दर्शक-दृश्य ते अंतर्दृष्टी  

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 27 जानेवारी 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.

स्व-ओळख किंवा स्वतःचा शोध हा एक मोठा प्रवास आहे. हा प्रवास आपल्यातल्या ‘स्व’च्या आविष्काराचा, प्रकटीकरणाचा आहे. तो सहजसोपा नाही. जगण्याच्या कोणत्यातरी टप्प्यात तो सुरू होतो. प्रत्येकाला तो करावाच लागतो, करावासा वाटतोही आणि तरच काही अर्थपूर्ण जगलो असे वाटते. 

आपल्या सर्व बोधपर ग्रंथांमध्ये असे स्पष्ट म्हटले आहे, की आपण स्वतःला ओळखायला शिकतो ते दुसऱ्यांच्या दृष्टीने. आयुष्याचा बराच काळ आपण हे जगही आजूबाजूच्या लोकांच्या नजरेतून पाहतो. आपल्याला नेमके काय दिसते, आपण नेमके काय पाहू शकतो, नक्की आपण कसे आहोत हे आपल्याला कसे समजते हे समजण्यासाठी मात्र हा ‘दर्शक - दृश्य ते अंतर्दृष्टी’ प्रवास आवश्यक आहे. 

त्या प्रवासाचे आत्मभानाच्या संदर्भात तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा दर्शक होण्याचा, दुसरा आपण दृश्य होण्याचा आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा - अंतर्दृष्टी प्राप्त होण्याचा. या विविध टप्प्यांचे आज मनन करूया. 

दर्शक म्हणजे दुरून पाहणारा. जरी पाहणे इथे अभिप्रेत असले, तरी ते पाहणे म्हणजे नुसते बघणे आहे. म्हणजे जणू एखादा चित्रपट बघणे, एखादी मॅच बघणे. आपण जे बघतो आहोत त्यात आपला काहीच सहभाग नाही. आपण फक्त पाहत आहोत. निरीक्षण करत आहोत. कोण काय करत आहे, कसे करत आहे, काय केले म्हणजे काय परिणाम होतात, काय मिळते, काय मिळत नाही इ. फक्त निरीक्षण करत आहोत. या निरीक्षणातून स्वतःला काही सांगत आहोत, स्वतःबद्दल आणि जगाबद्दल. कळतनकळत शिकत आहोत, की आपणही कसे वागायचे.  आपल्यापैकी प्रत्येकजण तान्हे असल्यापासून यथाशक्ती पाहत पाहत शिकत असतो. काही अंतःप्रेरणा नक्कीच असतात शारीरिक वाढीच्या, पण जगायचे कसे हे मात्र आपल्या आजूबाजूच्या लोकांना पाहतच शिकत जातो आपण. आपण कसे आहोत याबद्दलही आपल्या समजुती घडत जातात. 

अगदी साधे की आपण दिसतो कसे हे किती लहान असल्यापासून कोणी ना कोणी आपल्याला सांगत राहतो. आईसारखी आहेस, वडिलांसारखी दिसतेस, नाक यांचे घेतलेस, जिवणी तिची घेतलीस, हसणे अगदी अमक्यासारखे, बोलणे तमक्यासारखे. खरेही असते हे काही प्रमाणात. ज्या घरात जन्माला आलो त्या घरातील लोकांचे गुण येणारच आपल्यात. पण हे गुण आनुवंशिक असल्यापेक्षा ते अनुकरणाने अधिक आलेले असतात, तसेच आपल्यावर बसलेल्या शिक्क्यांमुळे. एक साधे उदाहरण घेऊ. लहानपणी आपण पडतो, धडपडतो, हातून चुका होतात त्यामुळे वेंधळा, बावळट, धांदरट, रागीट, तापट वगैरे शिक्के अगदी सहज आपल्यावर बसतात. आपल्यालाही तसे वाटू लागते. मी रागीट आहे हे अनेक वर्षे ऐकल्याने मग रागीट होण्याची जणू आपण मुभा घेतो आणि स्वतःला तसेच ओळखू लागतो.

आपण कुमारवयात प्रवेश केला, की आपले अनुकरण बदलते. आपले शिक्षक, मित्रमैत्रिणी, समाजातले आपले आदर्श यांचे अनुकरण नकळत आपण करत राहतो. कपड्यांच्या फॅशनची लाट असते, केशरचना, खाणेपिणे यांचेही ट्रेंड्स बदलत राहतात. बहुतेकजण याचे अनुकरण करतात. त्याची मजाही घेतात.

