व्यासंग

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
बुधवार, 26 फेब्रुवारी 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.

शरीर-मनाची युती आणि एकमेवत्व या संकल्पनांचा विचार करताना मागच्या लेखात एक उल्लेख असा केला होता, की संग करणे हे प्रत्येक मानाचा स्वाभाविक गुणधर्म असला, तरी व्यक्तिमत्त्व खुलते आणि मनाची प्रगती होते ती वैचारिक व्यासंग असेल तरच. कारण व्यासंग यामध्ये मनाला जोडणारा संग असला तरी ते नुसतेच गुंतून पडणे नाही. कोणत्या तरी विचारांमुळे, गोष्टींमुळे जगण्याचे प्राधान्य क्रम बदलत असले, थोडे त्या विषयाच्या दिशेने आपण वाहवत जाणार असलो तरी त्यात खूपच सकारात्मकता आहे. व्यासंग या शब्दाचा अर्थ ‘कोणत्याही गोष्टीचा ध्यास’ आणि ‘खोलवर अभ्यास’ असा आहे. त्या अभ्यासाबद्दल आसक्ती असाही आहे. ज्या विचारांशिवाय आपण राहू शकणार नाही, ज्या गोष्टी केल्याशिवाय चैन पडत नाही किंवा त्या गोष्टींचे अनेकविध आयाम समजून घेतल्याशिवाय स्वस्थता लाभत नाही... याला व्यासंग म्हणतो आपण. व्यासंग ही अशी बाब आहे की त्यामध्ये एकांत आणि एकमेवत्व दोन्हीची मजा लुटता येते.

अमुक अमुक व्यक्तीचा एखाद्या गोष्टीचा व्यासंग किती दांडगा होता... असे वाक्य अनेक दिग्गज लेखक, कलाकार यांची ओळख करून देताना आपण वापरतो. तेव्हा काय डोळ्यासमोर येते? किंवा मनात काय विचार होतो? व्यासंग या शब्दाबद्दल विचार केला जातो का, त्याचे मनन होते का, चिंतन होते का, तर अजिबात नाही. फक्त हा माणूस काय ग्रेट आहे एवढा विचार मात्र चमकून जातो. आणि ग्रेट माणसे ही वेगळीच घडतात. ती कसलेतरी वरदान लाभलेली असतात. आपण सामान्य आपल्याला असे काही जमणे शक्य नाही असे नकळत आपण मनात ठरवून टाकतो.

म्हणून आज हे समजून घेऊ, की आपल्यालाही व्यासंगी होता येईल का. व्यक्तिमत्त्वाची उभारणी आपोआप होत नसते. त्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. अनेक छोट्या मोठ्या मोहात आपण गुंतून पडलेले असतो आणि मग तेच जगणे खरे असे मानून त्यात अधिकाधिक अडकत जातो. त्यातून स्वतःला बाहेर काढून ज्यामध्ये आपल्या मनाची प्रगती आहे, असे काही करायचे असेल तर कंबर कसून तयारी करायला हवी. ज्या वैचारिक प्रक्रियांमध्ये गुंतल्यामुळे भौतिक मोहापासून आपण दूर जाऊ, एवढेच नाही तर ‘मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो.. जीवन त्यांना कळले हो..’ यासारखे काही काही आपल्याही जगता येईल असे वाटत असेल तर या व्यासंगी मनाचे पैलू समजून घ्यायलाच हवेत.

