शरीर-मनाची युती

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.

एक भक्कम साथ आणि सकारात्मक युती याचे परिणाम हे नेहमीच कोणालाही प्रगतीकडे नेणारे असतात. युती बिघडली की बरेचसे बिनसून जाते. राष्ट्रीय पातळीवरच ही बाब महत्त्वाची आहे असे नाही. वैयक्तिक पातळीवरही तितकीच महत्त्वाची आहे. प्रत्येक माणसाला अशी कोणाची तरी भक्कम साथ असते किंवा त्याच्या प्रगतीसाठी कोणती तरी युती महत्त्वाची असते. थोडा विचार करूया. 
जन्माला एकत्र आले आहेत, मृत्यूलाही एकत्रच सामोरे जाणार आहेत... आणि आयुष्य जगणारही एकत्र आहेत असे आपल्याबाबतीत काय आहे? जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणाची युती आहे?... तर उत्तर एकच आहे... ते म्हणजे शरीर आणि मनाची युती! शरीराची मनाला आणि मनाची शरीराला अतूट अशी साथ आहे. शरीरात मन नेमके कुठे आहे याचे उत्तर जरी पटकन देता आले नाही, तरी मनाचे अधिष्ठान हे शरीरच आहे. हे शरीर आहे म्हणून त्याचे मन आहे. जर दोघांनी एकमेकांना समजून घेतले, तर जगण्याची मजा व त्यात साधली जाणारी एकरूपता ही अद्‍भुत आहे. मानवी जीवनाची ही अत्युच्च साधनाच. 

परंतु, आपलेच शरीर आणि मन कधी बरोबर आहेत, तर कधी नाहीत ही आपल्या सर्वांना अनुभवास येणारी गोष्ट. म्हणजे जिथे आपण ‘शरीराने उपस्थित’ आहोत तिथे नेहमी मनाने असतोच असे नाही. बहुतांश वेळेला आपण असतो एका जागी आणि मन भरकटलेले अनेक जागी अशी अवस्था असते. फक्त प्रेमात पडलेल्या जीवांचीच अशी अवस्था असते असे काही नाही. रोजची कामे करताना हा अनुभव येत असतो अनेकांना. जगण्याचा आनंद, औत्सुक्य तसेच सद्यःस्थितीमधील असमाधान, नैराश्य कशामुळेही आपल्या शरीर-मनाची युती भंग पावू शकते आणि मनाच्या मागे शरीराची फरफट होऊ शकते. कारण शरीर-मनाची आज्ञा मिळाली नाही तर हालणार नाही. पण शरीर एकाजागी स्थिर करून मन मात्र जग हिंडून येईल. 

मनाचा वेग इतका आहे, की कोणत्याही विचार, आठवणी, कल्पना यासरशी.. मनाने आपण कुठेही कधीही, बसल्या जागी जाऊन पोचतोही! कधी कल्पनेने भविष्यात जाऊन जणू डोकावून येतो, तर कधी आठवणींच्या निमित्ताने पुन्हा एकदा भूतकाळ जगून येतो. हे इतके सरावाचे झाले आहे, की हे असेच असते असे आपण गृहीत धरले आहे. त्यामुळे मुळात शरीर-मनाची जोडी अभेद्य असते का, असू शकते का यावर आपलाच विश्वास उरलेला नाही. नेहमीच आपण एकीकडे आणि मन दुसरीकडे असे दुभंगलेले असेच स्वतःला पाहत आलोय. या शरीर मनाच्या असलेल्या किंवा नसलेल्या युतीचा एक पैलू असा... आजचे सोडून उद्याच्या विचारात जगणे. अगदी साधे उदाहरण घेऊ, की आजचे काम संपवताना उद्याच्या कामाचा विचार मनात येतो आणि ते सोपे जावे म्हणून आजचे काम अर्धवट टाकून हळूच, पटकन आपण उद्यासाठी काही तयारी आजच करून ठेवतो. अनेक वेळा फोनवर सूचना देऊन किंवा स्वतः काही गोष्टी करून आजच उद्याच्या काल्पनिक वास्तवात काही क्षण का होईना जगून येतो. अनेक वेळा ही तयारी उपयोगी पडते, मग आपल्या नियोजन कौशल्यावर खूश होऊन आपल्याला ती सवय पडते. ‘कल करे सो आज, आज करे सो अब’ असे म्हणत किती गोष्टी आधीच उरकून टाकतो. 