या कुमारवयात, तरुण वयात आपल्या आत्मभानाच्या प्रवासाचा दुसरा टप्पा सुरू होतो आणि आपण ‘दर्शक’ या स्थितीतून दृश्य या स्थितीमध्ये प्रवेश करतो. म्हणजे आता नुसती बघ्याची भूमिका नसते, तर अनुकरण करून, त्यात आपल्या अध्ययनाची भर घालून काही एक होण्याची धडपड असते. स्वतःला सिद्ध करायची, आपल्याला काहीतरी ओळख प्राप्त करून द्यायची. हे दर्शकपण आणि दृश्य असणे मग आपण समांतर अनुभवायला लागतो. सध्या काय सुरू आहे, ते मला येते आहे, जमते आहे की नाही, या निकषांनुसार मी दिसते आहे का नाही, चारचौघांत वावरण्यासाठी मी स्वतःला कसे कॅरी करायला हवे, कोणत्या भूमिकेमध्ये कसे राहायला हवे, कसे वागायला हवे, कसे बोलायला हवे... असे सारे उत्तम दर्शक होऊन, निरीक्षण करून आपण नेमके हेरून ठेवतो आणि ते ते स्वतःमध्ये बाणवायचा प्रयत्न करतो. 

या एका टप्प्यावर आपल्याला उत्तम दृश्य व्हायचे असते. घरामध्ये जी भूमिका असेल तिथे, नोकरी व्यवसाय या ठिकाणी आपल्याला जी भूमिका, जी जबाबदारी मिळाली असेल त्याप्रमाणे, एक उत्तम दृश्य. 

मनात कायम ही धाकधूक, की मला सर्वांसमोर नीट सादर होता आले पाहिजे; ज्याला आपण परफॉर्मन्स म्हणतो. प्रत्येक ठिकाणी तो परफॉर्मन्स उत्तम झाला पाहिजे अशी मनात कुठेतरी पक्की गाठ बसते. मग फक्त आपल्याबाबतीत नाही, तर सर्वांच्याबाबतीत त्या अपेक्षा निर्माण होतात. विविध घरगुती, सामाजिक, व्यावसायिक भूमिकांनुसार मग कसे वागायचे, काय बोलायचे, कसे दिसायचे याचे काही प्रोटोकॉल ठरून जातात. अनेकदा असे हे बाह्योपचार, जे पटकन कोणालाही दिसणारे असतात, त्यामुळे समोरच्या माणसाला समजून घेताना निकष म्हणून वापरले जातात. मग खरेच आत्मविश्‍वास असो वा नसो, पण काय शब्द, वाक्य, कशी बोलली गेली की समोरच्यावर छाप पडेल अशा तऱ्हेचे प्रशिक्षण वर्ग सुरू होतात, तर चेहऱ्यावर नेमके भाव येण्यासाठी किंवा नको असलेले भाव लपवण्यासाठी मेकअपची दुकाने उघडली जातात. सारे काही विविध प्रकारच्या कर्तृत्व फलाटांवर उत्तम दृश्य म्हणून सिद्ध होण्यासाठी. 

हे काहीच चुकीचे नाही बरे का. समाजजीवनाचा, आपल्या जगण्याचा तो अविभाज्य भाग आहे. परंतु हे इतकेच पुरेसे नाही. हे असे उत्तम दृश्य होऊन राहणे यामध्ये कायम स्पर्धा आहे. प्रत्येकाला हे दृश्य व्हायचे आहे. प्रत्येकजण आपापल्या मार्गाने, नवीन नवीन काही शोधत राहणार आणि उत्तम दृश्य असण्याचे निकष बदलत राहणार... यामुळे मग आपल्यात अस्वस्थता निर्माण होऊन बदलत्या निकषानुसार पुन्हा स्वतःला सिद्ध करत राहणार. 

म्हणून एक महत्त्वाचा प्रश्‍न आपण स्वतःला विचारायचा आहे, की उत्तम दृश्य होण्यासाठी मी इतके कष्ट घेतो आहे, त्यातून मला माझ्याबद्दल काही बोध होतो आहे का. माझ्या क्षमता, मर्यादा, कौशल्य, आवडी निवडी, माझ्या श्रद्धा, माझे विश्‍वास, माझी मूल्ये याबद्दल मला काही समजते आहे का नाही. कोणी म्हणतो म्हणून नाही, तर मला माझ्याबद्दल आणि या जगाबद्दल काय वाटते आहे. ‘दृश्य’ अवस्थेतून मला ही अंतर्दृष्टी प्राप्त होण्याच्या अवस्थेकडे जायचे आहे का नाही?

