उत्तराचं सूत्र

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 23 डिसेंबर 2019

मनतरंग
 

गणित हा तसाही सोपा विषय नाहीच. कारण कधी काय करायचं हे माहीत असेल तरच उत्तर बरोबर येतं. कधी काय करायचं हे सूत्र प्रत्येक गणिताला निराळं असतं. आपली जी जगतानाची गणितं आहेत त्यांचंही असंच नाही का! प्रत्येक प्रश्‍नाचे पैलू निराळे, कारणे निराळी आणि त्याचे परिणामही निराळे. त्यामुळे प्रत्येक प्रश्‍न सोडवण्याचं सूत्र वेगळं. कोणत्या अनुभवांची बेरीज करायची, कोणते साफ वजा करायचे, कशाला चांगल्या विचारांनी भागायचं आणि कोणत्या जाणिवांचा गुणाकार होऊ द्यायचा... हे जरा प्रयत्नपूर्वक ठरवावं लागतं. नाहीतर सर्व गोळाबेरीज होऊन बसते आणि आपल्याला खूप मोठे भयंकर प्रश्‍न आहेत असं भासू लागतं. 

ही गोळाबेरीज होण्याचं प्रमुख कारण असतं, ते म्हणजे अनेक गोष्टींचा एकाच वेळी विचार करायची सवय, तसंच आपल्या सर्व प्रश्‍नांना प्रत्येक वेळी ठराविक संदर्भ देऊन त्यांची तीव्रता वाढवण्याची आपली सवय. अनेकवेळा आपण आपले प्रश्‍न मांडताना खूप मोठी सुरुवात करतो... जसं, ‘म्हणजे कसं आहे की मुळात मला अगदी लहानपणापासून सारं काही समजून घेण्याची सवय आहे. सर्वांचा विचार करत असते मी. अनेकजण माझ्याशी बोलतात. फार आधार वाटतो लोकांना माझा. यामुळं होतं काय, की नकळत खूप जबाबदारी येते माझ्यावर. फार अपेक्षा असतात माझ्याकडून,’ किंवा ‘आम्ही मुलखाचे बावळट. लगेच प्रेम वाटतं, माया सुटते, अनेकांसाठी जीव तुटतो. स्वतःचा विचार करायला अजिबात जमत नाही. एकदा कोणाला आपलं म्हटलं, की मग मागं पुढं न पाहता करत राहायचं. पण सगळे असे नसतात हो, आपण करतोय हे समजत नाही अनेकांना...’ किंवा ‘साध्या सरळ मार्गानं कामं झाली असं कधी झालंच नाही. दर वेळी काहीतरी अडचणी येतातच. कितीही छोटं किंवा मोठं काम असो, पटकन काम होऊन मी मोकळा झालो असं तर होतच नाही.’ 

ही काही वाक्यं आपल्याला कोणत्याही वयाच्या, व्यवसायातल्या, कोणतंही शिक्षण झालेल्या लोकांकडून ऐकायला मिळतात. आपणही अनेकदा अनेकांना ऐकवून झालेली असतात. पण आपण आत्ताच स्वतःला अगदी खरं सांगूया, की कितीही काहीही झालं तरी अगदी जगातल्या प्रत्येकाबद्दल एवढं प्रेम वगैरे वाटत नसतं किंवा प्रत्येक घटनेमध्ये आपण समजूतदारपणाची भूमिका घेतलेली असते असंही नसतं. पण स्वतःबद्दल मात्र आपण प्रेमळ, समजूतदार असा आपला पक्का समज असतो. मग कोणती का घटना असेना, काही का घडले असेना. त्यामुळं मग आपले प्रश्‍न खूप आहेत आणि ते एकमेकांत गुंतले आहेत असं सारखं वाटत राहतं आणि ते सोडवणं निव्वळ अशक्य आहे अशी पक्की समजूत होते. 