पहिला पैलू आहे अध्ययनाचा. म्हणजे अभ्यासू मन. खरे तर लहानपणापासून आपल्या मनावर अभ्यास आणि परीक्षा यांची युती इतकी पक्की ठसली गेलेली असते, की अभ्यासाबद्दल जरा नावडच उत्पन्न होते. अध्ययन/अभ्यास याचा खरा अर्थच कितीतरी काळ आपल्याला समजत नाही. मग त्या अध्ययनाशी जवळीक कधी निर्माण होणार. ज्या गोष्टी समजून घेतल्याने, आपल्या विचारात बदल होतो, त्या गोष्टीचे विविध आयाम समजतात, आपल्या वर्तणुकीमध्ये बदल होण्याची शक्यता वाढते, आपण व्यक्त व्हायला शिकतो, अनेक गोष्टींचे सहसंबंध समजतात... अशा सर्व गोष्टी जेव्हा घडतील, तेव्हा तो अभ्यास किंवा ते अध्ययन म्हणायचे. एखाद्या लेखकाचा व्यासंग मोठा, असे आपण म्हणतो म्हणजे त्या लेखकाचे विविध विषयावर वाचन, मनन, चिंतन असते. जे विषय वाचनात आले त्याबद्दल संशोधन करून माहिती जमा केलेली असते. वाचनाबरोबर लिखाणाच्या अनेक पद्धती त्यांनी अजमावून पाहिलेल्या असतात. अशा लेखकांनी फक्त साहित्याचे नाही, तर विविध अभ्यास विषय साहित्यिक अंगाने कसे आले आहेत यावरही चिंतन केलेले असते. त्यांच्याशी बोलताना आपल्याला ते त्या विषयाचे कितीतरी संदर्भ देऊ शकतात, सामान्यपणे त्याचा विचारही झालेला नसतो. म्हणजेच जळी स्थळी काष्ठी पाषाणी यांना त्या विषयाचा अभ्यास, संशोधन दिसत राहते. मन नक्कीच गुंतत जाते. पण हे गुंतणे मनाच्या प्रगतीकडे घेऊन जाणारे असते. विश्लेषणात्मक कौशल्य विकसित होतात त्याबरोबर सर्वसमावेशकताही निर्माण होते. अनेक जगण्याच्या संदर्भातून मनाला झापड बांधून जगायची जी सवय झालेली असते ती दूर होते. एक व्यापकता येत राहते, आपल्या वेदन आणि संवेदन प्रक्रियेमध्ये.  

यातूनच एक पैलू मनाला पडतो तो समर्पणाचा. म्हणजे वाहून घेणे. अनेकदा अशी माणसे दिसतात आपल्याला जी विषयाचे संदर्भ शोधायला जगाच्या पाठीवर कुठे कुठे जायला तयार असतात. तिथे फायदा, नुकसान हा विचार नसतो, पण जो विषय माझ्या संशोधनाचा आहे त्यामध्ये अधिकाधिक खोलवर जाण्यासाठी वाटले ते करतात.  

जणू त्या विषयाच्या अभ्यासाने जगण्याचे कोणते तरी अमूल्य तत्त्व अथवा अवघे तत्त्वज्ञान शोधल्यासारखा हा आविर्भाव असतो. पण त्याचा एकही अभिनिवेश नसतो. जणू तो अभ्यास विषय, तत्त्व, मूल्य ही त्यांचा श्वास होतात. तरी स्वतःचे अथवा जो अभ्यास आहे त्या विषयाचा, विचारांचा फार उदो उदोही नसतो. उलट अगदी साधेपणाने आपण खूप काही दुर्मीळ भाव जगणारी ही माणसे असतात. सहजपणे समजून घ्या असाच त्यांचा आग्रह असतो. 

थोडा विचार करूया की आहे का असा एखादा विषय आपल्या मनात, की ज्याच्या अगदी तळापाशी आपल्याला पोचायचे आहे. जर असेल तर त्याचा आवाका लक्षात घेऊन, व्याप्ती ठरवून काही काळ असा अभ्यास करून पाहूया. जमेल, नाही जमेल असा काहीच विचार न करता ठरवून टाकू, की असा एक प्रयोग करून पाहायचा आहे. मनापासून, विश्वासपूर्वक! कोण जाणे एक छान अभ्यास आपल्याला खरेच काही जगण्याचे वेगळे आयाम दाखवून जाईल.

ही समर्पणाची भावना आपल्या मनाचा आणखी एक कंगोरा दाखवून देते तो म्हणजे एकाग्रता. एकाग्र होणे म्हणजे एका जागी तासनतास बसता येणे अभ्यास करत, असे आपल्याला वाटत आले आहे. पण असे अजिबात नाही. एकाग्रता याचा अर्थ असा, की कुठल्याही प्रकारचे काम करा, वाचन करा, पण समेवर आल्यासारखे आपल्या विषयाशी ते जोडता येणे. तसेच नेहमीच तो विचार, विषय आपल्याबरोबर आपल्याला नेता येणे. जणू बाकीच्या जगाशी केवळ कर्तव्य आणि जबाबदारी पुरता संबंध आहे, पण जगणे मात्र त्या विचाराच्या अनुषंगाने होते आहे.. म्हणजे एकाग्रता. म्हणजे ही एकाग्रता आपोआप आपल्या मनाला इतर संगापासून विभक्त करते. आपला अभ्यास विषय आपल्यात भिनत जातो आणि इतर जगण्याचे विषय नुसते नावापुरते उरतात. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला सापडतील. व्रत घेतल्याप्रमाणे काम करणारे सर्वजण हे त्यांच्या कार्यात मग्न आणि इतर ऐहिक जगापासून विरक्त असतात. अनेक समाजसेवक, मुलांमध्ये काम करणारे, शास्त्रज्ञ, कलाकार, लेखक, संगीतकार... हे सर्व व्यासंगीच. 