अंतर्दृष्टी ही अवस्था आत्मभानाकडे नेणारी अवस्था आहे. ती दृष्टी आहे, ते एकप्रकारचे पाहणेच आहे, पण बाहेरचे जग बघण्यासाठी नाही तर आपल्या आतले जग पाहण्यासाठी आपल्याला लाभणारी ती दृष्टी आहे. साधा विचार करूया.. सकाळी आरशासमोर उभे राहिल्यावर आपले लक्ष आपण कसे आहोत, कसे दिसतोय याकडे जाते पण आपण कसे आहोत? एक उत्तम दृश्य म्हणून स्वतःला साकारताना आपण हरवून बसलो आहोत का स्वतःपासून, असा विचार येतो का कधी? जे मनात अगदी खरे वाटते आहे ते समजले आहे का आपल्याला व ते करू शकतोय का आपण? सर्वत्र सिद्ध करताना हा स्वतःला आवश्यक असा वेळ हातून निसटून जातो आहे. मग त्या ‘स्व’च्या शोधातला हा महत्त्वाचा टप्पा आपण कधी गाठणार. कोणाला वाटते, कोणाला आवडते, आपले कौतुक होते, सगळे चांगले म्हणतात म्हणून नाही, तर मला काही वाटते म्हणून मी कधी काय करणार. म्हणजेच मी माझ्याकडे माझ्या दृष्टीने कधी पाहणार.

ही अंतर्दृष्टी लाभणे ही एक साधना आहे. त्यासाठी आपल्याला या टप्प्यापर्यंत घेऊन आलेल्या दर्शक आणि दृश्य या भूमिका थोड्या मागे ठेवाव्या लागतात. जे जे आपण आज इथे असे असण्याचे संदर्भ आहेत, मग ते समाज, संस्कृतीचे असतील किंवा शिक्षण, व्यवसाय आणि कर्तृत्वाचे असतील एक ओळख स्वतःला दिली आहे, त्याबद्दल पुरेसा अहंकारही आहे, हे सारे बाजूला टाकावे लागते. मग सगळे अर्थच बदलून जातात. आपण ज्याला चांगले, वाईट, योग्य, अयोग्य.. थोडक्यात उत्तम दृश्य असे म्हणत आहोत आणि त्या दृष्टीने स्वतःला घडवत आलो आहोत, ते सगळे मर्यादित वाटू लागते. आत्तापर्यंत जे जे उत्तम, उदात्त, उन्नत वगैरे जे हवे होते, ते खरेच मिळाले का आपल्याला. आपल्याकडून असे काही व्यक्त, प्रकट झाले आहे का, काही घडले आहे का, हा प्रश्‍न आपल्याला पडतो. मग सुरू होतो आपला अभ्यास पुन्हा एकदा, कदाचित जे करत आलो आहोत त्याचाच पण आता स्वतःसाठी!

पण त्यामुळेच आपण आपल्याला एक वेगळी दृष्टी देत जातो. मग तिथे सादरीकरण नसते तर आत्मप्रकटीकरण असते. कोणी कौतुक करावे म्हणून केलेला परफॉर्मन्स नसतो, तर आपल्यातल्या व्यक्त होऊ पाहणाऱ्या सर्व जाणिवांचा एक आविष्कार असतो. याची अनेक रूपे असतील किंवा आकृतिबंध असतील. कोणी कलेच्या, खेळाच्या, अभ्यास संशोधनाच्या प्रांतात उत्तमोत्तम पातळ्या गाठत जाईल, कोणी काम करताना स्वतःची वेगळी अशी शैली निर्माण करून जाईल. कोणी शुद्ध स्वरूपाचा सेवाभाव आत्मसात करून समाजाच्या, जीवसृष्टीच्या कल्याणासाठी झोकून देईल. आज असे आत्मभान लाभलेले आपल्याही समाजाला लाभले आहेत, ज्यांच्यामुळे अनेकांचे जगणे त्यांनी सुंदर केले आहे. चला आपणही दर्शक आणि दृश्य या टप्प्यांना लवकरात लवकर मागे टाकून त्या अंतर्दृष्टीला प्राप्त करण्याच्या मार्गावर पावले टाकायला सुरुवात करूया. कोण जाणे आपल्यातल्या ‘स्व’ला जागवणारा असा एक उत्तम आत्माविष्कार आपली वाट पाहत असेल. 

संबंधित बातम्या