कर्मफल (पूर्वार्ध)

डॉ. पल्लवी मोहाडीकर-कासंडे 
सोमवार, 2 मार्च 2020

मनतरंग
मन... डोळ्यांना न दिसणारं, पण तरीही रोजचं जगणं प्रभावित करणारं... त्याची रूपंही अनेक... अशा या मानवी मनाचा वेगळ्या नजरेतून वेध.

प्रत्येक काम चांगले व्हायला हवे असे सर्वांनाच वाटते. त्यासाठी ते आपल्या हातून होते आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे. चांगले काम करण्यासाठी काय हवे? क्षमता, साधने, संधी आणि एक मनोभूमिका? हा शेवटचा घटक अधिक महत्त्वाचा. मनोभूमिका! म्हणजे काम किंवा कार्य करताना मनाची असलेली भूमिका. कोणते काम करावे, कधी करावे, नेमके कसे करावे याबरोबर महत्त्वाचे हेही आहे की ते किती मनापासून करावे. ते काम आवडीचे असेल तर ते मनापासून होतेच असे आपल्या सर्वांना वाटते. पण नेहमीच तसे नसते. कारण काम आवडीचे असले तरी आपण ते का करत आहोत किंवा कोणासाठी करत आहोत आणि त्याचा काय परिणाम आवश्यक आहे, किती मोबदला मिळणार आहे, यावर ते चांगले होईल की पाट्या टाकल्यासारखे होईल ते ठरते. म्हणूनच कामाचा प्रकार, त्यासाठी आवश्यक असलेली सृजनशीलता, त्यातून आपल्याला काय शिकायला मिळत आहे, आपले मन त्या प्रक्रियेमध्ये रमते आहे का हा विचार त्या कामाचा मोबदला काय मिळणार आहे यापेक्षा अधिक असायला हवा असे वाटते. 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। 
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि॥
भगवद्‍गीतेतील दुसऱ्या अध्यायातील हा ४७ वा श्लोक. कर्मयोगाचे सार सांगणारा. 

अर्थात काम/कर्म करीत राहणे यावरच फक्त माणसाचा म्हणजे आपला अधिकार आहे. पण त्याच्या परिणामावर नाही. त्याच्या फळावर नाही. फळाची आसक्ती ठेवू नका. कर्मफळामध्ये न अडकता कार्य करत राहा. 

हा ‘कर्मयोग’ कर्म कसे करायचे हे सांगताना काम तन-मन अर्पून करायला हवे हेच तर सांगत नसेल? या दृष्टीने या कर्म करण्याच्या युक्तीकडे आपण कधी पाहिले आहे का? यावर अनेक चर्चा, कीर्तने, निरूपणे आणि व्याख्याने आपण ऐकतो. हा विषय बहुतेकांना तत्त्वज्ञानातील अवजड विषय वाटतो. मग जिथे कुठे ऐकून आलो आहोत तिथेच हा विषय आपण सोडून येतो किंवा आपण एकटे वागून काय उपयोग इतरांनीपण तसे वागायला हवे, सर्वांना समजायला हवे असे मनातल्या मनात म्हणून मग पुराणातली वांगी पुराणात या कथेप्रमाणे प्रत्यक्ष आचरणात काहीही येत नाही. 

‘कर्मफळ’ म्हणजे जे लेखाच्या सुरुवातीला म्हटले आहे ते... कर्म केल्यानंतरचे फळ, म्हणजे त्याचा परिणाम, अर्थात आपल्याला हवासा वाटणारा त्याचा मोबदला. या कर्मफळाची आसक्ती म्हणजे आपल्याला जे आपल्या कामाचे परिणाम, मोबदला अपेक्षित आहे त्यामध्ये अधिक गुंतत जाणे. हे अगदी स्वाभाविक व खरे, की आपण जे काम करत असतो त्याला एक ध्येय असतेच. त्याचा काहीतरी लाभ मनात गृहीत धरलेला असतो आणि जरी गृहीत नाही धरला, तरी त्याचा काहीतरी लाभ होणारच असतो. तो लाभ मिळवणे, ते ध्येय साकारणे हेच तर त्या कर्माचे कारण असते. म्हणजे जसे अभ्यास करणे या कर्माचे फळ परीक्षेतील गुण आणि नोकरी, कामधंदा या कर्माचे फळ पैसा, समृद्धी, प्रतिष्ठा. 