ही एकाग्रता, मग्नता या थोड्या काळापुरता आपल्यावर प्रभाव टाकतात असे नाही, तर ती हळूहळू साधना होत जाते. रोजचा दिवस कसा जगायचा यामध्ये प्रत्येक क्षणात आपल्या अभ्यास विषयाचा आणि त्याच्याशी निगडित विचारांचा संदर्भ येत राहतो. आपण रिकामे बसत नाही, नुसतीच घटकाभर करमणूक नको, तर अर्थपूर्ण काही अनुभव हवेत असे वाटत राहते. तसेच, या अभ्यासामुळे आपल्या आवडी निवडी, आपले प्राधान्य, आपल्या संवेदना, आपल्या मनोभूमिका या सगळ्यात बदल होत जातो. आपल्या विचारांच्या त्या छोट्या जगात जणू सगळे ब्रह्मांड सामावले असते. आपला पसारा कमी होतो आणि विचारांच्या एक एक पातळ्या आपण वर सरकायला लागतो. मग यश अपयश हे सर्व मागे पडते. कोणी बरोबर आहे, नाही, हेही फारसे आपल्यावर प्रभाव टाकत नाही. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आपण अनुभवतो.

याची सुरुवात होते ती एका अभ्यासू मनामुळे. हे अभ्यासू मन अचानक मिळणार नाही. ते तयार करावे लागेल. या परीक्षेविना अभ्यासातून मिळणाऱ्या आनंदाचा एक तरी अनुभव आपण आपल्या स्वतःला द्यायला हवा. आपण जो विचार करतो, आपली जी मते तयार होतात, ज्या मनोभूमिका असतात त्याचपासून सुरुवात करता येईल. कोणताही एक विषय आपल्या आवडीचा घेऊन त्याच्या मुळापर्यंत जाऊन पाहिले, तर किती समाधान मिळते आणि आपल्या वागण्यात किती बदल होतो हे प्रत्यक्ष करून पाहायला हवे. एकदा तरी हा अनुभव घ्यायला हवा. मनाच्या संगापासून व्यासंगापर्यंतचा प्रवास करायला हवा.  

कशासाठी इतका अट्टहास? असा प्रश्न ही पडू शकेल वाचकांना. पण या व्यासंगातून आपल्याकडून समाजाला जे योगदान दिले जाते त्याचे समाधान वेगळेच असते. ‘एकमेवाद्वितीय’ असे काम निर्माण होणे हे यातूनच घडते. मग ते लेखन असेल, एखाद्या समाजपयोगी विचारावर आधारित संस्थेची उभारणी असेल, एखादी वैचारिक चळवळ उभी करणे असेल, एखादा उद्योगधंदा असेल, काही सृजनशील कलाकृतीची रचना असेल, अथवा नवीन विचार आणि कृतींची संरचना असेल. हे असे घडणे तात्कालिक नसते तर कायमस्वरूपी असते. हे असे योगदान केवळ विचारांच्या व्यासंगातूनच शक्य आहे. म्हणजेच या योगदानातून फक्त स्वतःच्या व्यक्तिमत्वाचे खुलणे, उमलणे एवढेच शक्य होते असे नाही, तर अनेकांच्या जगण्याला आकार मिळणे शक्य असते. एका ‘मीच्या व्याप्त होण्याची’ ही प्रक्रिया आहे. माझे प्रश्न, माझ्या समस्या, माझी दुःख यातून कायमचे बाहेर पडून अनेकांच्या जगण्याला आकार देता येण्याची ही वाट आहे. 

ही वाट अनोळखी नाही, पण सर्वच जण निवडतात असेही नाही. याचे प्रसारपत्रक, माहितीपत्रक मिळणार नाही. पण जर आपण ही वाट निवडली, तर आपण याचा प्रसार करू शकू हे नक्की.

संबंधित बातम्या