म्हणून उत्तराचं गणित मांडताना जगण्याच्या विविध सूत्रांचा फक्त विचार नाही, तर अभ्यास करणं थोडं आवश्यक आहे. गणितात भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी अशा क्रमानं गणिती क्रिया करायच्या असतात. पण आपल्या प्रश्‍नांवर उत्तरं शोधताना सूत्रं जशी वापरावी लागतील, तसा त्यांचा क्रम थोडा वेगळा असतो. 

पहिलं सूत्र आहे बेरजेचं - आपल्यापैकी बहुतेकांना असं वाटेल, की प्रत्येक घटना तिच्या तिच्या जागी काही तर्कानं घडते आहे, त्या मागं काही कारणं आहेत वगैरे. पण आपण जगताना मात्र रोज, अगदी नित्य नियमानं अशा घटनांची मालिका सुरूच आहे. म्हणून आपल्याला अनुभव येतो आहे, तो रोज काही ना काही व्याप आणि ताप आहेत असा. पण आता असा विचार करू, की जसं गणितात अ + ब + क + ड = ई असं होणार नाही. ‘अ’ वेगळा आहे, ‘ब’ वेगळा आहे आणि ‘इ’सुद्धा वेगळाच आहे. पण आपला अनुभव म्हणून आपल्याला सगळं एकत्रित वाटतं आहे. म्हणजे एखाद्या गृहिणीची दैनंदिनी पहिली, तर दिसतं की आज कोणाचं आजारपण, उद्या काय पैशाचे प्रश्‍न, परवा काय कोणाशी भांडण होणं, त्यानंतर काय अचानक घरात पाहुणे, त्यानंतर काय तर सणवार, त्याचे मोठे स्वयंपाक, मग काय मुलांच्या परीक्षा... असं अगदी रोज वेगवेगळं आहे, पण ते रोज आहे. मग त्यातून एक दिवस ताण किंवा वैताग येतो म्हणून तिला वाटतं, की काय लागलंय माझ्यामागं. प्रश्‍नांचा ससेमिरा संपत नाही. मग मनावर मोठं ओझं असल्याचं जाणवतं.

हे अगदी स्वाभाविक आहे. पण जर कोणत्याही परिस्थितीमध्ये मनःस्वास्थ्य ढळू द्यायचं नसेल, तर जे स्वाभाविक आहे ते थोडं बदलण्याचा प्रयत्न करायला हवा. गेले अनेक दिवस, महिने असं जे सुरू आहे ते एकत्रित अनुभवणं थोडं सोडून द्यायला शिकायचं आणि प्रत्येक प्रश्‍नाचा स्वतंत्रपणे विचार करायचा, किंबहुना काही विचार सोडून द्यायचा. हे जमण्यासाठी दुसरं सूत्र वापरायचं ते म्हणजे वजाबाकीचं. 

नेमकं काय वजा करायचं तर जे काम किंवा घटना या फार मानसिक परिणाम करणाऱ्या नाहीत, पण तांत्रिकदृष्ट्या मात्र रोजच्या जगण्याचा हिस्सा आहेत अशा, आपण करत असलेल्या स्पेशल विचारातून वजा करून टाकायच्या आणि त्या कोणतीही भावनिर्मिती होऊ न देता वजा करायच्या. म्हणजे कितीतरी दैनंदिनीची कामं, असं मनावर ओझं असतं, म्हणून फार उगाच किचकट वाटू लागतात. पण ती असतात. त्यावर विचार करून काहीच उपयोग नसतो. ती कामं आहेत असं स्वतःलाही सांगायचं नाही. ती न रेंगाळता उरकून टाकायची. त्यातून काही कामं अशी असतात, की त्यामध्ये आपण इतरांवर अवलंबून असतो. मग ते नीट काम करत नाहीत म्हणून आपण आपला वैताग वाढवून घेतो. अशीही कामं आणि घडामोडी, जिथं आपल्या हातात फार गोष्टी नाहीत तिथं ती वेळेवर, नीट होतील अशी अपेक्षाच मुळात करायची नाही. वैताग निर्माण होण्याची शक्यता थोडी कमी किंवा कमी धारदार करायची. 