परंतु, हे फळ मिळायच्या आधी ते कर्म करण्याची, कार्य संपन्न करण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते. अर्थातच ती प्रक्रिया परिणामांकडे घेऊन जाणारी असते. त्या कार्य/काम करण्याच्या प्रक्रियेलाही तेवढेच महत्त्व असते. पण जेव्हा त्या प्रक्रियेमधले मन उडते आणि हळूहळू ते परिणाम कसा साधला जाईल यावर येऊन बसते, तेव्हा मग ती काम करण्याची प्रक्रियाही बदलते. त्यातले तत्त्व गायब होऊन मग ते एक तंत्र होते. 

सध्या परीक्षांचे दिवस आहेत, मग अभ्यास आणि परीक्षेचे उदाहरण घेऊया. अभ्यास का करायचा किंवा करावा लागतो, तर त्यातून त्या विषयाची माहिती मिळते हे खरे; पण त्या विषयाची परीक्षा द्यावी लागते म्हणूनही अभ्यास केला जातो. मग परीक्षा देऊन त्या गुणांवर पुढचे शिक्षण किंवा नोकरी हे आणखी पुढचे ध्येय अथवा परिणाम झाले. यात अभ्यास म्हणजे ‘विषय समजून घेऊन, त्या विषयात मन रमवून, त्या विषयाचा आपल्या रोजच्या जगण्याशी किंवा प्रत्यक्षातील कोणत्या कार्याशी, कामाशी असलेला संबंध समजावून घेऊन केलेले वाचन, लिखाण, अवलोकन वगैरे वगैरे.’ जेव्हा त्याचे उद्दिष्ट परीक्षा असे होते, तेव्हा मग मूल्यमापन कसे केले जाणार आहे याचाही अभ्यास करताना विचार केला जातो. केवळ त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन काम भागणार नसते, तर त्या गुणांचा पुढच्या शिक्षणाला उपयोग होणार असतो. 

मला हवे असणारे परिणाम साध्य होणार की नाही, म्हणजे गुण, ही चिंता वाढत जाते; तसतसे मग अभ्यास प्रक्रियेवरचे लक्ष सरकत सरकत परीक्षा उत्तीर्ण होणे या परिणामावर केंद्रित केले जाते. मग सुरू होतो अभ्यासच पण फक्त त्या निश्चित केलेल्या परीक्षांसाठी. जो अभ्यासातील रस वाढवण्यापेक्षा अभ्यासाचा ताण, त्याची भीती आणि नंतर अपेक्षित गुणांची काळजी निर्माण करणारा असतो. मग अशी शक्यता निर्माण होते की समजावून घेणे, अवलोकन झाले नाही तरी चालेल, परीक्षेपुरते लक्षात राहिले तरी खूप झाले. आज हे सार्वत्रिक आहे आणि यामुळे अभ्यास करणे या एका अत्यंत मनोरंजक आणि सुंदर प्रक्रियेपासून विद्यार्थी अनेक योजने दूर गेले आहेत.

हे असे म्हटले म्हणजे याचा अर्थ परीक्षेवर लक्ष केंद्रित करायचे नाही असे अजिबात नाही. परीक्षा द्यायचीच आहे. पण अभ्यास फक्त परीक्षेपुरता न करता तो सखोल आणि विषय आत्मसात करण्यासाठी करायचा आहे.

असे प्रत्येक कामाचे नाही का. कामाचा परिणाम आहेच आणि तो हवाच आहे. तो काहीही असेल. मगाशी म्हटल्याप्रमाणे मला पैसा मिळावा, समृद्धी मिळावी इथपासून सर्व जगाचे कल्याण व्हावे इथपर्यंत काही ना काही ध्येय हे असणारच आहे. आपल्या कामाचा मोबदला मिळावा ही अपेक्षा असणे हे चूक नाहीच. परंतु मनापासून सर्व शक्ती, क्षमतेनुसार काम करणे आणि फक्त मोबदल्यापुरते करणे या दोन्ही मनोभूमिकांमध्ये फार मोठा फरक आहे. कर्माचे फळ हे असायलाच हवे पण ते माझ्याच मनासारखे असायला हवे, ही झाली आसक्ती; तिचा त्याग करायला हवा. नाहीतर कार्याच्या प्रक्रियेमधील लक्ष कमी होणार. काहीवेळा ते परिणाम साध्य करण्यासाठी मग चुकीचे मार्ग ही अवलंबिले जाणार किंवा ‘कितीही करा आपल्याला काय फार मोठे मिळणार आहे’ हा विचार नुसता मनात जरी आला, तरी हातात असलेल्या कामातले थोडे लक्ष बाजूला जाणार व तर मी केलेल्या कामाची गुणवत्ता कमी होणार. 

