मानले तर आहे... 

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.

सुख काय आणि दुःख काय; मानले तर आहे, नाहीतर नाही. हे वाक्य आपण सर्वच कधीना कधी म्हणत असतो. कधी विषादाने, कधी फार मोठे सत्य समजले अशा आविर्भावात कोणाला समजावताना, तर कधी खरेच.. ‘मानले तरच आहे’ हे मनोमन पटून. पण फक्त सुख, दुःख इतकेच नाही, तर हे सारे जगच आपल्यासाठी आपल्या मनाने जसे मान्य केले तसेच ते काही असते. एवढेच काय तर आपण जसे आहोत आणि स्वतःला दिसतो आहोत तसे आपण मानतो म्हणून आहोत. उद्या दुसरे काही मानायला सुरुवात केली, की आपण वेगळे असू स्वतःसाठी. आपण नेमके कसे वागायला हवे, काय करायला हवे हे या मान्यतांवर आधारित असते. इतकेच नाही तर जे मान्य करायचे किंवा नाही करायचे, ते तसे का करायचे यासाठीचे निकष, म्हणजे कोणत्या आधारावर आपण असे म्हणणार, हे ही आपल्या मानण्यावर असते. या मान्यतांची आपण विविध प्रसंगी बारशी केली आहेत. कधी आपण त्यांना विश्वास, श्रद्धा म्हणतो, तर कधी दृष्टिकोन, तर कधी आपल्या भूमिका. 

हे मानणे काही वेळा सकारात्मक बाजूने आपल्या समोर येते, तर काही वेळा नकारात्मक. खास करून यश, अपयश हे आपण कसे पाहतो, मानतो त्याबद्दल उदाहरणादाखल काही वाक्ये पाहू. जसे, ‘होय हो, झालो मी अपयशी, अनेकदा प्रवाहातून बाहेर टाकला गेलो, पण मी कधी तसे मानलेच नाही, करत राहिलो, पुढे जात राहिलो.’ हे एक म्हणणे झाले, तर ‘तुम्ही काही म्हणा, माझी कितीही समजूत घाला, हे पहा हरणे म्हणजे जिंकणे नाही. मला माहीत आहे की काय आहे, मी या माझ्या मूर्खपणाला चांगले मानणार नाही.’ 

दोन्ही म्हणण्यात यश आणि अपयश या संकल्पनांचे निकष त्या त्या माणसाच्या मनात अगदी पक्के आहेत. फक्त ते वेगवेगळे आहेत. कुणी पैशाने बुडाला तर आपण समजावताना म्हणतोच, की अरे जाऊदे, किती मनाला लावून घेशील, ते तुझे नव्हतेच असे समज... किंवा कोणी फसवले तर मागच्या जन्मीचे देणे होते आपले असे समज. जेव्हा या समजुती पटतात तेव्हा घडलेले बदललेले नसते, तर त्या समजुतींनी त्या माणसाची त्या प्रसंगाबद्दलची मान्यता बदललेली असते. 

स्वतःला कधी काय समजावे, या मान्यता आपल्याला घडवतात किंवा बिघडवतात. एक दोन उदाहरण घेऊ. ‘वक्ता कसे व्हावे (पब्लिक स्पीकिंग)’ प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षक प्रथम काय सांगत असतील, तर ते स्वतःबद्दलची भूमिका बदलायला. हा कार्यक्रम पार पडल्यावर तुम्ही वक्ते होणार नाही, तर त्या आधीही तुम्ही सगळे वक्ते आहात. सर्वांसमोर उभे राहाल तेव्हा मी वक्ता असल्याचा विश्वास मनात असायला हवा. शब्दसंपत्ती, बोलण्याची पद्धत, संवाद निर्माण करण्याची युक्ती वगैरे हे सगळे शिकता येते. परंतु, मी वक्ता आहे हा विश्वास शिकता येत नाही. तो याच क्षणी स्वतःवर ठेवा. मग आपोआप उत्तम वक्ता म्हणून कसे घडावे यादृष्टीने व्यक्ती पावले उचलू लागते. कौशल्य, युक्ती, पद्धती या शिकण्याच्या गोष्टी आहेत. पण मी कसा आहे, कोण आहे ही मात्र आंतरिक जाणीव आहे. या उलट व्यवस्थापन शाखेतील पदवी घेणाऱ्यांना उलट सांगितले जाते, की इथून बाहेर पडल्यावर तुम्ही लगेच व्यवस्थापक होणार नाही. तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल, कष्ट करावे लागतील. लगेच मोठ्या पगाराची नोकरी, सुंदर केबिन वगैरे अपेक्षा करू नका.