जगताना काही महत्त्वाच्या घटनांना आपल्याला सामोरे जावे लागते, त्यासाठी आवश्यक आधीची तयारी, थोडा विचार, अभ्यास याबद्दल मी बोलत नाहीये. तर, आजच्या क्षणात जगण्यापेक्षा उद्याची काळजी करून उद्याचे आजच अंगावर ओढून घेण्याच्या मानसिकतेबद्दल किंवा मनाच्या या वागण्याबद्दल हे थोडे आहे. काल्पनिक उद्याच्या चिंतेने आज मिळालेला क्षण नीट न जगता येणे याबद्दल हे आहे. अनेक वेळा असेही लक्षात येते, की छे, फार विचार केला, उगाच भलभलत्या कल्पना केल्या, असे काही झालेच नाही. बराच वेळ वाया गेला. एका काल्पनिक उद्यासाठी आजचा दिवस मात्र थोडा ताणात घालवला. नियोजन करून भविष्य सुरक्षित करणे हे आजच्या काळात योग्यच आहे, पण त्यामुळे आपले आजचे काही क्षण उगाच त्रासात जात आहेत का असा विचार करून पाहिला तर! उद्याच्या चिंतेने आपल्या पंचज्ञानेंद्रियांना आज आत्ता अनेक सुंदर गोष्टींचा अनुभव घेण्यापासून आपण उगाच मागे ओढत आहोत का हा विचार केला तर! अनेक साधे साधे क्षण साजरे करून जगता आले तर! (परिणामाचा विचार न करता कोणत्याही वाममार्गाने केलेल्या आजच्या कामाचा आनंद इथे अर्थातच अभिप्रेत नाही.) 

जसे आज सोडून उद्याच्या चिंतेत रमणारे आपण भूतकाळाच्या पटलावरही बरेच रमतो. पूर्वी काय काय घडले होते आणि ते का तसे घडले, हे आपण स्वतःला विचारल्याशिवाय राहत नाही, किंबहुना राहूच शकत नाही. ‘बीत गयी सो बात गयी..’ श्रेष्ठ कवी हरिवंशराय बच्चन यांची ही कविता. पण ही आपल्याला आचरणात आणायला पटकन जमत नाही. काल न जमलेले, न मिळालेले, कोणी अपमान केलेला, कोणी अजून काही म्हटलेले, कधी आपलेच चुकलेले, थोडा राग, थोडे अपराधीपण असे सगळे आपण आपल्या खांद्यावर घेऊन पुढचा दिवस गाठतो. पण मन मागच्या वाटेवर रेंगाळलेले अनुभवतो. काही वेळा कालचा दिवस जरा वाईट गेला असला तरी आजचा, दुसरा दिवस छान असतो. पण मनात थोडे कालचे ठुसठुसत असतेच. आज माझा मूड नाही... हे कालच्या दुःखाने, किंवा उद्याच्या भीतीने, काळजीने कशामुळेही असू शकते. काल घडलेल्या चुका पुन्हा घडू नयेत हे बरोबर, काल जसे फसवले गेलो तसे आज होऊ नये हेही बरोबर, स्वतःला वाचवायला हवे अनेक गोष्टींपासून हेही ठीक. पण कालचा क्षण मागे टाकून नवीन अनुभव घ्यायला आपले हात, पाय इत्यादी अवयव आणि मेंदू पुढे आले आहेत. तर मनाने आपण किती मागे राहायचे हा विचार करून शरीर मनाची युती जमवायला थोडी मदत करता आली तर पाहू...!  