ही वजाबाकी जर नीट जमायला हवी असेल, तर रोजच्या घटनांना आणि घडामोडींना कोणत्या विचारांनी भागायचं हे मनात अगदी स्पष्ट हवं. जे काही घडलं आहे ते आपल्या आयुष्याचा किती भाग खरोखरीच व्यापून आहे याचा विचार करायला हवा. छोटी छोटी भांडणं, दुखापती, अडचणी, कोणी केलेले अपमान, अचानक घडलेल्या काही तापदायक घटना... या प्रत्यक्ष किती काळ आपल्या प्रत्यक्ष जगण्यात असतात आणि किती काळ आपल्या आठवणीत असतात ते एकदा स्वतःला समजावून सांगितलं, की या घटनांची व्याप्ती लक्षात येते. प्रत्यक्ष अस्तित्वापेक्षा ‘आठवणीत जास्त’ असलेल्या घटना विसरणं किंवा त्याबद्दलच्या दुःखाची तीव्रता कमी करणं यावर काम करता येतं. मोठ्या घडलेल्या, गंभीर घटनांपेक्षा छोट्या, ‘दिवाळीतल्या टिकल्या कशा वाजतात,’ अशा घटना खरं तर जास्त आवाज आणि वैताग निर्माण करत असतात. पण त्या गंभीर नाहीत, त्यानं जीवनमरणाचे कोणतेही प्रश्‍न निर्माण होणार नाहीत, त्याकडं दुर्लक्ष करता येईल हे आपणच आपल्याला सांगत गेलो, की अशा गोष्टींसाठी संवेदनशील असलेलं मन आपल्याला त्यातून सोडवता येतं. 

ही तीन सूत्रं अवलंबून झाली की मग गुणाकार करायचा असतो, तो आपण सर्व घडामोडींतून काय  शिकतोय याचा. म्हणजे मग जरी भले ते दुःखदायक असो किंवा निराशाजनक असो, पण प्रत्येक घटनेनं आपल्याला काय शिकवलं असा विचार केला की सकारात्मक विचारांची सुरुवात होते. अनेकदा तर मला असं वाटतं, की कोणी आपल्याशी मुद्दाम वाईट वागत असलं; तरी त्याचा अर्थ असा काढता येतो की कसं वागू नये, हे समजतं आहे... तेसुद्धा दुसऱ्याकडं नुसतं पाहून. म्हणून अशा शिक्षणाची नुसती बेरीज नाही तर गुणाकार करत गेलो की... अरे अरे, वाया गेले पैसे, वेळ, श्रम, प्रेम, कष्ट... असं जे वाटत असतं आणि सतत ते भर घालत असतं आपल्या दुःखात... ते कमी होत जातं.

इथं आपण अशा कोणत्याच घटना किंवा आपल्या चुका, की ज्या आणि त्यांचे परिणाम हे अपरिवर्तनीय आहेत, अशांबद्दल बोलत नाही. मनानं निर्माण केलेल्या प्रश्‍नांविषयी आपण बोलत आहोत. म्हणून हे सूत्र रोज घडणाऱ्या आणि मनाला ताप देणाऱ्या गोष्टींना लावून पाहूया. ज्यामुळं प्रश्‍नांची गोळाबेरीज कमी कमी होत जाईल. प्रत्येक प्रश्‍नाला स्वतंत्रपणे पाहता येईल, ज्यानं मनावरचं ओझं कमी होईल. 

इतकं तरी ठरवूच..
अडथळ्यांचा आधार घ्यावा पाय रोवून उभं राहताना...
हसून.. सारं सोडून द्यावं, रडू येणारे क्षण जगताना...
एकसारखं जुळणारं असं कधीच काही सापडत नाही 
विरोधी विचारांचीच सांगड घालावी जगण्याचं सातत्य शोधताना!

संबंधित बातम्या