एक गोष्ट आहे, एका कोळ्याची. समुद्राच्या किनारी एका साध्या आणि छोट्या झोपडीत हा कोळी आणि त्याचे कुटुंब राहत असते. तो हुशार कोळी असतो. नेमके चांगले मासे कुठे मिळतात हे त्याला ठाऊक असते. त्याच्या माशांना फार मागणी असते बाजारात. पण तो फार मर्यादित प्रमाणात मासे पकडत असतो. वेळेवर उठणे, सकाळी लवकर मासेमारीसाठी जाणे, दुपारनंतर घरी येऊन घराकडे पाहणे, बायको मुलांना वेळ देणे, त्यांना फिरायला घेऊन जाणे, हिंडणे अशी त्याची दिनचर्या असते. त्याची कीर्ती ऐकून एक मोठा व्यापारी त्याच्याकडे येतो. त्या कोळ्याने सर्व मासे त्याला विकले, तर त्या बदल्यात त्याला दुप्पट तिप्पट किंमत द्यायला तो तयार असतो. पण गावातले नेहमीचे गिऱ्हाईक सोडून देणे त्याला पटत नाही. तेव्हा तो व्यापारी त्याला सांगतो की, ठीक आहे, तू अजून थोडे काम कर, अजून जास्त मासे पकड, मग ते मी घेईन, तुला दुप्पट भाव देईन. त्यावर कोळी विचारतो की मग काय होईल? व्यापारी म्हणतो, की अरे तुला जास्त पैसे मिळतील, तू जरा घरात छान वस्तू घेऊ शकशील, मुलाला उंची कपडे घेऊ शकशील. यावर कोळी पुन्हा विचारतो.. की मग काय होईल? व्यापारी म्हणतो अरे काय होईल म्हणजे काय. छान वस्तू, कपडे याने तू, तुझी बायका मुले खूश होतील. यावर तो कोळी हसतो आणि म्हणतो की आम्ही सगळे आजही खूश आहोत. जरुरीपुरते काम करत आहोत. एकमेकांसाठी वेळ देत आहोत. उद्या गरजा वाढल्या की विचार करू. पण आज आम्ही खूश आहोत. 

ही गोष्ट मला फार वेगवेगळे अर्थ समजावून सांगते. सुख, आनंद हे मानण्यावर असते एवढाच अर्थ इथे नाही. मजबुरीतून तो कोळी काही मान्य करत नाही. तो हुशार आहे, त्याच्याकडे कौशल्य आहे, ते तो वापरतो आहे. तो बाजारात मागणी असलेला आहे. पण याचा परिणाम त्यांनी खुशी, आनंद या त्याच्या व्याख्या आहेत त्यावर करून घेतलेला नाही. कशासाठी काय करायचे हे त्याला पक्के माहीत आहे. भौतिक सुख आणि जगण्याचा आनंद याची गफलत त्या कोळ्याने केलेली नाही. उद्या मुले मोठी झाली आणि संसार वाढला, की आपोआप थोडे आणखी श्रम करावे लागतील हेही त्याला माहीत आहे. पण आज तो खूश आहे. आपल्या कुटुंबाला जो वेळ तो देऊ शकतोय तो पुन्हा पैसे कमावण्यात घालवणे त्याला मान्य नाही. कोणी परक्याने आमिष दाखवले म्हणून नेहमीच्या गिऱ्हाइकांची पंचाईत करणेही त्याला मान्य नाही.