याच, शरीर आणि मन यांच्या दुभंगलेपणाचा अजून एक पैलू - आपल्या क्षमता, कौशल्ये, मनातील इच्छा, ते करण्यासाठी आजूबाजूच्या वातावरणात असलेल्या संधी यांचा संगम साधून जे काही आपण ध्येय ठरवलेले असते, संकल्प मनाशी निश्चित केलेले असतात, त्यानुसार आपण ठराविक काळानुसार कृती मनाशी पक्क्या ठरवलेल्या असतात. परंतु सर्वच ठरवलेले जमते असे नाही, त्यात अडचणी येतात. मग आपल्या नियोजनात आपण बदल करतो. हे असे सगळे पद्धतशीर झाले तर ठीकच. पण हा नियोजनातील बदल आपल्याला शांतपणे सारे काही करू देईल का नाही हे सांगता येत नाही. मला असे करायचे नव्हतेच, हे सगळे माझ्या मनाविरुद्ध आहे, हे सगळे मी जबरदस्तीने करते आहे असे म्हणून ती बदललेली कृती करत असूनही आपले मन मात्र तिथे नसते. आपण त्या काल्पनिक नियोजनातल्या फसलेल्या, न जमलेल्या गोष्टीत अडकून पडतो. खरे तर आपले शरीर तयार असते प्रशिक्षणासाठी. पण मनच थोडे मागे ओढते आपल्याला. कोणत्या कृती आणि क्रिया करायला हव्या असा संदेश मेंदूतील माहितीने आपल्याला दिलेला असतो, पण आपले मनच ते मानायला तयार नसते. अशा वेळी मनाला थोडे समजवायला हवे.. मनाचा निर्धार असेल तर शरीरही खडतर परिश्रम करायला सज्ज होईल, नाही का! 

अजून एका गोष्टीमुळे शरीर मनाची साथ सुटते... ती म्हणजे जेव्हा मनाच्या आणि शरीराच्या गरजा यात फरक पडत जातो तेव्हा. हेसुद्धा आपण अनेक वेळा अनुभवत असतो. शरीर थकलेले आहे, पण मन मात्र अजून ताजेतवाने आहे. मनाच्या ताकदीवर आपण शरीराला ओढून पुढे नेत आहोत. शरीर निवृत्त होत आहे, पण मन मात्र अजूनही अनेक लालसा, लोभ, इच्छा यांवर रेंगाळले आहे. मनाने तरुण असायला काहीच हरकत नाही, जेवढे जमते आहे तेवढी जगण्याची मजा घ्यायलाही काही हरकत नाही, झेपेल तितके काम करायलाही हरकत नाही. शरीराने मनाच्या ताकदीला साथ देऊन आपली क्षमता वाढवायला हवी हे तितकेच खरे, पण शरीरावर त्याचा जर विपरीत परिणाम होतो आहे आणि आपल्या बिघडलेल्या तब्येतीमुळे आपले जगणे परावलंबी होऊन अनेकांना त्रास होतो आहे, असे होत असेल तर ते योग्य आहे का हा विचार करायला हवा. इथे आपल्या शरीर-मनाची युती बिघडते आहेच आणि आपले स्वातंत्र्यही आपण गमावत आहोत. 

कोणीही कितीही साथ दिली तरी शेवटी आपल्या शरीराने मनाची साथ सोडली तर त्याचा काही उपयोग नाही. आपल्या शरीरमनाचे अद्वैत आपणच ओळखायला हवे. मनाची धाव ही कायम पुढे किंवा मागे असणार आहे. त्या मनाला ज्याक्षणी जिथे आहोत तिथे राहण्याचे प्रशिक्षण देणे खूप आवश्यक आहे. मनाच्या ताकदीवर हे शरीर अनेक कर्तृत्व गाजवू शकते, अनेक अशक्य अशी कामे करू शकते. म्हणून मनाच्या विचारांचा केंद्रबिंदू बाहेरचे जग नाही तर मनाच्या आणि शरीराच्या क्षमता आणि त्यांचा योग्य मेळ असा असायला हवा. शरीर-मनाची ही युती आपल्याला कृतज्ञता मानायलाही शिकवते. आत्ता जिथे आहोत, आलो आहोत तिथून नक्कीच पुढे जायचे आहे, पण आत्ताच्या या क्षणासाठी मन जर खूश असेल तर या युतीचा पुढचा प्रवासही सोपा होतो. ही युती एका सुंदर जगण्याची सुरुवात आहे... आणि आत्मप्रकटीकरणाच्या प्रवासाची पहिली पायरी!

संबंधित बातम्या