पगार मिळतोय तेवढे काम मी करणार असे म्हणून मग पगारापेक्षा जास्त करतोय असेही वाटू लागेल, मग पगाराइतकेही काम होणार नाही. आपल्याला फार काम पडते आहे हे वाटणे याला वय, शिक्षण, पद किंवा क्षेत्र याचे काही बंधन नाही... ते कोणालाही वाटू शकते. 

काम करणाऱ्याला नेहमीच काम करावे लागते असेही सर्वत्र बोलले जाते. मग अशा लोकांवर कामाचा बोजाही वाढतो. जो नक्कीच ताण निर्माण करणारा असतो. पण तिथे जेव्हा अति होईल, तब्येतीवर परिणाम होत असेल, तर नाही म्हणायलाही शिकावे लागते. पण बहुतांश लोक याची वाट पाहायच्या आधी काम करणेच सोडून देतात.

ज्या कामातून आपल्या मनासारखे आपल्याला मिळणार नाही असे वाटत असेल, तर आधीच ते काम नाकारणे किंवा मग त्याचा मोबदला वाढवून मागणे हे मार्ग अधिक चांगले. पण जेव्हा एखादे काम आपण स्वीकारतो तेव्हा मधेच त्यावरचे लक्ष उडू देऊन काम नीट न करणे हे कोणाच्याही दृष्टीने चांगले नाही. ज्यांच्यासाठी काम करतोय त्यांनाही आपण फसवत असतो आणि स्वतःलाही. कामाच्या होणाऱ्या परिणामांत अडकून न पडता कर्म करण्याची प्रक्रिया पूर्णपणे अनुभवणे, त्याचा आनंद घेणे हे खूप महत्त्वाचे. काहीच मिळत नाही असे नसतेच. काहीना काही मिळत असतेच आपल्याला, अगदी मनासारखे सगळे झाले नाही तरी. म्हणूनच काहीही झाले तरी माझ्या हातून प्रत्येक काम उत्तम झाले पाहिजे हा आग्रह स्वतःशी धरणे हेच योग्य. आपले एकमेवत्व यातून तर उमलणार आहे.

तसेच मोबदला उत्तम नसेल तरी ते काम आपल्या हातून चांगले होणे यातून आपणच त्या कामाची एक उत्तम पद्धत घडवत जाणार असतो. एक बेंचमार्क सेट करण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल असू शकते. आपले कौशल्य वाढते, नवीन काही शिकणे होते, तसेच असे व्रत घेतल्याप्रमाणे काम केल्याने आपले काम पाहून नकळत समोरचा एखादा जो संभ्रमात असतो की आपण काय करावे.. तो प्रेरित होऊ शकतो. आपल्या मेंदू या संगणकातील डेटा अपडेट होत राहतो, रिफ्रेश होत राहतो.  

अपेक्षा न ठेवता केलेले काम हेच सर्वांत उत्तम आणि सर्वांनी अपेक्षा न ठेवताच करायला हवे असे अजिबात नाही. प्रत्येक कामाचे ध्येय हवेच. पण काम केल्याने मिळणारा आनंद मोबदल्याच्या विचाराने जाऊ नये. चांगले काम होण्यासाठी जी मनोभूमिका आवश्यक आहे, त्यात परिणामांची काळजी, भीती किंवा अपेक्षा ही काम करण्याच्या प्रक्रियेपेक्षा जर जास्त महत्त्वाची होऊन कामाच्या गुणवत्तेवर होऊन त्याचा परिणाम होऊ नये. उत्तम सुखसोयीयुक्त गुणवत्तेचे जगणे आज आपल्या सर्वांना हवे आहे. त्यासाठी कोणीतरी उत्तम, गुणवत्ता असणारे कामच केलेले असणार आहे. मग आपणही जे नेमून दिलेले काम आहे ते परिणामात न गुंतता मनापासून करू आणि गुणवत्तापूर्ण जीवन निर्माण करण्यात हातभार लावू.
 

संबंधित बातम्या