ही अशी साध्य आणि साधन यामध्ये कधीही संभ्रम नसलेली माणसे आपण आपल्या आजूबाजूलाही पाहतो. एरवी जग जिकडे धावते ती वाट सोडून वेगळ्याच वाटेने ती जातात. अनेक दुर्धर वाटा अनेकांसाठी त्यामुळे खुल्या होतात. एरवी आपण सर्वसामान्य माणसांनी मान्य केलेले जगण्याचे ठोकताळे लक्षात न घेता प्रयोग करतात, पडतात, अयशस्वी होतात, बुडतात पण तरी हार मानत नाहीत. त्यांचे कौतुक सर्वांना वाटते, पण तसे वागणे सर्वांना शक्य नाही असे आपण म्हणतो. काय वेगळे असते आपल्यात आणि त्यांच्यात.. तर जगण्यासाठी जे विश्वास आणि श्रद्धा या स्वरूपातल्या ज्या आपल्या मान्यता आहेत त्या वेगळ्या असतात.

काही वेळा आपल्याच मनातील फायदा-नुकसानीच्या मान्यतांचे संदर्भ आपल्याला निराश होण्यास, मनात भीती, साशंकता निर्माण करण्यास, राग, द्वेष, असूया निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. अडचणी, प्रश्न हे जसे आहेत तसे स्वीकारले न जाता ते मुळात का निर्माण झाले, होतात या कारणमीमांसेत सगळी ऊर्जा आणि वेळ जातो. मग लक्ष भलत्याच ठिकाणी जाते. किती मर्यादित करून घेतो आपण आपले रोजचे जगणे. मला माहिती होते की याचा काही उपयोग नाही आणि त्याने अपयशच मिळणार आहे, त्यामुळे मी कधी ते केले नाही हे असे बोलताना केवढे आपले नियोजन असे वाटून किती गर्व वाटतो आपल्याला. यामुळे साध्या शक्य असणाऱ्या प्रयोगांनाही जरा दूर ठेवतो आपण. केवढी विविधता आहे जगण्यात, पण चांगले जगता यावे म्हणून किती चौकटी मनात निर्माण करतो आपण.. पण अर्थात हेही मान्य करूया की सर्वांनाच कृतीमधून ती विविधता जगता येईल असे काही नाही. पण तरी किमान मान्यतांच्या पातळीवर विचार करायला काय हरकत आहे. 

कविराज मंगेश पाडगावकर यांची कविता सर्वांना मुखोद्‍गत असेलच. ‘सांगा कसे जगायचे, कण्हत कण्हत की गाणी म्हणत ते तुम्हीच ठरवा... पेला अर्धा भरला आहे असे ही म्हणता येते, पेला अर्धा सरला आहे असे ही म्हणता येते... काय म्हणायचे ते तुम्हीच ठरवा.’ यातले हे जे ‘ठरवा’ आहे ना, त्या आहेत आपण आपल्यासाठी मान्य केलेल्या गोष्टी. काय मिळाले, काय मिळाले नाही ते कसे ठरवायचे हे ज्याच्या त्याच्या मनात पक्के असते. त्यावरून मग निराश व्हायचे, की उत्साहाने पुढे जायचे ते ठरवले जाते.

आपले तत्त्वज्ञान या सगळ्या मान्यतांच्या पलीकडल्या ‘मी’च्या सत्याचा शोध घेण्यास सांगते. मी म्हणजे माझे मन, माझा देह की आणखी काही. जे मी मान्य करेन तशी माझी भावनिर्मिती होणार, माझे विश्वास आणि श्रद्धा तयार होणार. माझ्यातल्या ‘मी’चा शोध घेण्यासाठी मात्र याच्या पलीकडे जावे लागणार. हे मुळात शब्द समजले तरी ते ज्ञानाच्या पातळीवर समजणे कठीण आहे. ही अवस्था खडतर साधना आणि तपस्येने प्राप्त होणार आहे. पण कदाचित जगण्याचा शेवट येईपर्यंत याच्या थोडे जवळ पोचलो तरी मिळवले. 

पण रोजचे जगताना, कधीतरी एकांतात जेव्हा जगण्याच्या कुठल्या टप्प्यावर हा ‘मी’ आणि त्याच्या मान्यता या संदर्भात विचार होईल, तेव्हा मात्र आपल्या एका वेगळ्या अभ्यासाला आणि शोधाला सुरुवात होईल हे नक्की.

संबंधित बातम्या