान अर्थ आहे. काही झालं तरी हसून सोडून द्यायचं आहे. कारण तरच जगतानाची लय, धून टिकून राहणार आहे. जे घडलं त्यावर हसलो की मन मोकळं होणार आहे. मनाचं आभाळ पुन्हा स्वच्छ होणार आहे. मग रागावून कोणाला अंतर द्यायची गरजच काय? या अशा स्वभावामुळं नातेसंबंध सांभाळणं सोपं नाही का जाणार. 

कधी असाही विचार करून पहा, की दुःख व्यक्त करताना, रागवताना, चिडल्यावर आपण स्वतःला फार भारी समजत असतो, पण इतरांना ते मजेशीर वाटू शकतं. लोक आपल्यासमोर सहानुभूती दाखवतात, पण आपल्या मागं टिंगल करू शकतात आणि आपणही असं करतो. पण नेहमी हसतमुख असणाऱ्या माणसाचं मात्र कायम स्वागत केलं जातं. हसरा खेळकर स्वभाव हा कितीतरी संकटं झेलायला सहनशक्ती वाढवणारा ठरतो. कोणत्याही वाईट घटनेचं दुःखी भान मनात फार काळ राहात नाही आणि मनःस्वास्थ्याचं फीलिंग वाढत जातं.

तुम्ही म्हणाल हे सगळं पटलं हो! पण, असा स्वभाव प्रत्येकाला नाही मिळत. असा सेन्स शिकता येत नाही. पण मनाची अभ्यासक म्हणून मी हे अमान्य करेन. हे अगदी सर्वांना जमू शकेल. फक्त ते मनातून ठरवायला हवं. नकळत आपल्या गंभीर स्वभावाचा आपल्याला अभिमान असतो. कसं माझं आयुष्य खडतर गेलं, किती कष्ट झाले, त्यातून मी कसा वर आलो, हे सांगताना त्या दुःखी भावना आपण जपून ठेवलेल्या असतात. केवढं सहन केलं मी, हे सांगताना आपल्या स्वतःबद्दल आपली सहानुभूती निर्माण झालेली असते, जी सोडता येत नाही. विनोदी कोट्या करणारा आणि हसणारा हसवणारा माणूस कधीच असा स्वतःच्या प्रश्‍नांची टिमकी वाजवत नाही. जे झालं ते सांगून त्यावर काही विनोदी भाष्य करून मोकळा होतो आणि पुढं कामाला लागतो. 

उपहासातूनही विनोद निर्माण होतो. अनेकदा उपहास हा त्या परिस्थितीला सामोरं जायला मदत करतो. पण समोरच्या माणसाला कमी लेखताना केलेला उपहास किंवा विनोद इथं अपेक्षित नाही. आजकाल सोशल मीडियावर दुसऱ्यांना नावं ठेवताना विनोदी ढंगात लिहितात, पण त्यानं खेळकर स्वभाव वाढीस लागतो असं वाटत नाही. आपल्याला फार समजतं आणि दुसऱ्याला नाही असं ते लिखाण असतं. ते इथं अभिप्रेत नाही.

विनोदी बोलणं हे बेफिकीर किंवा बेजबाबदार असल्याचं लक्षण नाही, तर ते जगण्याची जबाबदारी उत्तम पेलण्याचं लक्षण आहे. कारण त्यात ताण नाही, जबरदस्ती नाही, उलट मोकळेपण आहे.

असा निरपेक्ष, निर्व्याज विनोदी स्वभाव आपल्यात निर्माण व्हावा असं वाटत असेल, तर काही अगदी साधे मार्ग आहेत ते नक्की करून पहा. 

पहिलं म्हणजे विनोदी साहित्य वाचा. आपल्याकडं मराठीत विनोदी साहित्याचा सागर आहे. त्यात डुबकी मारल्यावर हास्याचे मोतीच निघतात. रोज काहीतरी वाचून ऐकून मनसोक्त खळखळून हसण्याची सवय लावून घेणं हे अत्यंत उपायकारक आहे. हळूहळू कसं लिहिलं आहे, कसं सुचलं आहे, शब्द कसे वापरले आहेत, कोटी कशी केली आहे याकडं लक्ष जातं. आपल्यापुरतं आपल्याला रोज येणाऱ्या प्रसंगांचा विचार करताना मनात तसे गमतीशीर भाव निर्माण होऊ लागतात. अगदी साधं उदाहरण म्हणजे पेपरमध्ये ग्राफिटी येते पहा. ती वाचून आपल्यालाही तसे विचार करायला जमतं का हे पाहता येईल.

आपल्याला विनोदी लेखक व्हायचं नाहीये किंवा स्टँड अप कॉमेडीही करायची नाहीये. पण आपल्या मनात मिळणाऱ्या, खुपणाऱ्या गोष्टींना काही मजेशीर पद्धतीनं मनात साठवता येतं का ते पाहायचं आहे. 

असंही करून पाहता येईल, की एखादा वाईट म्हणून आपल्या स्मरणातला प्रसंग कोणाला सांगताना थोडा विनोदी ढंगात सांगून पाहायचा. काय झालं माहीत आहे का... अशी सुरुवात करायच्याऐवजी... आज काय गंमत झाली अशी सुरुवात करायची. जे काही घडलं आहे त्याला कोणत्या तरी विनोदी म्हणी किंवा वाक्प्रचार यांनी सजवायचा प्रयत्न करायचा. म्हणजे समजा मनात ताण, गोंधळ असं असेल तर त्याची ग्रेड अशी ठरवली तर... ‘डोक्याची मंडई झाली, मच्छी मार्केट झालं की स्टॉक मार्केट झालं...’ तर किती गोंधळ होता हेही समजतं आणि त्या फीलिंगमधून बाहेरही पडता येतं. कितीतरी विनोदी सिनेमात रोज म्हणता येतील असे संवाद असतात. कोणाला समजावून सांगताना त्याचा वापर करता येतो, जेणेकरून बोलताना हास्याचे फवारे उडालेच पाहिजेत.

कोणी मुद्दाम आपल्याला खोचकपणे बोलत आहे असं जर जाणवत असेल, तर चिडून काही उत्तर देण्यापेक्षा ‘अरे वा! जमतं की तुम्हाला अपमान करायला..’ एवढंच बोलून विषय वाढू न दिला तर? अडचणींनी खचल्यासारखं वाटू द्यायचं नसेल, तर ‘इतक्या भारी अडचणी की आपणही लैच भारी होणार...’ असं म्हणून स्वतःचं मनोधैर्य वाढवता आलं तर? म्हणजेच काय, अशा विनोदी शब्दांनी आपला घडलेल्या गोष्टींकडं पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला, तर आपण नावीन्यपूर्ण मार्ग शोधायला मोकळे होण्याची शक्यता अधिक असते. 

असं म्हणतात की दुःखी होण्याची शंभर कारणे असतील, तर हसून आनंदी होण्याची हजार आहेत. कारण प्रत्येक दुःखी घटनेकडं पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. जगणं सोपं नाही, प्रश्‍न आहेत, अडचणी आहेत. ते दूर करण्यासाठी कष्टही आहेत. पण या सगळ्याकडं पाहण्याचा एक हलकाफुलका दृष्टिकोनही आहे, जो निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या काळ्या ढगांना एक रुपेरी किनार देतो, जो आपलं रोजचं जगणं उजळवणारा आहे... हे लक्षात घेऊया. आयुष्य खूप छोटं आहे, त्यामुळं मनापासून रोज हसूया आणि हसवूया!

संबंधित बातम्या